चढाई उतराई - उपांड्या आणि मढे घाटाची
प्राचीन काळापासून महाराष्ट्रात अनेक घाटमार्ग प्रचलित आहेत. व्यापारी मालाची वाहतूक करण्यासाठी तर काही गावकऱ्यांना वापरात येणाऱ्या वाटा घाटमाथ्यावरून कोकणात उतरतात. त्यापैकीच केळद ते राणवडी ह्यांना जोडणाऱ्या मढेघाट आणि उपांड्या घाट ह्या वाटा आहेत. मढे, शेवत्या, उपांड्या, गोप्या, शिवथर आणि वरंध ह्या सगळ्याच घाटवाटा पुढे महाड बंदरास मिळतात. शेवत्या, मढे घाटामधून पूर्वापार व्यापारी मालाची वाहतूक चालत असे. सव्वा लाख रुपये खर्च करून ब्रिटिशांनी वरंध घाटात पक्का रस्ता बांधला त्यामुळे शेवत्या आणि मढेघाटामार्फत होणारी वाहतूक थांबली. उपांड्या घाटाचा वापर आजही सर्रास गावकऱ्यांकडून केला जातो. पुणे जिल्ह्यातील व्हेल्हे तालुक्यात केळद तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात राणवडी हे गाव आहे. मढेघाटातुन कोसळणारा लक्ष्मी धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. मुंबई-पुण्याहून नसरापूर-व्हेल्हे किंवा सिंहगड रस्त्याने पाबे घाटाने ८० किमी चा प्रवास करून केळद गाव गाठता येते. पावसाळ्यात इथला परिसर धुक्यात न्हाहून निघतो. धुवांधार पावसामुळे येथून कोसळणारे लक्ष्मी आणि केळेश्वर धबधबे सगळ्यांनाच अचंबित करतात. काही भटके मंडळी ह्याच ओल्याचिंब वातावरणात शेवत्या - उपांड्या - मढे किंवा गोप्या-शिवथर-आंबेनळी अश्या घाटवाटांची तांगडतोड करतात. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माझा मित्र योगेश मुंबईहुन माझ्या घरी आला होता. आदल्या दिवशी आम्ही वरंध आणि शिवथर येथून फेरफटका मारला होता. दुसऱ्या दिवशी अचानक मढे-उपांड्या घाटाचा प्लॅन बनवून दोघेही महाडवरून निघालो. मढेघाट ला जाण्याची ही माझी दुसरी वेळ होती त्यामुळे सकाळीच वेळ न घालवता आम्ही बिरवाडी-दहिवड मार्गे वाकी गावाजवळ पोहचलो.
नुकताच पाऊस पडून ओल्याचिंब झालेल्या रस्त्यावरून धुक्यात विलीन झालेल्या शिखरांचं प्रतिबिंब दिसून येत होत. दुतर्फा झाडी असलेल्या रस्त्यावरून काळ नदीला मागे टाकत वाकी गावातील पडवळकोंडच्या एका ओढ्याजवल पोहचलो.
डाव्या बाजूस धुक्यात सामावून गेलेला गाढवकडा आणि नानेमाची लक्ष वेधून घेत होती. ओढ्यावर असलेल्या पुलाजवळुन एक वाट आम्हाला गावातील शिवकालीन विहिरीजवळ घेऊन आली. चौकोनी चावीच्या आकाराची ही शिवकालीन विहीर आहे. साधारणतः २० फूट खोल बारमाही पिण्याच्या पाण्यासाठी ह्या विहिरीचा वापर केला जातो. अरुंद बाजूकडून उतरण्यास पायऱ्या व मधल्या भागात एक दगडाची कमान आहे. पायऱ्यांच्या उजव्या बाजूस एक शिलालेख कोरलेला आहे. १७९७ सालातील हा शिलालेख आहे. राघोबादादा पेशवे यांचा मुलगा दुसरा बाजीराव यांच्याशी संबंधित असा हा लेख असावा. त्यातील बरेच शब्द जीर्ण झाले आहेत. त्याचे अचूक वाचन केले जाणे आवश्यक आहे. पण हि विहीर त्या काळी घाटातून जाणाऱ्या प्रत्येकाची तहान भागवून त्यांची मनं प्रफुल्लित नक्कीच करत असणार.
विहीर बघून आम्ही कर्णवडी गावात पोहचलो. हल्लीच काही वर्षांपूर्वी इथपर्यंत पक्का रस्ता झाला आहे. बऱ्याच ठिकाणी दरड कोसळून खचला देखील आहे. कर्णवडी ह्या गावास रस्ता जरी रायगड जिह्यातुन असला तरी त्याची हद्द मात्र पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे बाजारासाठी किंवा शासकीय कामासाठी गावकऱ्यांना उपांड्या घाट चढून केळद गावातून वाहनाने व्हेल्हे किंवा पुणे गाठावे लागते. कर्णवडी ते केळद असा भोगदा काढून पुणे-महाड या शहरांना जोडण्याचा विचार बांधकाम खाते सध्या करत आहे. कर्णवडीमध्ये गाडी पार्क करून गावाच्या शेवटी असलेल्या म्हसोबा देवस्थानाचे दर्शन घेत आम्ही उपांड्या घाटाची वाट धरली. एका शेतालागच असलेल्या विहिरीच्या स्वच्छ आणि गोड पाण्याने आमच्याकडील बॉटल भरून घेतल्या.
घाट चढताना सुद्धा पावसाची रिपरिप चालु होतीचं , त्यामुळे धुक्याचे लोट झाडातून वरच्या बाजूस जाताना दिसत होते. योगेशला ट्रेकची सवय नसल्यामुळे घाट चढताना त्याचा धीर सुटत चालला होता आणि थकून तो जागोजागी बसू लागला. रोजच्या वापरामुळे वाट चांगलीच मळलेली होती. घाटामध्ये लावलेल्या पाण्याच्या पाईपचा आधार घेत आम्ही दोघेही तासाभरातच पठारावर पोहचलो.
पठारावर पोहचताच थंडगार वारा आणि धुक्याने आमचे स्वागतच केले. फक्त काही अंतर दिसेल इतक्या दाट झाडी आणि धुक्यातून केळद गावाच्या हद्दीत पोहचलो.
शेतात काही लोक शेतीची कामे करण्यात मग्न होती. त्याच शेताच्या बांधावरून वाट काढत, डाव्या बाजूस मढे घाटाकडे जाणारा रस्ता धरला.
रस्त्यावर वाहनांची व पर्यटकांची वर्दळ दिसून आली. थोड्याच वेळात धबधब्याजवळ पोहचलो.
सुरवातीलाच लक्ष्मी आणि केळेश्वर धबधब्याच्या माहितीचे फलक लावलेले दिसून येतात.
जोराची भूक लागली असल्याने आम्ही सरळ समोरच्या टपरिमध्ये जाऊन चहा, मॅगी आणि गरमागरम मक्याचे कणीस खाऊन आमचं शरीर आणि मन तृप्त केलं. धबधब्याचा काळजात धडकी भरायला लावणारा आवाज आणि रिव्हर्स वॉटरफॉल चा उंच हवेत उडणारा फवारा मन थक्क करत होता. आम्ही सुद्धा जवळ जाऊन रिव्हर्स वॉटरफॉल मध्ये भिजण्याचा आनंद घेतला. वाऱ्याच्या वेगामुळे धबधब्याचं पाणी खाली पडण्याऐवजी ते वरच्या बाजूस फेकले गेल्यामुळे दोन्हीबाजुंनी पावसाचा आनंद लुटता आला.
समोरच्या सेल्फी पॉईंट वरून धबधब्याचा नजारा खूप मस्त दिसतो. त्याच भागाला मोठमोठाले दगड कडेला रचून कठाडा केलेला दिसतो. खाली कोसळणारा प्रचंड झोत नजर खिळवून टाकणारा होता.
खालच्या बाजूस कर्णवडी, शिवथर, रामदास पठार त्यामगेच कावळ्या किल्ला आणि त्याचा न्हावीन सुळका, मोहनगड, जननी दुर्ग, कंगोरीगड, प्रतापगड, रायरेश्वर पर्यंतचा परिसर दृष्टीक्षेपात येत होता. मागच्या बाजूस नागमोडी वळणाची काळ नदी आणि गगनात घुसलेला गाढवकडा लक्ष वेधून घेत होता. सुरवातीला थकून मान खाली टाकलेल्या योगेश चा चेहरा आता मात्र खुलून गेला होता. त्याने आत्तापर्यंत इतका उंच धबधबा कधीच बघितला नव्हता. इथून काही फोटो काढून आम्ही केळेश्वर धबधब्याच्या व्हिव्ह पॉईंटकडे निघालो. २० मिनिटांतच आम्ही तिथे पोहचलो.
गाढवकड्याच्या शेजारून पडणारा हा तीन टप्यातील धबधबा येथून तासंतास बघत बसावं ह्यासारखं दुसरं सुख सहयाद्री वगळता कुठेच अनुभवता येणार नाही हे नक्कीच. पुन्हा टपरीवर येऊन एक एक चहा पीत मढेघाट उतरण्यास सुरवात केली.
१६७० साली ४ फेब्रुवारीच्या रात्री कोंढाण्याची लढाई ऐन भरात आली होती. शिवाजी महाराजांच्या शूरवीर मावळ्यांनी गड सर केला, पण स्वराज्याचे अनमोल रत्न सुभेदार तानाजी मालुसरे या लढाईत धारातीर्थी पडले. महाराजांनी त्यांचा ‘गड आला पण सिंह गेला’ या शब्दात गौरव केला. त्यावेळी तानाजी मालुसरेंचा मृतदेह (मढ) याच मार्गाने त्यांच्या पोलादपूर मधील उमरठ या मूळ गावी नेण्यात आला. म्हणूनच ह्या मार्गाला मढेघाट म्हणतात. पूर्वी हा घाट पायऱ्यांनी बांधून काढला होता. पाऊस आणि वरून येणाऱ्या ओढ्याच्या प्रवाहामुळे बराचसा भाग वाहून गेला आहे.
काही ठिकाणी फक्त वाट शिल्लक राहिली आहे. त्याच दगडातुन वाट काढत आम्ही कड्याला बिलगत एका कपारीतून धबधब्याच्या तळाशी पोहचलो.
उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याचे तुषार जेव्हा माझ्यावर वर्षू लागले तेव्हा त्यांचं हे रौद्र सुंदर रूप पाहताना आणि ते अंगी झेलताना माझं अस्तित्वचं मी विसरून गेलो होतो. जणू त्यात पांढऱ्या शुभ्र झोतात लुकलूकणारा दृवतारचं.
काही फोटोस काढून झाडीतून जाणाऱ्या वाटेने आम्ही खाली उतरू लागलो. कड्यावरील माकडं आम्हाला बघून ओरडत कातळाच्या दगडी भराभरा खाली ढकलू लागली. जीव मुठीत घेऊन त्यातूनच पळ काढत वर बघत बघत कर्णवडीच्या पठारावर पोहचलो.
मढेघाटाचा कोसळणारा धबधबा आता मागे पडला होता. शेतीच्या बांधावरून वाटेने कर्णवडीत पोहचून बाईकला किक मारत घरचा रस्ता धरला. तीन तासातच आम्ही दोन्ही घाटवाटा बेधुंद करणाऱ्या पावसाच्या धारेत एकरूप होत पूर्ण केल्या. ऐन पावसाळ्यात हा सारा भाग निसर्ग श्रीमंतीन ओथंबून गेलेला असतो त्यामुळे ह्याच काळात ह्या घाटवाटांच्या मोहिमा आखाव्यात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा