धक धक चंदेरी !


ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला रौद्रभीषण सह्याद्री हा निसर्गाचा एक अद्भुतरम्य अविष्कारच आहे. उंचच उंच सुळके , खोल खोल दऱ्या , दाट दाट झाडी , लांबच लांब पठारे , उन्हात तापून निघालेले कातळकडे पावसाळा आला की आपलं रूप पालटून टाकतात. ऋतुचक्राच्या एका फेऱ्यात जणू जादू घडते.मग ह्याच दर्याखोऱ्यातून ओसंडून वाहणारे निखळ धबधबे , हिरवीगार शाल पांघरलेला सहयाद्रीचा हा काळा पत्थर आपली रौद्रता काही काळ बाजूला ठेऊन आपले भान हरपून टाकतो. अश्या आल्हाददायक वातावरणात ट्रेक करण्याची मझ्या काही औरच. पावसाळ्यात मनसोक्त भटकंती करण्याचा मोह आमच्यासारख्या जातिवंत भटक्यांना कधीच आवरता येत नाही.

दरवर्षीप्रमाणे ह्यावेळी ही जून महिन्यात पावसाचा हंगाम सुरू झाला होता पण महिन्याच्या सुरवातीला टुमदार कामगिरी करून पावसाने पळ ठोकला होता. उन्हाचा तडाखा पुन्हा जाणवू लागला होता.पण सगळीकडे पसरलेल्या हिरवटीमुळे आणि दाटून आलेल्या काळ्या ढगांमुळे वातावरण सुखावून टाकणारे होते.ह्याच संधीचा फायदा घेत आपण पहिला वहिला मान्सून ट्रेक उरकून टाकावा अशी योजना तयार केली.तीन दिवसांत पाच किल्ले करण्याचा  हेतु माझा अलिबागमधील मित्र भोप्या ( रोशन भोपी) ला कॉल करून सांगितला.आमचा भोप्या म्हणजे आमच्यासाठी आगरी वाघ .पुलावरून नदीत उडी ठोकायची असो किंवा धावत डोंगर उतरायचा असो अगदी तोडीस तोड पार्टनर.उद्याच निघायचं असं बोलून आम्ही दुसऱ्याच दिवशी पनवेल ला त्याच्या रूम वर पोहचलो.पहिल्या दिवशी माणिकगड करून दुसऱ्या दिवशी आम्ही चंदेरीचा प्लॅन केला.

महाड - मुंबई - महाड असा प्रवास करताना पळस्पे फाट्यावरून कातळकड्याचा मुकुट परिधान केलेला चंदेरीचा सुळका नेहमीच लक्ष वेधून घेतो.माथेरान डोंगररांगेत चंदेरी ,पेब,  मलंगगड , ताहुली , म्हैसमाळ, प्रबळगड, इर्शालगड, सोंडाई अशे सुळके वजा किल्ले आहेत. त्यातील चंदेरी जितका मोहक तितकाच भीषण. वाट चुकने, पाय घसरून दरीत पडणे, सुळक्यावर अडकून राहणे ह्या गोष्टी दरवर्षी येथे घडतातच.पाण्याचा अभाव , निसरडी वाट,घसारा (स्क्री), धडकी भरायला लावणारे कातळकडे , चार ते पाच तासांची पायपीट ह्यामुळे मोजकेच डोंगर भटके चंदेरीची वाट धरतात. बदलापूर वांगणी यांच्या मध्ये असलेल्या चिंचवली गावातून चंदेरीवर जायची वाट आहे.किल्ल्यावर पाण्याची फारशी काही सोय नसल्याने कमीत कमी चार लिटर पाणी बाळगलेच पाहिजे.

पनवेलहुन पहाटेच आम्ही वांगणिकडे जाताना चौक- कर्जत-नेरळ करत माथेरान ला वळसा घालून निघालो होतो.मध्येच वाटेत नेरळ ला पेटपूजा करून सोबत अजून एक मोठी पाणी बॉटल घेतली. रस्त्यावरून जाताना दूरवर असलेला चंदेरी नजरेस येत होता तर सोबतीला प्रबळ,इर्शाल,पेब होतेच.सकाळी ८:३० वाजता आम्ही चिंचवली गावात पोहचलो , गाडी पार्क करून गावकऱ्यांना आमचा प्लॅन सांगितला.त्यांनीसुद्धा गडावरची वाट मार्क केलेली आहे असं सांगून सुरवातीची वाट दाखवली.

पंधरा मिनिटांतच एका मोठ्या झाडाखालून ही वाट पठारावर येऊन पोहचली. चंदेरीचा अजस्त्र सुळका आणि त्याला खेटूनच उभा असलेला म्हैसमाळ ( महिषमाळ ) दिसू लागला. ह्या दोन्ही डोंगराच्या मध्ये असलेल्या खिंडीतूनच ही वाट चंदेरीवर जाते.

पावसामुळे इथल्या वातावरणात बदल झाला होता. जंगलातून आणि डोंगरावरून जाणारं धुकं तर त्याच धुक्यात मध्येच पूर्णपणे गुडूप होणारा चंदेरी, वाटेमध्ये साठलेले पाण्याचे डबके, पठारावर उगलेल्या हिरव्यागार गवताची चादर , मधेच तुरुतुरु चालणारे खेकडे यांच्याकडे बघत तासाभरात आम्ही पठारावरून गर्द झाडीमध्ये प्रवेश केला.

वाटेमध्ये बऱ्याच ठिकाणी हल्लीच केलेली मार्किंग दिसत होती, त्याचा आधार घेत पुढे चाललो होतो. आता ही वाट नाळेतून वर जात होती सोबतीला होतं ते घनदाट जंगल. मोठमोठाले दगड ह्या नाळेत येऊन पडले होते. कधी झाडाचा आधार घेत तर कधी कातळाला बिलगुन वर चढत राहिलो.

एक घरंगळत आलेला दगड घुडघ्याला लागल्यामुळे भोप्या चा वेग थोडा कमी झाला होता. खड्या चढाईची घामटा काढणारी वाट तासाभरात पूर्ण करत आम्ही खिंडीमध्ये येऊन थबकलो.

म्हैसमाळ आणि चंदेरी यांच्या मध्ये असलेली ही खिंड दिन्हीकडे वर जाण्यासाठी वाटा इथेच आहेत. वर पोहचताच पलीकडून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे आम्ही ताजेतवाने होऊन गेलो. बॅगमध्ये असलेले पाणी गरम झाले होते.त्यानेच घसा ओला करून घेतला.

जळून खाक झालेल्या कारवीतून वाट चंदेरीवर जात होती. वाटेत खोदून पायऱ्या केलेल्या दिसतात.दाट तर कधी विरळ धुक्याचे मोठंमोठाले लोट चंदेरी वर येऊन धडकत होते.

धापा टाकत आम्ही छोट्या मंदिरापाशी येऊन पोहचलो, बाजूलाच एका काठीला झेंडा लावलेला होता .वाऱ्यावर मस्तपैकी डुलत होता.

येथूनच गडाचा मुख्यद्वार आणि काही तटबंदी असल्याचे अवशेष दिसतात. इतरत्र कुठेही ते आढळून येत नाहीत. सर्व बाजूनी सरळसोट कड्यांमुळे त्याची गरज देखील भासत नाही. लष्करीदृष्ट्या संरक्षण करावे यासाठी वॉचटॉवर किंवा टेहळणीसाठी या किल्ल्याचा वापर केला असावा. 

सुळक्याच्या तळाशी आम्ही येऊन पोहचलो. त्याच्या कडेकडेने ही वाट एका गुहेमध्ये जाते. एका बाजूला गगनात घुसलेला सह्याद्रीचा काळा पत्थर तर दुसऱ्या बाजूस पाताळात घुसलेली खोल दरी.

वरच्या बाजूस निर्मळ आकाश तर मधेच कापसासारखे पांढरेशुभ्र ढग , तेही अगदी भारावून टाकणारे. हा सगळा नजरा मोबाईल मध्ये कैद करत आम्ही गुहेत येऊन पोहचलो. दुपारचे बारा वाजले होते.

गुहेमध्ये शंकराचे मंदिर आहे.पिंडीला वेटोळे घालून बसलेला नाग त्यामगेच शंकराची प्रतिमा , छोटासा देवारा व त्यात काही घंटा टांगलेल्या होत्या. त्यामागेच एक नंदी तर गुहेच्या डाव्या बाजूस गणपतीची मूर्ती त्यासमोरच २० ते ३० जण झोपू शकतात एवढी प्रशस्त जागा.

एक कोपऱ्यात पाणी पिण्याची काही हांडे व ताट ठेवलेले आहेत ,पण तेही रिकामेच. गुहेच्या समोरच कोणतरी कोंबड्या कापून बसण्याचा प्रोग्राम केलेला दिसला.

गुहेच्या पुढे चालत गेल्यावर चंदेरी देवीचं ठाण आहे.

बाजूलाच एक पिण्याच्या पाण्याचे टाके आहे, पण ते कोरडेठाक पडलं होतं. कातळाला बिलगुन ही वाट आम्हाला मागच्या बाजूस घेऊन आली.

वाटेत मुरमाड जागेमुळे घसारा बराच आहे त्यामुळे आम्ही सुद्धा अगदी हळूहळू दगडांना असलेल्या खाचिमध्ये बोट अडकवत मिळेल त्याचा आधार घेत निघून आलो.

इथूनच मागच्या बाजूचा नजरा अगदी स्पष्ट दिसत होता. माथेरानचा जंगलांनी व्यापलेला पठार , मागच्या बाजूस इर्शालगड त्यांच्या मध्ये असलेला मोरबे धरण , मध्यभागी प्रबळगड आणि सोबतीचा कलावंतीनीचा सुळका , उजव्या बाजूस कर्नाळा किल्ला , चंदेरीच्या खालच्या बाजूस असेलले गाडेश्वर धरण आणि उजव्या बाजूस अस्ताव्यस्त पसरलेली नवी मुंबई. मागच्या बाजूने माथ्यवर जायला वाट आहे.पण ही वाट थोडी अवघड श्रेणीतील आहे. आमच्याकडील पाणी जवळजवळ संपत आले होते. आम्ही तरीही वरच्या बाजूस चालत राहिलो. ऐका रॉकपॅच जवळ आलो. हा पॅच ओव्हर हँग होता , वरच्या बाजूस पकडून चढण्यासाठी दोन खोबणी केलेल्या होत्या. अगदीच चिंचोळी वाट एक एक पाऊल जपून टाकत होतो. पण इथून आपण वर न जाण्याचा सल्ला भोप्याने मला दिला.

पण आपण हा पॅच चढलो तर सहज माथ्यावर पोहचू  अस बोलून त्याला थोडा धिर दिला.खरतर नवीन मंडळींनी इथे धाडस करण्याची काहीच गरज नाहीये. जर का फॉल झाला तर थेट दरीतच पोहचणार याची खात्री बाळगावी.

तरीसुद्धा हा मूर्खपणा आम्ही केलाच आणि वर चढू लागलो. कातळामध्ये पाणी जाण्यासाठी अगदी छोटा ओहोळ काढलेला आहे त्यामध्ये पाय अडकवत कातळाचा आधार घेत दोन कड्यांच्या मधोमध येऊन ठाकलो.

घसरड्या मातीवरून ही वाट दोन्ही कड्यांच्या मधूनच वर जाते. वाटेत एक कातळात कोरलेले पाण्याचे टाकेवजा गुहा आहे.

ह्याच टाक्यांमध्ये आपल्यासारख्याच दुर्गप्रेमींनी बऱ्याच खराब बॉटल , प्लॅस्टिक रॅपर , चप्पल टाकून पाणी घाण केले होते. अश्या लोकांना दुर्गप्रेमी म्हणायला सुद्धा लाज वाटते. जर आपले गडकिल्ले आपण साफ करू शकत नाही तर निदान ते घाण तरी करू नयेत. 

एक छोटा ट्रॅव्हर्स मारून आम्ही माथ्यावर आलो. शेवटच्या बाजूस महाराजांची मूर्ती व एक झेंडा नजरेस पडत होता. सुळक्यावरील वाट सुद्धा तितकीच बिकट आहे. दोन्ही बाजूस असलेली खोल दरी यातून पावलं टाकत आम्ही टोकाजवल पोहचलो.पाठीवरील बोजा टाकत महाराजांना मुजरा केला.

सिंहासनारूढ महाराजांचा हा पुतळा पाहून तो इतक्या वर आणला तरी कसा असेल यानेच मन भारावून जातं .इथेच एका दगडावर बसून काही फोटो आम्ही काढले.इथून चाहुबाजूचा नजारा तोंडात बोटं घालण्यासारखा होता. दूरवर दिसणारा गोरखगड, सिद्धगड , भीमाशंकर ची पर्वतरांग , पेठचा कोथलीगड , ढाकचा बहिरी ,छोटेखानी दिसणारा भिवगड , पळसदरी, राजमाची , माथेरान व त्यासमोर पेबचा किल्ला , पेब आणि चंदेरी मधील नाखिंड.

पुतळ्याच्या समोरच्या बाजूस म्हैसमाळ, नवरा नवरी डोंगर , ताहुली , मलंगगड नजरेस येत होता. एक वाजण्याच्या सुमारास आम्ही माथ्यावर पोहचलो. भुकेने पोटात कावळे ओरडू लागले होते. भीतीदायक पॅच आणि ट्रॅव्हर्स यामुळे भूक दडपून गेली होती. आमच्याकडील काही बिस्किटं आम्ही खाल्ले. पण प्यायला पाणी च शिल्लक न राहिल्याने खाताना घशाला घास लागत होता. उरलेसुरलेल्या पाण्यात ती बिस्किटं ओली करून खाऊ लागलो. भूक मिटवण्यासाठी आमची धडपड चालू असतानाच कोणीतरी सुरुंग लावावा असा आवाज झाला. तो आवाज ऐकून दोघांचाही जीव खालीवर होऊ लागला. ताहुली च्या आसपास दाट काळेकुट्ट ढग जमा होऊन एकांवर एक आदळू लागले त्याचाच हा आवाज .जोरदार पावसाची सर आमच्याकडे रोष करून येताना दिसली. आम्ही आमचा समान बांधून पळ ठोकण्यास सुरवात केली.पाऊस यायच्या आत आम्हाला तो ओव्हरहँग उतरायचाच होता. जर का पावसाने तो कातळ ओला झाला तर हातापायांची ग्रीप बसने कठीण होते. 

जीव मुठीत घेऊन त्या पॅच जवळ चालू लागलो. घाई गडबड न करता तो उतरतोय तितक्यातच पावसाच्या सरी आमच्यावर कोसळू लागल्या. पण आम्ही अजून गुहेत पोहचलो नव्हतो.धुकं दाटून आलं होत त्यामुळे हळूहळू दिसेनास होऊ लागलं. मोठमोठ्याने विजांचा आवाज येत होता. तो आवाज विजांचा होता की वरून होणाऱ्या रॉकफॉलचा हेही आम्हाला कळत नव्हतं.पावसाचा सपाटून मार खात गुहेत पोहचलो तोच गुहेच्या तोंडाशी जेमतेम पाच फूट रुंदीचा बोल्डर पडला. तुकडे होऊन खाली दरीत घरंगळत गेला. 


बराच वेळ मोठमोठ्याने आवाज येतच राहिले. आम्ही दोघेही पुरते घाबरून गेलो होतो. गुहेच्या बाहेर डोकावण्याची हिम्मत देखील होईना.आमच्याशिवाय किल्ल्यावर दुसरं कोणीही नव्हतंच. काही माकड गुहेत येऊन बसली होती.बॅग काढून ठेवल्या होत्या. भिजल्यामुळे थंडी वाजू लागली होती.त्यापेक्षा जास्त तहान लागली होती.म्हणून गुहेच्या कोपऱ्यात एक धारेखाली आमची बॉटल लावून ठेवली.धुक्यामुळे व सततच्या पावसामुळे बाहेरील काहीच दिसत नव्हते.

४ वाजून गेले होते. पावसाचा जोर कमी झाला होता पण धुक्यामुळे काही दिसून येत नव्हते.काळोख व्हायच्या आत काही करून गाडीजवळ पोहचायच असा निर्धार करून करून तिथून निघालो. दगडी कोसळण्याचा आवाज अजूनही येतच होता.

किल्ला उतरत असताना उतारावर मागे वळून पाहिले असता सुळका आमच्याकडे धुक्यातून डोकावून पाहत होता. जोरात आदळणारा वारा आणि पावसामुळे कान सुन्न पडले होते. ह्यातूनही आमचा फोटो काढायचा मोह काही आवरत नव्हता.कॅमेरामध्ये पाणी जाऊ लागले होते त्यातसुद्धा शेवटचा सेल्फी काढून आम्ही मोबाईल बॅग मध्ये कोंबला.

चार तासांची चढण आम्ही भीतीपोटी ४० मिनिटांत उतरून गाडीजवळ पोहचलो. गावातील एका घरात मनसोक्त पाणी पित तहान भागवली,  तेव्हा आमच्या जिवात जीव आला. त्याच पावसात आम्ही पनवेलला निघून आलो.
आतापर्यंतच्या कोणत्याच ट्रेकला इतका भीतिदायक अनुभव आम्हाला आला नव्हता.पुढचे सगळे ट्रेक रद्द करून आम्ही घरी निघून आलो. पावसात ट्रेक करायची आमची खाज मिटली होती. मनामध्ये धडकी भरायला लावणाऱ्या ह्या चंदेरीच्या वाट्याला जाताना आपली क्षमता ओळखूनच गेलेल चांगलं. दरवेळीपेक्षा २-४ लिटर जास्त पाणी घेऊन जावं. शक्यतो पहिल्या पावसात हा ट्रेक टाळावा. उन्हामध्ये तापल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रॉकफॉल होतेच. पावसाळा संपल्याशिवाय माथ्यावर जाण्याचा विचार न केलेलाच बरा.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ