घनांच्या दुलईत घनगड


पावसाळा सुरू झाला की वेध लागतात निसर्गाच्या सानिध्यात, ओल्याचिंब पावसात मनमुराद भटकंती करण्याचे!!आणि ती भटकंती जर ताम्हिणी घाटातील असेल तर आनंद द्विगुणित करणारी ठरते. पाऊस आणि ताम्हिणी घाट यांचं एक वेगळंच समीकरण आहे. एकदा का पाऊस बरसू लागला की इथे अगदी बेभान होऊन बरसतो. कधी कधी तर भारतात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस ताम्हिणी घाटात पडतो. पांढऱ्या शुभ्र धुक्यात हरवून गेलेला घाट, हिरव्यागार गवताची चादर ओढून घेतलेले डोंगर, कडेकपाऱ्यातून झेपावणारे धबधबे अशा आल्हाददायी वातावरणातून प्रवास करताना स्वर्गसुखांची प्राप्ती झाली नाही तरच नवल!! जुलै महिन्याच्या शेवटच्या रविवारी कोरसबारस मावळातील घनगड आणि तैलबैला किल्ल्यांचा बेत आम्ही आखला. पुण्याहून नितीन आणि योगेश तर महाडहून मी असे आम्ही तिघेही ताम्हिणी घाटातील निवे फाट्यावर भेटून लोणावळ्याला जाणाऱ्या रस्त्याने घनगड आणि तैलबैला हे किल्ले करायचे,अशी आमची योजना!! घनगडावर लोणावळा मार्गे सुद्धा जाता येते. त्यासाठी मुंबई किंवा पुण्याहून लोणावळा गाठावे. येथून बस किंवा खाजगी वाहनाने ३५ किमी अंतर पार करून आपण भांबुर्डे गावात पोहचतो. भांबुर्डे ते एकोले हे  दोन किमी अंतर चालत किंवा खासगी वाहनाने पार करून गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावी पोहचता येते.
एकोले व्हॅलीच्या मुखावर असलेला ९१५ मीटर उंचीचा हा घनगड किल्ला! किल्ल्याचे भौगोलिक स्थान आणि आटोपशीर माथा बघता ह्याचा वापर टेहाळणीसाठी केला गेला असावा. किल्ल्यावरील खांबटाक्यावरून आणि कोरीव गुहांवरून हा किल्ला शिलाहारांच्या काळातील असावा असा अंदाज बांधता येतो. इतिहासात फारसा परिचीत नसलेला हा किल्ला कोळी सामंताकडून निजामशहाकडे गेला आणि पुढे आदिलशहाकडे होता.आणि त्यानंतर ह्या किल्ल्याची डागडुजी शिवाजी महाराजांनी केली होती. पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी हा किल्ला मुघलांना दिला. त्यानंतर महाराजांनी तो पुन्हा जिंकून घेतला.तेव्हापासून राजाराम महाराजांपर्यंत गड मराठ्यांकडेच होता. त्यांच्या मृत्यूनंतर तो पुन्हा मोघलांकडे गेला. महाराणी ताराबाई यांनी तो पुन्हा जिंकून घेतला. हाच किल्ला कान्होजी आंग्रे यांनी शाहू महाराजांकडे दिला, नंतर त्यांनी तो बालाजी विश्वनाथ पेशवे यांना दिला. अशी ही घनगडाच्या हस्तांतरणाची कथा!! पेशव्यांनी या किल्ल्याचा वापर कैदी ठेवण्यासाठी केला. नोव्हेंबर १८१७ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने मावळातील कोरीगड-घनगड- लोहगड-विसापूर हे किल्ले जिंकून घेतले.
प्राचीन काळापासून विदेशातून येणाऱ्या व्यापारी मालाची वाहतूक ही कोकणातून घाटमाथ्याकडे होत असे. ह्याच घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी बऱ्याचदा किल्ल्यांची उभारणी केलेली असे. घनगडाजवळून नाणदांड घाट, सवाष्णीचा घाट, भोरप्याची नाळ हे तीन घाटमार्ग पाली गावात उतरतात. पुढे त्याच वाटा मांदाड व नागोठणे बंदरापर्यंत जातात. घाटमाथ्यालगतचा हा भाग या परिसरात येणाऱ्या छत्तीस गावांमुळे छत्तीस कोरबारसे म्हणुन ओळखला जातो. सकाळीच मी महाडहून माणगाव - विळे ह्या मार्गाने ताम्हिणी घाटाकडे निघालो. रस्त्यालगतच ओसंडून वाहणारे धबधबे, दाट धुक्यात हरवून गेलेलं जंगल आणि पर्यटकांची गर्दी ह्यांनी ताम्हिणी घाट गजबजून गेला होता.


पावसात भिजत, वळणावळणाच्या काळ्याभोर रस्त्यावर जेमतेम काही अंतर दिसेल इतक्या धुक्यातून प्लस व्हॅलीचा नजारा बघत निवे फाट्याजवळ पोहचलो. समोरच असलेल्या टपरीमध्ये वाफाळत्या चहाचे घुटके घेत मी नितीन आणि योगेशची वाट बघत बसलो. काही वेळातच दोघेही तिथे पोहचले. गरमागरम मॅगी आणि चहाचा आस्वाद घेऊन आम्ही लोणावळ्याकडे मार्गस्थ झालो. 


वाटेत लागणाऱ्या कुंडलिका व्हॅलीचे दृश्य बघून स्वर्गात आल्याचा भास झाला. बाजूलाच असणाऱ्या अंधारबन ट्रेकची आठवण नितीनने करून दिली. पिंपरी धरणाच्या बॅकवॉटर मध्ये एक-एक डुबकी मारत भांबुर्डेचा रस्ता धरला. मी एकटाच असल्याने थोडा पुढे जात भांबुर्डेला पोहचलो. नेटवर्क नसल्यामुळे त्यांची वाट बघत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. अर्ध्या तासानंतर शेवटी मीच मागे फिरून त्यांना शोधत निघालो. त्यांची जुनी स्प्लेंडर बंद पडली होती, तिलाच चालू करण्याचा प्रयत्न दोघेही करत होते.  इतक्या पावसात त्यांना फुटलेला घाम दिसून येत नव्हता, पण चेहऱ्यावर  स्पष्ट जाणवत होता. जवळपास २० किमी अंतरापर्यंत कुठेच गॅरेज नव्हते. गाडीला किक मारून दोघांचेही पाय दुखू लागले. वाटेत येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबवून मदत मागू लागलो. एक बाईकस्वार आमच्या मदतीस थांबला, त्याला आमची हकीकत सांगितली. त्याने तडक त्याच्या डिकीत असलेल्या स्क्रू ड्रायव्हरने  कार्बोरेटर मधील कचरा साफ केला. काही वेळातच गाडी चालू झाली. तो पौड मधील एक मेकॅनिक होता. स्क्रू ड्रायव्हर आम्हालाच देत 'गाडी भिजून बंद पडली तर पुन्हा तुमच्या कामी येईल',असं सांगून पावसाच्या सरींआड अदृश्य होऊन गेला. अनोळखी व्यक्तीकडून माणुसकीचे धडे घेत आम्ही भांबुर्डेहून एकोले गावात येऊन पोहोचलो.आमचा बराच वेळ ह्या प्रकरणात निघून गेला होता. एव्हाना घड्याळात बारा वाजले होते, त्यामुळे एकोले गावच्या शाळेजवळ गाडी पार्क करून शेजारीच असलेल्या मारुतीचं दर्शन घेऊन घनगडाची वाट धरली.

ढगांची दुलई पांघरलेला घनगड दुरूनच नजरेत आला. वाऱ्यामुळे धुक्याचा आणि गडाचा लपंडाव चालू होता. हिरव्यागार गवताने आणि पावसाच्या धारेने गड न्हाऊन निघाला होता. गावाच्या डाव्या बाजूने एका तारेच्या कंपाऊंड शेजारून ही वाट वर जाते. डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या ओढ्यामुळे वाटेवर चिखल आणि दगडगोटे जमा झाले होते. त्याच निसरड्या गुडघाभर चिखलाच्या वाटेवरून चालत गर्द झाडीच्या वाटेवर आलो. मधेच वाटेच्या उजव्या बाजूला शिवपिंडी, नंदी, वीरगळ व दगडी तोफगोळे दिसले.


डावीकडच्या वाटेने वर आल्यावर २० मिनिटांतच आम्ही गारजाई देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. या मंदिराचा हल्लीच जीर्णोद्धार झालेला आहे. मंदिरात गारजाई आणि अन्य देवांच्या मूर्ती आहेत.

मंदिराच्या समोरच दोन दिपमाळा, भग्न अवस्थेतील वीरगळ, पादुका आणि काही शेंदूर फासलेले दगड आहेत. सकाळपासूनच पावसाची संततधार चालू होती, पण मंदिरापाशी असलेल्या गर्द झाडांमुळे जाणवत नव्हती. मंदिरापासून डावीकडच्या वाटेने दाट झाडीतून वर एका खिंडीजवळ पोहचलो.

डावीकडील वाट खिंडीच्या मुखाशी तर उजवीकडील गडावर जाते. या खिंडीमुळेच मुख्य डोंगररांगेपासून घनगड विलग झालेला दिसतो. कातळावर शेवाळ साठून वाट खूप निसरडी झाली होती. एकमेकांचा आधार घेत गडाच्या दरवाजापाशी पोहचलो. दाट धुक्यामुळे सारं धूसर दिसत होत.

त्यातही गडाचे दोन्ही बुरुज नजरेस पडले.त्यातील पायऱ्या चढून वर आलो. समोरच कातळात खोदलेली लेणीसदृश्य गुहा आहे, दहा-बारा जण झोपू शकतील इतकी ती प्रशस्त आहे.

उजवीकडे एक भलामोठा दगड खाली पडून एक कमान तयार झाली आहे. तिथेच कातळात गारजाई देवीची महिषासूरर्मर्दिनी प्रकारातली सुरेख अशी मूर्ती आहे. देवीचे दर्शन घेत पुन्हा दरवाजापाशी पोहचलो.

समोरच वरती जाण्यासाठी २० फुटांची लोखंडी शिडी बसवलेली आहे. कधीकाळी कातळात कोरलेल्या पायऱ्या इथे असाव्यात. पण तोफेच्या माऱ्यामुळे त्या उध्वस्त झाल्या आहेत. शिडीवर चढून पाण्याच्या टाक्याशी पोहचलो, पिण्याच्या पाण्यासाठी ह्या बारमाही टाक्याचा वापर केला जातो.
डाव्या बाजूस एका लोखंडी केबलचा आधार घेत वरच्या बाजूस आलो. नवख्या मंडळींसाठी हा एक थरारक अनुभव ठरू शकतो. हा थरार अनुभवण्यासाठी एकदा तरी घनगडाला नक्कीच भेट द्यावी.

वर  काठोकाठ भरलेली आणखी तीन खांबटाकी आहेत. त्या बाजूलाच वर कातळावरून रेंगत बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे, तर डावीकडे कपारीत खोदलेली एक गुहा नजरेस पडते.

पंधरा मिनिटांतच आम्ही बालेकिल्याच्या दिड मीटर रुंद दरवाजापाशी पोहचलो. पावसाच्या पाण्यामुळे पायऱ्या निसरड्या झाल्या होत्या. शतकानुशतके ऊनपावसाच्या माऱ्याने त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

गडाची थोडीफार तटबंदी शाबूत आहे. त्यात जंग्या आणि झरोके बघायला मिळतात. डाव्या बाजूस गडावरील सर्वात मोठा बुरुज आहे. ह्याच बुरुजावरून खालच्या खिंडीचा, एकोले आणि मुळशीचा परिसर नजरेस येतो. गडाच्या वरच्या भागात पोहचताच पश्चिमेकडून येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आम्ही हडबडून गेलो.

बोचरा पाऊस आणि भन्नाट वाऱ्यामुळे आमचं अंग थरथरू लागलं. त्यातूनच मोबाइल बाहेर काढून आम्ही काही फोटो काढले. त्यातला काही वारा योग्याच्या डोक्यात जाऊन त्याला टीशर्ट काढुन फोटो काढायचा मोह झाला. फोटो काढताना वाऱ्याच्या एका जोरदार झडपेने मी तिथल्या गवतात पाय घसरून पडलो. मधेच धुकं विरळ होऊन एकोले व्हॅलीचा थक्क करायला लावणारा नजारा दिसून आला . मधेच काही वेळासाठी खालच्या बाजूस असलेला सुधागड, सरसगड आणि समोरील तैलबैला नजरेस पडला. धुकं, पाऊस आणि वारा यांच्या माऱ्यामुळे कानाला दडे बसले होते.अंग अगदी सुन्न पडू लागलं होतं. त्याच गडबडीत नितीनचा चष्म्या कुठे हरवून गेला की उडून गेला, याचा शोधूनही थांगपत्ता लागला नाही.

गडाच्या उत्तरेकडील दोन पाण्याची टाकी आणि तटबंदी बघत गडफेरी पूर्ण केली.गडाच्या सर्वोच्च माथ्यावर काही घरांची भग्न अवस्थेतील जोती बघायला मिळतात. वातावरण निरभ्र असेल तर अगदी कोकणातील पाली -नागोठणे पर्यंतचा परिसर, कोरीगड, कैलासगड, तिकोना, मोरगिरी, नागफणी दृष्टीक्षेपात येतात. वाढत्या थंडी आणि वाऱ्यामुळे आम्ही लगोलग गडाखाली खिंडीजवळ पोहचलो. खिंडीत एका टॉयलेटची उभारणी केलेली आहे,पण वाऱ्यामुळे ते देखील गदागदा हालत होते.

समोरच्या दगडावर उभं राहून दरीतून झेपावणारे धबधबे, धुकं आणि थंडगार वारा यांचं दृश्य डोळ्यात, आणि कॅमेऱ्यात कैद केलं. शेवटी कॅमेऱ्यात पाणी गेल्यामुळे तो देखील बॅगमध्ये टाकला.


तिथूनच कातळाला बिलगून वाट एका गुहेजवळ पोहचते. गडाच्या सर्वात मोठ्या बुरुजाच्या कातळकड्यात खालच्या बाजूस ही गुहा आहे. शेवाळामुळे ही वाट निसरडी बनली आहे. ती बघून झाडीतून गडाखाली उतरत असताना योग्याच्या डाव्या पायाचा बूट गुडघाभर चिखलात अडकला,तो कायमचाच. उरलेला काही रस्ता त्याने एका बुटावरच पूर्ण केला. दोन तासातच आम्ही ट्रेक पूर्ण केला होता. खूप भूक लागल्यामुळे गावातील एका मामांकडे भाकरी आणि गरमागरम चिकनवर ताव मारला. गारठलेल्या शरीराला त्यामुळे थोडीफार उर्जा मिळाली. पावसाचा जोर आणखीनच वाढला होता. त्या दोघांसोबत माझ्या काही वस्तू गहाळ होण्याआधी आम्ही  तैलबैला ट्रेक रद्द करून घरचा रस्ता धरला. रायगड , रोहिडा आणि घनगड ह्या किल्ल्यांवरचा कानाचे दडे बसवणारा वारा मी आजपर्यंत आणखी कुठेच अनुभवला नाही.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ