मांदाड खाडीचा रक्षक - किल्ले घोसाळगड
उत्तर कोकणचा प्राचीन इतिहास म्हणजे प्रामुख्याने तेथील बंदरे, खाड्या, देशी आणि विदेशी लोकांबरोबर होत असलेल्या व्यापारी व सांस्कृतिक संबंधांचा इतिहास होय. इ.स.पूर्व ५०० ते १५० या मौर्य, सातवाहन कालखंडात उत्तरेकडून दक्षिणकडे भ्रूगूकच्छ (भडोच), शूर्पारक (नालासोपारा), कलीयान (कल्याण), सिमुला (चौल), मंदगोर (मांदाड), हिप्पोकुरा (कुडा), पालेपट्पण (पालेमहाड), दालभ्यपुरी (दाभोळ) व मुसोपल्ली (म्हसळा), घोडेगाव (गोरेगाव) ह्या कोकणातील व्यापारी बंदरातून मालाची वाहतूक इजिप्त, अरबस्तान, इराण, ग्रीसमधील बंदराशी होत असे. रायगड जिल्यातील तळा तालुक्यात मंदगोर आताचे मांदाड हे बंदर आहे. मांदाड जवळील कुडा - ठाणाळे - भाजे असा नाणेघाट, बोरघाटातून पैठण, जुन्नर आणि घाटांवर जाणारा व्यापारी मार्ग होता. त्यामार्गात असलेल्या लेण्यांवरून तो अधोरेखित करता येतो. इ.स.पूर्व १०० वर्षाच्या काळात मुरुडमधील दंडा राजपुरी ही सातवाहनांचे सामंत महाभोज याची राजधानी होती. याच काळात मंदगोर बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी कुडा लेणी, तळगड आणि घोसाळगड यांची निर्मिती केली गेली.
सातवाहन काळात तळगड आणि घोसाळगड यांचा उल्लेख फक्त टेहळणी बुरुज म्हणून होता. निजाम मलिक अहमद ने १५८५ ला तळेगड , घोसाळगड वापरात आणला असा उल्लेख कुलाबा गॅझेटीअर मध्ये आहे. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानाचा मूळ पुरुष समजला जाणारा सिद्दी हा मुळचा ऑबिसिनियामधील होता. त्यांनी मुरुडमधील जंजिरा, राजपुरी, घोसाळगड, तळगड हा परिसर आपल्या सत्तेखाली आणला. १६५७ मध्ये शिवकाळात “तळा-घोसाळा सोंढवळकर व कोंढवळकर, हपसियाचे चाकर,मर्द जमातदार होते.त्यांचे राजकारण महाराजांकडे आले. आपली स्वारी कोंकणांत यावी,म्हणजे तळा -घोसाळा घेऊन देतो व जंजिरियांचेहि राजकारण आलें.ह्यांजवरुन खासा स्वारी कोंकणांत जाऊन दोन किल्ले तळा -घोसाळा घेतला.” असा उल्लेख मल्हार रामराव चिटणिस बखरिमध्ये आहे. १६६५ साली मुघलांचे सरदार मिर्झाराजा जयसिंह यांच्याशी झालेल्या पुरंदरच्या तहात तळगड आणि घोसाळगड हे किल्ले महाराजांनी स्वतःजवळ ठेवले. सिद्धी वर चाप बसवून जंजिऱ्यावर भगवा फडकावा अशी महाराजांची इच्छा होती. शिवपर्वकाळात किल्ल्याचा फक्त सुळका वापरात होता. रायरीवरील जावळीच्या मोऱ्यांचा प्रचंड खजिना मिळाल्यामुळे शिवरायांनी तळगड आणि घोसाळगड मजबूत करण्याची व्यवस्था केली असा उल्लेख सभासद बखरीमध्ये आहे. घोसाळगडाच्या सुळक्याच्या वायव्य बाजूस उतरलेल्या डोंगराच्या सोंडेवर माची बांधून किल्ल्याचे मजबुतीकरण केले व किल्ल्यास विरगड हे नाव दिले. पुढे सिद्धी, आंग्रे, मराठे, इंग्रज यांच्याकडे हा किल्ला होता.
घोसाळगडावर जाण्यासाठी रोहा पासून - मुरुड रस्त्यावर १० किमी अंतरावर तर इंदापूर पासून तळा-वाळी-म्हसळा फाट्यावरून ३० किमी अंतरावरील घोसाळे गाव गाठता येते. घोसाळे गावातून किल्ल्याचा शिवलिंगासारखा २६० मी उंचीचा सुळका नजरेस येतो. मौजे घोसाळे गावातून गडावर जायला वाट आहे.
गावाच्या सुरवातीलाच उजवीकडे असलेल्या शिवमंदिराच्या प्रांगणात एक ७ ते ८ फूट उंचीची दीपमाळ चौथऱ्यावर उभी केलेली आहे तर काही अज्ञात मुर्त्या, एक दगडात कोरलेली गणेशाची मूर्ती, दोन विरगळी आणि शिलालेख दिसून येतात. गावाच्या वरच्या बाजसु भवानी मातेचे तर शेजारीच स्वयंभू गणपतीचे मंदिर देखील आहे. इथवर जाण्यासाठी गाडीरस्ता आहे. कधीकाळी गडावर असणाऱ्या ह्या देवीची स्थापना आजमात्र गावातल्या मंदिरातच केलेली आहे. भवानी देवी ही कुलदैवत असल्याने महाराजांनी ह्या देवळास सनद चालू केली.
मंदिराच्या मागच्या बाजूने गडावर जाण्यास वाट आहे. वीस मिनिटांतच झाडीतून चढण चढून किल्ल्याजवळ येतो. वाटेत गडाची ढासळलेली तटबंदी आणि गर्द झाडीमध्ये गुडूप झालेले बुरुज आहेत. १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने हा किल्ला जिंकून तोफेने गडाची नासधूस केली.
तुटलेल्या पायऱ्यांवरून आपण गडाच्या दरवाजाजवळ पोहचतो. दरवाजाची व तटबंदीची वाताहत झाली आहे.
दरवाजावरील दोन्ही शरभशिल्प त्याच दगडांच्या ढिगाऱ्यावर पडून आहेत. दरवाजावर शत्रूने मारा करताना त्याला कोंडीत पकडण्यासाठी एक छोटेखानी बुरुजाची बांधणी येथे केलेली आहे.
तुटलेल्या तटबंदीतून प्रवेश करताच समोरच्या बाजूस एक गुप्त दरवाजा दिसून येतो. ह्या दरवाजातून दोरीच्या साहाय्याने गडाच्या मागच्या बाजूस घनदाट जंगलात उतरू शकतो.
गुप्त दरवाजाच्या समोरच एक लहान खांब ताक आहे. तर मधेच एक लेणीसदृश्य अर्धवट कोरलेली गुहा आहे. माचीवर अगदी चिंचोळ्या जागेतून तटबंदी बांधलेली आहे.
ह्याच तटबंदीमध्ये काही ठिकाणी शौचकूप आहेत. वाढेलल्या झाडीमुळे बऱ्याचदा ते दिसत नाहीत.
माचीच्या शेवटच्या भागात एक भगवा फडकताना दिसतो. इथून परत फिरून तटबंदीच्या पायऱ्यांवरून बालेकिल्ला डावीकडे ठेवत आपण वरच्या बाजूस येतो.
पायऱ्या चढून वर आल्यावर उजव्या बाजूस काही कातळात कोरलेली टाकी आहेत. त्यांना मागे टाकत आपण सुळक्याच्या तळाशी कोरलेल्या व काही बांधकाम केलेल्या गुहा दिसून येतात.
ह्या गुहेतून समोरच्या बाजूस मांदाड खाडीवर नजर फिरवता येते.
गुहेच्या समोरच एका दगडी ठोकळ्यात शिवलिंग कोरलेल आहे.
त्यासमोर खालच्या बाजूस झाडीमध्ये काही पाणीटाके आहेत.
गुहेला मागे टाकत पुढे आलो असता उजव्या बाजूस खाली पायऱ्यांनी आपण तीन टाक्यांच्या समूहजवल पोहचतो. पुढे झाडीमध्येसुद्धा काही टाके आहेत.
गडाच्या मागच्या बाजूस वर जाणारी वाट बालेकिल्ल्यावर जाते.
त्यासमोरच एक तोफ गवतामध्ये पडलेली आढळून येते.
मुरमाड आणि घसरड्या वाटेने डाव्या हाताला कडा ठेऊन बालेकिल्ल्यावर पोहचता येते.
दाट झाडाझुडपानी माजलेल्या माथ्यावर एका चौथऱ्याचे अवशेष आहेत.
इथूनच मागच्या बाजूस डोंगररांगेच्या शेवटी असलेला तळगड नजरेस पडतो तर समोर दिसणारं मांदाड खाडीचे दृश्य नजर खिळवून टाकते.
वायव्येकडील माची आणि त्यावर दिमाखात फडकणारा भगवा, मागच्या बाजूचे घनदाड किर्रर्र करणारं जंगल, चारही बाजूस असणाऱ्या डोंगररांगा, दाटीवाटीने कौलारू घरे असलेलं घोसाळे गाव हा सगळा रम्य परिसर येथून तासन्तास बघत बसावं पण मन काही भरत नाही.
बालेकिल्ल्यावरून खाली उतरून उजव्या बाजूची वाट मागच्या बाजूने किल्ल्याला वळसा घालुन पुन्हा दरवाजाजवळ येते.
या मार्गात काही जोत्यांचे निशाण आणि खांब टाके आहेत तर काही टाक्यांवर कातळात कोरलेली हत्ती व हरीण यांची शिल्पे आहेत.
बालेकिल्ल्याच्या सुळक्याला प्रदक्षिणा मारता येते. गड फिरण्यासाठी तीन तासांचा अवधी पुरेसा आहे. स्वतःचे वाहन असेल तर एकाच दिवशी तळगड , घोसाळगड आणि कुडे मांदाड लेणी बघता येतात.
Awesome place😍
उत्तर द्याहटवाDhanyavad 😍
हटवाअप्रतिम... असच share करत रहा. 🚩🚩
उत्तर द्याहटवाधन्यवाद मित्रा 😍❤️
हटवा