सोनकीच्या फुलांचा किल्ला - कोरीगड
श्रावण महिना संपल्यानंतर निसर्गात विविध रंगछटा आपल्याला पाहायला मिळतात. हिरव्यागार गवताने अच्छादून गेलेल्या डोंगररांगा, त्यातूनच ओसंडून वाहणारे जलप्रपात, ढगांआडून चालणारा ऊन सावल्यांचा खेळ, सोनकी-तेरडा-कुर्डु-विंचवी यांसारख्या रानफुलांनी बहारलेली पठारे अश्या आल्हाददायक वातावरणात भटकंती करताना एक वेगळाच उत्साह अंगी असतो. २७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो, पण त्या दिवशी सुट्टी नसल्याने वाईट वाटू न घेता येणाऱ्या रविवारी आम्ही मुळशी खोऱ्यातील कोरबारस मावळातील कोरीगड आणि तैलबैला किल्यांची भटकंती करण्याची मोहीम आखली. पुण्याहून नितीन आणि दिनेश थेट पेठ शहापूर या कोरीगड किल्ल्याच्या पायथ्याशी भेटणार होते, तर महाड वरून मेहुल आणि मी ताम्हिणी घाटाचा प्रवास करून कोरीगड गाठणार होतो.
गडाचा इतिहास :-
१ ) इ.स .१४८२ मध्ये महमदशहा बहमनी (बहमनी साम्राज्याचा प्रमुख) वारल्याने त्याच्या मृत्युपत्रात त्याने मलिक नायब (मुळ नाव मलिक हसन व नायब हि त्याची पदवी) बहमनी राज्याचा विश्वस्त याला आपल्या मुलाचा म्हणजे सुलतान महमुद याचा मुख्य वजीर केला. पुढे मलिक नायब याने आपला मुलगा अहमद याला जहागिरी लावण्याची जबाबदारी दिली. त्याची दौलताबादहुन जुन्नरकडे रवानगी केली. त्याने इ. स. १४८२-८३ च्या मोहिमेत शिवनेरी, चावंड, लोहगड, तुंग, हे किल्ले जिंकले आणि त्याने त्याचा मोर्चा कोआर (कोरीगड) येथे वळविला . इ.स. १४९० मध्ये अहमदने बहमनी सुलतानाचा अंमल झुगारुन स्वतंत्र निजामशाहीची स्थापना केली. तेव्हा कोरीगड निजामशाहीत आला. पुढे इ.स .१६३६ पर्यत १४६ वर्ष हा किल्ला निजामशाहीत होता.
२ ) इ.स. १६३६ दिल्लीचा बादशहा शहाजहान व विजापुरचा मुहम्मद आदिलशहा यांनी निजामशाही काबीज केली व निजामशाहीचा मुलुख बाटुन घेतला त्यावेळी कोरीगड हा आदिलशाहीच्या ताब्यात आला.
३ ) निजामशाहीत कोरीगडाच्या मुलखाला पौड मावळ किंवा कोरबारसे हे नाव होते. त्यावेळी ढमाले हे देशमुख होते. निजामशाही बुडाल्यानंतर आदिलशाही सत्ता आली तरी तेथील देशमुखी तसेच कोरीगड व घनगड हे किल्ले ढमाले देशमुख यांच्याकडेच होते.
४ ) इ.स. १६४७ मध्ये छत्रपती शिवरायांनी कोरीगड स्वराज्यात आणण्यासाठी दादोजी कोंडदेव यांना मावळात पाठविले. दादोजींनी ढमाले देशमुखांशी लढून अथवा मुसद्देगीरीने किल्ला स्वराज्यात दाखल केला.
५ ) इ.स. १६६५ मधील मोगल सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्या सोबत झालेल्या पुरंदरच्या तहात तेवीस किल्ले मोगलांना देण्यात आले व जे १२ किल्ले स्वराज्यात होते त्यात कुवारी (कोरीगड) हा स्वराज्यात होता.
६ ) इ.स .१६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराज याच्या निधनानंतर मोगलानी मराठ्यांचे बहुतांश किल्ले घेतले त्यात कोरीगडही मोगलांच्या ताब्यात गेला असावा. जेधे शकावली मध्ये "हे वर्षी कुल गड मोगले घेतले" असा उल्लेख आहे.
७ ) औरंगजेबाने कोरीगड घेण्याचा हुकुम जुन्नरचा किल्लेदार व फौजदार मन्सुरखान (अलीबेग) याला केला. अलीबेग ने आपला मुलगा मुहम्मद काझिम याला ही जबाबदारी दिली. मुहम्मद काजिम जुन्नर मार्गे कोरीगडाच्या पायथ्यास येउन बसला. त्याने किल्ल्याकड़े जाणाऱ्या मुख्य वाटांवर चौक्या बसविल्या. पण मराठ्यांचा चोर वाटां मार्गे राबता चालूच राहिला. दिवसभर पहारे देऊन थकलेल्या मोगली छावणीवर, रात्री मराठे छापे टाकित आणि शत्रुंस कापून काढीत. मोगली सैनिक अनेक वेळेस गड चढून दरवाज्यापाशी येत, पण मराठ्यांच्या बाणांना, गोफणीच्या दगडाना, आणि बंदुकीच्या गोल्यानां ते बळी पडत. असे अनेक दिवस सुरु राहिले त्यामुळे काजिम पार चिंतेत पडला. काझिमने लष्करी अधिकारी रायाजी बाहुलकर यांच्या मदतीने किल्लेदार सोनाजी फर्जत याला फितुर करुन किल्याला माळा (वेळीच्या फांदीला विशिष्ट ठिकाणी गाठ मारून पाय अडकबुन वर चढण्यासाठी केलेली दोर) लावुन मोगल सैन्य किल्यात शिरले, किल्यात घनघोर युद्ध झाले. गिरजोजी निंबाळकर व दिनकरराव यांना वीरमरण आले. शेवटी १२ नोव्हेंबर १६९५ रोजी किल्यावर मोगलांचे निशाण चढले.
८ ) शंकराजी नारायण सचिव यांच्या आज्ञेवरुन नावाजी बलकवडे यांनी कोरीगड परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. (वर्ष इ.स. १७०० पुर्वी असावे कारण १७०० मध्ये नावजी बलकवडे यांचे निधन झाले होते.)
९ ) इ.स .१७१३ मध्ये छत्रपती शाहु महाराजांच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वार असलेला कोरीगड सरखेल कान्होजी आंग्रे यांनी घेतला. २८ फेब्रुवारी १७१४ मध्ये कान्होजी आंग्रे यांनी शाहु महाराजांचे मांडलिकत्व पत्करले व झालेल्या तहानुसार कोरीगड शाहु महाराजांच्या ताब्यात गेला.
१०) पेशवाईच्या अस्तापर्यत पौड मावळवर सरदार रास्ते यांचा अमल होता त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंडही केले त्यावेळी कोरीगड इंग्रजांनी ताब्यात घेतला पण रास्ते यांनी पेशव्यांशी बोलणी करून परत कोरीगड आपल्या ताब्यात घेतला.
११) इ.स .१८१८ मध्ये लेफ्टनंट कर्नल प्रॉथरने लोहगड, विसापुर, राजमाची, तुंग व तिकोणा हे किल्ले आपल्या ताब्यात घेतल्यावर त्याने आपला मोर्चा कोरीगडकडे वळविला. इंग्रजाना कोरीगड जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले शेवटी १७ मार्च १८१८ रोजी इंग्रजांनी कोरीगड आपल्या ताब्यात घेतला.
गडावर पोहचण्याच्या वाटा :-
पेठ-शहापूर :- कोरीगडला जाण्यासाठी मुंबई किंवा पुणेकरांनी प्रथम लोणावळ्याला यावे. येथून आय. एन. एस. शिवाजीमार्गे आंबवणे किंवा भांबुर्डेला जाणारी बस पकडावी किंवा सहारा प्रकल्पाकडे जाणारी बस पकडावी आणि आय.एन.एस. शिवाजीच्या पुढे २२ कि.मी वरील पेठ-शहापूर गावात उतरावे. या गावातून सरळ गडावर जाणारी मळलेली पायवाट आपल्याला पायऱ्यांशी घेऊन जाते. पायऱ्यांच्या साहाय्याने साधारण वीस मिनिटांत गडावर पोहचता येते.
आंबवणे गाव :- कोरीगडला आंबवणे गावातूनही जाता येते. ही वाट थोडी अवघड श्रेणीची आणि मळलेली सुद्धा नाही. या वाटेने जाण्यासाठी लोणावळ्याहून भांबुर्डेकडे अथवा थेट आंबवणेकडे जाणारी बस पकडावी. गावातून पाऊण तासात गडावर जाता येते.
भल्या पहाटेच तांबडं फुटायच्या आत आम्ही महाड वरून माणगाव-विळे असा प्रवास करत ताम्हिणी घाटातून वर आलो. रविवारचा दिवस असूनसुद्धा रस्त्यावर गाड्यांची रेलचेल दिसत नव्हती. निवे फाट्यावरून वळसा घेत कुंडलिका व्हॅली व्हिवं पॉईंट जवळ पोहचलो. पावसाळा संपल्यानंतर खूपच कमी पर्यटक इथे फिरकत असावेत. कारण पावसाळ्यामध्ये धुक्यात आणि धबधब्यात न्हाउन निघालेला प्लस व्हॅली आणि कुंडलिका व्हॅलीचा नजारा अगदी मन थक्क करणारा असतो. काही फोटोस काढून आम्ही घनगड, एकोले व्हॅली, मुळाशी जलाशय, तैलबैल्याच्या कातळभिंती रस्त्यावरून बघत ११० किमी चा प्रवास करून पेठ शहापूर गावात पोहचलो. आंबवणे गावाजवळून येताना समुद्रसपाटीपासून ९३० मी उंच असेलाला कोरीगड एखाद्या धरणाच्या भिंतीसारखाचं भासत होता. दोन्ही टोकांना वर आलेले बुरुज तर रोहिड्या किल्ल्याची आठवण करून देत होते. नितीन आणि दिनेश अर्धातास आधीच पोहचून आमची वाट पाहत होते. आम्हाला उशीर झाल्याने त्यांची बोलणी ऐकत गडाची वाट धरली.
बैलगाडी रस्त्याने चालत आम्ही दाट जंगलाच्या वाटेवरून, रान भेंडीच्या काटेरी पानांपासून स्वतःला वाचवत पायऱ्यांजवळ येऊन ठाकलो. इथेच सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने किल्याचा इतिहास सांगणारा फलक लावलेला आहे. पायऱ्यांवर चढत मध्यवर्ती भागात एक कातळात कोरीव दोन खांबांवर उभी असणारी गुहा नजरेस पडते. गुहेच्या शेजारीच गणेशमूर्तीची ची स्थापना करून त्यावर छोटेखानी मंदिर उभारलेला आहे. ह्या गुहा मध्ययुगीन काळात कोरल्या असाव्या. त्यानंतर त्यांचा वापर पहारेकर्यांच्या चौक्या किंवा मेठ म्हणून केला गेला. थोडं पुढे गेलो असता कातळात कोरलेलं पाण्याचं टाक आहे. इथलं गारेगार पाणी पिऊन २० मिनिटांतच आम्ही गणेश दरवाजापाशी पोहचलो. डावीकडील उंच भिंत हल्लीच बांधून त्याची डागडुजी केलेली दिसते. वाटेत असलेल्या गणेश मंदिरामुळे ह्या दरवाजाचं नाव गणेश दरवाजा ठेवले असावे. दाराच्या वरच्या बाजूस कमळपुष्प कोरलेली आढळतात. सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेमार्फत हल्लीच लाकडी दरवाजा बसवलेला आहे. त्यांच्या या संवर्धन कार्याला मानाचा मुजरा करत आम्ही आतल्या बाजूस आलो. पहारेकऱ्यांच्या देवट्या दोन्ही बाजूंस येथे दिसून येतात. शिवाय डागडुजीची कामे चालू असल्याचे आढळते. देवट्यांच्या पुढे काटकोनात ही वाट वळून किल्ल्यात आपला प्रवेश होतो. कधीकाळी येथे आणखी एक दरवाजा असावा. किल्ल्याचा एवढा सपाट माथा रानफुलांनी बहरलेला बघून जणू आम्ही कास पठारावरचं आलोय असा भास झाला. चौफेर नजर मारली असता सोनकी, विंचवी आणि तेरड्याची फुले वाऱ्याच्या तालावर डोलत होती. डाव्या बाजूस एक भक्कम बांधणीचा बुरुज आजही दिमाखात उभा आहे. ह्या बुरुजावरून दरवाजासमोरील भाग आणि गडाची वाट अगदी बाणांच्या माऱ्यात आहे. तटबंदीमध्ये असलेल्या पायऱ्या चढून आम्ही वरच्या बाजूस आलो. ह्याच तटबंदीवरुन गडफेरी पूर्ण करता येऊ शकते.
दक्षिण बाजूस चालत आम्ही बुरुजापाशी पोहचलो. बुरुजावरून आंबे व्हॅली चा संपूर्ण परिसर आणि runway दृष्टीक्षेपात येतो. साधारण २००० साली आधुनिक शहर उभे करावे असे श्री. सुब्रतो राय यांच्या मनात आले आणि लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरापासून जवळ सहारा ग्रुपने आंबे व्हॅली शहर वसविले. खाली दिसणारे कारंजे, बंगले, जलतरण तलाव, पाण्याचे मोठे तलाव अतिशय विहंगम दिसतात. सहारा सिटीने गडावर खालून मोठे लाईट सोडले होते, गडावर शौचकुप उभारला होता, येणार्या पर्यटकांसाठी वॉच टॉवर उभारले होते. पण कंपनीविरुध्द गडावर अतिक्रमणाची तक्रार जाताचं हे सर्व काढून घेतले गेले. त्याच्या खुणा आजही ह्या बुरुजांपाशी पाहायला मिळतात. बुरुजांवरून दिसणारा आंबवणे दरवाजा आणि त्याची चिलखती तटबंदी आपल्याला लोहगडाची आठवण करून देते. ह्या वाटेवर बरीच पडझड झालेली असली तरी किल्ल्याच्या दरवाजावरील कमळ पुष्प लक्ष वेधुन घेतात. बुरुजाच्या पुढे एक तोफ ठेवलेली आहे. त्याखालीच एक पाणी टाके सुद्धा दिसून येते. याच वाटेने चालत आपण कोराई देवीच्या मंदिरापाशी येऊन पोहचतो. किल्ल्यावर ऊन आणि पावसापासून बचावासाठी गडावरील एकमात्र ठिकाण. मंदिराच्या प्रांगणात एक तुळशी रुंदावन, एक दीपमाळ आणि महिषासुरमर्दिनीची मूर्ती दिसून येते. जीर्णोद्धारीत मंदिरात प्रवेश करून आम्ही देवीच्या गाभाऱ्यात पोहचलो. एक उत्तर भारतीय इसम ह्या मंदिराचा पुजारी आहे. गावातून रोज देवीची पूजा करण्यासाठी तो गडावर येतो. इंग्रजांच्या हाती हा गड आल्यावर त्यांनी गडावर मिळालेले कोराई देवीचे दागिने मुंबईतील मुंबादेवीला अर्पण केल्याचे बोलले जाते. देवीच्या नावावरून गडास कोरीगड हे नाव पडले. याशिवाय गडास कुवारीगड, कोराईगड, कोआरी, कुंवारी, कोटीगड अशी नावे सुद्धा आहेत.
मंदिराच्या मागच्या बाजूस गडावरील सर्वात मोठी लक्ष्मी तोफ आहे. पिकनिकसाठी आलेल्या मंडळींकडून तोफांवर बसने, त्यांना हलवून पाहणे असे प्रकार आजही पाहायला मिळतात. इतिहासाची माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून अक्षम्य अशा चुका होतात. गड-किल्ल्यांचे पावित्र्यही जपलं जात नाही हे मात्र दिसून येतं. किल्ल्याच्या मध्यवर्ती भागांत बरेच बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात. याचं भागात एक हनुमान मंदिर आणि कातळात कोरीव पाण्याचे टाके आहे. मंदिराच्या समोरच गडावरील सर्वात मोठा पाण्याचा तलाव आहे. तलावाची भिंत सुद्धा आपलं लक्ष वेधून घेते. तलावांच्या पुढे उत्तरेच्या बाजूला काही गुहा आहेत. यातील एका गुहेत खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथेच शंख-चक्र-गदा-पद्मधारी श्री विष्णूची मूर्ती आहे. गडाच्या तटबंदीची हल्लीच डागडुजी केलेली दिसून येते. तलावाच्या समोरच्या बाजूस आपण पुन्हा गणेश दरवाजापाशी पोहचतो. दरवाजासमोर महादेव मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात चकांवर ४ तोफा ठेवलेल्या आढळतात.
गडाच्या उत्तर बाजूस तटबंदीवरुन चालत आम्ही झेंडा बुरुजावर पोहचलो. गडावरील हा सर्वात उंच बुरुज आहे. किल्ल्याचा संपूर्ण परिसर येथून नजरेस पडतो. पेठ शहापूर गावातून येणारी पायवाट आणि लोणावळ्याचा बराचसा परिसर न्याहाळता येतो. संपूर्ण गड पाहण्यासाठी तासभर वेळ पुरेसा आहे. चढाई आणि उतराई करून संपूर्ण ट्रेक अडीच तासांत पूर्ण करता येईल. निरभ्र आकाशात गडावरून नागफणीचे टोक, तुंग, तिकोना, मोरगिरी, मृगगड, अनघाई, तोरणा, राजमाची चे बालेकिल्ले, ढाकचा बहिरी, माथेरान, प्रबळगड, कर्नाळा, मिरगड, सरसगड, माणिकगड आणि मुळशीचा जलाशय असा सर्व परिसर दिसतो. कोरीगड किल्ल्याजवळून कोकणात अनघाई घाट, कुरवंड्या घाट, आंबेनळी घाट, बोरघाट, सव घाट, भैरीची वाट, गवळणीची वाट, काठीची वाट, कोराई घाट आणि वाघजाई अश्या घाटवाटा उतरतात. घाटमाथा आणि कोकण अश्या दोन्हीबाजूस देखरेखीसाठी या गडाचा वापर केला गेला. ह्या गडाचा पुरेपूर आनंद लुटण्यासाठी वर्षाऋतुत गडाला भेट नक्कीच द्यावी. सोनकीनी बहरलेल्या फुलांचा मनमुराद आनंद डोळ्यात आणि कॅमेरात कैद करत आम्ही तैलबैला च्या मार्गी लागलो.
महत्वाच्या सूचना :-
१) गडावर महादेव मंदिराच्या समोरील टपरित दिवसा नाष्ट्याची सोय होऊ शकते. राहण्यासाठी कोराई मंदिराचा वापर करता येईल. पण आधी गावकऱ्यांची परवानगी घ्यावी.
२) स्वतःचे वाहन असल्यास कोरीगड किल्ल्यासोबतचं तैलबैला, घनगड, मोरगिरी, तुंग, तिकोना यांपैकी एक अशे दोन किल्ले एकाच दिवशी करता येऊ शकतात. शिवाय लोणावळामधील टुरिस्ट पॉईंट आणि कोरीगड असा प्लॅन ही करता येईल.
३) वाटेत चढताना गणेश मंदिराजवळ पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. फेब्रुवारी नंतर गडावर पाण्याची कमकरता भासते. नेहमी सोबत आपली पाणी बॉटल बाळगलेली केव्हाही उत्तमचं.
४) पेठ शहापूर गावात भरमसाट पैसे देऊन, चव नसलेले जेवण करण्यापेक्षा आपला जेवणाचा डबा आपण घरूनच आणावा.
५) निसर्गात फिरताना कुठेही कचरा करू नये. ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य राखावे. गडावर कोणतेही व्यसन करू नये. वन्य प्राण्यांना खाद्यपदार्थ देऊ नये, कायद्यानेदेखील गुन्हा आहे.
संदर्भ ग्रंथ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटियर
२) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
३) साद सह्याद्रीची! भटकंती किल्ल्यांची !! - प्र.के. घाणेकर
किल्ले तैलबैला :-
https://royalbhatka.blogspot.com/2020/07/blog-post_28.html
किल्ले तैलबैला :-
https://royalbhatka.blogspot.com/2020/07/blog-post_28.html
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा