गांधीटोपीच्या आकाराचा किल्ला - केंजळगड


पावसाळा सरून गेला की निसर्गात निरनिराळ्या रंगछटा बघायला मिळतात. हिरव्यागार गवताने अच्छादून गेलेल्या डोंगररांगा , त्यातूनच ओसंडून वाहणारे शुभ्र पाण्याचे ओहोळ , ढगांआडून चालणारा ऊन सावल्यांचा खेळ, धुक्यात गुडूप झालेली गिरीशिखरे, रंगीबेरंगी फुलांनी बहारलेली पठारे अश्या आल्हाददायक वातावरणात भटकंती करताना एक वेगळाच उत्साह अंगी असतो. पाचगणी, कास, रायरेश्वर या मावळातील पाठारांवर उमललेल्या सोनकी, तेरडा, कुर्डु, विंचवी अश्या रानफुलांचा आनंद घेण्यासाठी पर्यटन मोठ्या संख्येने गर्दी करतात. सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या महादेव डोंगररांगेत महाराष्ट्रातील सर्वात मोठं असलेल रायरेश्वर पठार आणि उत्तुंग असा केंजळगड किल्ला आहे. स्वराज्य स्थापनेची शपथ महाराजांनी रायरेश्वरावर शंभुमहादेवाच्या मंदिरामध्ये घेतली. राजा भोज च्या काळात बांधला गेलेला केळंजा उर्फ केंजळगड किल्ला, आदिलशाहीकडून १६७४ मध्ये शिवराज्याभिषेकाच्या एक महिना आधी मराठ्यांनी सुलतानढवा करून स्वराज्यात दाखल केला होता. केंजळगडच्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा उल्लेख बऱ्याच लेख आणि पुस्तकात वाचल्यामुळे त्याची ओढ जास्त लागली होती. म्हणूनच भाद्रपदात चालून आलेल्या एका रविवारी आम्ही हिरडस मावळातील भटकंतीचा पर्याय निवडला. 

केंजळगड ला जाण्यासाठी पुण्याहून भोर-आंबेघर- कोर्ले असा ८० किमी चा  तर वाई मार्गे मेणवली-धोम-घेरा केंजळगड असा ३०किमी चा प्रवास करून पोहचता येते. पुण्याहून नितीन, योगेश आणि तेजस तर महाडवरून मेहुल, बाबु आणि मी भल्या पहाटेच मार्गस्थ झालो. महाड -भोर रस्त्यावरील आंबेघरजवळ सगळे एकत्र जमून केंजळगडाकडे जाणार होतो.

वरंध घाटातुन जाताना धुक्यातून डोकावून बघणाऱ्या  रायगड, तोरणा आणि राजगड यांना मुजरा करत पवार धाब्यावर गरमागरम भजी आणि चहाचा आस्वाद घेतला. हिरडस मावळातील मोहनगडाला मागे टाकत नीरा-देवघर धरणाच्या कडेकडेने जाणाऱ्या रस्त्याने आम्ही आंबेघर ला पोहचलो. पुण्यातून येणाऱ्या नितीन ची वाट बघत फोनाफोनी करण्यात काही वेळ निघून गेला. मागच्या बाजूस पंख पसरून बसलेल्या वटवाघुळासारखा रोहिडा उर्फ विचित्रगड धुक्यात न्हाऊन निघत होता.

रस्त्याच्या दुतर्फा सोनकुसुम (जंगली कॉसमॉस) ची फुले वाऱ्यावर डौलत जणू आमचं स्वागतच करत असल्याचा भास होत होता. काही वेळाने नेटवर्क गेल्याने आम्ही थेट केंजळगडच्या दिशेने आगेकूच केली.

कोर्ले गावातून समुद्रसपाटीपासून १३०० मीटर उंच असलेला केंजळा मन मोहित करत होत. महाराजांनी ह्याच नाव मनमोहनगड का ठेवले असेल ते त्याकडे बघूनच लक्षात आलं.

चिंचोळ्या आणि मुरमाड रस्त्याचा घाट पार करून आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहचलो. ८ ते १० घरांची वस्ती असलेले हे गाव. गावाच्या सुरवातीलाच केंजळाई  देवीचे मंदिर आहे. दाराला कुलूप असल्याने मुखदर्शन घेऊन आम्ही पुढे आलो.

रस्त्याच्या शेवटी गडाचा इतिहास सांगणारा फलक एका वनमित्र संस्थेने लावला आहे. त्याच्या मागे असलेल्या झाडाखाली नितीन, योग्या आणि तेजस आमची वाट बघत बसलेले दिसले. त्यांना सुद्धा नेटवर्क नसल्याने ते थेट पायथ्याशी पोहचले होते.

गाडी पार्क करून आम्ही झुडपातून जाणारी वाट पकडली, त्यातूनच केंजळगडाचे ताशीव कातळकडे जणू अभाळाशी स्पर्धा करताना दिसतात. दाट झाडीतून अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आम्ही तुटलेल्या तटबंदीतून प्रवेश केला. गडाचा पहिला दरवाजा ईथेच असावा पण वाढलेल्या गवतामुळे काहीच दिसून येत नाही. दरवाजाच्या कामानीचे काही दगड तुटलेल्या अवस्थेत पडून आहेत.

चालत पुढे एका निसर्गनिर्मित गुहेजवळ पोहचलो, १० जण झोपू शकतील इतकी प्रशस्त ही गुहा आहे. गुहेच्या शेजारी एक पिण्याच्या पाण्याचं टाक आहे.

डावीकडे वरच्या वाटेने जात आम्ही ह्या कातळात कोरलेल्या पायर्‍यांवर पोहोचलो. कातळभाग कोरून सुटसुटीत भक्कम अश्या पन्नास पेक्षा जास्त पायऱ्या आहेत. इतक्या सफाईत कोरीवकाम करणाऱ्या कारागिरांना नक्कीच सलाम करावासा वाटतो.

पायर्‍या चढून वर गेल्यावर गवतात हरवून गेलेल्या दरवाज्याचा उंबरठा नजरेस येतो. हा गडाचा दुसरा दरवाजा असावा, इतिहासात याचा उल्लेख घलई किंवा घळी दरवाजा असा आला आहे. बाजूलाच दोन्ही बुरुजांची जोती दिसून येतात.
गडावर प्रवेश करताच डाव्या बाजूला काही दगडी जोत्यांचे अवशेष आहेत.

त्याच बाजूने तटबंदीलगत चालत मोठ्या पाण्याच्या टाक्याजवळ पोहचलो. काही फोटो काढून कडेकडेने पुढे जात होतो.

सगळ्या बाजुंनी कातळकड्यांची व्याप्ती असल्याने तटबंदीची जास्त गरज भासत नाही पण बऱ्याच ठिकाणी ती दिसून येते तर काही ठिकाणी पूर्णतः नष्ट झाली आहे.

मागच्या बाजूस कृष्णा नदीवर बांधलेल्या धोम धरणाचा अप्रतीम नजारा, त्यामागे वाई शहर, पांडवगड, पुरंदर, मांढरदेवी, दिसून येतात. समोर कोळेश्वरच्या पठाराच्या शेवटी असलेला कमळगड, त्यामागे पाचगणी आणि महाबळेश्वरचे पठार नजरेस येतात. डाव्या बाजूने चालत एका दगडी जोत्याजवळ पोहचलो.समोरच पडझड झालेला बुरुज तर तटबंदीमध्ये जंग्या , जरोके यांची रचना केलेली आहे.

एक सुक ठाक पडलेलं टाक इथे आहे. बाजूलाच काही पायऱ्या चढून वर गेल्यावर चुन्याचा घाना आणि त्याला भरडून काढणार दगडी जातं आहे.

बांधकामासाठी लागणारा चुना दळण्यासाठी घाण्याचा वापर केला जाई. यामध्ये गुळ, भाताचे तूस, पाणी इ. पदार्थांचे मिश्रण दगडी जात्याने बैलांमार्फत फिरवले जात असे.

बाजूच्या तटबंदीवर बसून काही फ्रेम कॅमेरात कैद केल्या व सोबत आणलेल्या बिस्किटांवर तुटून पडलो. दोन ते तीन फूट उंच आणि दाट वाढलेल्या गवंतांतून चालताना त्याच गावतात सामावून जावंसं वाटत होत. हवेच्या तालात डोलणारे हिरव्यागार लुसलुशीत गवताचे गालिचे, सोनकी, तेरडा, कुर्डु, विंचवी अशी रानफुले, त्या फुलांवरील भुंगे, किर्रर्र आवाज काढणारे कीटक यांच्या सुरात मंत्रमुग्ध होत आम्ही किल्ल्याच्या शेवटच्या भागात पोहचलो.

शेवटच्या भागातून रायरेश्वराच्या पठाराचा विस्थार आणि त्यामागे नाकिंद टोक स्पष्ट दिसत होता. ही चिंचोळी माची हा गड किती अभेद्य आहे याची जाणीव करून देत होती.

सरळसोट काळजात धडकी भरेल अशे कातळकडे ! केंजलगडबद्दल पाने चाळता चाळता एक गोष्ट वाचनात आली होती ती म्हणजे इंग्रज अधिकारी एल्फिस्टन याची. हा अधिकारी जेव्हा गडावर आला होता तेव्हा त्याने " जर हा किल्ला दृढ निश्चयाने लढवला तर जिंकणे अशक्य आहे" अश्या शब्दात गडाचं भरभरून कौतुक केलं होतं.

डावीकडील वाटेने चालत आम्ही एका धान्य कोठाराजवल पोहचलो. काही जण ह्याला भीमाचे मंदिर म्हणून संभोधतात. ह्याला दगडाच्या भिंती आहेत तर त्यावर विटांमध्ये बांधलेला अर्धवर्तुळाकार छप्पर आहे. त्याच्या मधल्या भागाची पडझड झाली असली तरी अभिमानाने इतिहासाची साक्ष देत ताट मानेने उभा आहे. त्याच्या पुढे आणखी एक दगडी जात आणि चुन्याचा घाना आहे.

गडावरील दोन जात्यावरून गडावर मोठ्या प्रमाणत बांधकाम झालं असेल याची शक्यता नाकारता येत नाही. पण आज मात्र त्यातील काहीच दिसून येत नाही.काही वेळातच आम्ही गडाच्या प्रवेशद्वारा जवळ पोहचलो.

इथेच एका चौथऱ्यावर केंजळाई देवीचे ओसाड पडलेल मंदिर आहे. काही घंटा  शेंदूर फसलेल्या मुर्त्या आणि वीरगळ या आवारात आहेत. दुर्गप्रेमींचा एक ग्रुप तेथील झाडी साफ करण्यात मग्न होता. आम्ही देखील थोडा हातभार त्यांना लावला, बघता बघता १०-१५ मिनिटांतच तिथला वावर साफ करून टाकला. साधारणतः तासाभरातच आमची गडफेरी पूर्ण करून आम्ही रायरेश्वराच्या वाटेला लागलो. पण गडबडीत नितीन ची वॉटरबॉटल कुठे तरी हरवली.

ती शोधण्यासाठी मी पुन्हा उलटा चक्कर किल्ल्याला घालून परतलो पण ती काही सापडलीच नाही. टप्परवेअरच्या बॉटलवर पाणी सोडायला लागल्याने हताश होत गाडीजवळ पोहचलो आणि काही सेल्फी काढून रायरेश्वरकडे निघालो.

रायरेश्वर पठार :-

https://royalbhatka.blogspot.com/2020/05/blog-post_21.html 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ