जावळी खोऱ्यातील चंद्रगड


जावळी नाव उच्चारलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते घनदाट जंगलांनी वेढलेलं सह्याद्रीतील खोरं आणि चंद्रराव मोऱ्यांचा चंद्रगड. जावळीचे सर्वच डोंगर अंगाने एवढे अवाढव्य की माथ्यावरून खाली पाहिले तर पाताळ दिसावे ! झाडी तर शेवळासारखी दाट. अस्वले , चित्ते आणि असल्याच जनावरांचा वावर असलेल्या हिरव्यागार जंगलाचं खोर. ह्याच खोऱ्यात दडी धरून बसलेला कुठूनही सहजासहजी न दिसणारा किल्ला म्हणजेच चंद्ररावांचा चंद्रगड उर्फ ढवळगड. चंद्रगड पुर्वी मोर्‍यांच्या अधिपत्याखाली होता.त्यांना चंद्रराव हा किताब होता.  चंद्रराव वारल्यावर या गादीसाठी मोर्‍यांमधे तंटा उभा राहीला. शिवाजीराजांनी मध्यस्ती करुन तो मिटवला आणि येथील यशवंतराव मोरे हा चंद्रराव झाला. शिवाजीराजांनी केलेली मदत विसरुन या चंद्ररावाने त्यांच्याच विरुद्ध जावून आदिलशाहीशी सलोखा वाढवला. महाराजांच्या लोकांनाच त्रास देवू लागला. शिवाजीराजांनी चंद्ररावाला सामोपचाराने समजावून सांगितले पण मोरे शत्रुत्वानेच वागू लागले. महाराजांच्या राज्यात गुन्हे करुन शिक्षेच्या भितीने काही गुन्हेगार पळून या मोर्‍यांच्या आश्रयाला गेले त्यांना उघडपणे मोर्‍यांनी पाठीशी घातले. हे गुन्हेगार महाराजांच्या ताब्यात न देता उलटच निरोप महाराजांना पाठविला. उद्या येणार असाल तर आजच या. जावळीस येणार असाल तर दारु गोळा मौजूद आहे. इ.स. १६५५ - ५६ मध्ये  महाराजांनी जावळीवर हल्ला चढवला. मोर्‍यांना नेस्तनाबूत केले आणि जावळी स्वराज्यात दाखल झाली. त्या बरोबर ढवळगड ही स्वराज्यात दाखल झाला. त्याचे नाव बदलून महाराजांनी चंद्रगड / गहनगड ठेवले.असा उल्लेख शिवचरित्रात सापडतो.संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगड ताब्यात घेण्यासाठी आलेल्या जुल्फीकारखानाने मार्च १६८९ मध्ये रायगडच्या आजूबाजूचे किल्ले व प्रदेश ताब्यात घेतला. त्यावेळी चंद्रगड मोगलांच्या ताब्यात गेला. इ.स १६९० मध्ये छ. राजाराम महाराजांचे अमात्य रामचंद्रपंत यांनी चंद्रगड जिंकून घेतला. इ.स १८१८ मध्ये कनेल प्रौर्थर या इंग्रज अधिकाऱ्याने या भागातील किल्ले ताब्यात घेतले. नोव्हेंबरमध्ये जावळी खोऱ्यात भटकंती करण्याच्या हेतूने मी आणि मयुरेश सकाळीच आम्ही महाडवरून ढवळे गावाकडे निघालो. मुबई किंवा पुण्यातून येणाऱ्या भटक्यांनी प्रथम पोलादपूर गाठावे.महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर कापडे गावाजवळ उमरठ फाटा आहे.मोठ्या कमानीतून प्रवेश करून त्याच रस्त्याच्या शेवटी १७ किमी अंतरावर ढवळे गाव आहे. 

ढवळ्यागडाकडे जाताना मध्येच लागणाऱ्या उमरठ या गावी नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. १६७० साली ४ फेब्रुवारीच्या रात्री कोंढाण्याची लढाई ऐन भरात आली होती. शिवाजी महाराजांच्या शूरवीर मावळ्यांनी गड सर केला, पण स्वराज्याचे अनमोल रत्न सुभेदार तानाजी मालुसरे या लढाईत धारातीर्थी पडले. 

महाराजांनी त्यांचा ‘गड आला पण सिंह गेला’ या शब्दात गौरव केला. त्यावेळी तानाजी मालुसरेंचा मृतदेह मढेघाटाने याच त्यांच्या मूळ गावी आणला. ढवळे गावात गाडी पार्क करून आम्ही गावाच्या पुढे असलेल्या धनगर वस्तीत पोहचलो. गावातील बरेच लोक त्यांच्या नेहमीच्या शेतीच्या कामात व्यस्त होते. एका आजोबांनी आम्हाला थांबवून आमची विचारपूस केली. चंद्रगडावर जाण्याच्या हेतूने आम्ही इथवर आलोय असं म्हणताच आजोबा जागेवरून उठून उभे राहिले आणि 'चला मीच घेऊन जातो तुम्हाला गडावर' ! ह्या शब्दात आमचा आनंद द्विगुणित करून टाकला. आजोबांनी कालच रात्री त्यांच्या वाड्याच्या माचावर बिबट्या बघितल्याचं सांगितलं. ह्या काळजीपोटी ते आमच्या सोबत यायला तयार झाले होते. ह्या गावात बऱ्याचदा बिबट्या फिरकतोच. बिबट्याच नाव ऐकताच मयुरेश मात्र पुरता घाबरून आपण घरी जाऊया अस बडबडू लागला. आजोबा निघण्यासाठी आत गेले. आतून आज्जींचा भांडणाचा आवाज कानी पडताच आम्ही तेथून पोबारा केला. वाटाड्या न घेता आपल्यालाच हा ट्रेक करावा लागणार ह्याची खात्री आम्हाला झाली. गावाच्या बाहेर पडून अडमतडम वाटेने उजवीकडील म्हसोबा खिंड गाठून कारवीतली पुसट पिटुकल्या वाटेने चंद्रगडाचा अवघड कडा सर करावा असा उल्लेख डोंगरयात्री आनंद पाळंदे यांच्या पुस्तकात वाचला होता. त्याच आधारावर आम्ही दोघांनीच ट्रेकला सुरवात केली.

शेताच्या बांधावरून उड्या मारत जंगलात जाणारी वाट धरली. येथूनच चंद्रगडाचा ७०० मीटर उंचीचा माथा नजरेस येत होता. त्याच वाटेवरून चालत आम्ही खालच्या बाजूस येऊन पोहचलो. बऱ्याच ढोरवाटा जाताना दिसल्या. थोड्याच वेळात आपण वाट चुकलो असल्याची जाणीव झाली. वाटेत लागलेल्या ओढ्यानेच वर गेलो तर नक्कीच आपण म्हसोबच्या खिंडीत पोहचू असा तर्क लावून त्या ओढ्यानेच वर चढत राहिलो. 

अर्ध्यातासातच आम्हाला दूरवर चंद्रगड दर्शन नावाचा फलक  आणि वर चढणारी वाट दिसली.


मुख्य वाट भेटल्याने आम्हाला थोडा धिर आला.पाणी पिऊन क्षणभर विश्रांती घेत पुन्हा वाटेला लागलो. झाडाझुडपातुन जाणारी उभ्या चढाईची ही वाट आहे. वाटेत ' ॐ नमः शिवाय ' नावाच्या पाट्या आपण वाट चुकलो नाही ह्याची खात्री करून देत होत्या. 

वाटेवरील एका मोठ्या झाडाला नखाने खरवडलेले आणि त्यावर काही केसं चिकटलेली दिसून आली. बहुदा ती अस्वलाची असावी. त्यांची मार्किंग बघितल्यावर मयुरेश ची पुरती घाबरगुंडी उडाली. तुझ्यासोबत यायलाच नको हवं होतं असं काहीसं बडबडू लागला. त्याला कसाबसा धीर देत गडाच्या दिशेने आगेकूच चालूच ठेवली. गर्द सावलीने आमची साथ सोडून दिली होती. चढ इतका तीव्र होता की कडा जणू अंगावरच कोसळतोय असा भास होत होता. निसरड्या मुरमाड मातीवरून आणि त्यातच सुकलेल्या गावतावरून पाय घट्ट टिकत सुद्धा नव्हते. चटके लावणाऱ्या सूर्यकिरणांचा वर्षाव अंगी झेलत मधेच लागणाऱ्या एखाद्या झाडाखाली बसत आम्ही माथ्याच्या अगदी जवळ पोहचलो. मयुरेश पुरता दमून गेला होता. पाणी पिण्याच्या बहाण्याने जिथे मिळेल तिथे बुड टेकवत होता. 

कातळातल्या पायऱ्यातून वर जात आम्ही एका रॉकपॅच जवळ पोहचलो. अगदी डोक्यावर आलेल्या उन्हामुळे वरच्या बाजूस पाहवत सुद्धा नव्हते. अगदी  एका खाचेवरून पाय टाकून वर चढावे लागणार होते. जर का तोल गेला तर अगदी गडाच्या पायथ्याशी पोहचू इतका खोल कडा. मयुरेशने तर भितीपोटी वर येण्यास आधीच नकार देऊन टाकला. मी बॅग खाली ठेऊन वर चढलो.  किल्ल्याच्या माचीवर पोहचलो होतो. हा रॉकपॅच जर तू चढलास तर गडावर पोहचलोच आपण असं सांगून मयुरेश ला वर येण्यास धीर देऊ लागलो.

पण मयुरेश चक्क त्या पॅच जवळ उभा राहून ढसाढसा रडू लागला. त्याच रडणं थांबवताना माझा नाकोजीव झाला होता. दोन-चार शिव्या जास्त देत हात देऊन त्यालाही वर खेचला. मयुरेश सोबत हा काही माझा पहिलाच ट्रेक नव्हता. आम्ही दोघांनी ह्या अधिसुद्धा ८ -१० ट्रेक केले होते. पण रडत बसण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. गडमाथ्यावर पोहचल्याची जाणीव झाल्यावर तो सुद्धा शांत झाला. बॅग उचलून पुढेच्या दिशेनं आम्ही निघालो.

गडाचा माथा दक्षिणोत्तर लांबवर पसरलेला आहे तर रुंदी फक्त १० ते १५ मीटर इतकीच आहे. माचीवर सुरवातीलाच एका कातळात खोदलेल्या टाक्यात शिवलिंग / ढवळेश्वर आणि त्या समोर दगडी सुरेख कोरीवकाम असेलाला नंदी दिसून येतो. गावकरी श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्री व्यतिरिक्त गडावर फिरकत सुद्धा नाहीत.


ढवळेश्वराचे दर्शन घेऊन पुढे आल्यावर एक कातळात खोडलेलं पाणी टाक आहे. शेवाळाने पूर्णतः भरलेलं आहे.ह्याच टाक्याच्या वर चौथऱ्यावर आणखी एक शिवलिंग आणि तोफेचा गोळा दिसून येतो.


समोरच्या बाजूस बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या आणि दरवाजाचे अवशेष दिसून येतात. गडावर सर्वत्र गवत माजलं असल्याने बरेचशे अवशेष दिसून येत नव्हते.



बालेकिल्यातील वाड्याचे जोते आणि भग्न अवस्थेतील तटबंदी नजरेस आली. त्याच तटबंदीमध्ये काही जंग्या , झरोके आणि खिडकी यांसारखी रचना दिसून येत होती. शेवटच्या उताराच्या वाटेवरून उतरून खाली असलेले तीन पाणीटाके आणि पाहऱ्याची गुहा बघून आम्ही पुन्हा वर आलो.

बालेकिल्ल्यात उगवलेल्या झाडाखाली शिदोरीवर ताव मारून सभोवतालचा परिसर न्याहाळत बसलो. चाहुबाजूला असलेलं गर्द दाट जंगल चंद्रगडाला अधिकच दुर्गम बनवतं. पश्चिम बाजूस वाहणारी ढवळे नदी आणि तीच विस्तीर्ण पात्र नजरेस पडतं. मागच्या बाजूस महाबळेश्वरच्या पठारावरच ऑर्थरसीट / मढीमहल पॉईंट पाहता येतो. काही हौशी डोंगर भटके मढीमहल ते चंद्रगड असा सहा तासांचा ट्रेक ढवळे घाटाने पूर्ण करतात. त्याच वाटेत लागणारी बहिरीची घुमटी आणि कोळेश्वर पठाराचे पश्चिम टोकही किल्ल्यावरून दिसते. गडमाथा अगदीच लहान असल्याने अर्ध्या तासात पाहून होतो.




पोलादपूर येथुन महाबळेश्वरच्या मढीमहाल /आर्थरसीटला जाणाऱ्या पुरातन ढवळेघाटावर नजर ठेवण्यासाठी जावळीच्या खोऱ्यात हा किल्ला बांधला. निरभ्र आकाशात गडमाथ्यावरून मंगळगड,रायरेश्वर, कोळेश्वर पठार, महादेवाचा मुऱ्हा, महाबळेश्वर, ढवळे घाट असा दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. जावळीचे जंगल म्हणजे नक्की काय ह्याची पुरेपूर जाणीव आम्हाला चंद्रगडाला भेट दिल्यावर झाली. रॉकपॅच सावधपणे उतरून आम्ही ढवळे गावी पोहचलो.



घरी जाताना उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरेंच्या स्मारकाला भेट दिली. स्मारकालगत असलेल्या दुकानात त्यांच्याकडील दांडपट्टा व एक तलवार पाहायला मिळाले. समोरच असलेल्या भल्यामोठ्या झाडाच्या ढोलीत  त्यांना ते सापडले होते. ते पाहून घागरकोंडीचा धबधबा आणि झुलत्या पुलावरून हेलकावे खात आम्ही घरचा रस्ता धरला.

जावळीच्या खोऱ्यात घुसायची हिम्मत वाघाचं काळीज असणाऱ्यांनीच करावी हे खरं. चंद्रगडच्या ट्रेकचा मयुरेश ने इतका धसका घेतला की गेल्या तीन वर्षात तो कधीच माझ्यासोबत ट्रेकला आला नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ