नवसाला पावणारा उभादेव
'येवा कोकण आपलाच आसा' असं दिलखुलास आमंत्रण देणारा सिंधुदुर्ग जिल्हा ! आपल्या मालवणी बोलीने आणि जेवणाने सर्वदूर प्रसिद्धी झाला. शिवरायांनी स्वतः बांधलेल्या मालवणजवळील सागरी किल्ल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वाचं स्थान आहे. नेहमीच्या पर्यटनस्थळांव्यतिरिक्त आवर्जून भेट द्याव्या, अशा अनेक निसर्गरम्य जागा जिल्ह्यात आहेत. तळकोकणातील मंदिरे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे देखणी आहेतच. तशीच गूढ आणि वेगळी वैशिष्ट्ये असलेली देवस्थानेदेखील जिल्ह्याच्या परिसरात प्रसिद्ध आहेत. असेच एक अनोखे देवस्थान आहे, 'श्री उभादेव'… गडनदी आणि जनवली नदीच्या काठावर वसलेल्या कणकवलीजवळ हे मंदिर आहे. कणकवलीहून कुडाळकडे जाणाऱ्या महामार्गावर एक किलोमीटर अंतरावर वागदे गावाच्या सीमेवर उभादेव हे जागृत देवस्थान वसलेले आहे. रस्त्यालगत असेलेल्या वाहनतळापाशी 'श्री उभादेव प्रसन्न' अशी कमान आपलं स्वागत करते. गड नदीच्या तीरावर गर्द झाडीमध्ये विसवलेल्या महाकाय वृक्षाच्या छायेत साधारणतः २५ फूट उंचीची एक शिळा उभादेव म्हणून पुजली जाते. नजीकच्या रत्नगिरी आ...