चढाई उतराई सिंगापूर आणि आग्याच्या नाळेची


जगभरात कोरोना विषाणू चा वाढता फैलाव बघता हे भुतं भारताच्या माथी येणार हे मात्र नक्कीच होत. आतापर्यंत २०० पेक्ष्या जास्त देशांमध्ये याचा प्रादुर्भाव आढळून आला होता. चीनच्या हुवान पासून सुरू झालेला फैलाव आज आपल्यापर्यंत आला आहे. बरेचशे देश लॉकडाऊनच्या विळख्यात सापडले आहेत ह्यातून भारत काही सुटेल असा वाटत नाही. इतर देश्यांच्या तुलनेत आपल्याकडे समजा लॉकडाऊन झालंच तर दोन महिने तरी काय ह्यातून सुटका नाय हे मात्र खरं,मग अश्यावेळी आमच्यासारख्या पायाला भिंगरी असल्यागत भटकणाऱ्या लोकांना घरी बसावं लागणार. आता घरी बसून आठवणीत रमायला तसा खासमखास ट्रेक तरी हवाच की ! तसही कोरोना आपल्या जिल्यात तरी अजून आलेला नाहीये. लगोलग अक्षयला कॉल केला आपल्याकडे लॉकडाऊन होईल जाणीव करून दिली त्या आधी आपण उद्याच एक ट्रेक करून येऊ असं सांगितलं , त्यानेसुद्धा उद्या सुट्टीचं आहे बोलून आपला होकार कळवला. आता कुठला ट्रेक करावा तर नजरेसमोर रायगडापासून ते कावळ्या पर्यन्त असलेल्या बोचेघोळ नाळ, कावळ्या- बावल्या,गाय नाळ, निसणीची नाळ, बोरट्याची नाळ, बिब, तवीची नाळ, सिंगापूरची नाळ, फडताड नाळ , आग्याची नाळ, फणशीची नाळ, शेवत्याघाट, मढे घाट , उपांड्याघाट ,गोप्याघाट, आंबेनली घाटापर्यंत सगळ्याच घाटवााटांची प्रतिमा उभी राहिली. गड-किल्ल्यांच्या वाटा धुंडाळताना सह्याद्रीच्या कुशीतून कोकणात उतरणाऱ्या घाटवाटा चोखाळणं हे खऱ्या भटक्याचं लक्षण म्हणायला हरकत नाही. सिंगापूर आणि आग्यची नाळ करायची असा निर्धार मनाशी पक्का केला, ह्या दोन्ही घाटवाटा म्हणजे शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस बघायला लावणाऱ्या.

सकाळी निघेपर्यंत ७ वाजून गेलेले , थोडासा उशीर झाल्याने वाटेतच भूक मिटवायचा निर्णय घेतला. दापोली ते सिंगापूर गावांना जोडणारी वाट म्हणजेच सिंगापूर नाळ आणि एकलगाव ते दापोली ह्यांना जोडणारी एकल्याची किंवा आग्याची नाळ.रायगड किल्ल्याच्या पूर्वेकडे लिंगाण्याच्या कुशीतच दापोली हे गाव आहे.महाडवरून आम्ही नांगलवाडी ला पोहचलो समोरच टपरीवर एक मामा वडे तळत होते.ताबडतोब गाडी थांबवुन चार घास पोटात टाकले, पण चविष्ठ आणि गरमागरम असल्यामुळे अजून एकदा ताव मारून दापोलीकडे निघालो.

पंदेरी गावाच्या पुढेच एका वळणावरून कडसरी लिंगाणा आणि बाजूंच्या डोंगररांगेत असलेल्या काही घाटवाटा दिसून येतात.दापोली गावात पोहचताच समोर महाराजांची स्थापना केलेली मूर्ती नजरेस आली. मग तिथेच बाजूला गाडी  पार्किंग करून महाराजांचे दर्शन घेतले.

समोरून एक गावकरी आपल्या शेतीच्या कामसाठी नांगर घेऊन येताना दिसला त्यांना आमचा हेतू सांगितला, तर त्यांनी सिंगापूर नळातून चढून आग्याच्या नाळेतून उतरण्याचा सल्ला दिला.जवळ न येताच लांबूनच बोटाने इशारा करून आम्हाला वाट दाखवली कदाचित त्यांनी कोरोनाच्या संकटाची धास्ती घेतली असावी. गावाच्या मागूनच एका ओढ्याशेजारून वाट जाते , ओढा कसला हो नदीचं म्हणायला हवं . समोरील घटमाथ्यावरच सगळंच पाणी ह्यात येतंय आणि ह्योच ओढा पुढं जाऊन काळ नदीला मिळतोय बघा.त्यातूनच वाट काढत आम्ही पुढे निघालो, बऱ्याच ठिकाणी वाटेची मार्किंग नजरेस पडत होती.त्यात आम्हीसुद्धा जिथे गरज वाटेल तिथे एकावर एक तीन-चार दगड रचत त्यात भर टाकत होतो. गावकरी आणि काही ठराविक भटके सोडले तर घाटवाटांच्या वाटेला सहसा कोणी फिरकत नाय मग अश्यावेळी आपण केलेली मार्किंग केव्हाही उतमच. वाटाड्या सोबत नसल्याने समजा चुकलोच तर येताना ज्याने गेलो ती वाट तरी आपल्याला माहीत राहते. काही वेळ चालल्या नंतर बऱ्याच धोरवाटा दिसायला लागल्या पण आमचं लक्ष गेलं ते पुढे चालत असणाऱ्या लोकांवर .बहुदा जाळण्यासाठी फाटी तोडायला ते जंगलात जात होते. आम्ही सुद्धा आमचा वेग वाढवला आणि त्यांना गाठून पुढच्या वाटेची माहिती घ्यायचं ठरवलं. पण ह्याच सह्याद्रीच्या कड्याकपारीत कसलेले लोक हे आम्हाला काय भेटतायेत होय ! शेवटी कसंबसं आम्ही त्यांना गाठलंच आणि पुढच्या वाटेची माहिती मिळवली पण ह्या गडबडीत आमची पार दमछाक झाली.

पहिला सपाटीवरचा टप्पा पार करून आम्ही चढावर पोहचलो , पहिल्याच टेकडीवर दोघंही घामाच्या धारेने भिजू लागलो थोडाफार थकवा जाणवू लागला होता. दोन दिवसापूर्वीच आम्ही बोचेघोळ नाळेचा ट्रेक केला होता कदाचित त्याचाच हा परिणाम असावा.तासभरच्या चढाई नंतर खिंडीतून वर जाऊन आम्ही एका ट्रॅव्हर्स च्या टप्प्यात पोहचलो.
तिथून प्रथमतः दापोली गाव नजरेस पडले आणि डाव्या बाजूस उंचावरून कोसळणारा एक धबधबा पण, अर्थातच उन्हाळा असल्यामुळे सुखाठाक पडला होता. डोंगराच्या कडेकडेने अगदी एक ते दीड फूट तिरपी वाट आता थोड्याफार दाट जंगलात येऊन पोहचली. तिथेच दाट सावलीमध्ये थांबून थोडं पाणी पिऊन आम्ही पुन्हा चालू पडलो . वाटेत मध्येमध्ये लागणारी कडुलिंबाची आणि कडीपत्याची पाने हातावर चोळून वास घेत पुढे चालत राहिलो .

काही वेळातच पठारावर येऊन पोहचलो , खालच्या बाजूचा नजारा अगदी थक्क करणारच होता. डाव्या बाजूस अड्राईचा डोंगर त्यासमोर गुयरीचाडोंगर , पोटल्याचा डोंगर  , दुर्गदुर्गेश्वर रायगड , लिंगाण्याचा गगनात घुसलेला सुळका आणि ह्या सगळ्यांच्या मधोमध विराजमान झालेलं दापोली गाव.हे सगळं दृश्य कॅमेरात कैद करत सिंगापूर गावाकडे आगेकूच केली.

वाट चांगली मळलेली असल्यामुळे चुकण्याचा काही संभव नाही , थोडा चढावरून पुढं आलो तर भाजणी करून नांगरून ठेवलेली शेत नजरेस पडली सोबत गुरढोर चरताना दिसली म्हणजे आता गावाजवळ पोहचलोच याचे संकेत. एका घरच्या मागून आम्ही गावात गेलो तिथली बरीचशी मंडळी आमच्याकडं बघू लागली , बाजूलाच उभे असलेल्या आजोबांना सिंगापूर असा विचारताच त्यांनी पडवीत बसण्याची विनंती केली .पाठीवरचा बोजा तसाच खाली टाकत पाय पसरून दोघेही बसलो आतून आज्जीनी पाणी आणून दिले. 
अतिथि देवो भव! ह्याचा प्रत्यय आम्हाला आला. आजही खेड्यापाड्यात आपुलकी जपणारी माणसं बघून समाधान वाटलं.आमची ओळख सांगून आम्हाला आग्याच्या नाळेने उतरायचं अस म्हणताच ते एकलगाव इथून ३ किमी लांब असं म्हणाले.

सततच्या साडेतीन तासाच्या चढाईनंतर आम्ही सिंगापूरला पोहचलो होतो. भयंकर भूक लागली होती पण जेवायला थेट एकलगाव लाच जायचं असा निश्चय करून आल्याने लोगोलग बॅगा उचलून चालू पडलो. गावातील विहरिवरून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आता अजून अर्धा तास तरी भुकेची कळ काढायची होती. चालताना माझ्या उजव्या मांडीमध्ये एक पेटका ( cramp ) आला, कदाचित शरीरामध्ये असलेल्या पाण्याच्या कमकरतेमुळे आला असावा. 

वरती चढून आल्यावर रोडवरून रायलिंग पठार आणि लिंगाण्याचा अफाट सुळका अगदी मस्त दिसत होता.मागे वळून पाहिलं तर एक कुत्रा आमच्या मागोमाग येताना दिसला, हा राजू त्याला सिंगापूर मध्ये टाकलेल्या एक बिस्किटापाई त्याच गाव सोडून आमच्या मागोमाग आला होता.

वेळ न दवडता चालत आम्ही एका वळणावर येऊन पोहचलो आणि समोरच नजर खिळवून टाकणार गरुडाचे घरटे ( किल्ले तोरणा ) आणि खेटूनच उभा असलेला राजगड नजरेस पडला . त्यांच्याकडे बघत बघत कधी एकलगाव ला पोहचलो कळलं सुद्धा नाही. गावाच्या शेवटी असलेल्या एका शाळेच्या भिंतीला आमच्या पाठ टेकवल्या.

अंग भाजून काढणाऱ्या कडकडत्या उन्हात चालून घामाने पूर्ण शरीर भिजून गेलं होतं. ओले झालेले टिशर्ट आणि बॅग बाजूलाच वाळत घालते आणि शिदोरीवर ताव मारला.बऱ्याच वेळानंतर काहीतरी पोटात गेल्यामुळे थोडं अराम करून दोन वाजता निघायचा असं ठरवलं. काही बिस्किटं सोबत आलेल्या राजू ला दिली ती खाऊन तो सुद्धा आमच्या बाजूला निपचित पडून राहिला.

शहरापासून अगदीच लांब आणि काहीसा वेगळेपणा इथे दिसून आला. घरांची रचना सुद्धा वेगळीच ! बुटकी घर . घराचं छप्पर तीव्र उताराच.बहुदा जास्त पावसाचं प्रमाण इथे असावं.  गावात लाईट पोहचली असली तरी टीव्ही आणि फ्रिज पासून लांबच असलेला हे गाव. शेतीवर उदरनिर्वाह करणारी साधीभोळी माणसं. शाळेच्या पटांगणात गावतलीच बरीचशी बरीकसुरीक पोर आमच्याकडं बघत होती.मधेच कुजबुजत होती व हसून पळ ठोकत होती. शांत , थंड वातावरणामुळे झोपी गेलेल्या अक्षय ला जागं करून दोन वाजल्याची जाणीव करून दिली.

तिथेच उभ्या असलेल्या काही मुलांनी आम्हाला विहीर दाखवली , रिकाम्या झालेल्या बाटल्या पुन्हा भरून घेतल्या. विहिरीत शेवाळ बराच असल्यामुळे बॉटलमध्ये दोन क्लोरीनचे थेंब टाकून पाण्याचं निर्जंतुकीकरण केलं. मग त्याच मुलांकडून आग्याच्या नाळीची चौकशी केली , त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसून आलं. पण तुम्ही इथून खाली जा शेतात लोकं आहेत एवढ मात्र बिनधास्तपणे सांगून टाकलं.इथून समोरच खालच्या बाजूस दापोली गाव, गुयरीचा डोंगर आणि दुर्गाचा माळ अगदी स्पष्ठपणे दिसत होता.

खाली उतरून आल्यानंतर शेवटच्या शेतात काही लोक नांगरणी करताना दिसले, त्यांनीसुद्धा नांगरणी थांबवून वाटेची माहिती दिली आणि परवाच एका ग्रुपने वाट साफ केल्याचं सांगितलं.
                             

शेताच्या बाजूने असलेल्या ओढ्याने आम्ही डोंगराच्या कडेवर येऊन पोहचलो. थेट ३०० ते ४०० फूट कोसळणारा ओढा समोरच असलेला दुर्गाचा माळ ( फणशीची नाळेकडे ह्याच माळावरून वाट जाते , माळावर जननीच ठाण सुद्धा आहे .) , पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेल्या ह्या नाळ बघून फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही.इथूनच वाट उजवीकडे वळते , डोंगराच्या कडेकडेने कारवीच्या जंगलातून वाट पुढे जाते.

जेमतेम फूटभर रुंद , तिरकस वाट तिथे असलेल्या बारीक दगडांमुळे आणि सुक्या गवतामुळे पाय स्थिर काही टिकत नव्हते.मग ह्याच कारवीचा आधार घेत हळूहळू उतरत होतो. डाव्या बाजूस असलेला कडा पाहून हृदयाचे ठोके चुकयला लागले होते. अश्यातूनच दबकत पावलं टाकत नाळेच्या वरच्या मुखाशी येऊन पोहचलो.

८०°मध्ये खड्या चढाईची ही अग्याची नाळ उतरणे हा एक  वेगळाच अनुभव आमच्यासाठी होता. पावसामुळे हे सगळे दगड वरच्या बाजूने खाली घरंगळत येतात व एक ओढा तयार होतो ह्यातून जाणाऱ्या वाटेला नाळ म्हणतात. अस्थिर आणि डुगडुगणाऱ्या दगडांवरून उतरत मध्यावर आलो. ही वाट किती भीषण आहे याची जाणीव येथे पोहचल्यावर झाली.

एकेक दगडावर दबकी पावलं टाकत उतरून जंगलात आलो. डोंगरपठावर पडणारं सगळंच पावसाचं पाणी ह्या नाळेने खाली येते सोबत वाटेतील दगड आणि झाडे उपटून आणते. ह्यासागळ्यातूनच वाट काढत  कधी बसून तर कधी वाकून मोठ्या ओढ्यावर पोहचलो.आम्ही ओढ्याच्या मधोमध उभ राहून आजूबाजूच्या डोंगराकडे मान वर करून आश्चर्याने पाहत होतो.

आमच्या तीनही बाजूनी उंचच उंच डोंगर व त्यांच्या मध्यभागी ही दरी पाहून मन थबकून गेलं होत. आजूबाजूच्या तुटलेल्या झाडांमुळे आणि दगडींमुळे ह्या ओढ्यातील पाण्याचा जोर किती असेल ह्याचा अंदाज येत होता.

आम्ही आपलं ह्या दगडावरून त्या दगडावर उड्या मारत एका १०० फूट खोल कातळटप्यावर येऊन थांबलो . समोरच जननी देवीचं ठाण दिसलं . ह्याच ठाण्याच्या मागून बिब नाळ आणि समोरून फणशीची नाळ उतरते.इथे बसून पाणी पीत असतानाच मागे नाळेत कुठे गायब झालेला राजू धावत आला. बाजूच्याच डबक्यातला पाणी पिऊन आमच्या बाजूला येऊन बसला.

जननीच्या मंदिराच्या उजव्या बाजूने ही वाट पुन्हा ओढ्यात उतरते. तिथून खाली उतरतो तोच एक प्रचंड दगड एक खाचेत अडकून घळ तयार झाली होती, त्यात बसून फोटो काढण्यासाठी अक्षय तुटलेल्या झाडाचा आधार घेत तिथे पोहचला.समोरच असलेल्या त्या डबक्यात बरेच मासे आढळून आले.खाली उतरून आम्ही आमच्या वाटेला लागलो.

मोठ्या ओढ्यातूनच ही वाट दापोली कडे जाते. सुरवातीला दगडांवरून टुनुक टुनुक उड्या मारत उतरणारे आम्ही आता मात्र हातांनी पकडत हळू हळू चालायला लागलो होतो. पण आमचा राजू मात्र आमच्या पुढे जाऊन आमची वाट बघत बसायचा. कदाचित त्याने ह्या वाटेचा प्रवास बऱ्याच वेळा केला असावा. सिंगापूरला असताना माझ्या पायाला आलेला cramp आता आग्याच्या नाळीइतकाच मोठा झालं होता, चालणं देखील असह्य होत होत. अक्षय च्या सुध्या डाव्या घुडग्याला कातळाच्या माराने त्याचा पाय दुखू लागला होता. Pain relefe sprey चा फवारा दोघही मारून पायाच दुखणं कमी करत होतो. अगदी उत्साहात चालू केलेला ट्रेक आता मात्र आमचा अंत पाहत होता. कधी आम्ही दापोली गावात पोहचतोय याचीच उत्सुकता जास्त होती. 
सतत दोन तास ह्या ओढ्यातील दगडांवरून आणि वाळूतून चालून पाय अक्षरशः दुखायला लागले होते .

ह्या दरीच्या मुखाशी आल्यानंतर आमच्या जिवात जीव आला, आता लवकरच आपण पोहचणार ! पण ह्या ओढ्यातील वाट टाळण्यासाठी आम्ही एक टेपाडावरून ट्रॅव्हर्स मारायचा ठरवलं. तसाच खाली उतरतो तोच आम्ही सकाळी केलेली मार्किंग आम्हाला नजरेस पडली, ह्या दोन्ही  वाटा शेवटी दापोलीकडेच येतात. 

साडेचार तासांच्या ह्या उतराई नंतर आम्ही दापोली जवळ पोहचलो होतो. सूर्य कधीच रायगडच्या आड निघून गेला होता.आम्ही गाडीजवळ जाऊन आमच्यासोबत आलेला राजू आमच्याकडे टक लावून पाहत होता. माझ्याकडील सगळे बिस्कीट त्याला खाऊ घातले, त्याच स्वतःच गाव सोडून तो इथपर्यंत आला.आम्ही दाखवलेल्या प्रेमापोटी ! आम्ही सुद्धा गाडीवर पाय टाकून तिथून चालू पडलो. शरीर थकून गेल्यानंतरही फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर आम्ही ट्रेक पूर्ण केला. अर्थातच हे डोंगर सुद्धा खूप काही शिकवून जातात आणि त्यांची हीच शिकवण जीवन जगायला कामी येत असते. सिंगापूर आणि आग्याच्या आडवाटेवरचा हा ट्रेक केल्यानंतर भविष्यात अश्या बिकट वाटांवर जाण्याची उर्मी चेतावली हे मान्य करायला काही हरकत नाही.
 ( १५ मार्च २०२० )







टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ