कातळभिंती तैलबैल्याच्या !


सह्याद्री हा ज्वालामुखीचा उद्रेक. उन, वारा, पावसाने झीज होऊन अतिप्रचंड, अतिराकट, अतिदणकट, काळाकभिन्न अश्या वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाल्या. अतिप्रचंड शिखरे, उंचच उंच सरळ सुळके, भयाण घळी, दाट दाट झाडी, खोल खोल दऱ्या, भयंकर तुटलेले ताठ कडे, भयाण कपाऱ्या, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, आधारशून्य घसरडे उतार, लांबच लांब सोंडा, दुभेद्य चढाव आणि मृत्यूच्या जबड्यासारख्या गुहा. त्यापैकी एक रचना म्हणजे तैलबैल्याच्या प्रस्तर भिंती. समुद्रसपाटीपासून १०३० मी उंचीच्या तैलबैला उर्फ कावडीचा डोंगर उर्फ भैरवनाथाचा डोंगर त्याच्या सरळसोट कड्यामुळे अगदी खोपोली, नागोठणे, पाली, माणगाव या भागातूनही आपलं लक्ष वेधून घेतो. पुणे शहरापासून ९० किमी वर असलेल्या कोरबारसे मावळातील हा किल्ला. किल्ल्याचे ठिकाण, अवशेष आणि आकार पाहता याला टेहळणीची जागा किंवा संरक्षक वसाहत हेच नाव त्यास उत्तम. प्राचीन काळापासून घाटमाथ्यावरून कोकणात उतरणाऱ्या वाघजाई, चीवर दांड, साव घाट, बोरघाट, कुरवंड्या घाट, घोडजीनाची वाट/तिवईची वाट, भोरप्याची नाळ, नाणदांड घाट, डेऱ्या घाट यासारख्या वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी तैलबैला चा वापर केला गेला. यासोबतच घाटमाथ्यावर तैलबैला, कोरीगड, घनगड, कैलासगड तर कोकणात सुधागड, अनघाई, सरसगड आणि मृगगड अश्या दुर्गसाखळीतून घाटवाटांवर पहारे ठेवण्यात आल्याचे दिसून येते. पूर्वापार गावामध्ये बैलांचा तळ पडायचा. येथून कोकणात बऱ्याच घाटवाटा उतरतात. गावालगत असलेल्या सपाटीमुळे देशावरून आलेल्या माल वाहतुकीच्या बैलगाड्या इथे लावल्या जात. त्यामुळे गावाला बैलतळ हे नाव पडले. त्याचा अपभ्रंश होऊन तळबैला किंवा तैलबैला झाले असावे. कातळभिंतींच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे. पण आपल्यासारख्या भटक्यांना भिंतीच्या तळाशी असलेल्या खिंडीतील भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत जाता येते.


● पोहचण्याच्या वाटा :- 

१) तैलबैला गावात पोहोचण्यासाठी प्रथम मुंबई किंवा पुणे येथून लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भांबुर्डे कडे जाणारी एस. टी. पकडावी. पेठशहापूर (कोरीगडाच्या पायथ्याचे गाव) येथून तैलबैलाचा फाटा अंदाजे ८.५ किमी अंतरावर आहे. मुख्य रस्त्यावरून उजव्या बाजूला वळणार्‍या रस्त्यावर तैलबैला उर्फ भैरवनाथाचा डोंगर असा फलक लावलेला आहे. फाट्यापासून तैलबैला हे गाव साधारण ३ किमी अंतरावर आहे. लोणावळा बस स्थानकातून संध्याकाळी तैलबैला गावासाठी थेट बस सुटते. ती बस रात्री तैलबैला गावात थांबून सकाळी परत जाते.

२) पुण्याहून पौड-ताम्हिणी-निवे फाटा-भांबुर्डे-तैलबैला असा ९० किमी चा प्रवास करून सुद्धा पोहचता येते. या मार्गावर रहदारी जास्त नसल्याने खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. तसेच येताना कुंडलिका व्हॅलीचा नजारा अनुभवता येतो. 

३) कोकणातील पाली-धोंडसे-ठाणाळे लेणी-वाघजाई घाट-तैलबैला असा पाच-सहा तासांचा ट्रेक करून तैलबैला गाठता येते. 





कोरीगड किल्ल्याची मनसोक्त भटकंती करून सालतर खिंड ओलांडून आम्ही तैलबैला गावी पोहचलो. रस्त्याने जातानाचं लांबसडक पठारावर  स्लाईस केकच्या तुकड्यासारख्या कापून ठेवलेल्या अद्भुत व अफाट भिंती आपल्याला अचंबित करतात. सह्याद्रीत अश्या जुळ्या आणि एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या भिंती कुठेचं नसाव्यात. गावाच्या पुढे आलेल्या रस्त्यावर गाड्या पार्क करून शेताच्या बांधांवरून आणि डोंगराच्या उजवीकडील धारेवरून जाणाऱ्या वाटेने अर्ध्यातासातच आम्ही कातळभिंतींजवळ पोहचलो. समोरचं असलेल्या पाच फूट उंच दगडाजवल एक झेंड्याचा खांब उभारलेला दिसतो. मागच्या बाजूस सालतरचा डोंगर आणि खिंड नजरेस पडत होती. खालच्या बाजूस गुच्छात वसलेल्या तैलबैला गावाचा परिसर न्याहाळता येतो. समोरच्या बाजूस घनगड किल्ला आणि त्याला खेटूनच असलेला मारथाणा डोंगररांग दृष्टीक्षेपात येते. 




तैलबैला भिंतींच्या शेजारून दोन ते तीन फूट रुंद वाटेने आम्ही खिंडीतील भैरवनाथ मंदिरात पोहचलो. येथे असलेल्या गुहेत ग्रामस्थांनी मंदिर उभारलं आहे. उजव्या बाजूस बारमाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. याच भैरवनाथाच्या मंदिरात काही शेंदूर लावलेले दगड, त्रिशूळ आणि शंख ठेवलेले दिसून येतात. गुहेत ४ ते ५ लोकांची राहण्याची सोय होऊ शकते. या गुहेवरून पुढे चालत गेल्यावर कातळावर ३ गिरीदेवातांच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात. त्यापुढे दुसरी गुहा आहे. गुहेच्या पुढे स्वछ व पिण्यायोग्य असे पाण्याचे खांब टाके आहे. ह्या टाक्यांच्या पुढे अजून एक टाके आहे. खिंडीतून कोकणातील पाली शहरात दिमाखात उभा असलेला सरसगड किल्ला लक्ष वेधून घेतो. ह्याच खिंडीतून कधीकाळी कोरीव पायऱ्यांची वाट तैलबैलाच्या माथ्यावर जात होती. पण आता मात्र ती अस्तित्वात नाही. माथा गाठण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राचा माहितगार सोबत असावा. आजच्या दिवसातील कोरीगड आणि तैलबैला किल्यांची भटकंती करून आम्ही ताम्हिणी घाटातील सनसेट पॉईंट वर पोहचलो. येथून दिसणारा पॅनोरॅमिक व्हीव आम्हाला अचंबित करून टाकत होता. कोरीगड, मारथाणा डोंगर, घनगड, सालतर डोंगर, तैलबैला, सुधागड, सरसगड, अवचितगडाची डोंगररांग, सागरगडाची डोंगररांग, सुरगड, तळगड आणि खालच्या बाजूस असलेलं विळे भागाड गाव असा सगळा परिसर दिसून येत होता. 


● महत्वाच्या सूचना :- 

१) कातळभिंतींच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राचा माहितगार सोबत असणे आवश्यक आहे.

२) तैलबैला गावात गावकऱ्यांची परवानगी घेऊन हनुमान मंदिरात राहायची सोय होऊ शकते. गावातील घरांमध्ये जेवणाची सोय उपलब्ध आहे पण त्याची कल्पना त्यांना आधीचं द्यावी. वाढत्या पर्यटकांमुळे तैलबैला गावात भरमसाठ पैसे देऊन जेवण करण्यापेक्षा आपला जेवणाचा डबा आपण घरूनच आणावा. 

३) स्वतःचे वाहन असल्यास तैलबैला किल्ल्यासोबतचं कोरीगड, घनगड, कैलासगड, कुंडलिका व्हॅली, अंधारबन यांपैकी एक अशी दोन ठिकाणे एकाच दिवशी करता येऊ शकतात. 

४) खिंडीतील भैरवनाथाच्या मंदिरात बारमाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. पण नेहमी सोबत आपली पाणी बॉटल बाळगलेली केव्हाही उत्तमचं. 

५) साधारणतः दोन तासांत तैलबैला पाहून होतो. याशिवाय वाघजाई घाटाने उतरून ठाणाळे लेणी सुद्धा पाहता येऊ शकते.

६) निसर्गात फिरताना कुठेही कचरा करू नये. ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य राखावे. गडावर कोणतेही व्यसन करू नये. वन्य प्राण्यांना खाद्यपदार्थ देऊ नये, कायद्यानेदेखील गुन्हा आहे. 


● संदर्भ ग्रंथ :- 

१)  पुणे जिल्हा गॅझेटियर 

२)  डोंगरयात्रा - आनंद पाळंदे

३) साद सह्याद्रीची! भटकंती किल्ल्यांची !! - प्र.के. घाणेकर

४) महाराष्ट्र दर्शन - गो. नी. दांडेकर  

५) भटकंती घटवाटांची - डॉ. प्रीती पटेल  

किल्ले कोरीगड :- 

( सप्टेंबर २०१८ )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ