मनाला भुरळ पाडणारे महाड जवळील सुप्रसिद्ध धबधबे
कडाक्याच्या उन्हात तापलेला सह्याद्रीचा काळाकभिन्न कातळ जलधारांच्या वर्षावानंतर हिरव्याकंच शालीनं सजून आपले रौद्र रूप काही काळ दडवून ठेवतो. डोंगरकड्यांवरून एकसुरात कोसळणारे प्रपात, त्याच्याशी लगट करून दाटणारं दाट धुकं, भर्राट वाऱ्याचे झोत आणि नीरव शांततेनं, रानभूल न पडल्यासच नवल... निसर्गाचं हे सौंदर्य अनुभवणे म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभूती मिळाल्यासारखंच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला महाड तालुका नितांत सुंदर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. सावित्री, गांधारी आणि काळ नदीच्या तीरावर वसलेल्या महाड शहराला केवळ भूगोलंच नाही तर ऐतिहासिक वारसाही लाभला आहे. पावसाळ्यात रायगड किल्ल्या सोबतच आणखी काही ठिकाणे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहेत.
● नाणेमाची धबधबा :-
महाड तालुक्यातील वाकी ( नाणेमाची ) गावातील आईचा बांध या नावाने नाणेमाची धबधबा ओळखला जातो. वेल्हे तालुक्यातील गुगुळशी गावातून आणि गाढवकडा / दुर्गाच्या कड्याशेजारून ह्या धबधब्याचे प्रपात स्वतःला ६०० मीटर उंचावरून झोकून देतात. ह्याच धबधब्याच्या कुंडाजवळ प्रसिध्द आई देवीचे देवस्थान आहे. हल्लीच हा धबधबा सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यातून ह्या धबधब्याचे मोहक रूप नजरेत आणि कॅमेरात कैद करण्यासाठी पर्यटक येथे भेट देतात. नाणेमाची गावातील दरेकर बंधूंच्या स्टॉलवर जेवणाची व नाश्त्याची उत्तम सोय होऊ शकते.
दरेकर बंधू - ९४२१०१७०८१ / ७८७५१४५१३७
● शेवते धबधबा :-
महाड शहरातुन बिरवाडी-दहिवड-वाकी असा २५ किमी चा प्रवास करून शेवते गाव गाठता येते. शेवते गावाच्या पुढे रस्त्यालगतच हा धबधबा आहे. सातवाहन काळापासून वापरात असलेल्या शेवते घाटाच्या डोंगरधारेवरून कोसळणारा धबधबा आपल्या मनाला भुरळ घालतो. गर्द हिरव्या झाडीत उंचावरून कोसळणारा, धुक्यात हरवून जाणारा आणि पावसाच्या सरींनी गारठून टाकणारा हा शेवते गावचा परिसर आपल्याला जणू माथेरानलाच गेल्याची जाणीव करून देतो. अचानक वाढणारा पाण्याचा प्रवाह आणि निसरड्या धारदार दगडांमुळे पाण्याच्या प्रवाहात उतरता येत नाही.
● मोरझोत / माझेरी धबधबा :-
महाड - पुणे यांना जोडणाऱ्या प्राचीन वाघजाई / वरंधा घाटाच्या दक्षिणेकडील बाजूने हा धबधबा माझेरी गावात कोसळतो. १८५८ साली इंग्रजांनी कावळ्या किल्ल्यामधून गाडीरस्ता तयार केला. पावसाळ्यात वरंधा घाटात गरमागरम भजी आणि चहाचा आस्वाद घेण्यासाठी प्रवासी येथे थांबा घेतात. घाटात वाघजाई देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या पुढे असलेल्या पवार हॉटेल च्या बाजूला असलेल्या पठारावरून ह्या धबधब्याचे अविस्मरणीय दृश्य टिपता येते. धबधब्याच्या खालच्या बाजूस जाण्यासाठी माझेरी व तळीये या दोन्ही गावातून पायवाट आहे. गावापासून अर्ध्या तासातच ह्या धबधब्यापर्यंत पोहचता येते. पावसाचा जोर वाढला तर ह्याचं दिसणारं मोरपंखी रूप हे स्तिमित व छातीत धडकी भरवणारं असते.
● पळसगाव धबधबा :-
महाड शहरापासून ३३ तर माणगाव पासून १५ किमी अंतरावर पळसगाव खुर्द हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव आहे. महाड कडून पाचाडमार्गे जाताना रायगड आणि पाचाड कोट यांची भटकंती सुद्धा करता येऊ शकते. गावातून धनवी डोंगर आणि त्याच्या पायथ्याशी असलेला धबधबा आपलं दूरवरूनचं लक्ष वेधून घेतो. धबधबा समोर ठेवून चालायला सुरवात केल्यावर साधारणतः २० ते ३० मिनिटांनी आपण एका मंदिरापाशी पोहोचतो आणि तिथून आणखी पुढे १० मिनिटे चालल्यानंतर आपण धबधब्यापाशी पोहोचतो. ओढ्यातुन आणि भाताच्या शेतांमधून चिखल पायदळी तुडवत जाताना येणारा अनुभव हा सगळा थकवा दूर करणारा आहे. लोकांना या ठिकाणाबद्दल जास्त माहिती नसल्याने इथे लोकांची वर्दळ कमीच असते. इथल्या निसर्गाला धोका पोहोचेल असे कोणतेही कृत्य येथे करू नका, ही विनंती.
● सप्तधारा / सातधारा धबधबा :-
शेवते गावाकडे जाताना लागणाऱ्या वाकी गावात हा धबधबा आहे. एका ओढ्यावर असलेल्या पुलाजवळुन २० मिनिटांच्या अंतरावर डोंगराच्या खाचेमध्ये दडून बसलेला हा धबधबा आहे. सात टप्प्यात कोसळणाऱ्या पाण्याच्या झोतामुळे दगड अडकून मधल्या भागात कुंड/डोह तयार झाले आहेत. त्या कुंडांमध्ये पोहचणे मात्र शक्य नाही. त्याचे एकसंध प्रपात आणि झुळझुळणारा, खळाळत जाणारा आवाज आपलं मन गुंतवून टाकतो. वाढत्या पर्यटकांमुळे या भागांत कचरा करणे आणि मद्याच्या बॉटल फोडून फेकणे असे प्रकार वाढू लागले आहेत.
● कोथुर्डे धरण :-
महाड-रायगड रस्त्यावर १५ किमीचा प्रवास करून कोथुर्डे धरण गाठता येते. धरणाची व्याप्ती आणि त्याचे झोत पाहताच यात पोहण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. विकेंड डेस्टिनेशन म्हणून पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मांदियाळी असते.
● मंडप धबधबा :-
महाड शहरापासून फक्त १२ किमी अंतरावर असलेल्या मांडले गावाच्या हद्दीत हा धबधबा वसलेला आहे. रायगडापेक्षा उंच असलेल्या गुयरी डोंगराच्या पायथ्याला हा धबधबा आहे. दोन ओढे पार करून मांडले गावातून अर्ध्या तासात इथपर्यंत पोहचता येते. धबधब्याच्या झोताखाली भिजण्याचा आणि त्याच्या डोहात उड्या मारण्याचा आनंद नक्कीच आपण घेतला पाहिजे. पाण्याचा प्रवाह वाढला की हा धबधबा जणू आईसलँड मधील जगप्रसिद्ध धबधबा skogafoss waterfall याचं मिनी मॉडेल असल्याचा भास होतो.
● वाळणकोंड :-
महाड पासून २५ किलोमीटर अंतरावर वाळण गावाजवळ हे रांजणखळगे आहेत. कोंड म्हणजे नदीच्या पात्रातील कुंड, डोह. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे वाटेतील दगड कापले जातात. खडकांमध्ये खोल , अरुंद फट पडते आणि लहान मोठे खळगे तयार होतात , त्यांना रांजणखळगे असे म्हणतात. रायगडला विळखा घालणाऱ्या काळ नदीवर या खडकांमधे निर्माण झालेले रांजणखळगे निसर्गाच्या कलेचा एक उत्कृष्ट नमूनाच ! काठावर वरदायिनी देवीचे मंदिर आहे. नदीच्या प्रवाहाच्या प्रचंड वेगामुळे स्वयंभू शिळा वगळता इथले देवीचे संपूर्ण साहित्य पाऊस सुरू होण्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी हलवले जाते. मागेच शिवलिंगाच्या आकाराचा किल्ले लिंगाणा आजुबाजूच्या परिसरावर आपली नजर राखून खंबीरपने उभा आहे. इथून डोंगरात असलेली महाराजांची प्रतिमा नजरेस पडते.
● केंबुर्ली धबधबा :-
मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळील केंबुर्ली गावाजवळ असलेला हा धबधबा येणाजाणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. तीन टप्प्यात कोसळणारा हा धबधबा महामार्गाची शान वाढवत आहे. याचे जलप्रपात अंगी झेलण्यासाठी अनेक पर्यटन येथे गर्दी करतात.
● शिवथरघळ :-
महाडपासून तीस किमी अंतरावर असलेल्या, सर्व बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेल्या वाघजाई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे. चहूबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार झाडाझाडोऱ्याने झाकून टाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवथरघळ आहे. या घळीला समर्थ रामदास स्वामी ’सुंदर मठ’ म्हणत असत. इमारतीहून पुढे गेल्यावर सरळ जाणारा रस्ता थेट घळीपाशी घेऊन जातो. घळीमधे रामदासस्वामींची मूर्ती आहे. घळीच्या समोरच सुंदर धबधबा आहे. तो धीरगंभीर आवाज करीत धरतीवर कोसळत असतो.
● मोरझोत धबधबा :-
पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरून असंख्य धबधबे निर्माण होतात. अशा धबधब्यात भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र आकर्षणाचा मानबिंदू ठरतो तो उमरठ जवळील मोरझोत धबधबा! उमरठ जवळील चांदके व खोपड गावच्या मध्यभागी हा धबधबा जवळजवळ २०० ते २५० फुटावरुन कोसळतो. या कदेकपाऱ्यात निर्माण झालेली नैसर्गिक गुहा व आजूबाजूचा हिरवागार परिसर एका वेगळ्या विश्वात आपल्याला घेऊन जातो. उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे व शेलार मामांच्या समाधीला नतमस्तक होऊन नंतरच येथे येणारा प्रत्येक पर्यटक मोरझोतकडे जातो. वरुन एकसंध येणारा मोरझोतचा हा जलप्रवाह जमिनीवर पडताच मोर आपला पिसारा फुलवून थुई- थुई नाचत असल्याचा भास निर्माण करतो. या धबधब्यावर महाड - पोलादपूर तालुक्यासह मुंबई - पुणे येथील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. जसजसा पावसाचा जोर वाढतो तसतसा हा धबधबा आपला आकार वाढवतो. या धबधब्यापर्यंत गाडी जात असल्याने पर्यटक जास्त संख्येने येथे येत असतात. मोरझोत धबधब्याजवळ मोठे दगड तसेच तीव्र उतार असल्याने पर्यटकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
● घागरकोंड :-
पावसाळ्यात कोकणच्या निसर्गाला वेगळाच बहर आलेला असतो. धरतीनं हिरवा शालू पांघरलेला असतो. डोंगरदऱ्यातून वाहणारे धबधबे, धरणं सर्वानाच मोहून टाकतात. मुंबई- गोवा महामार्गावरील पोलादपूरपासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर वसलेल्या घागरकोंड या दुर्गम भागातील झुलता पूल आणि खोल दरीत कोसळणारा धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरला आहे. या ठिकाणी जाऊन पर्यटनाचा आनंद तुम्ही नक्की घेऊ शकता, हे तुम्हाला या फोटोवरून लक्षात आलंच असेल.
● मढे घाट धबधबा :-
नरवीर तानाजी मालुसरे यांचं पार्थिव सिंहगडावरून उमराठ या त्यांच्या गावी नेले होते. या घाटवाटेला मढे घाट म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्यातील केळद आणि महाड तालुक्यातील वाकी या गावांना हा घाटमार्ग जोडतो. महाड तालुक्यातील कर्णवडी गावातून दोन तासांची पायपीट करून आपण धबधब्यापाशी पोचतो. महाड ते कर्णवडी हे अंतर ३५ किमी आहे. केळद गावातून गाडी रस्ता थेट धबधब्यापाशी येतो. भर पावसात येथील टपरीवर वाफाळता चहा आणि गरमागरम मक्याच्या कणसाचा आस्वाद घेता येतो.
● कुडपन धबधबा :-
पावसाचा मनमाेहक आनंद लुटण्यासाठी निसर्गरम्य कुडपण टुरिझम पॉईंटला जरूर भेट द्यावी. कुडपणचे एक आश्चर्य म्हणजे भीमाची/ भीवाची काठी. भीवाची काठी म्हणजे "साधारण ४०० मी. उंचीचा आकाशात झेपावलेला एक सुळका!" त्याला स्थानिक नाव "भीमाची काठी" आहे पण खरं नाव आहे "भीवाची काठी"! कुडपणचा दुधाळ असा उंच धबधबा! हा धबधबा आणि भिवाची काठी मधली दरी म्हणजेच खेडच्या प्रसिद्ध जगबुडी नदीचा उगम. उंच डोंगर झरे, महाबळेश्वर घाट दर्शन, रायगड-रत्नागिरी-सातारा ह्या जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आणि मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या कुडपण ह्या गावाला पावसाळ्यात नक्कीच भेट द्यावी.
● कुंभे धबधबा :-
माणगाव तालुक्यातील कुंभे गावाच्या नदीवर हा धबधबा आहे. कुंभे घाटाने वर आलो असता, एका बोगद्यातून प्रवेश केल्यावर उंचावरून कोसळणाऱ्या जलप्रतताचा आवाज आपल्या कानात घुमू लागतो. समोरच असलेल्या पठारावरून या धबधब्याचा पूर्ण नजारा कॅमेऱ्यात कैद करता येतो.
● मोनल्याचा धबधबा :-
महाड-रायगड रोडवर कोंझरजवळ असणाऱ्या कोंडरान गावातून हा धबधबा बघताच क्षणी आपलं लक्ष वेधून घेतो. फारसा परिचित नसणारा आणि कुठूनही न दिसणारा दोन टप्प्यात कोसळणारा हा धबधबा आहे. दुतर्फा डोंगरांनी वेढलेल्या कोंढरान गावात पावसाचा आनंद लुटण्यासाठी इथे नक्कीच भेट द्यावी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा