किल्ले कोंढवी

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटाजवळ छोटेखानी  कोंढवी नावाचा अपरिचित गिरिदुर्ग आहे. पोलादपूर बस स्थानकापासून ११ किलोमीटरचा धामनदेवी - फणसकोंड फाटा - तळ्याची वाडी असा खाजगी वाहनाने अथवा बसने प्रवास करून आपण कोंढवी किल्ल्याजवळ पोहचतो. (उ. १७°५५'  २०.७०"  पू. ७३°२७'  १०.७०" ) 

तळ्याच्या वाडीतून जाणारा गाडीरस्ता सुमारे १०० मीटर उंचीच्या गडमाथ्यावर घेऊन जातो. वाटेच्या मधल्या टप्यात गडाचे पहिले भैरव मंदिर आहे. मंदिर प्रशस्त असून येथे मुक्काम करता येतो. मंदिरात काही मूर्ती ठेवलेल्या आहेत, पण शिल्पकलेवरून या मूर्ती ६० ते ७० वार्षपूर्वीच्या असाव्यात असे वाटते. गडाच्या सुरवातीलाच उजव्या हाताला मंदिराचे अवशेष आणि चौथऱ्यावर रंगरंगोटी केलेल्या वीर मारुतीच्या दोन मुर्त्या नजरेस पडतात. मंदिराच्या मागील बाजूस गाळाने भरलेल्या विहिरीचे अवशेष आढळतात. मारुती मंदिरच्या समोर असलेल्या आठ ते नऊ पायऱ्या चढून आपला कोंढवी किल्ल्यात प्रवेश होतो. कधीकाळी येथे गडाचे मुख्य प्रवेशद्वार असावे. साधारणतः गडाचा परिसर गोलाकार आकारात पाच एकरमध्ये दक्षिणोत्तर पसरलेला आहे. कोंढवी किल्ल्याच्या उत्तरेला घाटमाथ्यावरील सातारा व महाबळेश्वर येथे जाणारा आंबेनळी घाट असुन कोंढवी-देवपूर दरम्यान एक लहानसा घाटमार्ग या मुख्य घाटमार्गाला मिळतो. या घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी कोंढवी किल्ल्याची बांधणी करण्यात आली असावी. 


 


रायगड किल्ला व तेथील परिसर शिवाजी महाराजांनी घेतल्यावर कोकणात स्वराज्यविस्ताराची तयारी सुरू झाली. त्यावेळी महाराजांना सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज, सावंत यांच्याशी दोन हात करावे लागणार होते. याची सुरवात म्हणून कोकणातील मोऱ्यांचे चंद्रगड व कोंढवी हे दोन किल्ले शिवाजी महाराजांनी घेतले.

इ. स. १७७६ मध्ये सदाशिवराव भाऊंच्या तोतयाने बंड केले होते. त्याने वरंध घाटाखाली पेशव्यांविरुद्ध कट करून दीड हजार माणसे जमविली. तेव्हा त्याने रायगडावरील चाकर गंगाजी धिंडले याला फितूर केले. त्यामुळे काही काळ रायगडदेखील या तोतयाकडे होता. या सुमारास मोहोप्रे, बिरवाडी, महाड, नाते व कोंढवी इ. गावांतील शेकडो लोक त्याला मिळाले. या वेळी कोंढवी किल्ल्याचाही वापर या तोतयाने केला असावा.

इ. स. १७७८-७९ मध्ये रायगड तालुक्यात २४४ गावे होती. यामध्ये कोंढवी परगणा होता. या व्यतिरिक्त महाड परगणा, तर्फ बिरवाडी, तर्फ तुडील, तर्फ विन्हेरे, तर्फ वाळणखोरे असे सहा भाग होते. परगणा कोंढवी पैकी उमरठ, ढवळे, खोपडी व दांदके ही चार गवे पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होती. 

 

गडाच्या मध्यभागी दुसरे भैरव मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असून मंदिरात भैरोबा, भैरी देवी, शिवलिंग व एक महिषासुर मर्दिनीची मुर्ती पाहवयास मिळते.  कोंढवी आणि आजूबाजूच्या परिसरातील फणसकोंड, गांजवणे, खडपी, चोळई, धामणदेवी, दत्तवाडी, खडकवणे, गोलदरा व तळ्याची वाडी या गावांचे आराध्य ग्रामदैवत म्हणून आठगाव भैरवनाथ अशी ओळख आहे. मंदिराच्या प्रांगणात काही दगडी मुर्त्या, तुळशी वृंदावन, दिपस्तंभ, सुंदर नक्षीकाम केलेले आणि समोरच्या बाजूस कमळ कोरलेले मध्ययुगीन काळातील पीठ नजरेस पडते. 

भैरवनाथ मंदिराच्या लगत नवीन भव्य पाषाण मंदिर बांधण्याचा संकल्प हाती घेतल्यानंतर याकामी पाण्याची साठवण टाकी खणण्यासाठी खड्ड्यातील माती उपसण्यात आली. या मातीच्या ढिगार्‍यामध्ये काही मुर्त्या आढळून आल्याने तालुक्यात या घटनेमुळे भाविकांमध्ये विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. या मूर्तींमध्ये श्री गणेश, भैरी, जोगेश्वरी, वाघजाई आणि एक वीरगळ इत्यादींचा समावेश आहे. कोकणच्या इतिहासावर अभ्यास करणारे डॉ. अंजय धनावडे यांनी या मूर्तींसंदर्भात त्या चौदाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतच्या असल्याचे नमूद केले आहे. 




मंदिराच्या उजव्या बाजूस एक कोरडा पडलेला तलाव आहे. याच तलावाच्या बाजूला झाडाखाली भैरव मूर्ती व एक शिवलिंग दिसून येतात. मंदिराच्या डाव्या बाजूस जोत्यांचे अवशेष व बांध नजरेस पडतात. याच भागात एक कोरीव ४ X २ फूट आकाराचे शिल्प आहे. अश्या प्रकारचे शिल्प बहुतेकदा निजामशहाच्या ताब्यातील किल्ल्यावर आढळते. असे शिल्प मंडणगड किल्ल्यावर देखील पहावयास मिळते.

गडावर तटबंदी, बुरुज, दरवाजा अशे अवशेष दिसत नाहीत. काही भागांत कोसळलेल्या तटबंदीचा पाया नजरेस पडतो. गडावर पाण्याची सोय नाही. बहुतेकदा मंदिराला कुलुप लावलेले असते. गडाच्या पूर्वेकडील बाजूस प्रतापगड आणि कुडपन पर्यंतचा परिसर न्याहाळता येतो. तर आग्नेय बाजूस मिठखडा, महिपतगड व सुमारगड हे किल्ले नजरेस पडतात. निरभ्र वातावरणात येथून दुर्गदुर्गेश्वर रायगड आणि कडसरी लिंगाणा यांचे देखील दर्शन घडू शकते. गड फिरण्यासाठी अर्धा तास पुरेसा ठरतो. वर्षातील बाराही महिने गडाला भेट देऊ शकता.



संदर्भग्रंथ :-
१ ) रायगड जिल्हा गॅझेटीयर
२) रायगड जिल्ह्याचे दुर्ग वैभव - सचिन जोशी
३) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे











टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ