बेसुमार उंचीचा किल्ले सुमारगड
बेसुमार उंचीचा , कातळकड्यांनी व्यापलेला आणि जावळीच्या खोऱ्याचा पहारेकरी किल्ले सुमारगड. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या उत्तर पूर्व बाजूस असलेल्या डोंगररांगेवर रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड अशी दुर्गसाखळी वसलेली आहे. मुंबई-गोवा हायवेवरून जाताना कशेडी घाट उतरलो की डाव्या बाजूस हे दुर्गत्रिकूट नेहमीच नजरेस पडतात. बऱ्याचदा ट्रेकर मंडळी हा रेंज ट्रेकच करतात. मी सुद्धा हा प्रयन्त दोन वेळा केला होता. पण एकदा रसाळगड - सुमारगड असा ट्रेक करताना वाटेत पाणी संपल्यामुळे तर दुसऱ्यांदा महिपातगड- सुमार अशी रेंज करताना वाट चुकल्यामुळे सुमार अपुरा राहिला होता. ह्या गोष्टीला वर्ष लोटून गेलं होत, सारखी हुलकावणी देणारा सुमारगड सतत मनामध्ये घर करून बसला होता. अविरत लागलेली आस मिटवण्यासाठी या मोहिमेची जय्यत तयारी सुरू केली. आपले वाटाड्या गूगलबाबांकडून खडानखडा माहिती मिळवली. कोणत्या वाटेने जायचा याचा विचार करू लागलो. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी माझा हक्काचा सोबती अक्षय आमची स्वारी पहाटेच महाडवरून सुमारगडाकडे निघाली.
सुमारगडावर जायला तीन वाटा आहेत.
१. भरणे नाका - मोहने गाव - वाडी मालदे. ही वाट साफ केलेली असली तरी बऱ्याच ढोरवाटा या वाटेला फुटतात. ४ तासाची चढाई पार करून आपण गडाच्या दक्षिण बाजूस पोहचतो.
२. भरणे नाका - तळे - रसाळवाडी . ही वाट रासळगडवरून तीन डोंगर पार करून पठारावर येते इथेच वाडी मालदे वरून येणारी वाट ह्या वाटेला मिळते.
पाच ते सहा तासांची पायपीट ह्या वाटेने करावी लागते.
३. भरणे नाका - तळे - गोर खिंड. वाडी बेलदार च्या आधी एक खिंड लागते तिचं ही गोर खिंड . सुमारगडाकडे जाणाऱ्या डोंगराच्या धारेवरून ही वाट गडाच्या उत्तर बाजूस पोहचते. साधारणतः अडीच तास या वाटेने लागतात. ह्याच वाटेने सुमारगड फत्ते करायचं ठरवलं.
२. भरणे नाका - तळे - रसाळवाडी . ही वाट रासळगडवरून तीन डोंगर पार करून पठारावर येते इथेच वाडी मालदे वरून येणारी वाट ह्या वाटेला मिळते.
पाच ते सहा तासांची पायपीट ह्या वाटेने करावी लागते.
३. भरणे नाका - तळे - गोर खिंड. वाडी बेलदार च्या आधी एक खिंड लागते तिचं ही गोर खिंड . सुमारगडाकडे जाणाऱ्या डोंगराच्या धारेवरून ही वाट गडाच्या उत्तर बाजूस पोहचते. साधारणतः अडीच तास या वाटेने लागतात. ह्याच वाटेने सुमारगड फत्ते करायचं ठरवलं.
महाड सोडून आम्ही पोलादपूर मध्ये दाखल झालो. बस स्थानकाच्या बाहेरच एका टपरीवर गरमागरम भजीपाव खाऊन भुक मिटवली. कशेडी घाट टाळण्यासाठी आम्ही पोलादपूर-खडपी-घोगरे-वाडी बेलदार ह्या मार्गाने निघालो. पहाटेची वेळ असल्यामुळे रस्त्यांवर कोणीच नव्हतं. रस्त्याच्या दुतर्फा दाट वाढलेलं जंगल त्यातच हलकस धुकं, पक्षांचा किलबिलाट आणि त्यातूनच डोकावून बघणारी सोनेरी किरणं. उन्हाळा चालू झाला असला तरी हलकीशी थंडी इथे जाणवू लागली. घोगरे गावतुन जाताना मिठखडा नावाचा सुळका आणि त्यामगेच असलेला महिपतगड नजरेस पडत होता.
हा किल्ला म्हणजे जंगलाने व्यापलेला १२० एकरचं विस्तीर्ण पठार. सर्वात उंच महिपतगड मग त्यानंतर सुमारगड आणि त्याखालोखाल रसाळगड. डाव्या बाजूस दिसणारा महिपत लक्ष वेधून घेत होता तोच समोरून धनेश (Hornbill) पक्षांची डौलदार जोडी हवा कापत जाताना दिसली. त्याच क्षणी गाडी थांबवून त्यांचं निरीक्षण करू लागलो. असामान्य त्याच रूप, अतिशय देखणा, त्याची गर्द पिवळी चोच नेहमीच आकर्षित करते.
घाट उतरून आम्ही मांडले गावात आलो तिथून वळसा घालून वाडी बेलदार कडे निघालो. घेरासुमार मधून जाताना बरेचशे दाट जंगलात राहणारे आदिवासी लोक आमच्याकडे मोठ्या कुतूहलाने बघत होती. लुझरॉक कापून घाट तयार केल्यामुळे खूप ठिकाणी दरडी कोसळलेल्या दिसतात. रस्त्याची अवस्था तर फारच बिकट झाली आहे.
सकाळी ८ वाजता आम्ही गोरखिंडीत येऊन थबकलो.समोरच वाडी बेलदार आणि त्यामागे असलेला अजस्त्र महिपतगड नजरेस पडला. खिंडीमध्ये गाडी पार्क करून उजव्या बाजूला असलेल्या डोंगराच्या धारेवरून आम्ही निघालो.
चालताना उजव्या बाजूस होता तो सरळसोट कडा आणि डाव्या बाजूस तीव्र उताराच घनदाट जंगल, त्याची घनता इतकी की माणसांपेक्षा हिंसाचारी प्राण्यांचा वावर जास्त. मागच्या वेळी महिपतगडला गेलो असताना या भागात बिबट्याचा वावर असल्याचं गावकाऱ्यांकडून कळालं होत. शिवाय डुकरांचा सुळसुळाट तर आहेच. दाट जंगलातून जाणारी वाट पाऊणतासात आम्हाला एक गुरांच्या वाड्याजवळ घेऊन आली. गावापासून खूपच लांब एका आंबा आणि फणसाच्या झाडाखाली हा वाडा होता. उजव्या बाजूने जाणाऱ्या वाटेवर कुणीतरी लाकडं टाकून कुंपण घातले होते. म्हणून आम्ही डाव्या बाजूने जाणाऱ्या वाटेला लागलो. मध्येच लागलेल्या एका ओढ्याजवळ पाणी पिऊन, एक छोटया टेपडाला वळसा घालताच सुमारगड नजरेस पडला.
झाडीतून चालत थोडा मोकळ्या माळरानावर आल्यामुळे तो दिसू लागला होता. वाटेत एका हिंसाचारी प्राण्याची विष्ठा दिसून आली त्यात दिसणाऱ्या हाडांच्या आणि केसांच्या पुंजक्यामुळे कदाचित ती बिबट्याची असावी. त्यामुळे मनात थोडी भीती जाणवू लागली होती. ही वाट त्याच पठारावरून जात होती आम्ही काही केल्या वरती पोहचत नव्हतो. सगळ्या वाटा खालच्या बाजूस व किल्ल्यापासून लांब जात होत्या. आता प्रत्येक वाटेला एक जोडवाट फुटत होती. थोड पुढे जाऊन परत मागे येत कोणती वाट जास्त मळलेली आहे याचा विचार करू लागलो. पण मळलेल्या वाटेने जाऊनसुद्धा ती वाट पुढे नाहीशी होत होती. या भूलभुलय्या करणाऱ्या वाटांच्या नेटवर्कपुढे आम्ही पुरते चुकलो आहोत याची जाणीव दोघांनाही होऊ लागली. दोन वेळा वाट चुकलेला अनुभव माझ्या तिसऱ्यांदा माथी पडला तेही ह्याच किल्ल्याच्या बाबतीत. काय करावे काहीच सुचत नव्हतं. मध्येच अक्षय आपण आलो त्याच वाटेने परत मागे जाऊ असा सल्ला देत होता. पण ह्यात आमचे अजून दोन तास खर्ची पडणार होते. काहीही झालं तरी ह्या वेळी मी किल्ला सर करणारच अशी जिद्द मनाशी बाळगून तडकाफडकी बॅग मधून सुरा (knife) बाहेर काढला.
आम्ही किल्ल्याच्या पूर्व बाजूस होतो त्यामुळे जर सरळ वर चढून गेलो तर आपण नक्कीच किल्ल्यावर येणाऱ्या वाटेला भेटू असा सल्ला अक्षय ला दिला. त्याला सुद्धा तो पटला. आपणच वाट तयार करत वरच्या बाजूस जायचं.
तीव्र उतारच घनदाट जंगल, घसरडी माती, कारवीची झाडी ह्यातून वाट बनवत आम्ही वरच्या बाजूस आगेकूच करू लागलो. आता लवकरच वाट भेटेल असा धिर मी अक्षय ला मधून मधून देत होतो. वर चढताना मागच्या बाजूस मध्येच झाडीतून मधू- मकरंदगड नजरेस पडत होता, तर डाव्या बाजूस होती धडकी भरायला लावणारी खोल दरी.
तासभरच्या खड्या चढाईनंतर कारवीचे ओरबडे खात वर येतोच तर, आम्हाला पूर्व बाजूस असलेली किल्याची लोखंडी शिडी दिसू लागली व आम्हीसुद्धा मूळ वाटेला येऊन भेटलो. दोघेही एकमेकांकडे बघत जोरात ओरडू लागलो, आमच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
बस्स आता जिंकलोच आपण अस म्हणत भरभर ती शिडी चढून किल्ल्याच्या माथ्यावर पोहचलो. दुपारचे १२ वाजून गेले होते.चुकलेल्या वाटेमुळे आणि रखरखत्या उन्हात आमची बरीच ऊर्जा खर्ची पडली होती. आमच्याकडील पाणी सुध्दा संपत आले होते. किल्ल्यावर पोहचताच डाव्या बाजूस कोरलेल्या गुहेमध्ये सतीशीळा नजरेस पडली.
स्त्रिया त्या काळच्या रुढीप्रमाणे पतिप्रेम व अब्रुरक्षण यांसाठी त्यांचा देह अग्नीच्या स्वाधीन करून सती जात. त्या सती गेलेल्या स्त्रियांची चित्रे, त्यांच्या शौर्यगाथा हातच्या स्वरूपात दगडात कोरतात, त्या दगडी शिलेस ‘सतीशीळा’ म्हणतात. किल्यावर इतक्या वरती सती गेलेली व्यक्ती कोणीतरी महत्वाची असणार.
पाठीवरील बोजा तिथेच टाकत आमचा खाऊचा डब्बा बाहेर काढला. पेटपूजा करूनच किल्ल्यावर फेरफटका मारायचं ठरवलं. तहान खूप लागली असल्यामुळे आम्ही वेळ न घालवता पाण्याच्या शोधत किल्ल्यावर निघालो. किल्ल्याचा माथा अगदीच आटोपशीर आहे. पाण्याचे टाके, गुहा, दगडी जोते यांनी वेढलेली माची आणि त्यालाच जोडून एका टेपडावरील बालेकिल्ला अशी याची रचना. जावळीच्या घनदाट जंगलाच्या खोऱ्यात वसलेला , सर्व बाजूनी सरळसोट कातळकडे असलेला ८८३ मीटर उंचीचा सुळका . सोबतीला महिपतगड, रसाळगड, चकदेव, पर्वत, मधू- मकरंदगड असे एकाहून एक सरस जावळीच्या खोऱ्याचे रक्षक. सर्वबाजुंनी कडा असख्यमुळे खूप कमी ठिकाणी तटबंदी बांधलेली आहे. मागच्या बाजूस एक बुरुज लक्ष वेधून घेतो.
माचीवर पोहचताच नजरेस पडत हे ओसाड पडलेलं मंदिर. ह्यात डाव्या बाजूस भैरवाची मूर्ती, मधल्या बाजूस एक पिंड तर उजव्या बाजूस मातृदेवतांच्या मुर्त्या आढळून येतात, त्यासमोरच एक दीपस्थंभ आणि तुटकेल्या अवस्थेतील सतीशिळा दिसून येते. रक्षणकर्ता म्हणून बऱ्याचदा भैरवाच्या मुर्त्या अनेक ठिकाणी आढळून येतात.
मंदिराच्या मागच्या बाजूस तीन भागांत कातळात कोरलेली पाण्याचे टाकी आहेत. बरेच वर्ष साठुन शेवळामुळे पाण्याचा रंग हिरवट पडला आहे.
ह्याच टाक्यांची एक भिंत बांधून काढलेली आहे. त्यासमोरच एक गुहा आहे.
ह्याच गुहेत शंभुमहादेवाचे मंदिर आहे . १० ते १५ जण झोपू शकतील एवढी प्रशस्त आहे. गुहेत जेवण बनवण्याची सगळी भांडी आहेत. श्रावणी सोमवार , महाशिवरात्रीच्या दिवशी गडावर जागरण असतं त्यामुळे बरेच गावकरी वस्तीकरिता येतात.
मोठ्या टाक्यांच्या वर एक छोटं भूमिगत (Underground) पाण्याचं टाक आहे. इथलं अतिशय स्वच्छ आणि गारेगार पाणी पिऊन भलताच उत्साह आम्हाला आला. इतक्या कडकडीत उन्हात एवढ्या उंचावर थंडगार पाणी भेटल्याने मन आणि तन दोन्ही शांत झालं होत. रिकाम्या झालेल्या बॉटल पुन्हा भरून आम्ही वरच्या बाजूस आलो.
इथे बा रायगड टीमने लावलेला सुमारगडाचा नकाशा दिसला. आता ह्याचाच वापर करून योग्य त्या वाटेने जायचं ठरवलं. त्या बाजूलाच काही तुटलेल्या जोत्यांचे काही अवशेष आहेत.
बालेकिल्ल्याच्या खालच्या बाजूस बरेच भूमिगत आणि स्तंभ टाके नजरेस पडतात. उन्हापासून पाण्याची वाफ होऊ नये व वर्षभर पाण्याचा साठा गडावर टिकून राहावा, शिवाय टाक्याचे तोंड छोटे पण आत विस्तृत पाणीसाठा ! अशी दुर्गरचना करून बरेचशे गडकोट समृद्ध केलेले दिसतात.
बुजलेल्या अवस्थेतील काही गुहा इथे आहेत. खरतर आपल्यासारख्या दुर्गप्रेमींनी एकत्र येऊन गडसंवर्धनाची मोहीम काढून दडून बसलेला इतिहास लोकांसमोर आणला पाहिजे.
तिथूनच चढून बालेकिल्ल्यावर गेलो असता चहुबाजूंचा परिसर दृष्टीक्षेपात येतो. वास्तविक बालेकिल्ला म्हणावं अशी काही तटबंदी किंवा संरक्षणात्मक रचना येथे दिसून येत नाही.
इथूनच दक्षिणेस त्याच डोंगररांगेत खालच्या बाजूसर साळगड, त्याच्या समोरच असलेला चकदेव आणि पर्वत हे डोंगरपठार दिसून येतात.
तर उत्तरपूर्व बाजूस जावळीच्या खोऱ्यातील सर्वाधिक उंच किल्ले मधू- मकरंद गड दिसतात.
उत्तर बाजूस महिपतगड आणि पश्चिम बाजूस पालगड, मंडणगड नजरेस पडतात. दुपारचे २ वाजून गेले होते काही फोटोस काढत वरून खिंडीकडे जाणाऱ्या वाटेची टेहळणी आम्ही करू लागलो वरून वाट अगदी स्पष्ठ दिसत होती.
मग भराभर शिडी उतरून आम्ही एका अवघड टप्यावर आलो. हा टप्पा हळूहळू कातळाला बिलगुन पार करत एका ४ × ४ फुट कोरीव गुहेजवळ आलो. ही गुहा आत निमुळती होत ३० फूट लांबीनंतर उजवीकडे वळसा घेत होती. गुहेच्या तोंडाजवळ बऱ्याच माश्या भिन भिनत होत्या. तिथेच असलेल्या चिखलात डुक्कर, भेकर, बिबट्या अश्या बऱ्याच निरनिराळ्या प्राण्याच्या पायांचे ठसे उमटले होते. अशी एक गुहा आम्ही प्रबलगडावर वर सुद्धा बघितली होती. आत जाऊन एक मोठी लांबलचक कोठार तिथे आहे. आतमध्ये जर का कोणी प्राणी असलाच तर तो घाबरून आम्हला धडक देणारच! त्यातच अरुंद अशी वाट. आम्ही आत दगड मारून आतून काही आवाज येतोय का ते पाहू लागलो.
तिथेच बाहेर बॅग ठेऊन पाणी पित पहिलं कोण जाणार यावर चर्चा करू लागलो. अक्षय ने तर सपशेल नकार देऊन टाकला , तुला जायचंय तर तू जाऊन ये असेही बोलु लागला.काही करून मला ती गुहा पाहयचीच होती. मग मीच टॉर्च हातात घेत आत निघालो मागून अक्षय देखील येत होता. गुहेच्या कोनाशी पोहचून वळसा घालणार तोच मोठ्याने डुबुक असा आवाज झाला. गुहा निमुळती असल्यामुळे आवाज चांगलाच घुमला. आता बिबट्या आमच्यावर कोणत्याही क्षणी झडप घालणार ह्या भीतीने दोघेही सुन्न पडलो.
मी हिम्मत करून उजव्या बाजूस वळून पाहिले, तर एक इतभर मोठा बुलफ्रॉग आमच्याकडं डोळे बाहेर काढून बघत होता. आम्हीसुद्धा त्याला बघून हसू लागलो.
आत गुहा नसून एक कोरीव आतमध्ये रुंदावलेला पाण्याचं टाक होत. मी दोन्ही हात बुडवून ओंजळीत पाणी घेतले त्याच निखळ पाण्यात माझं हसणार प्रतिबिंब बघून मनोमन सुखावलो. इतक्या आत व आतून विस्तारित स्वरूपाचं टाक कोरून काढणाऱ्या कारागिराला तर २१ तोफांची सलामीचं द्यावी.
तिथून पुढे निघून आम्ही त्याच डोंगराच्या धारेवरून पुढे चालू लागलो. खरंतर हीच किल्ल्याची मूळ वाट होती. इथून किल्ल्याचा अभेद्यपणा नजरेस पडत होता.
किल्याच्या समोर असलेल्या टेपाडाला वळसा घालत पुन्हा जंगलातून ही वाट जात हाती. काही झाडावर पुसटशी मार्किंग नजरेस पडत होती. वाट चुकून जंगलात भटकत बसण्याचे अनुभव कुणाच्या पदरात पडू येऊ नये म्हणून आम्ही आधीच्या मार्किंग मध्ये भर टाकत होतो.
माझ्याजवळ असलेल्या स्प्रे ने खुणा करत खाली चाललो होतो. ही वाट आम्हाला पुन्हा त्या वाड्याजवळ घेऊन आली. ही लाकडं टाकून कुंपण घातलेली वाट हीच मूळ वाट आहे हे आमच्या लक्षात आलं. त्या झाडावर मार्किंग करत डोंगराच्या धारेवरून चालत राहिलो. वाटेमध्ये दिसणाऱ्या करवंदांवर ताव मारू लागलो, अक्षय ने तर वाटेत लागलेले कच्चे आळू काढून बॅग मध्ये भरले. घरी जाऊन ते कोवळे आळु तांदळात पिकवणार होता. आता घरच्या तांदळाचीही वाट लागणार हे वेगळचं.
धपाधप पावलं टाकत गोरखिंडीत पोहचलो. सूर्य अस्ताकडे चालला होता . ५ वाजून गेले होते. आम्ही गाडीला किक मारत घरचा रस्ता धरला. अखेरकार तिसऱ्या प्रयत्नात सुमारगड फत्ते झाला होता. प्रत्येक छोटामोठा ट्रेकही आपल्याला काही ना काही शिकवून जातो हे खरंच. बिकट परिस्थितीत सुद्धा मनाने खंबीर राहायचा, येणाऱ्या संकटांना जिद्दीने सामोरं जाण्याची प्रेरणा वाट चुकण्याच्या आणि गुहेतील प्रसंगाने आम्हाला मिळाली.
( एप्रिल २०१९ )
Great writing as always🙌🏻
उत्तर द्याहटवाThank you 😍❤️🚩
हटवा