स्वर्गसुखाचा अनुभव देणारी बोराट्याची नाळ
हरिश्चंद्राच्या नळी च्या वाटेच्या तुलनेत अरुंद, अवघड श्रेणीची, तीव्र उताराची असणारी, प्रत्येक ट्रेकरचा घामटा काढणारी, लिंगाण्याच्या शेजारील आणि सह्याद्रीच्या मुखावर आ करून बसलेली बोराट्याची नाळ. रायलिंग पठारावरून दुर्गदुर्गेश्वर रायगड आणि त्याचा पाठीराखा असलेला लिंगाणा एकत्र पाहण्यासाठी एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बोराट्याच्या नाळेची मोहीम आखली. नाळेची चढाई उतराई करण्यासाठी तोडीसतोड पार्टनर असलेला धिरज ला कॉल करून त्याला ट्रेकची कल्पना दिली. रविवारी सकाळीचं आम्ही महाड वरून मार्गस्थ झालो. एप्रिल महिना असून देखील हवेत गारवा जाणवत होता.
वाळण गावातून ८२० मी उंचीचा रायगड , ९०५ मी उंच लिंगाणा आणि रायलिंग पठार एकाच रेषेत दिसून येत होते. त्यांच्या मध्ये असलेल्या डोंगररांगेतील महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घेत, ३० किमी अंतर कापून पाने गावात दाखल झालो. सकाळचे ८.३० वाजले होते. गावकरी शेतीच्या कामात मग्न झाली होती. गावातून रायगडाचा टकमक टोक , सातविणीचा खळगा, माडाचा खळगा आणि भवानी टोक किल्ल्याची अभेद्यता दर्शवत होते. गावातील तुकाराम कानोजे यांच्या दुकानासमोर गाडी पार्क करून आम्ही रायलिंग ला जात असल्याची त्यांना कल्पना दिली.
पाने गावाच्या पुढे असलेल्या शेताच्या बांधांवरून उड्या ठोकत आम्ही नदीजवळ पोहचलो. नदीचं पात्र सुकं ठाक पडलेलं होतं. वाहून आलेले दगडधोंडे आणि विस्तार बघता पावसाळ्यातील नदीच्या प्रवाहाची जाणीव होते. हीच नदी पुढे जाऊन काळ नदीला मिळते. नदीच्या समोरील बाजूस अजस्त्र, अफाट, गगनात घुसलेला कडसरी लिंगाण्याचा सुळका मनात धडकी भरवत होता. लिंगाण्याला खेटूनच रायलिंग पठार, मध्यावर असलेली लिंगाणा माची दिसून येत होती. वाटेवर भेटलेल्या कडू आजोबांनी वाटेची माहिती त्यांच्या हातातील काठीनेच दर्शवली. त्यांची राणी नावाची कुत्री आमच्या अवतीभवती फिरू लागली. काही बिस्किटं दिल्यानंतर आमच्या मागेमागे येऊ लागली. आजोबांनी हाका मारून सुद्धा आमच्या मागे येतच राहिली. हळूहळू वाटेची चढण वाढत गेली. वाटेवर विजेचे खांब उन्मळून पडलेले दिसत होते. अर्ध्या तासाची चढाई करून माचीवर पोहचलो.
लिंगाणामाची हे ७ ते ८ घरांचं ओसाड पडलेलं गाव. सततची कोसळणारी दरड आणि गाडीरस्त्याचा अभाव यांमुळे कडसरी वाडीचे पाने गावाच्या शेजारीच पुर्नवसन झालेले आहे. सद्य:स्थितीत गावात कोणीच राहत नाही. होळीच्या दिवशी येथे गावकरी घर आणि जजनी देवीचं मंदिर साफ करून सण साजरा करतात. जननी मंदिराच्या उजवीकडील वाट लिंगाणा किल्ल्यावर जाते तर डावीकडील वाट बोराट्याच्या नाळीत. मंदिरात बसून थोडं पाणी पिऊन आम्ही नाळेची वाट धरली. ही वाट दाट जंगलातून जाणारी होती. काही ठिकाणी कुंपणावरून उडी मारत आम्ही चालत राहिलो. वाटेवर पुसटशी मार्किंग झाडावर दिसून येत होती. डोंगराच्या कडेकडेने, घसरड्या वाटेवरून, पायतळीचा पालापाचोळा तुडवत आम्ही नाळेच्या मुखाशी पोहचलो. पाण्याच्या प्रवाहामुळे ओढ्यातील मोठंमोठाले दगड घरंगळत येऊन निपचित पडलेले आहेत. त्यांच्यावरून उड्या मारत दगडांतील खाचेचा आधार घेत वर चढू लागलो. आमच्या मागोमाग राणी सुद्धा वर चढत होती. एव्हाना सूर्य खिंडीच्या वर आला होता. आमच्याकडे रोखून बघत, आग ओतत असल्याचाच भास होत होता. आमच्यावर होणार्या उन्हाच्या वर्षावामुळें आम्ही पुरते भिजून गेलो होतो. बॅगेतील पाण्याच्या बॉटल घटाघटा खाली होऊ लागल्या. काही पाणी आणि बिस्किटं राणी ला देत आम्ही चढाई चालूच ठेवली. राणीकडे बघून नाळेतील माकड गोंगाट भरत, ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारू लागली. नाळेच्या मागच्या बाजूस असलेल्या डोंगरात गायनाळ आणि निसणीच्या नाळेची खाच दिसून येत होती. तीव्र घसाऱ्याच्या, मुरमाड मातीवरून सोबतीला असलेल्या दाट कारवी आणि उंबराच्या झाडांचा आधार घेत तासाभरात खिंडीत पोहचलो.
खिंडीतून लिंगाण्याचा सुळका उभ्या भिंतीसारखा भासत होता. लिंगाणा चढाईच्या मार्गावर रोप लावलेला दिसून आला. सुळक्यावर जाण्यासाठी पुण्याहून लोक याच खिंडीत येऊन तळ ठोकतात. झाडांच्या सावलीमध्ये थोडी विश्रांती घेऊन, पाणी पीत वरच्या वाटेवर आलो. उन्हाचा तडाखा पुन्हा जाणवू लागला. लिंगाण्याच्या मध्यावर चढाई करणारे काही लोकं दिसून आली. चढणाऱ्या लोकांना हातानेच इशारा करत वाटेवर चालू लागलो. फक्त दोन फूट रुंद वाटेवरून ट्रॅव्हर्स मारत अजुन एका ओढ्याच्या नाळेशी पोहचलो. शेवटच्या बाजूस जपूनच चाल धरावी. आधारासाठी इथे काही बोल्ट लावलेले आहेत. ह्या भागातील चढाई अधिकच तीव्र आहे. शिवाय अरुंद, दमछाक करणारी आणि मोठमोठ्या दगडांवरून जाणारी ही वाट. काही कातळटप्पे सावधगिरीने चढत आम्ही राणी ला सुद्धा वर घेत होतो. खालच्या बाजूस इवलासा दिसणारा दापोली गाव आणि रायगडाच्या उंचीचा गुयरी डोंगर प्रखर उन्हातही लक्ष वेधून घेत होते. जसजसे वर चढत राहिलो तसतसे नाळ अरुंद होत गेली. मजलदरमजल करत खिंडीपासून तासाभरातच पठारावर दाखल झालो.
पठारावर पोहचताच पहिली नजर गेली ती गरुडाच्या घरट्याकडे (किल्ले तोरणा) नावाप्रमाणेच प्रचंड ! त्याला मागे टाकत रायलिंग कडे प्रस्थान केले.
उजवीकडील वाट मोहरी आणि सिंगापूर गावात जाते तर डावीकडील वाट रायलिंग पठारावर. सह्याद्रीच्या कुशीत विहार करणाऱ्या शार्क माश्याचा कल्ला असल्याचा भास आम्हाला लिंगाण्याकडे बघून झाला. लिंगाण्याचं वैभव पहावं तर ते इथुनच. पठाराच्या टोकाशी आल्यावर काही वेळ आम्ही स्तब्ध झालो होतो. समोरून येणारा गार कधी गरम वारा अंगी झेलत होतो. आमच्या नजरा खिळवून टाकल्या होत्या त्या रायगडावरील राजांच्या समाधी आणि जगदीश्वर मंदिराने. मी आजवर बऱ्याच ठिकाणाहून लिंगाणा बघितलाय पण रायलिंग वरून दिसणारा लिंगाणा मनात घर करून गेला. पठारावरून गुयरीचा डोंगर, अड्राईचा डोंगर, दुर्गाचा माळ, पोटल्याचा डोंगर, तवली डोंगर, कोकणदिवा, निसणीची नाळ व गायनाळ, फणशीची नाळ, सिंगापूर नाळ, दापोली गाव, पाने गाव हा सगळा परिसर दृष्टीक्षेपात येत होता.
दुपारचे दोन वाजले होते. फोटो काढण्यात आणि परिसर बघण्यात बराच वेळ वाया घालवला होता. आमच्याकडील पाणी पुर्णतः संपले होते. त्यामुळे सोबत आणलेली बिस्किटं सुद्धा घशाखाली उतरत नव्हती. राणी तर टक लावून जीभ बाहेर काढुन आमच्याकडे बघत होती. तिला सुद्धा तहान लागली होती. तितक्यात धिरज ला एका दगडाखाली दूध पिशवी नजरेस पडली. तिथेच पडलेल्या भांड्यांत ओतून राणीने अख्खी दूध पिशवी पिऊन रिकामी केली. घशाला कोरड पडल्यामुळे आम्ही भरभर पावलं टाकत नाळेच्या मुखाशी पोहचलो. त्याच भागांत एक आज्जी त्यांच्या मेंढ्या चरायला घेऊन आल्या होत्या. त्यांच्याकडे पाण्याची विचारपूस केली असता त्यांनी मोहरी गाव लांब असल्याचं सांगितलं. त्यात आमचा बराच वेळ खर्ची पडला असता. आमची हकीकत ऐकून त्यांनी त्यांच्या बॉटल मधील काही पाणी आम्हाला दिलं. त्यांचे शतशः आभार व्यक्त करत आम्ही नाळ उतरण्यास सुरवात केली.
उतराई करताना हीच नाळ भीषण, थरकाप उडवणारी वाटत होती. रॉकपॅच उतरून मी खाली आलो तेव्हा राणी ने पुन्हा वरच्या दिशेने धूम ठोकली. काही केल्या ती खाली येतच नव्हती. ट्रॅव्हर्स येई पर्यन्त आम्ही तिला उचलूनचं आणलं होत. पाऊण तासांत खिंडीत पोहचलो. तहानेने व्याकुळ झालो असल्यामुळे खिंडीत न थांबता माचीवर पोहचण्याचा निर्धार केला. कारवीतून मुरमाड जागी उतरताना अचानक काहीतरी घरंगळत आल्याचा आवाज झाला. मागे वळून पाहिले तर राणी त्यातून धावत येत होती. तिच्यासोबत बरीकमोठे दगड सुद्धा खाली येऊ लागले. त्यातला एक ईतभर दगड माझ्या डाव्या गुडघ्यावर आपटला. अख्खा पाय सुन्न पडला. थोडी विश्रांती घ्यावीच लागली. Pain Relief Sprey चा फवारा अख्या पायावर मारत, काठीचा आधार घेत दीड तासांत लिंगाणा माचीवर असलेल्या विहिरीजवळ पोहचलो.
विहिरीच्या शेजारीच असलेल्या काढणं घेऊन गारेगार, गोड पाणी पिऊ लागलो. पोटभर पाणी प्यायल्याने दोघांचेही चेहरे खुलुन आले होते. बॉटल भरून आम्ही पाने गावात आलो. संध्याकाळचे साडेपाच वाजून गेले होते. ही सर्व कहाणी कानोजे काकांना सांगितली. आमच्याकडे माचीवरल्या विहिरीतील पाणी आहे असं माहीत होताच त्यांनी बॉटल घेऊन त्यातील पाणी पिऊ लागले. कित्येक वर्षात ते माचीवर फिरकले नसल्याचं त्यांच्याकडून कळालं. त्यांचा निरोप घेत रायगडाला प्रणाम करत आम्ही सुद्धा घरचा रस्ता धरला. बोराट्याची नाळ ही रांगडी अन आपली क्षमता जोखायला लावणारीचं आहे. जीवन जगायला शिकवणारी, जिवंतपणी स्वर्गसुखाचा अनुभव देणारी अशी ही बोराट्याची नाळ. पठारावरून रायगड आणि लिंगाण्याचे जे काही रूप बघायला मिळाले त्यासाठी शब्दच कमी पडतील. समोरच अफाट , प्रचंड असा लिंगाणा आणि मागे निःशब्द पणे उभा असलेला रायगड. मन भरत नाही आणि नजर हटत नाही. सह्याद्रीच हे रौद्र रूप पाहताना , इथला भन्नाट वारा अंगी झेलताना मनामध्ये एक विचार आला आपण स्वर्ग नाही पहिला पण रायगडाचा पाठीराखा असलेला लिंगाणा इथून पहिला.....
● सूचना :-
१. लिंगाणामाची ते मोहरी गावादरम्यान कुठेच पाण्याची सोय नाही, त्यामुळे सोबत नेहमीपेक्षा जास्त पाणी बाळगावे.
२. खिंडीजवळ असलेल्या कारवीमध्ये bamboo pit viper जातीचे विषारी साप आहेत. झाडीत हात टाकताना खबरदारी बाळगावी.
३. रॉकपॅच उतरताना नवख्या लोकांनी सावधानता बाळगावी व शक्य असल्यास रोपचा वापर करावा.
४. लिंगाणामाचीवरील वाटेवर गावकऱ्यांनी कुंपण घातलेलं आहे. तर काही
वाटेचे मार्किंग खोडलेलं आहे. कदाचित वाटाड्या घेण्यासाठी गावकऱ्यांनी हे केलं असावं.
५. पावसाळ्यात ह्या नाळेने चढाई / उतराई करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नये.
६. एकट्याने ट्रेकला जाण्याचे धाडस करू नका. सुरक्षित भटकंती करा.
(३ एप्रिल २०१८ )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा