धक धक चंदेरी !
ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला रौद्रभीषण सह्याद्री हा निसर्गाचा एक अद्भुतरम्य अविष्कारच आहे. उंचच उंच सुळके , खोल खोल दऱ्या , दाट दाट झाडी , लांबच लांब पठारे , उन्हात तापून निघालेले कातळकडे पावसाळा आला की आपलं रूप पालटून टाकतात. ऋतुचक्राच्या एका फेऱ्यात जणू जादू घडते.मग ह्याच दर्याखोऱ्यातून ओसंडून वाहणारे निखळ धबधबे , हिरवीगार शाल पांघरलेला सहयाद्रीचा हा काळा पत्थर आपली रौद्रता काही काळ बाजूला ठेऊन आपले भान हरपून टाकतो. अश्या आल्हाददायक वातावरणात ट्रेक करण्याची मझ्या काही औरच. पावसाळ्यात मनसोक्त भटकंती करण्याचा मोह आमच्यासारख्या जातिवंत भटक्यांना कधीच आवरता येत नाही. दरवर्षीप्रमाणे ह्यावेळी ही जून महिन्यात पावसाचा हंगाम सुरू झाला होता पण महिन्याच्या सुरवातीला टुमदार कामगिरी करून पावसाने पळ ठोकला होता. उन्हाचा तडाखा पुन्हा जाणवू लागला होता.पण सगळीकडे पसरलेल्या हिरवटीमुळे आणि दाटून आलेल्या काळ्या ढगांमुळे वातावरण सुखावून टाकणारे होते.ह्याच संधीचा फायदा घेत आपण पहिला वहिला मान्सून ट्रेक उरकून टाकावा अशी योजना तयार केली.तीन दिवसांत पाच किल्ले करण्याचा हेतु माझा अलिबागम...