अलिबागच्या अथांग सागरावर नजर हेरून असलेला गिरिदुर्ग - सागरगड
पावसाळा सुरू होताच वेड लागतात ते निसर्गाच्या सानिध्यात मनमुराद भटकंती करण्याचे, पावसाच्या धारेत ओले चिंब होत गडकिल्यांवरील सोसाट्याचा वारा अंगी झेलण्याचे. ट्रेक करताना वाटेत लागणाऱ्या धबधब्यात आणि नदीतील डोहात मनसोक्त डुंबण्यासाठी अलिबाग जवळील सागरगड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मुंबई, पुणे किंवा रायगड यांसारख्या कोणत्याही ठिकाणांहून सागरगड आणि अलिबागचे समुद्रकिनारे यांचा वन-डे विकेंड डेस्टिनेशन म्हणून विचार करता येईल. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यातचं आम्ही सागरगड आणि कनकेश्वरचा प्लॅन बनवला. माझा अलिबाग मधील मित्र भोप्या (रोशन भोपी) आणि त्याचा भाऊ असे तिघेही भल्या पहाटेच त्याच्या बेलोशी गावातून सागरगडाकडे मार्गस्थ झालो. अलिबागजवळील धरमतर खाडी ते रेवदंडा खाडी पर्यंतच्या परिसरावर वचक ठेवण्यासाठी सागरगड किल्ल्याची उभारणी केली गेली. सागरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला असला तरी सागरापासून ८ किलोमीटर लांब आणि १८°४२' उ., ७३°२०' पू., ४१४ मीटर उंच असलेल्या डोंगरावर हा किल्ला वसलेला आहे.
● सागरगडाचा इतिहास :-१) सागरगड किल्ल्यावरील खांबटाके आणि भुयारे यांवरून याची पायाभरणी शिलाहार कालीन (इ.स. ९ वे ते १३ वे शतक) असावी. शिलाहार घराण्यांचा उत्तर कोकणचा पहिला राजा कपर्दी याची राजधानी सागरगडाच्या समोरच्या बाजूस असलेली चौल येथील दंडाराजपुरी होय. त्यामुळे पहाऱ्यासाठी सागरगडाचा वापर त्याकाळात नक्कीच झाला असेल.२) हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर इ.स १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. सागरगड उर्फ खेडदुर्ग या गडावर टेहळणी करताना महाराजांना अलिबाग जवळ समुद्रात दोन बेटं दिसून आली. त्याचं बेटांवर खांदेरी आणि उंदेरी किल्यांची बांधणी झाली. स्वतंत्र आरमार स्थापन केल्यानंतर अलिबाग पट्यातील रेवदंडा, कुलाबा, सर्जेकोट, खांदेरी आणि उंदेरी यांसारख्या किल्यांवर सागरी तटांच्या रक्षणाची भिस्त येईपर्यंत सगळा कारभार हा सागरगडावरूनच होत असे.३) इ.स. १६६५ मध्ये शिवाजी राजांनी मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे २३ किल्ले मोगलांना दिले त्यात सागरगडचा (खेडदूर्ग) समावेश होता. आग्र्याहून सुटका झाल्यावर महाराजांनी सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला.
४) संभाजी महाराजांना मुघलांनी पकडल्यानंतर माणकोजी सूर्यवंशीने सागरगड ठाणे सोडून प्रबलगडावर आश्रय घेतला. संभाजीच्या मृत्यूनंतर माजलेल्या अंदाधुंदीत सागरगड सिध्दीने ताब्यात घेतला. पण कान्होजी आंग्रे, कुलाब्याचे भिवाजी गुजर, आरमार प्रमुख सिधोजी यांनी १६९८ साली सिध्दीकडून किल्ला जिंकून घेतला.
५) छत्रपती शाहू महाराज व ताराराणी यांच्या वादात कान्होजी आंग्रे ताराराणीच्या बाजूस होते. पण १७१३ मध्ये बाळजी विश्वनाथ पेशवे यांनी मुसद्देगिरीने छ. शाहू व कान्होजी आंग्रे यांच्यात समेट घडवून आणला. त्यावेळी १६ किल्ले कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यात सागरगडचा समावेश होता. कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सागरगडचा ताबा येसाजीकडे गेला. मानाजी आंग्रे व यसाजी आंग्रे या भावांच्या भांडणात पोर्तुगिजांनी मानाजीची बाजू घेतली, मानाजीने येसाजीचा पराभव केला. त्यावेळी सागरगडाचा ताबा त्यांच्याकडे आला. इ.स. १७३८ मध्ये संभाजी आंग्रेने सागरगड मानाजी कडून जिंकून घेतला.
६) १७४० सालीं बाजीरावाचें सैन्य नासिरजंगाशीं लढण्यांत गुंतलें आहे अशी संधी साधून संभाजी आंगरे यानें एकाएकीं अलीबागेंत उतरून हिराकोट, थलचाकोट, राजगड, सागरगड व चौलचा कोट हीं स्थळें घेतलीं व अलीबागेंत कुलाब्याचें पाणी बंद केलें, तेव्हां मानाजीनें, ताबडतोब येऊन आपलें रक्षण करावें अशी पेशव्यांस विनंति केली. पेशव्यांनीं मानाजीच्या कुमकेस जाण्याविषयीं इंग्रजांकडे पत्रें रवाना केलीं व बाळाजी बाजीराव व चिमाजी आप्पा हें स्वतः संभाजीवर चाल करून गेले.
७) येसाजीचा मुलगा बाबुराव आंगरे कुलाब्याचा सरखेल असताना त्याने शिंदेच्या सेनेच्या मदतीने मानाजीचा भाऊ जयसिंगाचा पराभव करून त्यास कैद केले व १८०० मध्ये त्याचा सागरगडावरून कडेलोट केला. त्यानंतर जयसिंगाचा मुलगा मुरारने उठाव केला पण तो फसला. रामजी अंगरेने मुरारला मदत केली होती. त्यामुळे बाबुरावने रामजीस पकडून त्याचा १८०७ मध्ये सागरगडावरून कडेलोट केला.
८) इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इथला रम्य निसर्ग व अल्हाददायक वातावरण पाहून जनरल फूलर व काही इंग्रज अधिकार्यांनी येथे विश्रामधामे बांधली होती.
● पोहचण्याच्या वाटा :-
१) सागरगडावर जाण्याची मुख्य वाट मुंबई-अलिबाग रस्त्यावरील खंडाले गावातून आहे. मुंबई-पुण्यातून येताना वडखळ-पेझरी-कार्ले खिंड-खंडाले असा प्रवास करून खंडाले गावातून सागरगड फाटा पकडावा. पावसाळ्याच्या दिवसांत एका फार्महाऊस शेजारून ओढ्याजवळ गाडीरस्ता जातो. या वाटेने गडावर जायला अडीच तासांचा कालावधी लागतो. पावसात याच वाटेने धोंदाणे धबधब्याचा आंनद लुटता येईल.
२) सागरगडावर पेझारी गावातूनही जाता येते. पेझारी गावातूनच नागझिरा गावात पोहचून गावाच्या शेवटी असलेल्या क्रिशिवन फार्म शेजारून गडावर वाट जाते. या वाटेने दीड तासांचा वेळ लागतो. वाटेवर काही प्रमाणात मार्किंग केलेली दिसून येते.
अलिबाग शहरापासून अवघ्या ५ किमी अंतरावर असलेल्या खंडाले गावातून आम्ही गावाच्या शेवटी असलेल्या ओढ्या जवळ पोहचलो. ओढा पार करताच दगड रचून तयार केलेल्या पायऱ्यांच्या वाटेला आम्ही लागलो. काही वेळातच टेकडीवर पोहचलो. येथून एक वाट माचीवर जाते तर दुसरी धोंदाणे धबधब्याकडे. माचीवरच्या वाटेने मोकळ्या जागेत पोहचल्यावर दोन टाप्यांत कोसळणाऱ्या धोंदाणे धबधब्याचे जलप्रपात त्याच्या एकसुरी आवाजने आपलं लक्ष वेधून घेतो. वीस मिनिटांची चढाई करून आम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या आवारात दाखल झालो. माकडांच्या गदारोळात मंदिराचा परिसर नेहमीच गजबजून गेलेला असतो. मंदिराच्या खालच्या बाजूस एक विहीर व मठ दिसून येतो. बाजूनेच वाहणाऱ्या ओढ्याचे जलप्रपात स्वतःला झोकून देतात तोच हा धोंदाणे धबधबा. मंदिरामुळे ह्यास सिद्धेश्वर धबधबा म्हणुनही ओळखतात. कौलारू छप्पर,आधाराला लाकडी खांब, गाभाऱ्यात शिवलिंग आणि समोरच्या बाजूस नंदी अशी मंदिराची रचना आहे. श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्री या दिवशी दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येथे गर्दी करतात. सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन अर्ध्या तासातच आम्ही माचीवर पोहचलो. माचीवर चढताना मागच्या बाजूस पश्चिमेस खांदेरी आणि उंदेरी जलदुर्ग दिसून येतात.
सपाटीमुळे माचीवर मोठया प्रमाणात वस्ती दिसून येते. सागरगड व माचीवर पावसाळा वगळता बाकी दिवसांत गाडीरस्त्याने सगरगडाच्या दरवाजा पर्यंत जाता येऊ शकते. माचीवरील घरांमध्ये जेवण्याची सोय होऊ शकते, पण त्याची कल्पना त्यांना आधीच द्यावी. माचीवरून तासाभरात आपण गडाच्या महादरवाजाजवळ पोहचतो. वाट मळलेली असून जागोजागी वाटेवर मार्किंग केलेली दिसून येते. गडाच्या वाटेवरच डावीकडे शेंदूर फासलेला कातळ आहे, तर उजवीकडील बाजूस गडाचे सरळसोट कातळकडे, वानरटोक आणि रेवदंडा खाडीचा परिसर दृष्टीक्षेपात येतो. गडाच्या डाव्या बाजूस भग्न अवस्थेत असलेला महादरवाजा आहे. येथील तटबंदी सुद्धा मोठ्या प्रमाणात ढासळलेली आहे. शिवाय काही जांभ्या दगडात (Laterite Stone) बांधलेली आहे. कोकणात ईतक्या उंचीवर जांभ्या दगडात बांधलेला हा एकमेव किल्ला असावा. जवळपास चिऱ्याची खान नसताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात चिरा कोठून व का आणला असेल हाच पहिला प्रश्न उद्भवतो. महादरवाजा च्या डाव्या बाजूस एक वाट कातळात कोरलेल्या भुयाराकडे जाते. पावसाळ्यात या वाटेने जाताचं येत नाही. त्या भुयारची माहिती व काही फोटोस आम्हाला माझा पेझारी मधील मित्र रोहित पाटील यांच्याकडून मिळाली. उजव्या बाजूची वाट गडाच्या चार मीटर उंच तटबंदीकडे जाते. याच भागात एक भक्कम बांधणीचा बुरुज नजरेस पडतो. मधील जागेत हत्ती, घोडे ठेवण्याची जागा होती. गडाला महादरवाजा पासून २०९.७६ मीटर लांब तटबंदी आहे. कधीकाळी तटबंदीच्या लगतच खंदक खोदलेला होता पण आता तो पूर्णपणे बुजलेला आहे. तटबंदीवरूनसुद्धा झाडाच्या आधारे गडावर प्रवेश करता येतो. याच तटबंदी मध्ये एक छोटेखानी खिडकी वजा दरवाजा दिसून येतो त्यास गुप्त दरवाजा किंवा चोर दरवाजा म्हणून ओळखतात.
गडाच्या आत प्रवेश करताच वाटेवर उजव्या बाजूस झाडाखाली नंदी ठेवलेला आहे. त्याबाजूलाच एक भग्न अवस्थेतील गोमुख टाक आहे. पाण्याची गळती होत असल्याने ह्यात पाणी साठत नाही. त्यापुढेच आणखी एक पाण्याचा झरा दिसून येतो, पण हा फक्त पावसाळ्यातचं वाहता असावा. हीच वाट आपल्याला बालेकिल्ल्याच्या आवारातील शिवमंदिरात घेऊन जाते. शिवमंदिरचा हल्लीच जीर्णोद्धार झालेला दिसून येतो. मंदिरात शिवलिंग, नंदी, गणपतीची मूर्ती, महिषासुरमर्दिनीची मूर्ती आणि बाहेरच्या बाजूस एका अज्ञात विराची मूर्ती आहे. बालेकिल्ल्याचा बराचसा भाग हा दाट मोठ्या झाडांनी व्यापलेल्या आहे. याच परिसरात काही बांधकामाचे अवशेष, किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष आणि भग्न अवस्थेतील तोफ आढळून येते. बालेकिल्ल्यात पश्चिमेला उंचवट्यावर महाराजांचं स्मारक आहे. त्याशेजारीच तीन लहान तोफा ठेवलेल्या आहेत. गडाचा पश्चिमेकडील परिसर येथून न्याहाळता येतो. शिवमंदिरच्या खालच्या बाजूच एक बारमाही पिण्याच्या पाण्याचे टाके बांधलेलं आहे. यालाच स्थानिक लोकं पांडवकुंड या नावाने देखील संबोधतात. एका दगडी गोमुखातून खळखळत कोसळणारी पाण्याची संततधार येणाजणाऱ्यांची तहान भागवते. याशिवाय गडावर मूजांबा, खेरजाबाई व वेतळाची देवळे होती.
गडाच्या पश्चिम बाजूस असलेल्या सतीच्या माळावर बांधकामाचे अवशेष दिसून येतात. येथे एक भग्न अवस्थेत समाधी आणि दीपमाळ देखील आहे. पश्चिमेकडील बाजूस असणाऱ्या सरळसोट कड्यामुळे या बाजूस तटबंदी दिसून येत नाही. डावीकडील सोंड लांबवर गेलेली असून त्याच्या सुरवातीस एक तलाव दिसून येतो. या सोंडेलाच टकमक टोक किंवा मंकी पॉईंट देखील म्हणतात. येथील शेवटच्या बाजूस असलेला वानरटोक नावाचा गडापासून विलग झालेला सुकला हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. याच भागात तासंतास बसून पश्चिमेकडून येणाऱ्या गार वाऱ्याचे झोत अनुभवण्याची मजा काही औरचं. येथून धरमतर खाडी, सर्जेकोट, खांदेरी, उंदेरी,कुलाबा, रेवदंडा किल्ला, कोर्लई किल्ला, रेवदंडा खाडी आणि अलिबागचा समुद्रकिनारा दृष्टीक्षेपात येतो. याच सोंडेवर असलेल्या तलावाच्या बाजूनेच पेझारी गावात उतरणारी वाट आहे. वाटेच्या मध्यावर कातळात कोरलेली खांब टाकी दिसून येतात. यांना सोनेरी कुंड या नावाने देखील ओळखतात. बालेकिल्ल्याच्या पूर्वेकडे भक्कम बांधणीचा बुरुज आहे. या भागातून कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, सांकशी किल्ला, मिरागड, तैलबैला यांसारखे किल्ले निरभ्र आकाशात पाहता येतात. गडाचा सर्व परिसर पाहण्यास तासभर वेळ पुरेसा ठरतो. गडफेरी पूर्ण करून परतीच्या प्रवासात धोंदाणे धबधब्याचे जलप्रपात अंगी झेलताना, पावसाळ्यात हा एक भन्नाट ट्रेक असल्याची ग्वाही आम्हाला झाली. त्यातील काही आठवणी मनात आणि कॅमेरात कैद करून आम्ही कनकेश्वर मंदिराकडे प्रस्थान केले.
● महत्वाच्या सूचना :-
१) सागरगड माचीवरील गावात गावकऱ्यांची परवानगी घेऊन दत्त मंदिरात राहायची सोय होऊ शकते. गावातील घरांमध्ये जेवणाची सोय उपलब्ध आहे पण त्याची कल्पना त्यांना आधीचं द्यावी. (शिवसमर्थ किराणा स्टोअर - संदीप पाटील - ७८७५०२३६५८, ९२७३१६८५५४, ९१६८१४९२६४)
२) स्वतःचे वाहन असल्यास सागरगड किल्ल्यासोबतचं कुलाबा, रामदरने किल्ला, कनकेश्वर मंदिर, अलिबागचा समुद्रकिनारा यांपैकी एक अशी दोन ठिकाणे एकाच दिवशी करता येऊ शकतात.
३) गडावर पांडवकुंडात बारमाही पिण्याचे पाणी असते. पण नेहमी सोबत आपली पाणी बॉटल बाळगलेली केव्हाही उत्तमचं.
४) सागरगडाला पावसाळा वगळता बाईक वरून गडाच्या तटबंदी पर्यंत जाता येते.
५) निसर्गात फिरताना कुठेही कचरा करू नये. ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य राखावे. गडावर कोणतेही व्यसन करू नये. वन्य प्राण्यांना खाद्यपदार्थ देऊ नये, कायद्यानेदेखील गुन्हा आहे.
● संदर्भ ग्रंथ :-
१) कुलाबा गॅझेटिअर
२) भटकंती रायगड जिल्ह्याची - प्र. के. घाणेकर
३) मराठी रियासत मध्यविभाग २ पृ. १
खुप छान 😍
उत्तर द्याहटवाधन्यवाद मित्रा 😍
हटवाWell executed and well informed...
उत्तर द्याहटवाधन्यवाद ☺️❤️
हटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवा