संरक्षक वसाहत - किल्ले सोनगड
मौर्य, सातवाहन काळापासून कोकणातील सिमुला (चौल), मंदगोर (मांदाड), पालेपट्पण (पालेमहाड), दालभ्यपुरी (दाभोळ) व घोडेगाव (गोरेगाव) ह्या व्यापारी बंदरातून मालाची वाहतूक इजिप्त, अरबस्तान, इराण, ग्रीसमधील बंदराशी होत असे. सावित्री आणि गांधारी नदीच्या तीरावर वसलेल्या महाड बंदराचा व्यापार गलबतातुन सावित्री नदीमार्गे अरबी समुद्राशी जोडला गेला होता. महाड आणि दासगाव ह्या बंदरांच्या सुरक्षिततेसाठी सावित्री नदीवर बाणकोट, मंडणगड, दौलतगड, सोनगड आणि महेंद्रगड ह्या किल्ल्यांची उभारणी केलेली आढळते. आजही महाड शहराच्या प्रवेशाजवळ, गांधारी आणि सावित्री नदीच्या संगमापाशी महाड बंदराचे व तटबंदीचे अवशेष दिसून येतात. महाडच्या उत्तर पश्चिम बाजूस असणाऱ्या डोंगररांगेवर ३०० मीटर उंचीचा सोनगड हा किल्ला आहे. सोनगडावरील खांब टाके पाहता गडाची उभारणी मध्ययुगीन काळात झाली असावी असा अंदाज बांधता येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये जावळीच्या खोऱ्यात उतरून चंद्रराव मोऱ्यांचा पराभव केल्यानंतर जावळीच्या खोऱ्यातील चंद्रगड, मंगळगड, मकरंदगड, सोनगड, चांभारगड आणि रायगड हे किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. रायगड किल्ला स्वराज्याची राजधानी केल्यानंतर कोकणदिवा, मानगड, सोनगड, दौलतगड, महेंद्रगड, कांगोरी आणि कावळ्या ह्या किल्ल्यांची दुर्गसाखळी तयार करून राजधानीला चिलखत चढवले. महाराज पन्हाळगडावर वेढ्यात अडकले असताना राजापुरच्या टोपीकर इंग्रजांनी आदिलशाही विजापूरकरांना त्यांचे गोलंदाज, एक तोफ व दारुगोळा सिद्दी जौहर च्या मदतीस रवाना केला ! इतकेच नव्हे तर इंग्रजी झेंडा (युनियन जॅक) फडकवीत किल्ल्यावर तोफा धडकावल्या. महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटल्यावर मार्च १६६१ मध्ये राजापूरला असलेली टोपीकरांची वखार लुटून काढली. वखारीचा रेसिडेंट अधिकारी हेन्री रेव्हिंग्टन, गीफर्ड आणि तीन चार इंग्रजांना पकडून कैद केले. इंग्रज कैद्यांपैकी निम्मे वासोट्यावर व निम्मे सोनगडावरील रावजी पंडितांच्या स्वाधीन केले. हे कैदी तीन वर्ष कैदेत होते. सोनगडचा उल्लेख इ.स.१८१७ मध्ये पेशवे दफ्तरात मिळतो. यात रायगड ताब्यात घेतल्यावर पेशव्यांनी सोनगड भागाचा बंदोबस्त ठेवण्यासाठी ३०० पायदळ नेमल्याची नोंद आढळते.
महाडपासून ४ किमी अंतरावर असलेल्या सोनगडावर जाण्यासाठी गंधारपाले, वहुर आणि म्होपरे या तिन्ही गावातून पायवाट आहे. वहुर आणि म्होपरे या गावातून गडावर जाण्यास सुमारे दोन तास लागतात. ह्या वाटा जास्त मळलेल्या नसून ह्या वाटेने गडाच्या उत्तर बाजूने आपला किल्ल्यात प्रवेश होतो. गंधारपाले गावातून जाणारी वाट उभ्या चढणीची आणि देवराईतून जाणारी दीड तासाची ही वाट आहे. शहराच्या जवळच विविध पक्षी आणि दाट जंगलाची मजा अनुभवायची असल्यास ह्याच वाटेने गडाला भेट द्यावी. ह्याच डोंगररांगेत असलेल्या सातव्या शतकातील गांधारपाले येथील बौद्धकालीन लेण्या आणि सोनगड असा ट्रेकही आपल्याला करता येतो.
हल्लीच बौद्धवाडीतुन गडाजवळ जाणारा कच्चा रस्ता झाला आहे. मुंबई- गोवा महामार्गालगतच असणारा हा कच्चा रस्ता पावसाळा वगळता आपल्याला गौळवाडी पर्यंत घेऊन येतो.
गवळी समाजाची १० ते १५ घरांची वस्ती येथे आहे. वाडीच्या बाहेरच गडावर जाणारा दिशादर्शक फलक मावळा संघटनेने लावलेला दिसतो.
गौळवाडी डावीकडे ठेवत समोरून उतरलेल्या डोंगराच्या धारेवरून वाट गडाच्या दिशेने जाते. वाटेत बऱ्याच ठिकाणी दगडांवर मार्किंग (Arrows) केलेली दिसते.
उन्हाळ्यात वाटेत येणाऱ्या करवंद आणि धामणीच्या आंबट गोड बोंडावर ताव मारत २० मिनिटांतच आपण डोंगराच्या वरच्या बाजूस पोहचतो.
येथून गडावर फडकणारा भगवा आपलं लक्ष वेधून घेतो. दोन्ही बाजूस असलेला डोंगराचा उतार मागे टाकत समोरील धारेवरून ही वाट गडाकडे जाते. वाटेत बऱ्याच ठिकाणी दगड रचून बांधलेली थडगी दिसून येतात. गंधारपाले आणि वहुर गावाच्या हद्दीवर ही थडगी आहेत. किल्ल्याचा बराचसा भाग हा म्होपरे गावाच्या हद्दीत आहे.
डावीकडे दिसणारे सावित्री नदीचे विस्तारित खोरे त्यालागतच दिसणारा दौलतगड किंवा दासगावचा किल्ला, किल्ल्याच्या तळाशी असणारे वहुर गाव, वन ट्री हिल, म्हाप्रळ खाडी आणि दूरवर डोंगराआड डोकावून बघणारा मंडणगड किल्ला आपलं लक्ष वेधुन घेतो.
किल्ल्याच्या सुरुवातीस एका भल्याभक्कम बुरुजाच्या पायथ्याचे निशाण दिसतात. कधीकाळी ह्याच बुरुजावर डौलाने फडफडणारा झेंडा गडाची शोभा वाढविणारा असणार हे नक्कीच! सद्यस्थितीत मात्र हा बुरुज पूर्णतः ढासळलेला आहे.
बुरुजाच्या उजव्या बाजूने पायऱ्यांनी आपला गडावर प्रवेश होतो. पूर्वी गडाची मुख्य वाट हीच असावी. गडावरील उंच सखल भागात काही जोत्यांचे अवशेष दिसुन येतात. थोडं पुढे जात डावीकडील घसाऱ्याची वाट खालच्या टप्प्यातील असलेल्या पाण्याच्या टाक्यापाशी पोहचते.
गंधारपाले गावातील माझा मित्र आदेश उतेकर व त्याच्या सहकाऱ्यांनी वाटेवर पायऱ्या खोदून वाट व्यवस्थित केलेली आहे. त्यांच्यामार्फत दरवर्षी गडावरील टाक्या साफ करणे, वाट सुरळीत करणे, गडाखाली वृक्षारोपण करणे यांसारख्या योजना दरवर्षी राबवल्या जातात. दोन दिवसांपूर्वी गडावर गेलो असताना मागच्या वर्षी आम्ही लावलेल्या वृक्षारोपण मोहिमेतील एका झाडाकडे बोट दाखवत झाड जगवल्याची ग्वाही आदेश ने करून दिली.
गडावरील पाण्याचा एकमेव स्रोत म्हणजे ह्या कातळात खोदलेल्या आयताकृती आडव्या टाक्या. खांब टाके मिळून एकूण ९ टाक्या गडावर आहेत.
पहिल्या चार टाक्या साफ केल्यामुळे स्पष्टपणे ओळखता येतात.पण उन्हाळ्यात ह्या टाक्या तळ गाठतात. पुढील टाक्यांमध्ये गाळ व दगडी साठलेल्या असल्यामुळे त्या सहजासहजी दिसून येत नाहीत
मधल्या भागातील एक गवतात विलीन झालेलं टाक हे खांब टाके आहे. गाळाने भरून गेलं असलं तरी खांबाचा छताकडील आयताकृती भाग स्पष्टपणे नजरेस पडतो.
टाक्यांच्या शेवटच्या भागात गडावर जाण्यासाठी पायऱ्यांची रचना केलेली दिसते. ही वाट ढासळल्यामुळे पुन्हा मागे फिरून आलेल्याचं वाटेने गडावर जाता येते.
गडाच्या मध्यवर्ती भागात एका दगडी इमारतीचे अवशेष दिसून येतात. दगडी भिंती आणि दोन्ही बाजूस ओसरी अश्या स्वरूपाची ही इमारत आहे.
उजव्या बाजूस काही पायऱ्या दिसून येतात. त्यासमोरच दोन बुरुजांची रचना केलेली आढळते. ही गडावरील सर्वात उंच जागा असून ह्या ठिकाणी फडफडणारा भगवा आपला लक्ष वेधून घेतो.
इमारतीच्या बाजूलाच चुन्याचे मोठाले ढीग दिसून येतात. कधीकाळी बांधकामासाठी आणलेला चुना आज मात्र पावसामुळे वाहून इतरत्र पसरलेला आहे.
काही भागात तटबंदीमध्ये वाळू आणि चुन्याचा लेप आजही दिसून येतात. गडावरील सगळ्या बाजूची तटबंदी ढासळलेली आहे. काही नक्षीदार दगड खालच्या भागात असलेल्या पठारावरील शेतात आजही नजरेस पडतात.
गडाच्या मागच्या बुरुजालगतच उजवीकडे एक वाट खाली म्होपरे गावाकडे जाते.
ह्याच वाटेवर थोडे खाली वहुरकरिन / काळकाई / सोनजाई देवीचं ठाण आहे. दगडाला शेंदूर फासून काही घंटा लटकवलेल्या येथे दिसून येतात. डावीकडे तीव्र उतार व घसऱ्याची वाट आपल्याला गडाखाली असलेल्या नैसर्गिक गुहेमध्ये घेऊन जाते.
थंडगार वातावरणात मोदकाच्या आकाराची पाच फूट उंच आणि वीस फूट लांब ही गुहा आहे. गडाच्या पश्चिम बाजूस असलेल्या आतल्या बाजूस निमुळती होत गेलेल्या गुहेतून नागमोडी वळणाच्या सावित्री नदीचे विहंगम दृश्य नजरेस पडते.
अशीच एक नैसर्गिक गुहा गडाच्या पूर्व बाजूस सुद्धा आहे. आदेश व त्याच्या सहकाऱ्यांनी हल्लीच ही गुहा शोधून काढली आहे. साधारणतः ३० ते ४० फूट लांब ही गुहा आहे. गुहेच्या आत एका प्राण्याचा आवाज ऐकू येत असल्याचं देखील आदेश ने सांगितलं होतं. गडाचा आटोपशीर माथा आणि गुहा पाहण्यास तासभर वेळ पुरेसा आहे.
गडावरून निरभ्र वातावरणात डोळ्यांचं पारडं फेडणारं दृश्य सह्याद्री डोंगररांग आणि त्यात वसलेल्या किल्ल्यांचं दिसतं.
गडावरून दक्षिणेकडे कशेडी घाट, महिपतगड, मिठखडा किल्ला, कुडपन, प्रतापगड, महाबळेश्वर पठार, कोळेश्वर पठार, नाखिंड, रायरेश्वर पठार, मोहनगड, चोरखना, मंगळगड, जननी दुर्ग, चांगमोड, कावल्या किल्ला नजरेस पडतो.
तर पूर्वेकडील बाजूस राजगड, गाढवकडा, रामदास पठार, तोरणा किल्ला , लिंगाणा, रायलिंग पठार, गुयरीचा डोंगर, दुर्गदुर्गेश्वर रायगड, महेंद्रगड, महाड शहर , कोल लेणी, कोकणदिवा, टवळीचं टोक आणि कुंभेघाटाचा परिसर दृष्टीक्षेपात येतो. गडाचं भौगोलिक स्थान बघता सोनगडाचा वापर टेहाळणी किल्ला किंवा संरक्षण बुरुज म्हणून केला असणार हे नक्की. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या टप्यात हा किल्ला असल्याने आणि महाड बंदरातून सावित्री नदीमार्गे होणारा व्यापार यांच्या दृष्टीने शिवकाळात ह्याला नक्कीच मोलाचे स्थान असणार. गडाच्या मागच्या बाजूस असलेल्या देवीचं ठाणं वगळता गडावर कोठेही मंदिराची स्थापना केलेली आढळत नाही. १८१८ नंतर इंग्रजानी कोकणातील किल्ले जिंकुन गडाची नासधूस केली त्यात सोनगडाचाही समावेश होता. पावसाच्या दिवसात गडावर पांढऱ्या रंगाचे बंदुकीचे गोळे(शिसे) सापडतात. महाडपासून हाकेच्या अंतरावर असलेला हा किल्ला आजही कित्येक महाडकरांना परिचित नाही. कधीतरी वेळात वेळ काढून इतिहास आणि सौंदर्य सृष्टीची कयामत अनुभवण्यासाठी सोनगडाला नक्कीच भेट द्यावी. ट्रेकर मंडळींना एकाच दिवशी सोनगड, गंधारपाले लेणी, कोल लेणी, महाड शहर आणि महेंद्रगड असा ट्रेकही खाजगी वाहनाने करता येईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा