सफर सुरगडाची


महाड-मुंबई-महाड प्रवास करताना सुकेळी खिंडीच्या डोंगररांगेवर कोलाडमधील खांब गावाच्या मागे कातळकड्यांनी व्यापलेला सुरगड किल्ला नेहमीच लक्ष वेधून घेतो. बऱ्याचदा त्या डोंगरावर एखादा किल्ला असावा असे दिसून सुद्धा येत नाही. दोन दिवसांपूर्वी महाडच्या दिशेने येत असतांना सुरगडावरील ढालकाठी ह्या बुरुजावर डौलाने फडफडणारा भगव्या झेंड्याकडे नजर गेली. मनमोहित करणारं ते दृष्य जणू काय मनात घरच करून गेलं. ७०व्या प्रजासत्ताक दिनी शाळेत झेंडावंदन करताना त्या सुरगडावरील झेंड्याची आठवण झाली. झेंडावंदन आणि सांस्कृतिक कार्यक्रम बघून घरी जात असतानाच अक्षय ने हाक मारली. ' आज काय करायचं ?' त्याच्या ह्या प्रश्नावर ' चल सुरगडावर जाऊ '! हे माझे उत्तर आपसूकच निघून गेले. ' बॅग घेऊन आलोच !' असं बोलून चटकन दोघेही आपापल्या घरी निघून गेलो. सकाळी ११ वाजता आम्ही महाडवरून सुरगडाकडे आगेकूच केली.

पुण्याहून ताम्हिणीघाट-विळे-कोलाड-खांब असा प्रवास करून तर मुंबई कडून येताना सुकेळी खिंड संपल्यावर डाव्या बाजूस खांब गाव लागते. खांब गावच्या कमानीतून प्रवेश करून खांब-वैजनाथ-घेरा सुरगड हे २ किमी अंतर चालत किंवा खाजगी वाहनाने कापता येते. आम्ही तासाभरातच बाईकने घेरा सुरगड मध्ये पोहचलो.

गावात गाडी पार्क करत समोरच लावलेला घेरा सुरगडच्या माहितीचा फलक वाचत असतानाच, एक इसम हातात वही घेऊन आला. गावचा सरपंच होता तो, गडावर जाणाऱ्यांची आम्ही नावे व पत्ता लिहून ठेवतो असं सांगू लागला. दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्या मार्फत गडावर टाक्या साफ करणे, किल्ल्याची वाट आणि परिसर साफ करणे, माहिती फलक लावणे ह्या दुर्ग संवर्धन मोहिमा राबविण्यात येतात. सरपंचांनी आमची नावे नोंदवून जेवणाच्या सोयीबद्दल विचारपूस केली. आम्ही डबा घेऊन गेल्यामुळे त्यांना नकार कळवत गडाची वाट धरली. गावात कोणतेही हॉटेल नाही त्यामुळे गावातील एखाद्या घरात जेवणाची सोय होऊ शकते, पण तशी कल्पना त्यांना आधीच दिलेली बरी म्हणजे भुकेने बेहाल होण्याची वेळ येणार नाही. प्राचीन काळापासून विदेशातून व्यापारी मालाची वाहतूक कोकणातील बंदरांमार्फत घाटमाथ्यावर होत असे. भिरा येथे उगम पावणारी कुंडलिका नदी चौल (रेवदंडा) येथे अरबी समुद्रास मिळते. चौल बंदरापासून कुंडलिका नदीवर देखरेखीसाठी रेवदंडा, बिरवाडी, अवचितगड, सुरगड आणि सुधागड या किल्ल्यांची बांधणी केलेली आढळते. सुरगडच्या जवळून ताम्हिणी, भोरप्या नाळ,  सवाष्णी, नाणदांड  या घाटवाटा जातात. गडावर असलेल्या खांब टाक्या पाहता असे मानले जाते की, सुरगड किल्ला हा शिलाहार काळात बांधला गेला आणि नंतर त्याचा वापर अहमदनगरच्या निजामाने केला. छत्रपती शिवाजी महाराजांनीही ह्याची डागडुजी केली. जंजिरेकर सिद्दि याने हा किल्ला जिंकून त्याची पुनर्बांधनी केली. राजारामांच्या कारकिर्दीत हा किल्ला शंकरजी नारायण सचिव यांनी पुन्हा जंजिराच्या सिद्धीकडून ताब्यात घेतला होता. पेशवाईच्या काळात कैदी ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग केला. १८१८ मध्ये कर्नल प्रॉथर या इंग्रज अधिकाऱ्याने कोकणातील किल्ले जिंकून घेतले त्यात सुरगडाचाही समावेश होता.

गावाच्या मागून शेताच्या बांधावर लावलेल्या दुतर्फा निवडुंगातून वाट गडाकडे जाते. वाटेवरून २६० मीटर उंचीचा सुरगड आणि त्याचा सरळसोट कातळकडा नजरेस येत होता. काही वेळातच आम्ही सुक्याठाक पडलेल्या ओढ्यानजीक पोहचलो. एक नव्या बांधणीची वर्तुळाकार विहीर येथे आहे. त्यातील पाणी काढून फ्रेश होत दाट जाडीतुन जाणाऱ्या वाटेने चालत राहिलो.

झाडांमुळे उन्हाचा त्रास जाणवत नव्हता, मध्येच येणारी थंडगार वाऱ्याची झुळूक आम्हाला तरोताजा करत होती. अर्ध्यातासातच आम्ही पठारावर पोहचलो.

वाटेच्या दुतर्फा दगड धोंडे रचून वाट व्यवस्थित केलेली आहे. वाटेत जागोजागी दिशादर्शक बाण आणि मार्किंग केलेली आहे. हीच वाट पुन्हा झाडांमध्ये जाऊन आम्हाला किल्याच्या कड्याजवळ घेऊन आली.

उजवीकडील वाट घळीतून गडावर जाते तर डावीकडील वाट इंजाई देवीच्या मंदिराकडे आणि गडाच्या उत्तर बाजूस जाते. घड्याळात एक वाजून गेला होता. पोटात भुकेने कावळे ओरडू लागले होते, गडावर पोहचून जेवणावर मस्त ताव मारण्याच्या उद्देशाने भरभर गडाची वर जाणारी वाट पकडली.

एका खिंडीतून / घळीतून ही वाट वर जाते. सुरवातीलाच एक ८ ते १० फुटांचा कताळटप्पा आहे. इथे खोबणी किंवा पायऱ्या दिसून येत नाहीत. आम्ही अगदी सहज हा टप्पा चढत खिंडीच्या मध्यावर आलो. पावसाळी कातळावरील शेवळामुळे ह्या रॉकपॅचवर नवख्यांनी दोर लावूनच चढाई करावी.

खिंडीत वरच्या बाजूने घरंगळत आलेले मोठे धोंडे व पायऱ्यांचे दगड पडलेले दिसतात. कधीकाळी ही वाट गडाची मुख्यवाट (राजमार्ग) असावी. वरच्या बाजूस दरवाजा आणि तटबंदीचे अवशेष दिसून येतात. येथूनच पुढे मारुती मंदिराची स्थापना केलेली आहे. पण आता मात्र दगडी जोत्यावर चपेटदान मारुतीची पिळदार मिश्या आणि कंभरेला खंजीर असलेली दगडी मूर्ती आहे.

पणवती राक्षसीनीला पायाखाली चिरडतानाची प्रतिमा त्या काळी गडावर किंवा गडाच्या सुरवातीलाच शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून याची स्थापना केलेली आढळते. मारुतीरायाचे दर्शन घेत डाव्या बाजूने कातळातील खोदीव पायऱ्यांनी वर जात एका झाडाखाली आमचं बस्तान मांडलं.

शिदोरीवर ताव मारत पोटोबा शांत केला. अक्षय ने आणलेला मसालेभात खाऊन जरा जास्तच सुस्ती चढली आणि अर्धातास विश्रांती करून गडावरील वास्तूंच्या शोधत चालू पडलो. 

गडाच्या तिन्हीं बाजूनी कातळकडे असल्याने खूप कमी ठिकाणी तटबंदी दिसून येते, बऱ्याच ठिकाणी ती ढासळलेली आहे. गडाच्या दक्षिण बुरुजावरून वेडीवाकडी वळणे घेत जाणारी कुंडलिका नदी तर दूरवर डोंगररांगेत कुर्डुगडाचा पुसटसा सुळका नजरेस पडत होता.

गडाच्या मधल्या भागात एक धान्यकोठराचे भग्नावशेष आहेत.

त्यातच एक दगडी जातं आणि काही कोरीव दगड अस्ताव्यस्त पसरलेले आहेत. त्यालागतच एक गोमुखासारखी दगडांची रचना केलेली दिसते.

कोठाराच्या समोरच  शिवमंदिराचे अवशेष आहेत. त्यात भैरवाची मूर्ती आणि त्यासमोर एक शिवलिंग आहे.

कधीकाळी हे शिवमंदिर गडाची शोभा वाढवणारे असेल हे मात्र नक्की. मंदिराच्या पुढे  एका दगडी जोत्याजवळ विरगळ दिसून येते.

डावीकडे खालच्या बाजूस दोन जोडटाकी कातळात खोदलेली आहेत. त्यांची एक बाजू दगडांनी बांधून काढलेली आहे.

किल्याच्या मध्यवर्ती भागात सदर आणि काही बांधकामाचे अवशेष आहेत. त्यातच एका ठिकाणी सिंहासनासारखी दगडी प्रतिकृती आढळते.

त्यालागतच एक दगडी चौरंगासमान दगड तुटून पडलेला आहे. गडाचा मध्यभाग हा पूर्ण कातळचा असून त्यात चार टाकी कोरलेली आहेत.

उघड्यावर असल्यामुळे बाष्पीभवन होऊन टाक्या मार्च-एप्रिलमधेच तळ गाठत असणार. येथुन उजवीकडे खालच्या बाजूस कातळात गुहेसारखी कोरलेली खांबटाकी आहेत.

गडावरील थंडगार पिण्याच्या पाण्याचा हा सर्वोत्तम स्त्रोत. त्यालागतच एक शेवाळ माजलेला टाक तटबंदिलगतच आहे.


पुन्हा वरती चढून थोडं पुढे जाता एक उंचवट्याचा भाग लागतो त्यातही काही घरांचे अवशेष व डाव्या बाजूस एक कोरड पाणी टाक दिसून आलं.

किल्ल्यावर बऱ्याच प्रमाणात चाफा, साग, धावडा, किंजळ, उंबर आणि काटेसावर यांचं रान माजलं आहे. काही झाडांची मुळे तर तटबंदीमध्ये गेली आहेत. त्यांची तोड दरवर्षी केली पाहिजे किंवा त्या तटबंदीवर नबंरिंग करून ते झाड मुळासकट उपटून त्याची पुनर्बांधणी केली पाहिजे.

नाहीतर आपल्या पुर्वजांच्या स्मृती आळवत, जर्जर अवस्थेत बांधकाम शास्त्राच्या दृष्टीने अभ्यासनीय आणि अनमोल ठेवा नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.

एक भलाभक्कम बुरुज याच भागात आहे. गडावरील हा सर्वात उंच बुरुज टेहळणीसाठी असावा. ह्या उंचवट्याचा विचार करता कदाचित या भागात गडाचा बालेकिल्ला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. निरभ्र आकाशात गडावरून सरसगड, सुधागड, तैलबैला, घनगड, कुर्डुगड, ताम्हिणी घाट,  अवचितगड, घोसाळगड, तळगड पर्यंतचा सारा परिसर दृष्टीक्षेपात येतो.

बालेकिल्यातील बुरुजाच्या खालच्या बाजूस एक पाणी टाक आहे. वरून दगडांचा खच पडल्यामुळे त्यांनीच ते भरून गेलं आहे.

खालच्या बाजूस उतरताना वाटेवर आडवा शिलालेखाचा दगड दिसून येतो.

अरबी, देवनागरीत कोरलेल्या या शिलालेखानुसार सिद्दीसाहेब ह्या माणसाच्या हुकुमावरून सूर्याजी याने हा किल्ला बांधला. या वेळी तुकोजी हैबतराव गडाचे सुभेदार होते.

समोरच भक्कम अशी गडाच्या उत्तर बाजूची पाच फूट रुंदीची तटबंदी आहे.गडावर सगळ्यात मोठी तटबंदी इथेच पाहायला मिळते. तटबंदीमधेच एक शौचकूपची रचना दिसून येते. हीच तटबंदी खालच्या बाजूस ढालकाठी बुरुजापर्यंत गेली आहे. मूळ डोंगररांगेपासून किल्ला अलग करण्यासाठी खंदक खोदलेला आहे. इथूनच एक वाट खाली गडाच्या मूळ वाटेपर्यंत जाते. ढालकाठी म्हणजे झेंडा लावण्याचे ठिकाण.

आजही ह्या बुरुजावर फडफडणारा हा भगवा मराठयांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा असल्याची जाणीव होते.

पायऱ्यांनी खाली उतरताच एक पाणी टाके ह्या बुरुजाजवळ आहे.

गडफेरी पूर्ण करून आम्ही मारुती मंदिराजवळ पोहचलो. त्याच्या उजवीकडची वाट आम्हाला घेरा सुरगड गावाकडच्या बुरुजाकडे घेऊन आली.

ह्याच वाटेत एक पाणी टाके सुद्धा आहे. बुरुजावर झेंडा घेऊन काही फोटोस आम्ही काढले.

बुरुजावरून कुंडलिका नदी, घेरा सुरगड गाव आणि दगडांनी सुशोभित केलेली पठारावरची वाट दिसून येत होती. गडाखाली उतरलो व डाव्या बाजूस असलेल्या इंजाई / अणसाई देवीच्या मंदिराकडे आलो.

वाटेत एक कड्याच्या कातळालगत पाणीटाके आहे. गर्द झाडीतुन जाणारी ही वाट आम्हाला मंदिरापर्यंत घेऊन आली.

दगड रचून ह्या मंदिराची दोन फूट उंचीची भिंत बांधलेली आहे. मंदिरात देवीची मूर्ती, दीपस्थंभ, झेंडे, मडकी आणि भिंतीवर एक भग्न तोफ ठेवलेली आहे. ह्याच मंदिराच्या पुढे आणखी एक तोफ पाहायला मिळते.

कदाचित गडावरून खाली पडलेली ही तोफ असावी. देवीचे दर्शन घेऊन आम्ही घरचा रस्ता धरला. गडमाथा लहान असल्याने तीन तासातच हा ट्रेक आम्ही पूर्ण केला. आजचा प्रजासत्ताक दिन आमच्या सार्थकी लागला होता. देशभक्तीपर मराठ्यांच्या शौर्यतेचं गुणगान गाणार हे गाणं गुणगुणत आम्ही घरी निघून आलो.
             " देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था
               मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था
               हर पर्वत पे आग लगी थी हर पत्थर एक शोला था
               बोली हर-हर महादेव की बच्चा-बच्चा बोला था
               यहाँ शिवाजी ने रखी थी लाज हमारी शान की
               इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की
               वंदे मातरम ...वंदे मातरम ...वंदे मातरम ...." 🇮🇳

https://youtu.be/CFfINnVeJWY

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ