बडदेमाच आणि निवाची वाट
सातवाहन काळापासून कोकणातील बंदरांवर उतरलेल्या व्यापारी मालाची वाहतूक घाटवाटांमार्फत पैठण सारख्या शहरात होऊ लागली. याच घाटवाटांवर व्यापाऱ्यांच्या सोईसाठी पाण्याची टाकी , विहरी आणि लेण्यांची सोय झाली. काही वाटा अगदीच प्राथमिक होत्या तर काही वाटा खास बांधून काढलेल्या. व्यापारी वाटांसोबतच गावकऱ्यांच्या नेहमीच्या वापरातील गावांना जोडणाऱ्या वाटा प्रचलित होऊ लागल्या. सह्याद्रीतील अश्याच कुंभे आणि बडदेमाच या गावांना जोडणाऱ्या वाटेचा मागोवा आम्ही घेतला.
३ जून रोजी आलेल्या ‘निसर्ग’ वादळामुळे अनेक गावेच्या गावे विस्कटून गेली. वीजपुरवठा पुरता कोलमडून गेला. त्यातच आधीच दुर्गम असलेल्या भागातली संपर्कयंत्रणाही पार निकामी झाली. सह्याद्रीतील अश्याच दुर्गम आणि अतिदुर्गम भागात वसलेल्या बदडेमाच गावात तातडीने मदत पोहचवण्याचा निर्णय अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने घेतला. गूगल मॅपवरही शोधून न सापडणाऱ्या या गावात महासंघा मार्फत आलेली मदत पोहचविण्याची धुरा डॉ. राहुल वारंगे आणि सह्याद्रीमित्र संस्थेने त्यांच्या हाती घेतली. महाड वरून सकाळीच आम्ही ३०० किलो धान्याचा साठा घेऊन माणगाव - निजामपूर - कडापे असा प्रवास करत टिटवे गावात दाखल झालो. बडदेमाच गावात जाणारा मातीरस्ता खचल्याने गाड्या रस्त्यावरच पार्क करत आम्ही चढाई सुरू केली. प्रत्येकाच्या पाठीवर १० ते १५ किलो सामानाची बॅग होती. गावातील लोकांशी संपर्क केल्याने काही गावकरी आमच्या मदतीस आले होते. वाटेवर चढाई करताना मागच्या बाजूस धुक्यातून डोकं वर काढणारा कुर्डुगड आणि पायथ्याचे जिते गाव आमचं लक्ष वेधून घेत होते. गवतांवर उडणारा मोठा चांदवा (Great eggfly) फुलपाखराचे फोटो काढत आणि दमछाकामुळे पाण्याने घसा ओला करत चढू लागलो. पाउण तासांत मजल-दरमजल करत आम्ही बडदेमाच गावात पोहचलो. बडदेमाच गावापर्यंत गाडीरस्ता अजून झालेला नाही.
सह्याद्रिच्या डोंगररांगेतील पदरावर वसलेलं १५ घरांचं हे गाव. गावात सगळ्यांचीच आडनावे बडदे आहेत म्हणून या गावाला बडदेमाच नाव पडले. गावात पोहचताच गावकऱ्यांनी आमचे स्वागतच केले. गावकऱ्यांना जमा करून सोबत आणलेल्या सामानाचे वाटप केले. गावाला खेटूनच उभा असलेला धुक्यात विलीन झालेला कडा आमच्या नजरा खिळवून टाकत होता. क्लाइंबिंग क्षेत्रातील अवलिया भूषण आम्हाला कड्यावरील लुस बोल्डर, जेंडाराम (Gendarme) आणि सुळक्यांची माहिती सांगू लागला. गावात विचारपूस केली असता त्यांनी कुंभे गावात जाणाऱ्या वाटेबद्दल माहिती दिली. ह्याच वाटेवरून वळसा मारून ह्या कड्याच्या वरच्या बाजूस पोहचता येते. गावकरी ह्या समोरच्या कड्याला चांदा कडा किंवा निवाचा कडा तर उजवीकडील उंच डोंगराला धामणदरा म्हणून संबोधतात. महाड वरून आमच्या सोबत आलेले काही जण माघारी फिरले. आमच्या गाडीतील मंडळींनी निवाच्या वाटेचा मागोवा घेण्याचे ठरविले. गावातील एक वाटाड्या आम्हाला वाटेच्या सुरवातीपर्यंत सोडण्यास तयार झाला.
जिते - टिटवे - बडदेमाच - कुंभेवाडी या गावांना जोडणारी ही निवाची वाट. बदडेमाच हे गाव कुंभलमाच , बोरमाच आणि केळगण ह्या गावांना पदारावरील पायवाटेने जोडलेले आहे. गावाच्या पुढे वाटेच्या उजव्या बाजूस एका नैसर्गिक पाण्याच्या झऱ्यावर विहीर बांधलेली आहे. मार्च ते एप्रिल पर्यंत या विहिरीतील पाणी गावकऱ्यांची तहान भागवते. याच पठाराला गावकरी घाटाचा माळ म्हणून ओळखतात. मळलेल्या वाटेने शेतावरील बांधांवरून आम्ही घाटाकडे जाणाऱ्या वाटेवर पोहचलो. एका मोठ्या आंब्याच्या झाडाच्या पलीकडून उजवीकडील वाट केलगण गावात जाते तर डावीकडील वरच्या बाजूस ही वाट कुंभेवाडी कडे जाते. डावीकडच्या वाटेवर आम्हाला सोडून आमचा वाटाड्या परत फिरला. दगडांची विशिष्ट रचना करून बांधलेली आणि गावकऱ्यांना नेहमीच्या वापरासाठी सोईस्कर पडेल अशीच ही वाट आहे. वाटेवर चढताना मधेच कोणीतरी शिट्टी मारल्याचा आवाज येऊ लागला. चिन्मय सगळ्यांना सतर्क करत एका झाडाच्या फांदीवर बसलेला शिळकरी कस्तूर (Malabar whistling thrush) बोटाच्या इशाऱ्याने दाखवू लागला. वाटेत दुतर्फा लिंबूवर्गीय फळांची झाडे , मिरची आणि कारवीच्या झाडांचं जंगल माजलेलं आहे.
वाटेच्या मध्यवर्ती भागात वाघजाई देवीचं ठाणं आहे. शेंदूर फासलेल्या दगडांसमोर घंटा बांधलेली होती. गावकरी वर्षातून एकदा कोंबड्याचा बळी ह्या देवीस नैवद्य म्हणून देतात. देवीचं दर्शन घेत अर्ध्यातासातच आम्ही घाटमाथ्याजवळ पोहचलो. डोंगरात खिंडीसारखी खोदून ही वाट तयार केलेली दिसून येते. पठारावर उजवीकडील वाट कुंभे वाडी कडे जाते तर डावीकडील वाट घोळ गावाकडे जाते. धरणाचे काम पूर्ण झाल्यावर घोळ कडे जाणारी वाट पाण्याखाली जाणार हे मात्र नक्की. कुंभेवाडी गावातून कुंभे घाट उतरून मानगड किल्ला गाठता येतो. घोळ गावी जाऊन गारजाई वाडी मार्गे कोकणदिवा असा ही ट्रेक करता येतो.
डावीकडच्या वाटेने जाताना समोरील पठारावर दिसणारं कुभेवाडी , कुंभे धरणाची भिंत, धामणदरा डोंगर आणि दूरवर मंडणगड किल्ला दृष्टीक्षेपात येत होता. चढाई करत असताना आम्हाला बघून झाडावरील माकडं ह्या न त्या झाडावर उद्या मारत सैरावैरा पळू लागली. आम्ही कड्याच्या धारेवरून माथ्यावर पोहचलो. डोळ्यांचे पारडे फेडणारा नजरा आम्हाला कड्यावरून दिसू लागला. समोरील बाजूस कुर्डुगड , जिते, बडदेमाच व टिटवे गाव , विळे MIDC, गरूडमाची , घनगड , तैलबैला , सुधागड , सरसगड , सुरगड , तळगड , अवचितगड पर्यंतचं विहंगम दृश्य नजरेस पडतं. मागच्या बाजूस दाट जंगलांच्या डोंगराआड कोकणदिवा किल्ला लक्ष वेधून घेत होता. सोबत आणलेली बिस्किटं खात तासाभरातचं बडदेमाच गावी पोहचलो. दुपारचे दोन वाजून गेले होते. आमच्यासाठी विजय बडदे यांनी खास जेवणाची सोय केली होती. गरमागरम जेवणावर मनसोक्त ताव मारला. एका दिवसाच्या ट्रेक मध्ये इतकं भारी आणि पोटभर दुपारचं जेवण आम्ही आतापर्यंत कधीचं जेवलो नव्हतो. त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करत आम्ही घरचा रस्ता धरला. जाताना आमच्या चेहऱ्यावर आडवाटेवरचा एक नवीन ट्रेक केल्याचं समाधान मात्र ओसंडून वाहत होतं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा