किल्ले कुर्डुगड
कोरोना, लॉकडाऊन आणि त्यातच ३ जून रोजी आलेल्या ‘निसर्ग’ वादळाचा तडाखा… अशा तिहेरी संकटात कोकणी माणूस अडकला आहे. वादळामुळे गावेच्या गावे विस्कटली, जीव लावून बांधलेली कौलारू घरे कोसळली…. वादळ घुसले, तांडव करून गेले, शमले तरी कितीतरी गावे अंधारात बुडाली. वीजपुरवठा पुरता कोलमडून गेला. त्यातच आधीच दुर्गम असलेल्या भागातली संपर्कयंत्रणाही पार निकामी झाली. सह्याद्रीतील अश्याच दुर्गम आणि अतिदुर्गम भागात वसलेल्या कुर्डुपेठ गावात तातडीने मदत पोहचवण्याचा निर्णय अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने घेतला. महासंघाच्या निर्णयानुसार रविवारी १४ जून रोजी महाड मधून सह्याद्रीमित्र संस्थेचे गिर्यारोहक डॉ राहुल वारंगे आणि १३ गिर्यारोहक भल्या पहाटेच कुर्डुगडाच्या दिशेने मार्गस्थ झालो. पुणे - माणगाव रस्त्यावर जिते गावाकडे जाणारा फाटा आहे. कडापे गावातील काळकाई देवीचे गाडीतूनच दर्शन घेत आमच्या गाड्यांचा ताफा १५० किलो धान्यासह सुमारे ५० किमी अंतर कापून जिते गावात पोहचला. गावात पोहचल्यावर गावकऱ्यांच्या भेदरलेल्या नजरेनं आमचं स्वागतच झालं. सध्या कोरोना सारख्या महामारीमुळे मुंबई - पुण्यातून येणाऱ्...