चकवा लावणारा माणिकगड


रखरखत्या उन्हात बारमाही ट्रेक करणारे भटके असो किंवा फक्त पावसाळी बेडकांप्रमाणे ट्रेक ला जाणारे हौशी पर्यटक असो, अश्या सगळ्यांनाच पावसाळा सुरू झाला की ह्याच डोगरदर्यातील किल्ले खुनवू लागतात. सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्यात वेडी झालेली भटक्यांची मने स्वतःला घरी जास्त वेळ बसूच देत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाचा पहिला मान्सून ट्रेक हा त्याच्या जिवनाला नवी पर्वणी देणाराच ठरतो. हिरव्यागार गवताची चादर ओढवून घेतलेले डोंगर, खळखळून वाहणारे झरे, ओढे आणि नद्या, घुडगाभर चिखलातुन जाणाऱ्या पायवाटा, धुक्यात मंत्रमुग्ध झालेली जंगले, सतत रिपरिपणाऱ्या जलधारा अश्या आल्हाददायक वातावरणात ट्रेक करण्याची मझ्या काही औरच. यंदाचा पावसाळी हंगाम नेहमीप्रमाणे सुरू झाला होता, पण सुरवातीला मुसळधार पडून जून महिनीच्या शेटवीमात्र पावसाने पोबारा केला होता. त्यातूनच सलग तीन दिवसांची सुट्टी चालून आल्याने मी पनवेल जवळील दुर्गांची मोहीम आखली. 
पहिल्या दिवशी माणिक-इर्शाल, दुसऱ्या दिवशी चंदेरी, तर तिसऱ्या दिवशी सोंडाई-पेब अशी दुर्गसाखळी पूर्ण करण्याचा आमचा बेत होता. महाडवरून माझा फोटोग्राफर मित्र मित आणि मी तर अलिबागवरून आमचा आगरी वाघ भोप्या अश्या तिघांनी ठरल्याप्रमाणे सकाळीच वडखळ येथे पेटपूजा करून माणिकगडाकडे कूच केली. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना  कर्नाळा आणि सांकशी किल्ल्यांच्या मधोमध दूरवर ७६० मीटर उंचीचा माणिकगड किल्ला नेहमीच नजरेस पडतो. शिवाजी महाराजांनी १६७० मध्ये खुद्द जातीने हजर राहून वाऱ्याच्या वेगाप्रमाणे मुघली मुलखावर काढलेल्या कल्याण - भिवंडी आणि उत्तर कोकण मोहिमेत माणिकगड , कर्नाळा, माहुली  यांसारखे अनेक किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. माणिकगडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
रसायनी-वाशिवली-ठाकूरवाडी अशी पठारावरून जाणारी किल्ल्याला वळसा घालून मागच्या बाजूने वर जाणारी ही वाट आहे. दोन ते तीन तासांची पायपीट ह्या वाटेने करावी लागते. तर दुसरी रसायनी-चावने-सावणे धनगर वाडी अशी वाट आहे. ठाकरवाडीतुन येणाऱ्या वाटेला ही वाट मध्यावर छेदते. आम्हाला ही वाट जवळची वाटल्याने आम्ही ह्याच वाटेने जायचा निर्धार केला. लगोलग आम्ही पेन वरून खारपाडा मार्गे पाताळगंगा नदीलगतच्या रस्त्याने सावणे गाठलं. गावात धनगर लोकांची छोटीशी वस्ती आहे. गावात विचारपुस केल्यानंतर माहीत पडलं की ह्या वाटेने माणिकगडकडे शक्यतो कोण फिरकत नाही. वाट जास्त मळलेली देखील नाही. पण आता आलोच आहे तर ह्याच वाटेने गडावर जायचा असं मनाशी पक्क केला आणि आम्ही वाटेला लागलो.

शेताच्या बांधावरून नदी शेजारून ही वाट गडाकडे जात होती. इथून दूरवर दिसणारा माणिकगड आणि त्यांचे दोन्ही बाजूस दिसणारे लिंगी नजरेस पडत होते. थोड्याच वेळात एका चढावर येऊन बसलो.

इथून कर्नाळ्याचा सुळका झाडांच्या वरून आमच्याकडे डोकावून बघत होता. ढग दाटून आले होते, उन्हाच्या ताडाक्यामुळे आमच्या अंगाची लाईलाही होत होती. मितला ट्रेकची सवय राहिली नसल्याने त्याची तर पारच दमछाक झाली. घटाघटा आमच्या जवळच्या पाण्याच्या बॉटल तो उताणी पाडू लागला. त्या डोंगराला ट्रॅव्हर्स मारून पुढे आलो असता ती वाट अचानक नाहीशी झाली. अनेक ढोरवाटा वेगवेगळ्या दिशांना जाताना दिसत होत्या. दोन तीन वाटांचा पिच्छा करून आम्ही अधिकच दाट जंगलात भटकत बसलो होतो पण काही केल्या योग्य वाट सापडत नव्हती. झाडांमुळे वरच्या बाजूचं काहीच दिसून येत नव्हतं.

एका टेपाडाच्या धारेवरून आम्हाला किल्ला नजरेस पडला. मग त्याच्याच लंबरेषेत (perpendicular) जर चालत राहिलो तर आपण नक्कीच ठाकूरवाडी वरून येणाऱ्या वाटेला भेटू असा विचार करत समोर चालत राहिलो. मध्येच पावसाची रिपरिप चालू झाली त्यातून वाचण्यासाठी घातलेल्या रेनकोट मुळे अजूनच घामाने भिजून गेलो.

मितने त्याच्याकडील गोप्रो काढून क्लिक करायला सुरवात केली. काही वेळातच आम्ही मळलेल्या वाटेला येऊन भेटलो. मग त्याच वाटेने चालत राहिलो. पण ह्या वाटेने चालत आम्ही किल्यापासून दूर चाललो होतो. फोनाफोनी आणि गूगल बाबांमुळे आम्ही उलट्या बाजूस ठाकूरवाडी कडे चाललोय ह्याची खात्री झाली. मग पुन्हा मागे फिरून किल्ल्याच्या दिशेने पावलं टाकायला सुरवात केली.

वाटेमध्ये केलेले मार्किंग आता नजरेस पडू लागले. पुढे जाऊन आम्ही मारुती मंदिराच्या आवारात पोहचलो.

एका चौथऱ्यावर शेंदूर फासलेली पणवती राक्षसिनीला पायाखाली चिरडतानाची मूर्ती आहे. बऱ्याचदा गडकोटांवर शक्तीचे प्रतीक म्हणून मारुतीची स्थापना केलेली असते. 

मंदिरापासून गडाचा माथा खूपच उंच होता त्याच्याकडे बघत मित ने तिथेच आराम करण्याचा निश्चय केला. सततच्या तीन तासांच्या पायपीटीमुळे आमच्याकडील पाणी जवळ जवळ संपतच आलं होत.त्यातील पाणी आणि काही बिस्किटं मित साठी ठेऊन गडावर पाणी भेटेल ह्या भ्रमात आम्ही पाण्याविना गडाकडे चालू लागलो. मंदिराच्या समोरून गडाचा खेकड्यासारखा आकार खुणावत होता. मित सोबत येत नसला तरी त्याचा गोप्रो आमच्यासोबत असल्यामुळे आम्ही मनोमन सुखावून गेलो.

पाण्याच्या शोधात आम्ही गडाला वळसा घेत माथ्याकडे धाव घेतली.पावसामुळे ओल्या झालेल्या निसरड्या मुरमाड मातीवरून माणिकलिंगी सुळक्याला डावीकडे ठेवत आम्ही गडाच्या एक तृतीयांश भागावर आलो. गडाची ढासळलेली तटबंदी आणि रेखीव बुरुज दिसून आले.

इथेच एक वाटेला समांतर रेषेत कातळात कोरलेल पाणी टाक आहे. मागच्या बाजूस दिसणाऱ्या इर्शालगड आणि टाक्यातील प्रतिबिंबाचे फोटोस काढून तुटलेल्या तटबंदीतून गडावर प्रवेश केला.

गडाच्या सुरुवातीलाच दगडी चुन्याचा घाणा आहे. पण त्याला भरडून काढणार दगडी जातं कुठेच दिसलं नाही. बांधकामासाठी लागणारा चुना दळण्यासाठी घाण्याचा वापर केला जाई. यामध्ये गुळ, भाताचे तूस, पाणी इ. पदार्थांचे मिश्रण दगडी जात्याने बैलांमार्फत फिरवले जात असे.

इथूनच पुढे एक चौथऱ्यावर दगडाची घुमटी असून त्यात शेंदूर फासलेला दगड आणि पुढे पहारेकरांच्या देवट्यांचे अवशेष दिसून येतात.

बाजूलाच दोन्ही बाजूस चौकोनी बुरजांमधून तयार केलेल्या पायऱ्यांवरून वाट खिंडीतून खाली जाते. कधीकाळी गडाचा दरवाजा इथे असावा. त्याच्या समोरच कड्यामध्ये एक छोटेखानी कातळात कोरलेलं भूमिगत पाणी टाक आहे.

तहानेने व्याकुळ झालो  असल्यामुळे तडकाफडकी त्याकडे धाव घेतली, पण टाक्यातील शेवाळ आणि बेडकांचा वावर बघून आमचा हिरमोड झाला. 

वरच्या बाजूस तटबंदीने मजबूत करून बालेकिल्ला बांधलेला आहे. त्यातच गणेशपट्टी असलेली साडेसहा फुट उंचीची बालेकिल्ल्याची कमान दिसून येते. 
पण हे प्रवेशद्वार वगळता बाकीची तटबंदी पूर्णतः ढासळली आहे.

बालेकिल्ल्यात प्रवेश करताच समोरच एक मोठा पाणीटाक दिसून येतो. पण जगोजागी पडलेल्या भेगांमुळे हे पाण्याने पूर्ण भरत नसावे. शिवाय वापर नसल्यामुळे शेवाळ खूप साचलं आहे. तलावाच्या डाव्या बाजूने खाली उतरत आम्ही सात ते आठ फूट मोठ्या दगडजवळ पोहचलो.

दगडावर बसून समोरच्या डोंगररांगेत असेलेले किल्ले सांकशी आणि किल्ले कर्नाळा तर मागच्या बाजूस प्रबळगड, माथेरान डोंगररांग, इर्शालगड, सोंडाई, लोणावळा डोंगररांग दृष्टीक्षेपात येतात.

इथूनच एक वाट कातळाच्या कडेकडेने पाण्याच्या टाक्याजवळ गेली आहे. पण १० फूट खोल टाक्यांनी सुद्धा तळ गाठला होता. ह्या वाटेवर गोप्रो चे काही क्लिक करून डाव्या बाजूने चालत आम्ही शिव मंदिरापाशी पोहचलो.

शिवलिंग त्यासमोर नंदी आणि झाडाला बांधलेल्या काही घंटा अशी ह्याची रचना. मंदिराच्या डाव्या बाजूचा एका टाक्यातील शेवाळाचा तवंग बाजूला सारला असता आतील पाणी स्वच्छ दिसून आलं.

बॉटल ला स्लिंग बांधून पाणी वर काढून दुसऱ्या बॉटल मध्ये गाळून घेतलं. जितकं पिता येईल तितकं पाणी आम्ही पिऊन घेत होतो. भूक लागल्यामुळे बॅग मधील काही बिस्किटांवर जीव शांत केला. पाण्याविना चालून थकल्यामुळे गारेगार पाणी पिऊन आमच्या अंगी नवीनच ऊर्जा प्राप्त झाली. 

ह्याच टाक्यांच्या शेजारीच दोन कोरडीठाक पडलेली टाकी आहेत. तिथेच एक गुप्त दरवाजा दिसुन येतो. थोडं वर जाऊन पुन्हा मोठ्या पाणीटाक्याजवळ पोहचलो.

खालच्या बाजूस मित एकटाच थोडंफार पाणी बाळगून आमची वाट बघत बसला होता. त्यामुळे भरभर मंदिरापाशी येऊन ठाकलो. पाणी नसल्यामुळे त्यानी काहीच खाल्लेलं नव्हतं. आमच्याकडील पाणी पिऊन त्याचा चेहरा देखील खुलुन आला होता. ट्रेकच्या सुरवातीला बरसेलेला पाऊस पुन्हा फिरकलाच नव्हता. मान्सून ट्रेकच्या नावाखाली घामटा काढणाऱ्या उन्हातून पाण्याविना आम्ही हा ट्रेक पूर्ण केला होता. आम्ही धनगरवाडीत पोहचलो, दुपारचे तीन वाजून गेले होते. मित ने थेट घरी जायचा निर्णय घेतला. इर्शालगड  न करताच फक्त माणिकगडावर समाधान मानावं लागत होत .मग मी आणि भोप्या त्याच्या पनवेल वरील रूम वर जाऊन, त्याने बनवलेल्या झणझणीत मटनावर ताव मारला.

गॅलरीतून दिसणाऱ्या कलावंतीण आणि प्रबलगडकडे  बघत दुसऱ्या दिवशीच्या ट्रेकचं नियोजन करण्यात मग्न होऊन गेलो.

२६ जून २०१९


दुसरा दिवस  :- किल्ले चंदेरी

http://royalbhatka.blogspot.com/2020/04/blog-post_28.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ