अल्पपरिचित गडकिल्ले - मिरगड


पेण शहराजवळ असलेल्या महाल मिऱ्या डोंगररांगेच्या शेवटच्या भागांत छोटेखानी मिरगड किल्ला आहे. मिऱ्या डोंगराचा थंड हवेचे ठिकाण म्हणून वापर करण्याचा ब्रिटिशांनी विचार केला होता, पण ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. मिरगड किल्ल्यावर जाण्यासाठी कोंढवी आणि पाचगणी अशा दोन्ही गावातून वाटा आहेत. पेण-वडखळ-कासु-पाबळ-कोंढवी ( बिरडावाडी ) असा २७ किलोमीटरचा प्रवास करून गडाच्या पायथ्याला पोहचता येते. या वाटेने आपण गडाच्या पदरात पोहचतो. समुद्रसपाटीपासून साधारणतः ३५० मीटर उंचीची गडाची दोन्ही शिखरे समोरूनच आपलं लक्ष वेधून घेतात. प्रथम डावीकडील शिखरमाथ्याकडे चालायला सुरुवात केल्यावर तासाभरातच आपण दोन शिखरांमधील खिंडीत पोहचतो. मिऱ्या डोंगराजवळील कुरवाड या गावाजवळ कलात्मकरीत्या कापलेले दगड सापडतात. नजीकच्या तलावात अनेक भग्न मूर्ती असल्याचे लोक सांगतात. दुसऱ्या वाटेने गडावर जाण्यासाठी पेण-बोरगाव-महालमीऱ्या-पाचगणी असा २० किलोमीटरचा प्रवास करून आपण पाचगणी गावात दाखल होतो. याच वाटेने गडावर जाताना माचीवरील वाघेश्वराचे दर्शन सुद्धा घेता येते. पाचगणी पठाराच्या शेवटच्या भागात किल्ला असल्याने समोर दिसणाऱ्या पहिल्या टेकडीला वळसा घालून अर्ध्यातासात आपण खिंडीत येऊन पोहचतो. याच पहिल्या टेकडीवर झाडाखाली महिषासूरमर्दिनीच्या दोन मुर्त्या ठेवलेल्या दिसतात. बहुदा गडावरील मंदिर उध्वस्त झाल्यानंतर कोणीतरी त्या झाडाखाली ठेवल्या असाव्यात. 




दुसऱ्या टेकडीच्या उतारावर बांधकामाचा साधारण अर्धा मीटर उंचीचा पाया दिसतो, तर माथ्यावरील एका भागात बांधकामाचे जोते दृष्टीस पडते. माथ्यावरील या भागात पाणी नाही. गडाच्या पुढच्या शिखराकडे चालायला सुरुवात करावी. मिरगडाचा मुख्य भाग या डोंगरमाथ्यावर आहे. पाच मिनिटांमध्ये गडाच्या तुटलेल्या तटबंदीमधून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. गडाच्या माथ्यावर बर्‍यापैकी सपाटी आहे. गडमाथ्यावर तटबंदी व बुरुजाचे मोजकेच अवशेष दिसतात. डाव्या बाजुस एक उंचवटा दिसून येतो. कधीकाळी हा गडाचा सर्वात मोठा आणि भक्कम बुरुज असावा. याच बुरुजाला खेटून दोन लहान बुरुजांची जोती नजरेस पडतात. येथेच गडाचा मुख्य दरवाजा असावा, तर खालच्या बाजुस पायऱ्यांचे कोरीव दगड ढासळलेल्या अवस्थेत दिसून येतात. समोरील बाजूस एका मंदिराचे जोते शिल्लक आहे. २-३ पायऱ्या व अनेक घडीव दगड विखुरलेले जोत्याजवळ दिसतात. मंदिरालगतच एक कातळात खोदलेलं भलंमोठं टाकं नजरेस पडतं. टाक्याच्या आच्छादनासाठी बाजूलाच पोस्टहोल्स आहेत. पण पावसाळा व्यतिरिक्त कोणत्याही टाक्यात पाणी नसतं. गडाच्या मध्यभागात सदरेसारखे बांधकाम आहे. हे बांधकाम गडावरील सर्वात मोठे बांधकाम आहे. आता या बांधकामाचे फक्त जोतेचं शिल्लक राहिले आहे. या बांधकामाच्या उत्तरेला कातळात खोदलेले आणखी एक टाके आहे. गडफेरी पूर्ण करण्यासाठी तासाभराचा वेळ पुरेसा आहे. 






मिरगड किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी किंवा संरक्षक वसाहत म्हणून केला गेला असावा. मिरगड किल्ल्याला काही पुस्तकांत तसेच शासकीय गॅझेटियरमध्ये सोनगिरी असे संबोधले आहे. पण सोनगिरी हे या किल्ल्याचे नाव नसून मिरगड हेच योग्य नाव आहे कारण या किल्ल्याचा मिरगड या नावानेच ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख आलेला आहे. सोनगिरी हा किल्ला खंडाळा घाटात असून पळसदरी हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे. इ.स १६६२ मध्ये मोगल सरदार नामदारखान याने पेण व आजूबाजूच्या परिसरावर हल्ला केला होता. तेव्हा झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी भाग घेतला होता. ही लढाई मिरगडच्या परिसरात झाल्याचा उल्लेख आढळतो. आणखी काही ज्ञात ऐतिहासिक कागदपत्रांतून मिरागडचा उल्लेख दि. २८ मार्च १७४० मध्ये येतो. या दिवशी संभाजी आंग्रे विजयदुर्ग किल्ल्यावरून आपले आरमार घेऊन समुद्रमार्गे अलिबागजवळील साखर या गावी आले. त्या सुमारास चिमजीआप्पा व नानासाहेब पेशवे त्यांच्या मदतीस आले व त्यांनी पाली, मिरगड व उरण हे भूभाग जिंकून घेतले, अशी माहिती आंग्रेकालीन पत्रव्यवहारात मिळते. मिरगड किल्ल्यावरून वाघेश्वर मंदिराचा परिसर, रत्ना व अंबा नदीचे खोरे, रत्नगड, सागरगड, कर्नाळा, माणिकगड आणि सरसगड हा सारा परिसर निरभ्र वातावरणात दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्यावर राहण्याची व जेवण्याची सोय उपलब्ध नाही. पायथ्याच्या गावात जेवणाची सोय होऊ शकते, पण त्याची कल्पना त्यांना आधीच द्यावी. वेळेचे योग्य नियोजन केल्यास मिरगड, रत्नगड आणि सांकशी ह्या तिन्ही किल्ल्यांची भटकंती एकाच दिवशी करता येऊ शकते. मिऱ्यागड आणि रत्नगड यांच्या मध्यावर चांदेपट्टी हे गाव असून चांदजी जेधेने शिवाजीच्या काळात ते वसविले असावे. या उंच पठारावर लॅटेराईट व बॉक्साइट खडकाचे साठे आढळतात. महालमीऱ्या डोंगरावर अंदाजे ४०० वर्ष जुने व्याघ्रेश्वराचे मंदिर आहे. देवळाच्या बाजूने वर येण्यासाठी सुबक पायर्‍या आहेत. बाजुला लहानसे कुंड आणि गायमुख आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजुस दीपमाळ, वीरगळ, नंदी आणि काही मूर्तीसदृश्य दगड पाहायला मिळतात.  मंदिरात शिवलिंग, गणेश यांच्या मुर्त्या आहेत. देवळाला वळसा घालून मागील बाजूस उतरल्यावर पावसाळ्यात १०० फूटावरुन पडणारा धबधबा पर्यटकांचे मन मोहित करतो. 


संदर्भग्रंथ :- 
१) रायगड जिल्ह्याचे दुर्ग वैभव - सचिन जोशी 
२) रायगड जिल्हा गॅझेटिअर 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ