कावळ्या बावळ्या घाटाचा रक्षक - कोकणदिवा


सह्याद्रीच्या डोंगररांगेतील दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या सुळक्यांवर उभं राहून दूरवर क्षितिजात विलीन झालेल्या किल्ल्यांची टेहळणी करणे व दुरून दिसणारं त्यांचं अक्राळ विक्राळ रूप डोळ्यात साठवून घेणे, माझ्यासाठी या पेक्षा दुसरी कोणती सुखाची व्याख्या असूच शकत नाही. त्याचप्रमाणे रायगडावरील टकमक टोकावरून आणि त्याच्या समोरच असलेल्या कोकणदिवा वरून सूर्यास्त अनुभवलेल्या क्षणांना शब्दांच्या ओंजळीत कैद करताच येत नाही. नुकताच कोकणदिवा वरून तैलबैला बघितल्याचं एक वृत्त माझ्या वाचनात आलं. तेंव्हापासूनच माझ्या कल्पनेचा Google Earth गरागरा फिरू लागला होता. तसं पाहता कोकणदिवा हा रायगडाच्या उंची इतकाच आहे. परंतु तैलबैला ते कोकणदिवा यांच्यामध्ये आडव्या येणाऱ्या कुंभे आणि ताम्हिणी घाटाच्या डोंगररांगेआडून तैलबैला दिसणे थोडे कठीणच आहे. रायगडावरील नगारखान्यावरून अरबी समुद्र बघण्याचं स्वप्न कधी पूर्ण होईल हे माहीत नाही, मात्र कोकणदिवा वरून दिसणारा तैलबैला! या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी मी कावळ्या बावळ्या घाटाची मोहीम आखली.

जून महिन्याचे ते दिवस होते. १०- १२ दिवसांची जोरदार बॅटिंग करून पावसाने विश्रांती घेतली होती. सह्याद्रीचा काळा पत्थर हिरव्यागार गवताने नटून गेला होता. काही प्रमाणात शतजलधारा धबधब्याच्या रूपात ओसंडून वाहू लागल्या होत्या. सकाळीच घरून दिसणारा राजगड आकाश निरभ्र असल्याची ग्वाही देत होता. माझ्या ट्रेकर भिडू भवऱ्याला (अक्षय भवरे) कॉल  करून कोकणदिवा ला निघण्याची तयारी करण्यास सांगितले. दोघेही निघेपर्यंत घड्याळात ११ वाजून गेले होते. दुपारच्या जेवणाचे डबे बॅगेत भरून महाडवरून बाईकने कोकणदिव्याकडे मार्गस्थ झालो.



रायगड-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर व रायगड किल्ल्याच्या उत्तर बाजूस "कोकणदिवा" नावाचा बुटाच्या आकाराचा किल्ला आहे. गडावर जाण्यासाठी पुण्याहून गारजाई वाडी व महाड कडून सांदोशी गावातून चढाई करता येते. पुण्यातून येणाऱ्यांनी सिंहगड रस्त्याने पानशेत-घोळ-गारजाई वाडी असा ७० किमी चा प्रवास करून पायथ्याचे गाव गाठावे. दीड तासांची चढाई करून आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहचतो. माणगाव तालुक्यातील कुंभे गावातून एक पायवाट घोळ-गारजाई वाडीला येते. दाट अरण्यातून ट्रेक करण्याचं थ्रिल अनुभवायचं असेल तर ह्या वाटेने सुद्धा ट्रेक करता येईल. महाड ते सांदोशी हे अंतर ३० किमी आहे. कोंजर घाट चढून आम्ही पाचाड ला पोहचलो. घनांच्या दुलईत सामावलेला रायगड किल्ला त्याच्या अफाट उंचीची जाणीव करून देत होता. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता जिजाऊंच्या पाचाड येथील समाधीचे दर्शन घेऊन आम्ही सांदोशी गावाजवळ पोहचलो. पाचाड-माणगाव रस्त्यावर उजवीकडे सांदोशी गावात जाणारा फाटा आहे. येथून सुळक्यांच्या डोंगरात विलीन झालेला सुमारे ९०० मीटर उंचीचा कोकणदिवा लक्ष वेधुन घेत होता. गावात गाडी पार्क करून आम्ही कोकणदिव्याच्या वाटेला चालू पडलो.



सांदोशी गावाच्या पुढे रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीसमोरून, डावीकडील शेताच्या बांधांवरून जाणाऱ्या वाटेने आम्ही चालत राहिलो. काही वेळातच शेतातून गर्द झाडीमध्ये पोहचलो. कावळ्या घाट हा नेहमीच वर्दळीचा असल्यामुळे वाट चांगलीच मळलेली आहे. त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता नाही. पावसामुळे जंगलात एक वेगळीच प्रसन्नता असते. झाडांच्या फांद्यांवरील कोवळ्या पालवीचा तजेलदार रंग खुलुन आला होता. पावश्या पक्षी (Brainfever Bird or Common Hawk-Cuckoo) त्याच्या शिट्टीतुन शेतकऱ्यांना "पेरते व्हा" असा संदेश देत होता. वाटेत चालताना आम्हाला बघून खेकडे सैरावैरा पळत त्यांच्या बिळामध्ये धूम ठोकत होते. जंगलामुळे उन्हाचा वर्षाव आमच्यावर होत नव्हता तरी दमछाक आणि सततच्या चालण्याने घामाच्या धारेने पुरते भिजून गेलो होतो. थोड्याच वेळात आम्ही मोकळ्या माळरानावर आलो. तेथून निवडुंगाच्या कुंपणामागून ही वाट पुन्हा दाट जंगलात जाते. एका ओढ्याजवळ आम्हाला कातळात कोरलेल्या तीन पायऱ्या नजरेस पडल्या. जसजसा घाटाचा चढ तीव्र होत होता, तसतसा आमच्या चढाईचा वेग कमीकमी होत होता. वाटेत बऱ्याच ठिकाणी किल्ल्याचे मार्किंग (Arrows) दिसून येतात. गारजाई वाडीतील बरेचशे लोक सामानाची खरेदी करण्यासाठी याच कावळ्या घाटाने सांदोशी गावात येतात. शिवकाळात पाचाड नंतर दुसरी बाजारपेठ सांदोशी गावात होती. घाटाच्या मध्यवर्ती भागात तटबंदी सारखी दगडांची रचना केलेली आढळते. कधीकाळी व्यापारी मार्ग म्हणून प्रचलित असलेला कावळ्या बावळ्या घाट आता मात्र पावसाच्या आणि सततच्या कोसळणाऱ्या दरडींमुळे दुर्लक्षित झाला आहे. तब्बल दीड तास बिनाथांबा चढाई करत आमच्या पायांच्या टापा खिंडीत जाऊन पोहचल्या. पाठीवरील बॅगा बाजूला ठेवून बॉटलमधील पाण्याने घसा ओला केला. खिंडीच्या वरच्या भागात दोन्ही बाजूस दगडी जोत्यांचे अवशेष व पडक्या अवस्थेत असलेली ताल दिसून येते. समोरील बाजूस शेंदूर फासलेल्या दगडाला गावकरी टालदेव असे म्हणतात. याच देवाला गावकऱ्यांनी लग्नपत्रिका वाहुन त्यांची पूजा केलेली दिसून आली.




पावनखिंड आणि नेसरीच्या खिंडीनंतर कावळ्या बावळ्या खिंड सुद्धा अश्याच एका पराक्रमाने पावन झाली आहे. 
११ मार्च १६८९ रोजी जेव्हा छत्रपति संभाजी महाराजांचे निधन झाले (फाल्गुन वाद्य ३०). राजधानी रायगडावर वयाने अवघे लहान असलेले राजाराम महाराज गादीवर आले, छत्रपति झाले. आता औरंगजेबाने जणूं मराठा साम्राज्य संपवण्याचा पण केला होता. त्याने कर्तबगार सरदार शहाबुद्दीनला रायगडला वेढा टाकण्यास व राजाराम राजेंना पकडण्यास पाठवले. जुल्फिकार खानाच्या थोडक्या सैन्यानि आधीच रायगडला विळखा टाकला होता. हाच वेढा (विळखा) मजबूत करण्यासाठी औरंगजेब ने तेवढच मोठं सैन्य शहाबुद्दीन सोबत पाठवले.
मुघल सरदार म्हणजे तेव्हढाच् मोठा लवाजमा. शहाबुद्दीन आपले पाच हजाराचे सैन्यबळ घेऊन निघाला. वाटेत त्याला काही माणकोजी नामक मराठी सरदार सामिल झाले. सात हजार परियंत असलेलं त्याचं सैन्य रायगड कडे निघालं. ते किल्ले कोकणदिव्याकडे आलं. आता कावळ्या घाटाच्या काही अंतरावर येऊन ते थांबलं. डोंगरावरच्या घोळ गारजाईवाड़ी गावात येऊन त्यांनी आपला तळ ठोकला. किल्ले कोकणदिव्याच्या खिंडीत शिवछत्रपतींचे कुशल सेनानी, खिंडीचे प्रमुख व रायगडच्या पायथ्याशी असलेले सांदोशी गावचे "जीवाजी सर्कले नाईक" तैनात होते. सोबत त्यांचे नऊ पाइक असे दहा जण या खिंडीत होते. शिवछत्रपतींच्या कालखंडात अनेक लढायांत पराक्रमाची शर्थ केल्याने सांदोशी गाव(खोरं) हे त्यांना इनामी दिलेल वतन. आधी ("सरखेल" नौसेनापरमुख ) या पदावर असलेले नाईक सर्कले घराणं आता रायगडच्या रक्षणाच्या जवाबदारी साठी किल्ले कोकणदिव्यावर सज्य होतं. तेंव्हा खान आल्याची बातमी त्यांना कळाली.
पन्हाळ गड़ाला सिद्धि जोहर ने दहा हजार सैनिकांशी वेढा दिला होता. इतिहासाची पुनरावृत्ति झाली.  सुमारे सात हजारां विरुद्ध दहा उभे होते.दिवस होता २५ मार्च १६८९. बलाढ्य शत्रु  डोळ्या समोर उभा होता. विचार करण्याचीही ऊसंत नव्हती. जीवाजी नाईक सर्कले यांनी नऊ ही जणांना आपली जागा गाठण्यास सांगितले. त्यांनी नऊ ही जणांना गनीम संपेपर्यत न मरण्याची जणू ताकित दिली होती, कारण तसं न झाल्यास जर आज खिंड पडली तर आत्ताच उगवतं स्वराज्य उद्या उभ राहणार नाहीं ऐवढ नक्की होतं. आता दहा ही जण खिंडीत लढाई साठी सज्ज झाले. अर्ध्या मावळ्यांनी म्हणजेच पाच ते सहा मावळ्यांनी खिंडित आपल्या गुप्त जागा गाठल्या. जीवाजी नाईक सर्कले , हातात समशेर घेऊन अपल्या तिन चार मावळ्यांसोबत खिंडीत, मध्येच जणू पर्वतासारखे खिंडीचा रस्ता अडवून उभे ठाकले... 
घोळ गारजाई गावा मधुन शहाबुद्दीने आपली पहिली हजारी तुकड़ी खिंडीत धाडली. दहा जण विरुद्ध हजारोंची लढाई आता सुरु झाली. क्षणात रणसंग्राम पेटला. दीन दीन रण शब्दास हर हर महादेव भिडला. कमरेला लटकलेल्या समशेरी शत्रुवर कोसळल्या. शिवछत्रपतींनी शिकवलेली गनिमिकावा  युद्धनिति आता रंग घेऊ लागली होती. कोण बाणांनी टिपल गेल. तर कोणावर चढ़ावले भाल्यांचे हल्ले. मराठ्यांच्या गोफणि फेर धरु लागल्या, आकाशातल्या उल्कापाता प्रमाणे गोफणि आग ओकात होत्या..कोणावर केव्हाही तलवारीचे वार. तर कोण मोठ्या दगडांनी चेचल गेलं. थोडा थोडक्यांना मधेच जाऊ कापून येऊन आपल्या गुप्त जागि मावळे परत जात..
अशा रीतीने  जीवाजी सर्कले व त्यांच्या नऊ पाइकांनी हजारोंना पाणी पाजलं...हजारोंना संपवलं. आपली पहिली तुकड़ी परत आली नाहीं म्हणून शहाबुद्दीन ने दूसरी तुकड़ी खिंडीत पाठवली. परत या दहाही विरांनी त्यांच्यावर गोफंगोंड्याचा  मारा सुरु केला..दगडांचा मारा .. जीवाजी सर्कले शत्रुवर यमा सारखे कोसळत होते .. त्यांच्या समशेरीच्या वारांनी खिंडीत मोघलांची दाणादाण उडवली..शवांचा थर रचत चालला होता..आता दुसऱ्या तुकडीची ही तीच दशा झाली.परत हजार मारले गेले.. दूसरी तुकड़ी लढत असताना मात्र या दहा जणांच्या गुपित जागा आता गनीमास समजल्या. तुकडीतील काही मागच्या सैनिकांनी हे खानाला जाऊन कळवल. शहाबुद्दीन ला हे कळताच तो सर्व सैन्य घेऊन खिंडीत आला... तोपर्यत सुमारे अर्ध्याहुन अधिक सेना या दहा मावळ्यांनी खिंडीत झोपवली होती. 
अखेर आता मावळे आपल्या गुप्त जागा सोडून एकत्र खिंडीत जीवाजी सर्कले यांच्या सोबत  हजारों समोर उतरले. सर्वत्र कापाकापि सुरुचं होती. जो समोर येईल त्याला फक्त चिरायचं एव्हढच ते करत होते. रक्तानं ते भीजले माकलेले तासा वर तास उलटले. सुमारे दहा तास सरले होते...जीवाजी सर्कले यांचा हां महापराक्रम पाहुन मुघल सरदार स्तब्द झाला होता. (जीवाजी सर्कले यांनी खानाची अर्ध्र्याहून आधिक सेना परास्त केली होती , सुमारे ४००० हुन अधिक ). काही तासांनी ही गोष्ट खाली सांदोशी गावात समजली. त्यावेळी गावात मुक्कामी असलेले गोदाजी जगताप काही साठ सत्तर गावातील मावळे घेऊन जीवाजी सर्कले यांच्या मदतीसाठी त्यानी खिंडीकडे धाव घेतली. आता मराठ्यांची अशी मुठभर जेमतेम साठ सत्तर ची ही फ़ौज खिंडीत आली.
खिंडीत आता भयानयुद्ध सुरु होत.. रक्ताचे पाट वाहायला लागले. जीवाजी सर्कले रक्तात भिजुन गेले. तळपत्या सूर्या सारखे ते लालबूंद झाले होते.. या मराठ्यांनी जणु कहरच केला होता. खिंडीत रक्ताचा अभिषेक झाला. खानाला आता घाम फुटला, मराठ्यांच्या तूफानी वारांने पठाण कापले गेले.खानाचं सैन्य आता संपत चाललं होतं. आपली हार होणार हे ख़ानाला आता समजलं..  आपला जीव वाचवण्यासाठी  शहाबुद्दीन खान व राहिलेल्या काही  शे दीडशे सैन्याने खिंडीतून पळ् काढला. मुठभर मराठ्यांनी हजारोंना संपवल. मावळ्यांनी अखेर युद्ध जिंकल. मात्र ,जीवाजी नाईक सर्कले यांचा या अग्निकुंडात बळी गेला. जिवाजी नाईक सर्कले यांनि मरेपर्यंत खिंडीतून एकहि गनीम जाऊन दिला न्हवता..त्यांनी विजयश्री चा झेंडा लावत आपला देह रणी ठेवीला..तब्बल १६ तास पेटलेलं हे युद्ध शांत झालं.. स्वराज्यावरचं सर्वात मोठं संकट टाळलं होतं..युद्ध संपल्या वर राहिलेल्या काही मवळ्यांनी ,जीवाजी सर्कले व शहीद झालेल्या मावळ्यांना ते, त्याचं (प्रेत) घेऊन खाली सांदोशी गावात आले .गावात जीवाजी नाईक सर्कले व इतर शहीद झालेल्या मवळ्यांचे अंत वीधी पार पडले...त्यांच्या घरातील स्त्रीया सती गेल्या ..हे त्याग असामान्य होते!!
तब्बल १६ तास पेटलेलं हे युद्ध, १६ तास लढणारे ते मराठे काय असतील आणि अखेर मराठ्यांच्या बलिदानने व विजयाने ते संपलं. जीवाजी सर्कले नाईक यांच्या मरणाचं सार्थक झालं कारण छत्रपति राजाराम महाराज सुखरूप दक्षिणेत पोहोचले.. एक मावळा शंभराला भिडला.. दहा मराठे हजारोंशि भिडले हजरोंना चिरले. दहा जणांनी हजारोंना कंठस्नान घातलं. जेमतेम ६०-७० मावळ्यांनी जवळपास सात हजार गनीमाला परास्त केले,अखंड सेना पराजीत केली. मणभर मोघली फ़ौजेला कणभर मराठ्यांनी यंमसदनि धाड़लं... यात काय नाही. ..कोण पराक्रम..ते स्वराज्य प्रेम ..ती स्वामी निष्ठा..याचा परिणाम म्हणजेच  (शके १६११ शुल्क संवस्तरे,चैत्र वैद्य १०) राजाराम महाराज छत्रपति प्रतापगड करुन पुढे दक्षिणेत ,सरसेनापति हर्जीराजे परसोजी राजेमहाडिक यांस कड़े सुखरूप पोहोचले. व पुढच्या काही काळात एक अफट अश्या मराठा साम्राज्याचा उदय झाला.
आजही या लढाईत शहीद झालेल्या वीरांचे, जीवाजी सर्कले नाईक यांची साक्ष असलेल्या विरगळी ,समाधि ,सतिशिळा गावात आहेत.३५०  वर्षांन पूर्वी खिंडीत कोरलेली त्यांची  "मूर्ति " त्यांच्या अतुलनीय  पराक्रमाची साक्ष देते. अस म्हणतात की हा अतुलनीय पराक्रमाने पाहुन छत्रपती घराण्याने सर्कले घराण्याला ला पंचधातुत कोरलेले इनामी पंचधातु स्तुति पत्र दिले होते (सध्या ते उपलब्ध नसून ह्याच पुरव्याचा शोध चालू आहे).२५ मार्च हा दिवस शौर्य दिवस म्हणून सर्कले यांच्या सांदोशी गावी थाटात साजरा केला जातो. वीरांना श्रद्धांजली अर्पित केली जाते. 
°°° [ जेधे शकावलीत ह्या भव्य लढाईची ही ऐतिहासिक नोंद आहे.] °°°





गारजाई वाडीतून येणारी वाट सुद्धा खिंडीतच येऊन मिळते. उजवीकडील वाटेने झाडीतून मार्ग काढत पुन्हा एका सपाटीवर आलो. भुकेने व्याकुळ झाल्यामुळे तेथे न थांबता आमच्यापेक्षा दुप्पट उंचीच्या कारवीतून निसरड्या वाटेने चढत राहिलो. कातळात खोबणीसारख्या केलेल्या पायऱ्यांनी लेणीपाशी पोहचलो. मागे वळून पाहिले तर दूरवर डोंगरांच्या पलीकडे पुसटसा साल्तरचा डोंगर आणि त्याबाजूला तैलबैला दृष्टिक्षेपात पडला. नैसर्गिक डाईक रचनेची तैलबैलाची कातळभिंत इथून मात्र एका सुळक्याप्रमाणे भासत होती. काही क्षणांतच पावसाची रिपरिप चालू झाली. दिसणारा तैलबैला मोबाईलच्या कॅमेरात कैद केला पण तो कॅमेऱ्याच्या क्षमतेच्या पलीकडे होता. 




लेणीत बसून बॅगेतून जेवणाचे डबे उघडले. सोबत आणलेल्या चिकन भाकरी आणि बिर्याणी वर ताव मारला. जेवणानंतर ढेकर देत लेणीत पाऊस कमी होण्याची वाट बघत बसलो. साधारण ८ ते १० जण राहू शकतात इतकी कातळात कोरलेली ही लेणी आहे. लेणीच्या उजव्या बाजूस पाण्याचे टाके आहे. बारमाही पिण्याच्या पाण्यासाठी या टाक्याचा वापर होतो. उन्हापासून पाण्याची वाफ होऊ नये म्हणून भूमिगत हे टाके कोरलेले आहे. पाणी काढण्यासाठी एका छिद्राची रचना केलेली दिसते. लेणीच्या डाव्या बाजूस सुद्धा एक पाण्याचे टाके आहे. याच टाक्याशेजारून माथ्यावर जाण्यास वाट आहे. 


दुपारचे ४.३० वाजून गेले होते. पाऊस जाण्याची काहीच चिन्ह दिसत नव्हती. मग भर पावसातच आम्ही माथ्यावर चढाई केली. १० फुटांचा रॉकपॅच चढून आम्ही माथ्यावर पोहचलो. नवख्या लोकांनी इथे सावधगिरी बाळगावी. माथ्यावर फारच कमी सपाटीची जागा आहे. बेभान होऊन बरसणाऱ्या पावसांच्या सरींमध्ये विलीन झालेला रायगड किल्ला नजरेस पडत होता. समोर लावलेल्या झेंड्याच्या मागील बाजूस लिंगाणा डोकावून पाहत होता. शिवकाळात कोकणदिव्याच्या माथ्यावर मावळे मशाल पेटवून रायगडाला संकेत देत. दिवसा (चाऱ्याचा) गवताचा धूर करुन रायगडाला इशारा दिला जाई. निरभ्र वातावरणात माथ्यावरून कांगोरीगड , जननीदुर्ग , लिंगाणा , रायलिंग , प्रतापगड, राजगड , तैलबैला , सुधागड यांसारखे किल्ले दृष्टीक्षेपात येतात. रायगडाचा टकमक टोकापासून ते भवानी टोकापर्यंतचा संपूर्ण विस्तार कोकणदिवा वरून दिसतो. मावळतीला जाणारा सूर्य आणि किल्ले रायगड इथून तासंतास बसून बघावं असाच हा कोकणदिवा आहे. कोणत्याही ऋतूत कितीही वेळा इथे आलो तरी मन भरतचं नाही. पावसाचा वाढता जोर बघता भरभर उतरून आम्ही घरचा रस्ता धरला. रायगडच्या प्रभावळीतील आणि संरक्षक वसाहत म्हणून वापरात राहिलेला हा किल्ला आजही रायगडावरून लक्ष वेधून घेतो. जोरदार बरसणारा पाऊस आम्हाला पहिल्या वहिल्या मान्सून ट्रेकची अनुभूती देऊन गेला. 


                         ( पुनाडेवाडीतून दिसणारा कोकणदिवा )



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ