चढाई उतराई - उपांड्या आणि मढे घाटाची
प्राचीन काळापासून महाराष्ट्रात अनेक घाटमार्ग प्रचलित आहेत. व्यापारी मालाची वाहतूक करण्यासाठी तर काही गावकऱ्यांना वापरात येणाऱ्या वाटा घाटमाथ्यावरून कोकणात उतरतात. त्यापैकीच केळद ते राणवडी ह्यांना जोडणाऱ्या मढेघाट आणि उपांड्या घाट ह्या वाटा आहेत. मढे, शेवत्या, उपांड्या, गोप्या, शिवथर आणि वरंध ह्या सगळ्याच घाटवाटा पुढे महाड बंदरास मिळतात. शेवत्या, मढे घाटामधून पूर्वापार व्यापारी मालाची वाहतूक चालत असे. सव्वा लाख रुपये खर्च करून ब्रिटिशांनी वरंध घाटात पक्का रस्ता बांधला त्यामुळे शेवत्या आणि मढेघाटामार्फत होणारी वाहतूक थांबली. उपांड्या घाटाचा वापर आजही सर्रास गावकऱ्यांकडून केला जातो. पुणे जिल्ह्यातील व्हेल्हे तालुक्यात केळद तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात राणवडी हे गाव आहे. मढेघाटातुन कोसळणारा लक्ष्मी धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. मुंबई-पुण्याहून नसरापूर-व्हेल्हे किंवा सिंहगड रस्त्याने पाबे घाटाने ८० किमी चा प्रवास करून केळद गाव गाठता येते. पावसाळ्यात इथला परिसर धुक्यात न्हाहून निघतो. धुवांधार पावसामुळे येथून कोसळणारे लक्ष्मी आणि केळेश्वर धबधबे सगळ...