अल्पपरिचित गडकिल्ले - रत्नगड उर्फ रतनगड
पेण तालुक्यातील मिऱ्या आणि तिलोरे डोंगररांगेला जोडणाऱ्या टेकडीवर रतनगड उर्फ रत्नगड नावाचा अपरिचित किल्ला वसलेला आहे. पेण-खोपोली मार्गावर कामार्ली फाट्यावरून वारवणे-सायमाळ असा १७ किलोमीटरचा प्रवास करून आपण किल्ल्याजवळील गावात पोहचतो. साय/सैतानमाळ गावाच्या खालच्या बाजूस असलेल्या टेकडीवर आणि रत्ना नदीकाठी हा किल्ला आहे (उ. १८°४१' २९.४६'' पू. ७३°०९' २८.५३''). समुद्रसपाटीपासून सुमारे ४०० मी उठवलेला हा किल्ला,त्यावर फडकणाऱ्या भगव्या झेंड्यामुळे सायमाळ गावातून आपलं लक्ष वेधून घेतो. याच सैतान/सायमाळावर शिवाजी महाराजांचा सेनापती आबाजी सोनदेव याने कल्याणच्या सुभेदाराचा खजिना लुटला होता. किल्ल्याचा आकार पाहता याचा वापर संरक्षक वसाहत किंवा टेहळणीसाठी केला गेला असावा.
रतनगड उर्फ रत्नगड हा किल्ला बाबूराव पाशीलकर नावाच्या माणसाने बांधला. शायिस्ताखानाने हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला पण गडाचा किल्लेदार कावजी कोंढाळकर याने निकराने लढा दिला. मिऱ्या डोंगराच्या या परिसराचा, थंड हवेचे ठिकाण म्हणून वापर करण्याचा ब्रिटिशांनी विचार केला होता, पण ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकली नाही.
सायमाळ गावातूनच किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत कच्चा रस्ता जातो. येथूनच साधारणतः १५ मिनिटांमध्ये आपण भैरव मंदिरापाशी पोहचतो. हल्लीच बांधकाम केलेल्या मंदिराच्या आतील बाजूस तीन, तर बाहेरील बाजूस एक असे शेंदूर लावलेले चार मूर्तीसदृश्य दगड पहावयास मिळतात. मंदिराच्या डाव्या बाजूने एक तीव्र घसाऱ्याची वाट अर्ध्या तासातच आपल्याला किल्ल्याच्या पहिल्या सपाटीवर घेऊन येते. सपाटीवरून किल्ल्याचा माथा नजरेस पडतो. याच भागांत कातळात खोदलेले काही पोस्ट होल्स दिसून येतात. छप्पर उभारण्यासाठी किंवा झेंडा रोवण्यासाठी यांचा वापर झाला असावा.
सपाटीवरून पायवाटेने माथ्यावर जाताना वाटेत पाण्याचे एक खोदीव टाके आहे. टाक्यात पाणी शिल्लक असले तरी ते पिण्यायोग्य नाही. ज्या ठिकाणी आपला किल्ल्यात प्रवेश होतो त्या जागी तटबंदीचे अवशेष दिसून येतात. येथेच एक शिवलिंग ठेवलेलं आहे. किल्याच्या माथ्यावर मध्यभागी रत्नाई देवीची मूर्ती, एक कोरीवकाम केलेलं पिठ नजरेस पडते. गावकरी देवीच्या दर्शनाला येऊन नारळ अर्पण करतात. पश्चिमेकडील बाजूस एका बुरुजाचे अवशेष आढळतात. त्याच्या बाजूलाच एक दगडी पन्हळ पहावयास मिळते. किल्ल्यावरून कामार्ली आणि सायमाळ गावं, हेटवणे धरण, माणिकगड, भोगेश्वरी नदीचे खोरे दृष्टीक्षेपात येते.
किल्ल्याच्या मध्यावर दक्षिणोत्तर बाजूस एक कातळात खोदलेले पाणीटाके आहे. पहिल्या टाक्याच्या शेजारूनच तीव्र घसाऱ्याची वाट इथपर्यंत येते. बारमाही पाण्याच्या या टाक्यात अतिशय थंडगार पिण्याचे पाणी उपलब्ध असते. किल्ल्याचा माथा आटोपशीर असल्याने सुमारे दोन तासांतच किल्ल्याची भटकंती पूर्ण होते. सायमाळ गावातील जिल्हापरिषद शाळेच्या प्रांगणात एक तुटकी तोफ पहावयास मिळते. वर्षभरात कधीही किल्ल्याला भेट देता येते. किल्ल्याच्या खाली असलेल्या भैरव मंदिरात किंवा शाळेत राहण्याची सोय होऊ शकते.
संदर्भग्रंथ :-
१) रायगड जिल्ह्याचे दुर्ग वैभव - सचिन जोशी
२) रायगड जिल्हा गॅझेटिअर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा