किल्ले कुर्डुगड


कोरोना, लॉकडाऊन आणि त्यातच ३ जून रोजी आलेल्या ‘निसर्ग’ वादळाचा तडाखा… अशा तिहेरी संकटात कोकणी माणूस अडकला आहे. वादळामुळे गावेच्या गावे विस्कटली, जीव लावून बांधलेली कौलारू घरे कोसळली…. वादळ घुसले, तांडव करून गेले, शमले तरी कितीतरी गावे अंधारात बुडाली. वीजपुरवठा पुरता कोलमडून गेला. त्यातच आधीच दुर्गम असलेल्या भागातली संपर्कयंत्रणाही पार निकामी झाली. सह्याद्रीतील अश्याच दुर्गम आणि अतिदुर्गम भागात वसलेल्या कुर्डुपेठ गावात तातडीने मदत पोहचवण्याचा निर्णय अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने घेतला. महासंघाच्या निर्णयानुसार रविवारी १४ जून रोजी महाड मधून सह्याद्रीमित्र संस्थेचे  गिर्यारोहक डॉ राहुल वारंगे आणि १३ गिर्यारोहक भल्या पहाटेच कुर्डुगडाच्या दिशेने मार्गस्थ झालो.

पुणे - माणगाव रस्त्यावर जिते गावाकडे जाणारा फाटा आहे. कडापे गावातील काळकाई देवीचे गाडीतूनच दर्शन घेत आमच्या गाड्यांचा ताफा १५० किलो धान्यासह सुमारे ५० किमी अंतर कापून जिते गावात पोहचला. गावात पोहचल्यावर गावकऱ्यांच्या भेदरलेल्या नजरेनं आमचं स्वागतच झालं. सध्या कोरोना सारख्या महामारीमुळे मुंबई - पुण्यातून येणाऱ्यांकडे गावकरी अश्याच नजरेने बघतात. आम्ही घेऊन आलेल्या मदतीची कल्पना गावच्या सरपंचांना दिल्यावर त्यांचाही विरोध मावळला. गावच्या काही लोकांनी उंबर्डी गावातून कुर्डुपेठेत जाण्याचा सल्ला दिला. पण ती वाट जास्त दमछाक करणारी,जास्त मळलेली नसल्यामुळे आणि आमच्यापैकी कोणीच त्या वाटेने गेले नसल्यामुळे आम्ही जिते गावातूनच चढाई करायचं ठरवलं. कुर्डुपेठेतील गावकरी सुद्धा ह्याच वाटेचा वापर करतात. सोबत आणलेल्या १५० किलो धान्याची विभागणी आम्ही १४ बॅगांमध्ये केली. जिते गावातून समोरच्या बाजूस गेलेल्या बैलगाडी रस्त्याने पुढे जाऊन डावीकडे जाणाऱ्या वाटेवर चालत राहावे. समोरच्या बाजूस असलेल्या डोंगररांगेमुळे सुमारे ६१० मीटर उंचीचा कुर्डुगड जिते गावातूनही दिसून येत नाही. पण वाट चांगली मळलेली असल्यामुळे ती चुकण्याची शक्यता नाही. वाटेत लागणाऱ्या करवंदांवर ताव मारत २० मिनिटांमध्ये आम्ही सपाटीवरून डोंगराच्या चढाजवळ पोहचलो. वादळामुळे बऱ्याच ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती. कुर्डुपेठेत जाताना वाटेत एका वृद्ध महिलेने आम्हाला ' तुम्ही जर गावात कोरोना घेऊन आलात , तर गावची देवी तुमच्यावर कोपेल ' असा धमकी वजा इशारा दिला. जसजसा डोंगराचा चढ तीव्र होत होता, तसतसा आमच्या चढाईचा वेग कमी होऊ लागला. जागोजागी सगळेच बसू लागले. कुणाच्या पाठीवर ८ ते १० किलो तर काहींच्या पाठीवर १२ ते १५ किलो सामानाचं ओझं होतं. सूर्यकिरणांचा वर्षाव आमच्यावर होत असल्याने प्रत्येकजण घामाच्या धारेने भिजू लागला होता. मधुनच येणारी वाऱ्याची झुळूक थोडा दिलासा देत होती. पावसामुळे‌ सगळ्याच डोंगरांवर हिरवाईची चादर पसरली होती, त्यामुळे वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता होती. उंच आकाशात  ‘केक केक कीs किs !’ अश्या कर्कश आवाजात शीळ घालणारा सर्पगरूड सगळ्यांचचं लक्ष वेधून घेत होता.


समोर दिसणाऱ्या कातळाला ट्रॅव्हर्स मारून आम्ही सपाटीवर पोहचलो. एका मोठ्या जांभळाच्या झाडाखाली बॅगा ठेवल्या आणि तिथेच पाय पसरले.  डोंगररांगेपासून विलग झालेला कुर्डुगडाचा सुळका बघत पाण्याच्या बॉटल घटघट खाली झाल्या. सगळे वर पोहचल्यावर आम्ही पुन्हा कुर्डुपेठेच्या वाटेला लागलो. वाटेवरील विजेचे खांब वाऱ्याने पडून गेले होते. मजल दरमजल पावलं टाकत आम्ही अडीच तासात चढाई करून कुर्डुपेठ गाठले. गावातील ग्रामस्थांना गोळा करून सोबत आणलेल्या धान्याचे वाटप केले. घरांच्या परिस्थितीची आम्ही पाहणी केली. घरांची छपरे काही प्रमाणात उडाली होती. पण वादळाच्या दुसऱ्याच दिवशी गावकऱ्यांनी कोणाच्याही मदतीची वाट न पाहता त्याची दुरुस्तीही केली होती.

दुपारचे १२:३० वाजले होते. जेवण चुलीवर गरम होईपर्यंत कुर्डुपेठेतुन हाकेच्या अंतरावर असलेल्या कुर्डुगडाच्या दिशेने धाव घेतली. आम्ही ह्या आधीही हा किल्ला पहिला होता पण गडावर जाण्याचे मुख्य कारण होते ते डॉ. राहुल वारंगे आणि इतिहास संशोधक डॉ. अंजय धनावडे यांनी कुर्डूगडाचा इतिहास पालटून टाकणारा शोध ! तो म्हणजे त्यांनी शोधलेल्या कुर्डुगडाच्या सुळक्यातील लेण्या. ह्या शोधमोहिमेची हकीकत राहुल दादा कडून याची देही याची डोळा ऐकायला मिळणार ह्या पेक्षा आम्हाला दुसरी पर्वणी काय असणार होती.


गडाच्या खालीच कुर्डाई देवीचे मंदिर आहे. देवळात देवीची महिषासुरमर्दिनी प्रकारातील दगडी मूर्ती व काही अन्य मुर्त्या आहेत. ह्याच देवळात जिल्हा परिषदेची शाळा सुद्धा भरते. दोन मुलांकरिता शिक्षक एक दिवस आड दीड तासाची चढाई करून शाळेत शिकवण्यास येथे येतात. देवळाच्या आवारात एक गजलक्ष्मी आणि काही वीरगळ भग्न अवस्थेत पडलेल्या दिसून येतात. 

शोधमोहिमेची सर्व हकीकत दादाने आम्हाला सांगितली. ही सर्व हकीकत असलेला लेख २०१५ मध्ये लोकसत्ता पेपर आणि बऱ्याच मासिकात प्रकाशित झाला आहे. इतिहास अभ्यासक डॉ. अंजय धनावडे यांच्या मते या लेण्यांची निर्मिती १० व्या शतकानंतर व १२ व्या शतकापर्यंत झाली असणार. तर मराठा  काळामध्ये मुख्य लेण्याचा तळ खोदुन पाणी साठवण्यासाठी त्याचा उपयोग केला असावा असे तेथे केलेल्या दगड -  चुना व खडीच्या बांधकामाच्या अवशेषांवरून वाटते. या लेणीमध्ये त्यावेळी दरवाजासाठी वापरलेले लाकडाचे सुटे अवशेष आहेत. लेणीतील पहिली खोली २५ फूट लांब ८ फूट रुंद व १० फूट उंच आहे व आतील दालन इंग्रजी  ' L '  आकाराचे इतकेच मोठे दालन जे आता पूर्णपणे पाण्याने भरलेलं आहे. एक भलेमोठे पाण्याचे टाके आहे त्याची लांबी १४ फूट आहे. इथपर्यंत जाणारी वाट आता मात्र अस्तित्वात नाही. रोपचा वापर करून प्रस्तरारोहण ( क्लाइंबिंग ) करूनच इथे पोहचता येते. 

गडाचा आतापर्यंतचा इतिहास असा की कुर्डुगड मोसे खोऱ्यातील पासलकर या शिवाजीराजांच्या समकालीन आणि सहकारी घराण्याच्या अखत्यारीत होता. बाजी पासलकर कुर्डुगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत म्हणून या गडाला विश्रामगड असेही म्हणतात. पुरंदर तहानुसार मुघलांना द्यावे लागलेले किल्ले स्वराज्यात दाखल करून घेण्याची मोहीम शिवाजी महाराजांनी १६७० मध्ये आखल्यावर जूनमध्ये माहुलीगड जिंकल्यावर कर्नाळा, कोहोज व कुर्डुगड स्वराज्यात दाखल झाले. या गडाशी वीर बाजी पासलकर, येसाजी कंक, बाजीचा विश्वासू सेवक येल्या मांग, बाजीचा आश्रित अनंता खुरसुले, जंजि-याचा सिद्दी, थोरले बाजीराव, खंडोजी माणकर, अमृता पासलकर, नाना फडणीस, रामाजी कारखानीस यांचा संबंध काही ना काही कारणांनी आला आहे. कुर्डुपेठ हे येसाजी कंक यांचे जन्मगाव.  १८१८च्या मराठा युद्धात पुण्याच्या ९व्या रेजिमेंटमधील कॅप्टन सॉपीटने एका तुकडीसह देव खिंडीतून येऊन अचानक हल्ला करून हा किल्ला काबीज केला. त्यावेळी किल्ल्यावर किल्लेदार व ४० जणांची शिबंदी होती. त्यावेळी सॉपीटला किल्ल्यावर मोठा धान्यसाठा सापडला. किल्ल्यांच्या लेण्यांवरून शिवपूर्व काळापासून हा गड वापरात होता. कुर्डुगडाच्या आसपासच्या भागातून  लिंग्या / देव घाट , निसणी घाट , ठिबठिबा नाळ , कुंभळमाची नाळ / तेल्या नाळ , चिपेचे दार , दीपमाळ , सातनाळ अश्या घाटवाटांवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला असणार. किल्ल्यासमोरील उंबर्डी गावात असलेले हेमाडपंथी मंदिर सुद्धा ह्या किल्ल्याचा इतिहास सांगण्यास मदत करतो. 


मंदिरापासून १० मिनिटांतच आपण कातळात खोदलेल्या दरवाजाजवळ पोहचतो. कातळात दाराची लाकडी चौकट अडकवण्याची खाच आजही पाहायला मिळते. दाराच्या डाव्या बाजुस १० फूट  खोल एक पाणी टाके आहे. बारमाही पिण्याचे पाण्याचे हे टाके आहे. मार्च - मे महिन्याच्या दरम्यान गावकरी ह्याच टाक्यातील पाण्याचा वापर करतात.  टाक्याच्या डाव्या बाजूस थोड्या सपाटीवर पाहऱ्याच्या चौकीची जागा दिसुन येते. ७ ते ८ पायऱ्या चढून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. समोरच्या बाजूस जाणारी वाट शेवटच्या बाजूस वळसा घालून किल्ल्यावर जाते.


काही ठिकाणी कातळ कोरून वाट मोकळी केलेली दिसून येते. शेवटच्या बाजूस काही पायऱ्या आहेत. किल्ल्यावर पोहचल्यावर सुळका उजवीकडे ठेवत सपाटीवर दगडाची कोरीव मारुती शिल्प दिसून येते. साधारणतः ४ फूट उंचीची कंभरेला खंजीर , पिळदार मिश्या असलेली आणि पायाखाली पणवती राक्षसिनीला चिरडतानाची ही मूर्ती आहे. अश्या स्वरूपाची मूर्ती सुरगड आणि रसाळगड किल्ल्यावरही पहावयास मिळते.


त्याच्या मागेच बुरुजाचे अवशेष आहेत. ह्या बुरुजाला हनुमान बुरुज संबोधले जाते. तर समोरच्या बाजूस काही उध्वस्त चौथऱ्याचे अवशेषही निदर्शनास येतात.
                       



दगडांच्या ढिगाऱ्यातून वाट काढत आपण निसर्गनिर्मित गुहेपाशी येऊन पोहचतो. ५० ते १०० माणसं बसू शकतात एवढी मोठी ही गुहा आहे , पण छताचा भाग कोसळल्यामुळे गुहेत सपाटी नाही. गुहेच्या डाव्या बाजूस एक बुजलेले पाणी टाके दिसून येते.  गडाच्या मागील बाजुस एक उत्तम बांधणीचा बुरूज असून बुरुजाखाली प्रचंड खोल दरी असल्याने या बुरुजास स्थानिक लोक कडेलोटाचा बुरूज म्हणतात. मागच्या बाजूस भला मोठा दगड तुटून पडल्याने किल्ल्याला पुन्हा वळसा घालून मागच्या बाजूस जावे लागते. किल्ल्याच्या समोरच्या बाजूस सुद्धा एक बुरुज व काही बांधकामाचे अवशेष दिसून येतात. सुळक्याच्या उजवीकडील भागांत बऱ्याच प्रमाणात रॉकफॉल झालेला नजरेस पडतो. त्याच बाजूस एक पाणी टाके सुद्धा दिसुन येते.




कड्याच्या बाजूने दगडांच्या खाचेतून गडफेरी पूर्ण होऊ शकते पण नवख्या लोकांनी हे धाडस न केलेलंच बरं. किल्ला पाहण्यासाठी अर्धा तास वेळ पुरेसा आहे. निरभ्र वातावरणात गडावरून गरूडमाची, सुधागड , सरसगड , सुरगड , अवचितगड , घोसाळगड , तळगड हे किल्ले दृष्टीक्षेपात येतात. भुकेने बेहाल झालेल्या आमच्या मंडळींनी भरभर किल्ला उतरून गरमागरम जेवणावर ताव मारला.

जेऊन झाल्यावर किल्ला उतरत असताना सकाळी वाटेत भेटलेल्या वृद्ध महिलेला आम्ही केलेल्या मदतीची माहिती मिळताच त्यांनी भरभरून आशीर्वाद दिला. त्यांच्या ह्या आशीर्वादाने सगळ्यांचीच मने प्रफुल्लित झाली. उतारावर आलेल्या जोरदार पावसाने सगळ्यांची पहिल्या पावसाळी ट्रेकची हौसही पूर्ण झाली. निसर्ग चक्रीवादळाने आणलेल्या भीषण स्थितीमध्ये येथील नागरिकांना मदत करून सह्याद्रीमित्र संस्थेने सामाजिक बांधीलकीचे आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. 


कुर्डुगड लेणी शोधमोहिमेची  गिरीमित्र संमेलन मध्ये प्रदर्शित केलेली माहितीपट ( Documentary ).
https://www.youtube.com/watch?v=h1KZkBYyD4w

टिप्पण्या

  1. खूपच सुंदर लिहिले आहेस संकेत !अतिशय ओघवत्या भाषेतील हे वर्णन वाचणाऱ्याला कुर्डुगडाची सफर घडवून आणणारी आहे , तुझ्यामधील निष्णात गिर्यारोहकाचे व उत्कृष्ठ लेखकाचे दर्शन या ब्लॉगमधून होते .सह्याद्री तसेच पुढे जाऊन नगधीराज हिमालयातील अमर्याद भटकंतीसाठी खूप खूप शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच सुंदर लिहिले आहेस संकेत !अतिशय ओघवत्या भाषेतील हे वर्णन वाचणाऱ्याला कुर्डुगडाची सफर घडवून आणणारी आहे , तुझ्यामधील निष्णात गिर्यारोहकाचे व उत्कृष्ठ लेखकाचे दर्शन या ब्लॉगमधून होते .सह्याद्री तसेच पुढे जाऊन नगधीराज हिमालयातील अमर्याद भटकंतीसाठी खूप खूप शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच सुंदर लिहिले आहेस संकेत !अतिशय ओघवत्या भाषेतील हे वर्णन वाचणाऱ्याला कुर्डुगडाची सफर घडवून आणणारी आहे , तुझ्यामधील निष्णात गिर्यारोहकाचे व उत्कृष्ठ लेखकाचे दर्शन या ब्लॉगमधून होते .सह्याद्री तसेच पुढे जाऊन नगधीराज हिमालयातील अमर्याद भटकंतीसाठी खूप खूप शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ