थरार लिंगाण्याचा !


लिंगाणा ! कडसरी लिंगाणा ! अफाट लिंगाणा ! उंचच उंच लिंगाणा !
कितीही उपमा ह्याला दिल्या तरी ह्याची जाणीव आपल्याला तो नजरेनं बघितल्याशिवाय होत नाही. जेव्हापासून ट्रेकचा चस्का लागलंय तेव्हापासून सतत खुणवणारा हा पाने गावातील लिंगाण्याचा सुळका म्हणजेच रायगडाचा सोबती आणि बोराट्याच्या नाळेचा पाहरेकरी. कधीकाळी स्वराज्याच कारागृह म्हणून वापर झालेला ,अवघड चढणीचा  गगनात घुसलेला साधारणतः ९०० मीटर उंचीचा हा सुळका. येथे प्रस्तरारोहण साधनांशिवाय माथा गाठणे हे आपल्या प्राणाची आहुती देण्यासारखेच आहे.
दोन वर्षांपूर्वी लिंगाण्यावर जाण्याच्या बहाण्याने माझी चिंतनशी जिममध्ये ओळख झाली होती. चिंतन म्हणजे आमचा क्लाइंबिंग क्षेत्रातील गुरूचं.त्यासोबत त्याचे सर्पमित्र आणि प्राणीमित्र म्हणून काम करणारे सोबती कधी आपलेसे होऊन मी सुद्धा त्यांच्याच टिमचा एक भाग होऊन गेलो होतो.पण काही केल्या लिंगण्यावर जाण्याचा योग मात्र जुळत नव्हता. किल्ल्यावर आणि लिंगाणा माचीवर मी दोनदा गेलो होतो पण मनामध्ये ओढ होती ती लिंगाण्याचा माथा गाठण्याची . जानेवारी महिन्याच्या ३१ तारखेला रात्री चिंतनचा कॉल आला " उद्या संध्याकाळी लिंगाण्याला जायचंय , तू आहेस ना ?" आता हे ऐकून मी काय नाही बोलणार आहे होय . ज्या साठी केला होता हट्टाहास तोचि दिवस उजेडीला ! " मी आहेच की ! " . बरं ५ वाजता सगळ्यांनी माझ्या घरी जमायचं असं बोलून त्याने कॉल ठेऊन दिला.
संध्याकाळी ठरल्याप्रमाणे ५ वाजता सगळे शिलेदार एक एक करून जमा होऊ लागले.मी सुद्धा आधीच भरून तयार असलेली बॅग उचलून चिंतन कडे आलो. मी गेलो असता  तिथे सगळेजण साहित्यांची जमवाजमव करून बॅग भरत होते. रोप , हार्नेस, कॅरॅबिनर, हेल्मेट, हेड टॉर्च , वॉकी-टॉकी इ. अश्या साहित्यांनी बॅग घच्च भरून गोळा होत होत्या. महाड मधून योगेश,चिंतन , ओम,सोहम, चिराग आणि मी तर बिरवाडी आणि पोलादपूर मधून ओंकार , बारीक बाबू ( नितीन ), अनुराग अश्या मंडळींचा ताफा लिंगण्याकडे कूच करू लागला.

निघायला थोडा उशीर झाल्यामुळे अंधार व्हायला लागला होता. आम्ही सगळयांनी वळणकोंड येथे थांबून ग्रुपचे काही फोटोस काढले , तिथूनच लिंगाण्याचा बेलाग सुळका नजरेस पडत होता आणि बाजूच्याच डोंगरात महाराजांचे दर्शन घडून येत होते.

पूर्णपणे काळोख होईपर्यंत आम्ही पाने गावात दाखल झालो.गाडी पार्किंग करून त्यांना आमच्या लिंगाणा स्वारीची माहिती करून दिली.आता ते ओळखीचेच असल्यामुळे त्यांनीसुद्धा काहीच हरकत घेतली नाही, उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही परत येऊ असा  सांगून त्यांचा निरोप घेतला.
गावातून पुढे नदीमध्ये पोहचतोय तोच पूर्णपणे काळोख झाला, सगळ्यांच्या हेल्मेट वर हेड टॉर्च माऊंट झाल्या होत्या. टॉर्चच्या लखलखीत प्रकाशात आम्ही लिंगाणा माचीवरकडे चाललो होतो. वाटेमध्ये असकेल्या कडव बाबांच्या घरची कुत्री आमच्याकडे धाऊन आली, तिला काही बिस्किटं दिल्यानंतर ती सुध्दा आमच्या सोबत वर येत होती. जसजसा चढ वाढू लागला तसतसा आमच्या शिलेदारांचा वेग मंदावत होता.पाठीवरील असह्य ओझं घामाच्या रूपात घरंगळत होत. गावातून काही लोकांचा ओरडण्याचा आवाज येत होता कदाचित आम्ही वाट चुकलोय असा त्यांचा समज झाला असावा.पण  मी याआधी माचीवर आल्यामुळे योग्य वाटेने चाललो होतो. अंधारात सुद्धा लिंगाणा अगदी स्पष्ठ दिसत होता मागे वळून पाहिले तर रायगडावर जगदीश्वर मंदिरामध्ये अंधुकसा प्रकाशझोत नजरेस पडत होता.

दिड तासांच्या चढाईनंतर आम्ही माचीवर येऊन पोहचलो. माचीवरील घरे अगदीच ओस पडलेली, सतत कोसळणाऱ्या दरडेमुळे त्यांची व्यवस्था शासनाने पाने गावात केलेली आहे.पण माचीवरील जननीदेवी मंदिर अजूनही  स्वछ करून त्याची डागडुजी गावकरी करतात. आमचा मोर्चा मंदिरात येऊन थबकला, घामाने भिजलो असल्यामुळे थोडा आराम करून खिंडीपर्यंत जायचा ठरलं. माथ्यावर जाण्याकरिता सुळक्याला वळसा घालून बोराट्याच्या नाळेने वर चढून खिंडीत पोहचुन चढाई करावी लागते.माचीपासून किल्ल्यावरील गुहेपर्यंत पाण्याची सोय कुठेच नाही आणि खिंडीत मुक्काम करायचा तर पाणी हवेच. लगोलग मी आणि चिराग रिकाम्या बॉटल आणि जार घेऊन माचीवरील विहिरीवर निघालो. काळ्याकुट्ट अंधारात फक्त १० फूट लांब जाणाऱ्या उजेडात विहीर काही दिसेना , बराच वेळ शोधल्यानंतर अखेर सापडलीच. बॉटल भरून मंदिराजवळ पोहचलो ह्या गडबडीत तास निघून गेला. आधीच थकून गेलेली पोर आम्हाला झालेल्या उशिरामुळे अजूनच उदासीन झाली . आज इथेच मुक्काम करून उद्या खिंडीत पोहचायचे असा सल्ला त्यांनी दिला. पण दुसऱ्या दिवशी खिंड आणि सुळका गाठणे थोडं कठीणच काम होत शिवाय आमच्याकडे असलेल्या बॅगच ओझं आमच्यापेक्षाही जड. तश्याच बॅग उचलून आम्ही वर जायचा निर्णय घेतला पण जागोजागी लावलेल्या कुंपणामुळे पुढची वाट काही सापडत नव्हती त्यामुळे हताश झालेली आमची मंडळी पुन्हा मंदिराकडे वळली.

पाठीवरील ओझं टाकून आम्ही जेवणाच्या तयारीला लागलो. प्रत्येकाने आणलेले डबे बाहेर काढून त्यावर ताव मारू लागलो. भाजी भाकरी - चपाती , थेपले तर कोणी पुरणपोळी आणली होती.अर्धे डबे उद्यासाठी ठेऊन बाकीचे फस्त करायच्या प्रयत्नात सगळे तुटून पडले होते.

पोटभर जेवल्यामुळे जो तो बॅगा उशाला घेऊन झोपायच्या तयारीला लागला,आम्ही आपलं स्लोशटर च्या नावाखाली काही फोटोग्राफी करत बसलो. थोड्याच वेळात मंदिरासमोर टेंट लावून त्यात आम्हीसुद्धा गुडूप झालो.

सकाळी उजडताच आम्ही उठून खिंडीकडे जायची तयारी केली पण कालच्या थकव्यामुळे योगेश आणि ओंकार यांनी माचीवरच जागता पहारा द्यायचा ठरवलं. त्यांना अर्धा खाऊ आणि एक वॉकी-टॉकी तिथेच सोडून जननी देवीचं दर्शन घेऊन आम्ही बोराट्याच्या नाळेने खिंडीकडे निघालो.
कड्यावरून वाहून आलेले दगड , दाट झाडी , निसरडी वाट यामुळे ही वाट अजूनच बिकट झाली आहे.मधल्याच झाडीतून समोरच्या डोंगरात असलेली निसणीची वाट नजरेस पडत होती.


पाठीवरील असह्य होणार ओझं त्यामूळे बॅगची अदलाबदल करत दोन तासांत वरती पोहचलो. खिंडीत पोहचताच तिथे पाच जणांचा एक ग्रुप पुण्याहून आला होता. शिवाय आधल्या दिवशी वर लोक काही कार्यक्रमासाठी आले होते. नुकताच कोकणकड्याला ट्रॅव्हर्स मारताना पडून मृत्यू झालेल्या अरुण सरांच्या अस्थीविसर्जनाचा हा कार्यक्रम ! त्यामुळे गडावर बरेच लोक होते. गावातील बबन कडूंच्या हस्तेही विसर्जन होणार होतं. लिंगाण्याचा नाव काढावं तर त्यात बबन कडूंचा उल्लेख होणार नाही अस क्वचितच. कित्येकदा विनारोप चढणारे व गडालाच देव मानणारे अस त्यांचं व्यक्तिमत्व.

खिंडीपासून गुहेपर्यंत , तिथून सरळ कतळभाग मग चढून वाटेने माथ्यावर अश्या तीन टप्प्यात किल्ला सर करायचा होता.पण बरेच लोक पहिल्या टप्यातून रॅपलिंग करत खाली उतरत होते.आम्ही खिंडीतच रोप काढून हार्नेस , हेल्मेट घालून तयार झालो होतो.

चिंतन आणि चिराग आळीपाळीने आम्हाला क्रॉसचेक करत झुमार क्लाइंबिंग ची माहिती देत होते.तितक्यात माझ्या बॅग लावलेला वॉकी-टॉकी खरखरला , योगेश बोलत होता " तुम्ही खिंडीत पोहचलात का ?" ओव्हर . चिंतन " हो, आता क्लाइंबिंग ची तयारी करतोय "ओव्हर .योगेश " बबन कडू वर येतायत " ओव्हर . चिंतन " बबन कडू अलेती , क्लाइंबिंग सुरू केलं की तुला कळवतो "ओव्हर . योगेश " ठीक आहे चिंतन " ओव्हर अँड आऊट. बबन कडू २० मिनिटांमध्ये खिंड चढून आले होते. सरसर ते माथ्यावर सुद्धा पोहचले.

१० वाजून गेले होते तरी आमचा रोप लागला नव्हता मग क्लाइंबिंगची धुरा चिराग ने त्याच्या हाती घेतली. भल्याभल्या वॉल चढून काढलेल्या हा अवलिया एका फॉल मुले थोडा थंडावला होता, पण अंगी असलेली आवड काय गप्प बसू देते का कुणाला. रोप घेऊन आमचा लीडर निघाला सोबत नव्या दमाचा नुकताच बेसिक करून आलेला शिलेदार अनुराग सुद्धा होताच.आधीच झालेल्या दमछाकमुळे सोहमने बिले देत खिंड लढवण्याचा निर्धार केला.

आमचा रोप फिक्स झाला होता पण वरून रॅपलिंग करणारे खूप जण होते. मग आमचा एक त्यांचा एक अश्या रीतीने चढाई उतराई चालू होती. चिराग , अनुराग त्यामागून मी चढाई करत होतो. सोबत असलेल्या झुमार मुळे क्लाइंबिंग खूपच सोपं झालं होत.

मधेच कोणीतरी वरून " वॉच आऊट " अस जोराने ओरडून सगळ्यांना सतर्क करत होते.मग आम्ही सुद्धा आहे तिथेच कातळाला बिलगून राहायचो. वरती घसारा ( scree ) असल्यामुळे बारीक दगड वरून घरंगळत येत होते.त्यापासून बचाव करत वर चढत होतो.

माझ्यामागून अक्षय , बाबू , ओम आणि चिंतन वरती चढत होते. दुपारचा १ वाजून गेला होता आम्ही गुहेजवळ पोहचलो होतो तरी चिंतन आणि बाबू वर यायचे बाकी होते तो पर्यंत गुहेजवळ जायला रोप लावून गुहेत पोहचलो.
ही वाट म्हणजे नजर हटी दुर्घटना घटी अशीच आहे. दोरीला पकडून कडेकडेने गुहेत जाऊन बसलो. सगळे येईपर्यंत फोटो काढत समोर दिसणाऱ्या रायलिंग पठाराकडे बघत बसलो.

सवर्जन पोहचल्यावर डबा खाऊ लागलो , दिवसभरात काहीच खाल्लेलं नसल्यामुळे मोठमोठ्याने घास तोंडात कोंबत होतो. बघ तुझं स्वप्न पूर्ण झालं अस जेवताना चिंतन बोलू लागला , जो पर्यंत वर पोहचत नाही तो पर्यंत ते होणार नाही असा बोलून  मी त्याला माथा अजून लांब असल्याची जाणीव करून दिली.चार वाजून गेले होते वेळ निघून जात होता तरीही वरती चढणारे व खाली उतरणारे कमी होत नव्हते. कमी कमी होत होती ती फक्त आमची इच्छाशक्ती.तरीही सूर्यास्त माथ्यावरून बघायचाच अस ठरवून आम्ही पुढच्या तयारीला लागलो. तेवढ्यात बाबूने तुम्ही वर जाऊन या मी इथेच थांबतो अस बोलून आमचा उत्साह कमी केला.

एक खड्या कातळाजवळ आम्ही येऊन थांबलो तिथे आमच्यासोबत आलेला एक ग्रुप वर जाण्याच्या तयारीत रोप फिक्स करत होता. तोपर्यंत आम्ही बाजूलाच असलेल्या 2 पाण्याच्या टाक्या व एक बुजलेली गुहा यांचं निरीक्षण करत बसलो. कधीकाळी किल्ल्यावरून ह्या गुहेपर्यंत यायला नक्कीच वाट असणार पण आता मात्र त्याची काहीच निशाणी शिल्लक नाहीये.

सूर्य कधीच डोंगराआड निघून गेला होता , आमची चढाई चालूच होती . तो कातळ पार करून ओम , अनुराग ,अक्षय आणि मी बाकीच्यांची वाट बघत बसलो. दिवसभरच्या वापरामुळे वॉकी-टॉकीने कधीच जीव सोडला होता. नेटवर्क नसल्यामुळे मोबाइल बॅग मध्ये पडून होते.तितक्यात चिंतनचा खालून आवाज आला " खालच्या डोंगरावर कुठे तरी वणवा लागलाय आणि काळोख होतोय तुम्ही भराभरा रॅपल करून खाली या". त्या जागेवरूनच आम्ही माथ्याला मुजरा करत खाली उतरायच्या तयारीला लागलो.

अनुराग सगळ्यांना खाली उतरवत होता,आम्ही गुहेजवळ एक एक जमा होत गेलो.आमचा रोप दगडांमध्ये अडकला होता त्यामुळे अनुराग आणि चिंतन यांनी तो पुन्हा क्लाइंब करून काढायचा ठरवलं.

आता मात्र आम्हाला तोपर्यंत एकाच रोप ने दोन टप्यात उतरायचं होत.चिराग ने याची जबाबदारी घेत तयारीला लागला. एकदा पहिल्या टप्यात उतरून त्याच रोप ने खाली उतरायचं तेही सेल्फ बिले घेऊनच म्हणजे का आमचा हातून रोप चा कंट्रोल सुटला की थेट खालीच आमची पालखी. आधीच चढताना दमछाक झालेल्या बाबूच्या आणि अक्षय च्या चेहऱ्यावरील भीती रॅपलिंग करताना स्पष्ठ दिसत होती. काळोख वाढत चालला होता.

८ वाजून गेले होते मी मधल्या टप्यात येऊन बोल्टला अँकर झालो. चिराग ओम ला उतरून रोप परत घेऊन यायची वाट बघत होतो.  वरती लिंगाण्याचा सरळ कडा व चंद्र दिसत होता तर खालच्या बाजूस मध्ये ओम उतरताना आणि खिंडीमध्ये सोहम अश्या दोन्हीं हेडटॉर्च चा अंधुकसा प्रकाश दिसत होता. कालपर्यंत लखलखीत उजेड टाकणाऱ्या टॉर्च आता अंधुक होऊ लागल्या. काळ्याकुट्ट अंधारपुढे त्यांचा उडेज काजव्यासारखाच दिसत होता. सोबतीला होती ती भयाण शांतता आणि रातकिड्यांचा किर्रर्र आवाज. सकाळी अगदी उत्साहात असलेले आम्ही आता मात्र शांत बसून मधेच बोल्ट ला अँकर होऊन खाली जायची वाट बघत होतो.

थंडी वाढत चालली होती पण भीतीमुळे ती जाणवत सुद्धा नव्हती .मी पालिसारखा कातळाला बिलगुन चिराग ची वाट बघत बसलो.
सगळे जण एक एक करून खिंडीमध्ये उतरू लागलो. खिंडीमध्ये सोहम सगळे सुखरूप परत यायची वाट पाहत होता. आम्ही खाली आल्यावर त्याने पायाखालून चापडा ( bamboo pit viper ) गेल्याच सांगितलं त्यामुळे तो शेकोटी करून त्याबाजूलाच बसून होता. अजूनही चिंतन आणि अनुराग वरतीच होते. तिथपर्यंत आमचा आवाज देखील पोहचत नव्हता. खूप भूक लागली होती बॅग मध्ये असलेले काही बटाटे त्याच शेकोटीत भाजून खात बसलो. तासाभरानंतर चिंतन आणि अनुराग खाली आले.

११ वाजले होते माझ्या मोबाईल ला नेटवर्क आल्यामुळे सोहम ने त्याच्या बाबांना आम्ही सुखरूप असल्याची माहिती दिली व उद्या सकाळी आम्ही महाड ला पोहचू असं संगीतल. सगळे खूपच दमलो होतो, खाली माचीवर योगेश आणि ओंकार जिवाच्या आकांताने आमची वाट बघत होते. क्षणाचाही अवधी न घालवता बॅग पॅक करून आम्ही डिड-दोन तासात अंधुक झालेल्या टॉर्च च्या उजेडात माचीवर पोहचलो.सगळ्यांना सुखरूप पाहून योगेश आणि ओंकार यांचा आनंद गगनात न मावण्यासारखा होता. आम्ही आज जर पोहचू शकलो नसतो तर दुसऱ्या दिवशी गावातील लोकांना घेऊन तो वरती मदतीसाठी येणार असा विचार करीत बसला होता. रात्रीचे १२ वाजून गेले होते  उताणी पडकेले डबे उरलीसुरली बिस्किटं खाऊन आम्ही ती रात्र मंदिरात झोपून घालवली.

सकाळी थोडं उशिराच उठून पाने गावात दाखल झालो. काल संध्याकाळी परत येऊ असं घरी सांगून आलेलो आम्ही आज सकाळ होऊन घरी परतलो नाही म्हणून महाडमधून एक टीम आमच्यासाठी रवाना झाली व वाटेतच आम्हाला भेटली.कुणाच्याही मनात धडकी भरेल असा लिंगाण्याचा ट्रेक म्हणजे साधासुधा काम न्हाय! प्रॉपर प्लॅनिंग , शारीरिक आणि मानसिक क्षमतेची जाणं , लिंगाण्यावरील वाढती गर्दी, इक्विपमेंटची माहिती आणि वापर या गोष्टींचा पुरेपूर विचार करूनच तो साध्य करावा. ह्या ट्रेकमधून प्रत्येकालाच त्याची जाणीव नक्कीच झाली असेल पण लवकरच ह्यातून धडा घेऊन ह्याच वर्षी पुन्हा आम्ही तो ट्रेक पूर्ण करू अशी जिद्ध मनाशी बांधून आपापल्या घरी मार्गस्थ झालो.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ