शिवदुर्ग - किल्ले बिरवाडी
महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचे सखोल ज्ञान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा अचूक उपयोग स्वराज्याची स्थापना , विस्तार , संरक्षण आणि विकास यासाठी करून घेतला. गडकोट म्हणजेच राज्याचे मूळ, गडकोट हाच खरा खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, गडकोट म्हणजेच प्राण संरक्षण हेच धोरण डोळ्यासमोर ठेऊन राजांनी अनेक ठिकाणी गडकोटांची पुनर्बांधणी केली तर काही ठिकाणी नव्याने उभारणी केली. जंजिरेकर सिद्दी आणि पोर्तुगीजांचा साळावच्या खाडीवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन राजांनी १६६१ मध्ये कुंडलिका नदीवर होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी चनेरे गावच्या डोंगरावर बिरवाडी नावाचा किल्ला बांधला. पूर्वी रोहा ते गोफण (रेतीबंदर) हे गाव जलमार्गाने जोडलेले होते. साळाव व रोहा यांच्या मध्यवर्ती भागात चनेरे गाव आहे. रोहा - रेवदंडा मार्गावर दोन्हीकडून २० किमी अंतर खाजगी किंवा बसने पार करून चनेरे गावात पोहचता येते.
जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी रेवदंडा आणि कोर्लई किल्ल्यांची स्वारी करून रोह्याकडे येताना चनेरे गावापासून आत २ किमी वर असलेल्या बिरवाडी गावाजवळ पोहचलो. चनेरे गावातून २५० मीटर उंचीचा बिरवाडीचा किल्ला नजरेस पडला. संध्याकाळचे ५ वाजले होते.
काळोख होण्याआधी किल्ला सर करायच्या हेतूने रुपेश आणि मी आम्ही दोघेही भरभर पावलं टाकत भवानी मंदिराच्या मागे असलेल्या बुरुजापाशी आलो.
बुरुजातून बाहेर आलेल्या एका झाडाच्या मुळाला पकडून मी बुरुजावर चढलो. घसरड्या मुरमाड मातीवरून कसाबसा वर पोहचलो परंतु शेवाळ मुळे झालेली घसरण पाहता रुपेशने मला खाली उतरण्याचा सल्ला दिला.
मग खाली उतरून बुरुजाच्या डावीकडे असलेल्या दाट जंगलात वाट शोधण्यात मग्न झालो. पण कधी काळोख झाला हे कळलंच नाही. खाली उतरून आम्ही घरचा रस्ता धरला. पण काही करून उद्याच हा किल्ला सर करायचा ह्या उद्देशाने रूमवर असलेली काही पुस्तके आणि ब्लॉग हुडकून काढले. प्र. के. घाणेकर लिखित "भटकंती रायगड जिल्ह्याची" ह्या पुस्तकात गडाची माहिती आणि नकाशा आमच्या हाती लागला. वरील नकाशा हा त्याच पुस्तकातील आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही बिरवाडी गावी पोहचलो. गावात गाडी पार्क करून भवानी मंदिराची वाट धरली. ८० -९० पायऱ्या चढून मंदिरात पोहचलो.
मंदिराच्या समोरच एक भग्न अवस्थेतील तोफ आहे. मंदिराचा हल्लीच जीर्णोद्धार झाला आहे. भवानी देवीमुळे गडाला भावानिगड हे नाव पडले आहे तर काही लोकं चनेरेचा किल्ला अशी ओळख ह्या किल्ल्याची सांगतात.
मंदिरात भवानी मातेची मूर्ती दगडाच्या कमानीत स्थानापन्न केलेली आहे. गावकऱ्यांच्या सांगण्यावरून असे कळते की देवीची मूर्ती ही पूर्वी बुरुजावर होती. शत्रूची चाहूल लागताच देवीने बुरुजखाली उडी घेतली, घुटघ्याच्या आकाराचा खड्डा त्या बुरुजखाली दिसून येतो. त्यानंतर गडाखालीच देवीची स्थापना करून गावकऱ्यांनी मंदिर उभारले. अश्या आख्यायिका बऱ्याच किल्ल्यांवर सांगितल्या जातात.त्यांवर आपण विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा निर्णय असतो. पण अश्या कथांतून गावकऱ्यांची देवावरील पूर्वीपार श्रद्धा दिसून येते. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला देवीची जत्रा भरते. गावोगावच्या देवीच्या काठ्या तीर्थ घेण्यासाठी मंदिरात येतात. पूर्वी देवीच्या वाहणाकरिता रेड्याचा बळी दिला जायचा. गोऱ्या लोकांनी त्यांच्या कारकिर्दीत ही प्रथा बंद करून टाकली. आता दरवर्षी बोकडाचा बळी चैत्र पौर्णिमेला किंवा दसऱ्याला ठराविक मानकरी देतात.
देवीचे दर्शन घेऊन आम्ही वरच्या बाजूस पोहचलो.शिवरायांचा ८ फुटी उंच पुतळा येथे गावकऱ्यांनी उभा केला आहे. लाकडांचे ओंडके आडवे टाकून इथपर्यंत पायऱ्या केलेल्या आहेत. पुतळ्यासमोर बैठकीची व्यवस्था करून आजूबाजूचा परिसर स्वछ केला आहे.
खाली उतरून डावीकडील वाटेने किल्ल्याला वळसा घालून दाट जंगलातून जाणारी वाट धरली. २० मिनिटांतच झाडांआड किल्ल्याचा दरवाजा दोन भक्कम बुरुजांमध्ये लपलेला दिसला.
गोमुखी आणि सुबक बांधणीचा दरवाजा आजही निरागसपणे आपल्यासारख्या भटक्यांच्या मदतीने ह्या वडाच्या पारंब्या आणि झाडांच्या मुळातून सुटका करून घेण्याची वाट बघत उभा आहे.
दरवाजावरील छज्जा सुद्धा अगदी कोरीव दगडात बसवलेला आहे. पावसाच्या पाण्यामुळे बऱ्याचशा पायऱ्यांचे दगड वाहून गेले आहेत.
पायऱ्यांवरील शेवळामुळे वाट निसरडी झाली होती. दरवाज्याच्या आतल्या बाजूने सुद्धा दाराची बांधणी कश्या स्वरूपाची आहे हे दिसून येते.
दरवाजा चढून आत गेल्यावर समोरच कातळात खोदलेली दोन पाणी टाके दिसतात. सुरवातीच्या टाक्याची एक भिंत बांधून काढलेली आहे.
ह्याच टाक्याच्या पुढे आयताकृती पाणी टाके आहे. उन्हाळ्यात गावकरी घरगुती वापरासाठी ह्याच टाक्यांतील पाण्याचा वापर करतात.
पाणीटाके बघून निसरड्या वाटेने बालेकिल्ल्यावर धाव घेतली. काही घरांची जोती किल्ल्यावर दिसून येतात.
बालेकिल्ल्याच्या शेवटी एका गुप्त दरवाजाचे / चोर दरवाजाचे अवशेष पाहायला मिळतात. गडावरून स्वच्छ वातावरणात साळाव खाडीचा परिसर , अवचितगड किल्ला, फणसाड अभयारण्य आणि सागरगड पर्यंतचा परिसर दृष्टीक्षेपात येतो.
कोकण ते घाटमाथ्यावर कुंडलिका नदीमार्गे होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी कोर्लई , रेवदंडा , बिरवाडी , अवचितगड, सुरगड आणि सुधागड यांचा उपयोग केला.
गडाच्या पूर्वेकडील भागात एका बुरुजाचे निशाण मिळतात. काही ठिकाणी सुबक तर काही ठिकाणी ओभडढोबड बांधणीची तटबंदी दिसून येते. बऱ्याच ठिकाणी ती ढासळलेली सुद्धा दिसून येते. मंदिराच्या वरच्या भागात असलेल्या बुरुजापाशी एक झेंडा लावलेला दिसतो. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात झाडं वाढलेली आहेत आणि गवतामुळे अवशेष सहजासहजी दिसून येत नाहीत.
मागच्या बाजूस काही जोत्यांचे अवशेष , दगडी डोन पाण्याने भरलेले दिसले. गडफेरी करतानाच पावसाची रिपरिप चालू झाली.
मागच्या बाजूस असेलेले पाणीटाके / घोड्याचे टाके बघत पुन्हा मूळ वाटेवर आम्ही पोहचलो. गडमाथा लहान असल्याने तासाभरात किल्ला बघून झाला. चनेरे गावात चहा बिस्किटं खाऊन आम्ही रोहामधील अवचितगडाचा रस्ता धरला.
इतिहास :-
जावळीतील मोऱ्यांचा पराभव केल्यावर कोकणात सत्ता प्रस्थापित करण्याच्या दिशेने शिवाजी महाराजांचा मार्ग मोकळ झाला. इ. स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी रघुनाथ बल्लाळ कोरडे यांना जंजिन्याच्या स्वारीवर पाठवले. ऑक्टोबर इ. स. १६५७ मध्ये स्वतः महाराज कोकणात दाखल झाले. सुरगड, तळे, घोसाळे, सुधागड, मंगळगड हे किल्ले महाराजाकडे आले. सिद्दीला अलिबाग ते जंजिरा यांच्या पूर्वेकडील भाग गमवावा लागला. इ. स. १६५९ मध्ये महाराजांनी शामरात पेशवे यांना जंजिऱ्याच्या स्वारीवर पाठविले. मराठ्यांचे फत्तेखानाशी युद्ध झाले. त्यात फत्तेखानाची सरशी झाली. या मोहिमेत खेम सावंतांनी सिद्दीला मदत केली होती. इ. स. १६६१ मध्ये शिवाजी महाराजांनी पूर्ण सामर्थ्यानिशी फत्तेखानावर स्वारी केली. दंडाराजपुरी जिंकून घेतले व या परिसरात बिरवाडी, लिंगाणा असे किल्ले बांधून सिद्दीवर अंकुश ठेवला, बिरवाडी महाराजांनी बांधला व अवचितगड स्वराज्यातच असल्यामुळे पर्यायाने कुंडलिका नदीच्या खाडीवर रोह्यापर्यंत मराठ्यांची सत्ता प्रस्थापित झाली. फेब्रुवारी इ. स. १७७३ मध्ये दादोपंत गोडबोले बिरवाडी किल्ल्याचे सुभेदार होते.
संदर्भग्रंथ :-
१) रायगड जिल्ह्याचे दुर्ग वैभव - सचिन जोशी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा