अमोघ सौंदर्याने नटलेलं रायरेश्वर पठार


पुणे , सातारा आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर असलेलं, महाराष्ट्रातील सर्वात उंच, सर्वात जास्त लांबीचं व कृष्णा - नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यामध्ये वसलेलं हे रायरेश्वर पठार आहे. पर्जन्य काळात पठारावरून सूर्यदर्शन होत नाही अशी ख्याती रायरेश्वर पठाराची आहे. सुमारे १४३० मीटर उंच , ११.५ किमी लांब आणि १.२ किमी रुंद अशी याची भौगोलिक रचना. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ याच पठारावरील शिवमंदिरात घेतली. गडावर जाणाऱ्या शिडीजवल सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच गर्दी करतात. पावसाळा सरल्यानंतर गडावर रानफुलांचा बहार फुलतो त्यामुळे हिरवाईने नटलेल्या ह्या पठाराला नक्कीच भेट द्यावी. केंजळगड किल्ला जवळच असल्याने रायरेश्वर- केंजळगड असा ट्रेक एकाच दिवशी करता येतो.

रायरेश्वरावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत. 

१) टिटेधरण-कोर्ले मार्गे :-  पुणे-भोर-आंबवडे गावातून टिटे धारणाजवळून           कोर्ले मार्गे रायरेश्वर ला जाता येते. काही ठिकाणी ही वाट अवघड आहे.
     सुमारे तीन तास वेळ ह्या वाटेने लागतो.
२) भोर- रायरी मार्गे  :-  पुणे - भोर - रायरी गावातुन ही वाट जाते.दोन
     तासांच्या चढाईनंतर आपण पठारावर पोहचतो. याच वाटेला                         सांबरदऱ्याची वाट म्हणून ओळखतात.
३) वाईमार्गे  :-  वाई-जांभळी मार्गे खड्या वाटेने दोन तासात आपण 
     श्वानदर्‍याच्या( सुणदरा) वाटेला येउन मिळतो. तिथुन लोखंडी शिड्यांनी
     माथ्यावर पोहचता येते.
४) केंजळगडमार्गे :- केंजळगडावरून श्वानदऱ्याने किंवा सुणदऱ्याने                     रायरेश्वरला जाता येते. 

आम्ही केंजळगड करून रायरेश्वराच्या पायथ्याजवळ पोहचलो. दुपारचा एक वाजला होता. गाडी पार्क करून चालत शिडीजवल पोहचलो.

गडावरून उतरणाऱ्या पर्यटकांची लांबच लांब रांग लागली होती. काही घाबरत लोक भीतीपोटी दबकत पावलं टाकत उतरत होती. अर्ध्या तासानंतर आम्हाला वर जायला संधी भेटली. तोपर्यंत आम्ही फोटोग्राफी मध्ये वेळ घालवला. कातळभागाला लोखंडी जिना बसवून वाट तयार केलेली आहे. एकदा पावसाळ्यात भेट दिली होती तेव्हा धुक्यात हरवलेल्या जिन्यावरून स्वर्गातच चाललोय असा भास होत होता. पण आता मात्र ह्या कंटाळवाण्या गर्दीतून वाट काढत वरती पोहचलो.

मंदिरापर्यंत जाण्यासाठी पेव्हरब्लॉक टाकून रस्ता केलेला आहे.

जाताना वाटेत उजव्या बाजूस एक तलाव आहे तर मंदिराच्या जवळ एका गायमुखातून येणारा पिण्याच्या पाण्याचा झरा आहे. आमच्याकडील रिकाम्या झालेल्या बॉटल भरून आम्ही मंदिराजवळ पोहचलो.

मंदिरच्या सुरवातीलाच गडाची माहिती आणि नकाशा दर्शवणारा एक फलक वनमित्र संस्थेनं लावला आहे.

हल्लीच बसवलेलं पत्र्याचे छप्पर मंदिराला आहे. मंदिराच्या समोरच शेंदूर फासलेला दगड आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाला असावा. प्रवेश करताच समोरच दोन नंदी दिसून येतात.

दगडी खांबांवर उभ्या असलेल्या ह्या मंदिराच्या डाव्या बाजूच्या खांबावर एक शिलालेख दिसून येतो. " श्रीशंकर , रायरेश्वर दापघर , मौजे राईर येथील समस्त भाउपणी, यांचे वडील संकरलिंग याने पूर्वी शिवालय बांधले, त्यास सुमारे दोनशे वर्षे झाली , याचा जीर्णोद्धार हरी पाटील यांनी बांधले यास खर्च रुपये ७०० शेहे १७०५ साली झाले ".

मंदिराच्या गाभाऱ्यात महाराजांनी रुद्राभिषेक केलेलं शिवलिंग आहे. मागच्या बाजूस तश्या स्वरूपाची पेंटिंग्ज सुद्धा लावलेली आहे. मंदिराच्या भिंतीवर ढाल तलवार लावलेली आहे. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो , समोरच महाराजांचा पुतळा आणि त्यावर फडफडणारा भगवा त्याची शान वाढवत होता. श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीच्या दिवशी गडावर मोठा उत्साह असतो.

मंदिराच्या मागे असलेल्या ओढ्यापालिकडे काही लोकांची वस्ती आहे. त्यांच्याकडे जेवणाची व राहायची सोय होते त्याचा ते योग्य मोबदला घेतात. आमच्या पोटात कावळे ओरडू लागल्याने आम्ही थेट जंगम मामांकडे जाऊन जेवणाची ऑर्डर देऊन टाकली. हेच जंगम लोक देवळात पुजारी म्हणून सुद्धा काम करतात आणि पावसाळ्यात शेती करतात. पर्जन्यकाळात पुरेल इतके धान्य ते आधीच भरून ठेवतात. गडाखाली उतरत देखील नाही.

गरमागरम पिठलं , ठेचा , कांदा आणि भाकरीवर पोट भरेपर्यंत ताव मारला.

थोडा आराम करून मागच्या बाजूस एका टेकडीवर आढळणारी सात रंगाची माती बघायला निघालो. अर्ध्या तासात वाड्यांच्या मागून ही वाट आम्हाला तिथे घेऊन गेली.

वाटेत दुतर्फा तेरडा, सोनकी आणि विंचवी ची रानफुले आमचं स्वागतच करत होती. हिरवट - लाल - तांबडी - पिवळी - काळी-जांभळी आणि निळसर रंगाची माती या टेकडीवर आढळते.

पठारावरून वातावरण स्वच्छ असेल तर फार मोठा परिसर नजरेस पडतो. थेट उत्तरेला राजगड, तोरणा, सिंहगड, रायगड, लिंगाणा दिसतात. ईशान्येला पुरंदर, वज्रगड, रोहिडा दिसतात.

वायव्येला मोहनगड, मंगळगड आणि त्याच्या मागे वरंधा घाटातील कावळ्या किल्ला दिसतो. नीरा-देवघर आणि धोम अश्या विस्तृत धरणांचा पाणीसाठी नजरेस पडतो. महाबळेश्वर, पाचगणी आणि कोळेश्वर पठार, कमळगड, पांडवगड, वैराटगड, चंद्रगड दृष्टीक्षेपात येतात. रायरेश्वराच्या पश्चिम बाजूस नखिंड टोक आहे. याच बाजूने अस्वलखिंडीतून चंद्रगड - महादेवाचा मुर्‍हा - मंगळगड असा ट्रेक ही करता येतो.

गडाच्या एका कड्यात नेढे तर एका कड्यात माणसाच्या चेहऱ्याची आकृती दिसून येते. गडावरून गांधीटोपीच्या आकाराचा केंजळगड किल्ला नजरेस पडतो. हिरवाईने नटलेल्या पठारावर आमचा काही वेळ घालवून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.

जाताना रस्त्यात आंबवडे गावातील झुलत्या पुलावर उद्या मारत काही वेगळाच अनुभव घेतला.

आंबवडे गावातच पुढे कान्होजी जेधे यांची समाधी आहे. अफझलखान प्रसंगावेळी जेध्यानी शिवाजी राजांच्या केवळ शब्दासाठी वतनावर पाणी सोडलं होतं. त्यांच्या समोरच जिवाजी महाले यांची समाधी आहे. अफजल्याचा वध करताना जिवाजी यांच्याबद्दल " होता जिवा म्हणून वाचला शिवा " कौतुकास्पद वाक्य लिहलेला आहे. केंजळगड आणि रायरेश्वर यांची मनसोक्त भटकंती करून आम्ही घरचा रस्ता पकडला.


केंजळगड किल्ला :-

https://royalbhatka.blogspot.com/2020/05/blog-post_19.html













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ