सातनाळ आणि मंडप धबधबा
नोव्हेंबर महिन्यातील दमछाक करायला लावणारं ऊन आणि त्यातच चालून आलेल्या दिवाळीच्या सुट्टीचं औचित्य साधून आमची उन्हातान्हात भटकणारी शरीर-मन सातनाळेतील मंडप धबधब्याखाली गारेगार करण्याची एक विराट योजना आखली."भटकंती घाटवाटांची" या डॉ. प्रीती पटेल यांच्या पुस्तकातील मंडप धबधबा आणि सातनाळ घाटवाटेचा लेख वाचल्यापासूनच मनात घर करून बसला होता. पण सतत कोसळणारा मुसळधार पाऊस, कोरोना आणि वाढलेलं लॉकडाऊन यांमुळे घराबाहेर पडणचं मुश्किल झालं होतं. वाढलेली कामे आणि कोरोना यांतून उसंत मिळताच, आम्ही महाडवरून उंबर्डी गावाच्या दिशेने रवाना झालो. दरवेळी प्रमाणे अलिबागचा वाघ म्हणजे आमचा भोप्या बऱ्याच दिवसांनी ट्रेकला जायचं म्हणून आमच्या आधीच माणगाव मध्ये दाखल झाला होता. महाड- माणगाव- निजामपूर- कडापे- जिते असा ५५ किलोमीटरचा प्रवास करून उंबर्डी गावात दाखल झालो. उंबर्डी नदीच्या तिरावर असलेलं हेमाडपंथी शिवमंदिर आणि त्यामागील मोसे खोऱ्यात दिमाखाने उभा असलेला कुर्डुगडाचा सुळका रस्त्यावरूनचं आमचं लक्ष वेधून घेत होता. फक्त दगड एकावर-एक रचून हे मंदिर उभारलं आहे. मंदिराच्या प्रांगणात बऱ्याच वीरगळ आणि सतीशिळा दिसून येतात. मंदिराच्या उत्तरेकडील बाजूस विरमारुतीची भलीमोठी मूर्ती दिसून येते. इतक्या वीरगळ बघून कधीकाळी येथे प्रचंड मोठे युद्ध झाले असेल याची प्रचिती येते. शतकानुशतकांपासून ऊन-पाऊस-वारा सोसत, झीजत आणि पराक्रमी इतिहासाची साक्ष असलेल्या ह्या वीरगळी कॅमेऱ्यात कैद करत आम्ही उंबर्डी मधील मोरेवाडीत येऊन पोहचलो.
भातकापणी नंतरच्या च्या कामात सगळेचं गावकरी मग्न झाले होते. गावकऱ्यांना सातनाळेबद्दल विचारले असता, कित्तेक वर्षात त्या वाटेला कोण फिरकलं नसल्याची कबुली त्यांनी दिली. "आजोबा !!! सातनाळेची वाट दाखवता का ??". "आजोबा - त्यो बघा लक्ष्या !! त्यालाच जाऊन विचारा". सरतेशेवटी आमची गाठ लक्ष्मण मोरे यांच्याशी पडली. मुंबईत लोकल मधून पडून अपघात झाल्यावर ते गावाकडेच कायमस्वरूपी वास्तव्यास आले होते. त्यांचं अख्ख कुटुंब मुंबईतचं पण, धावपळीच्या जीवनाला कंटाळून त्यांनी गावचा रस्ता धरला तो कायमचाचं. शेवटी बालपण गावाकडे घालवलेल्या व्यक्तीला गावची ओढ नसेल तर नवलचं. त्यांच्या घरासमोरील अंगण सारवून ते तडकाफडकी आमच्या सोबत यायला तयार झाले. हातातली काठी खांद्यावर टाकलेले लक्ष्मण दादा, त्यांचा कुत्रा राजा आणि आमची टोळी नऊच्या सुमारास सातनाळेच्या दिशेने निघाली. कुर्डुगडाच्या मागून हळूच वर आलेल्या नारायनरावांची आमच्यावर रोखून बघायला सुरवात झाली होती.
गावाच्या शेवटी कोळीराजाच्या वाड्याचे जोते आणि भल्यामोठ्या लांबलचक सहाफुटी तटबंदीचे विखुरलेले अवशेष नजरेस पडत होते. मोठ-मोठाले कोरीव दगड, जाती, पाटे, वाड्यांचे अवशेष यांवरून कोळीराजाच्या संपत्तीची आणि त्याच्या राजवटीची कल्पना करता येते. गावकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी ह्या कोरीव दगडांचा वापर आपली घर बांधण्यासाठी केलेला दिसतो. उरलेले काही अवशेष काळानुसार ह्या भयाण झाडीमध्ये लुप्त होत चालले आहेत. उंबर्डी येथे असलेली ही कोळीराजाची राजवट, गुप्तधन आणि कोरीव गुहेतील भांडी हे न उलघडणारं कोडंच आहे. अजूनही गावात सर्रास कोळीराजाची भांडी आमच्या आज्या-पंज्याच्या लग्नात जेवणासाठी वापरली असं गावकरी तोऱ्यात सांगतात. पण आजवर कोणत्याही म्हाताऱ्याने ती भांडी प्रत्यक्षात बघितल्याचे दिसून आले नाही. कोळीराजाच्या ह्या कथेवर पडदा टाकत आम्ही पुढचा रस्ता धरला. शेताच्या बांधाबांधने जाणारी आमची वाट थेट उंबर्डी नदीच्या पत्रातचं शिरली.
कोरडं पडलेलं उंबर्डी नदीचं पात्र आणि पाण्यासोबत घरंगळत आलेले द्विरद दगड पाहून पावसाळ्यातील पाण्याच्या प्रहवाचा अंदाज बांधता येतो. मोसे खोऱ्यात असलेल्या कुर्डुगडाकडे घाटावरील गाव धामणव्हळ येथून सातनाळ, देवघाट / लिंग्याघाट, निसणीची वाट, चिपेचं दार, मारुडा घाट यांसारख्या वाटा खाली उतरतात. यांपैकी निसणीची वाट आणि देवघाट बऱ्यापैकी वापरात आहेत. दुर्गाडीच्या ह्याच डोंगरातून एकूण सात नाळा खाली उतरतात म्हणून ह्या मुख्य वाटेला सातनाळ असे संबोधले जाते. पावसाळ्यात नदीमध्ये पाणी असल्याने ही वाट पूर्णपणे बंद असते. नदीतल्या दगडगोट्यांवर उड्या मारत, कधी मोठे दगड चढून, तर कधी पाण्यातून वाट काढत आम्ही तासाभरातचं नाळेच्या मुखाजवळ पोहचलो. निसरडे कातळटप्पे, हात टाकताच घरंगळत जाणारे दगड, वाटेतील काट्यांचे ओरबडे खात लक्ष्मण दादांच्या लगोलग आम्ही वाट चढत राहिलो. नदीपात्रात बरेच मोठे कुंड दिसून येत होते. त्यांत जवळच्या अदिवासी पाड्यातील लोकं खेकडी आणि माश्यासाठी जाळं लावण्याची तयारी करताना दिसली. आदिवासी दिवसभर उंबर्डी नदीच्या कुंडातील पकडलेले खेकडे आणि मासे विकून उदरनिर्वाह करतात. कुंडातील क्रिस्टल क्लिअर पाण्याकडे बघून त्यांतच उडी ठोकण्याची इच्छा होत होती, पण मंडप धबधब्याचा कानी गुंजनारा आवाज आमच्या पावलांचा वेग अजूनचं वाढवत होता. नाळेच्या डाव्याबाजूला असलेल्या उताराला वळसा घेत, घनदाट वाढलेल्या कारवीतुन वाट काढत आम्ही मंडप धबधब्यापाशी पोहचलो.
साधारणतः चारशे ते पाचशे फुटावरून कोसळणारे जलप्रपात आम्हाला मंत्रमुग्ध करून टाकत होते. पावसाळ्यात तर इथल्या नजऱ्याची कल्पनाचं न केलेली बरी. आता जरी पाण्याचा प्रवाह कमी असला तरी वाऱ्यामुळे उडणारे तुषार आमची धापा टाकत चढाई करून आलेली शरीरं थंड करीत होती. आम्ही खांद्यावरल्या बॅगा खाली ठेवेपर्यंत, भोप्याने पाण्यात उडी मारून पोहण्यास सुरवात सुद्धा केली. आम्ही सुद्धा जास्त वेळ न दवडता स्वतःला पाण्यात झोकून दिलं. बराच वेळ मनसोक्त पाण्यात डुंबल्यानंतर चांगलीच भूक लागली. भिजलेल्या अंगानेच आम्ही आमची शिदोरी उघडली. प्रत्येकाने आणलेली चकली, लाडू, चिवडा यांवर ताव मारत आपली भूक भागवली. दिवाळीच्या दिवसांत तर ह्या खेरीज दुसरी न्याहारी आमच्या ट्रेकला नसतेचं. सुरवातीला शांत असणारे लक्ष्मण दादा आता मात्र मनपूर्वक गप्पा मारू लागले. त्यांच्या लहानपणी ह्याच डोहातून मोठमोठाली खेकडी पकडून नेल्याचे त्यांनी सांगितले. पण हल्ली जास्त कोणी फिरकत सुद्धा नाही इकडे. धबधब्याच्या बाजूलाच असलेलं कालकाई देवीचं ठाणं दादांनी काठीनेच इशारा करून आम्हाला दाखवलं.
एव्हाना सूर्य माथ्यावर आला होता. घड्याळात एक वाजून गेला. आंघोळीनंतर उन्हाच्या प्रचंड झळा जाणवू लागल्या. सातनाळ चढून निसणीच्या वाटेने उतरण्याची आमची योजना क्षणार्धात मोडीत निघाली, त्यामुळे आल्यावाटेनेचं आम्ही उंबर्डीकडची वाट धरली. वाटेत कडीपत्याची बरीच झाडे दिसून येत होती. आईला हा कडीपत्ता दिला तर पुढच्या ट्रेकला लगेच आई पाठवेल ह्या विचाराने प्रत्येकजण कडीपत्याच्या फांद्या ओरबडून बॅगेत कोंबू लागला. तीव्र घासऱ्याची नाळ उतरून आम्ही नदीपात्रात पोहचलो. घामाच्या धारांनी आमची पुन्हा अंघोळ होत होती. नदीतील कातळामुळे उन्हाचा चांगलाच तडाखा आम्हाला जाणवू लागला. रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या नदीतल्या डोहातच भरून आम्ही आमची तहान भागवत होतो. डोहात एखादी चिंबोरी दिसली की दादा आणि आमचा आगरी वाघ त्या पाण्यात उतरून त्या पकडण्याचा अतोनात प्रयत्न करत होते. पकडलेली खेकडी दादांनी, त्यांचा टीशर्ट काढून त्यात बांधून घेतली. नदीतील एका डोहापाशी दादांनी एका बगळ्याला पकडले. आता खेकडी आणि मटण दोघांचीही सोय होणार म्हणून दादा भलतेच खुश झाले होते. पण आमच्या विनंतीचा मान ठेऊन त्यांनी बगळ्याला सोडून दिले. चिंबोऱ्यांची गाठोडी खांद्यावर टाकत दादा झपझप पावलं टाकू लागले. दगडांवरून चालून चालून आमचा वेग सुद्धा आता कमी होऊ लागला. वाटेत लागणाऱ्या डोहातील पाण्यात तोंड आणि डोक्यावर पाणी टाकत ऊन्हापासून स्वतःला वाचवू लागलो. आमच्यासोबत आलेला राजा सुद्धा डोह दिसताच त्यात पोहून स्वतःला थंड करत होता.
नदीतील तासाभराच्या चालीनंतर आम्हाला कुर्डुगड, बोरमाची आणि लवासाचा वॉच टॉवर दिसू लागले. समोरच्या बाजूला दिसणाऱ्या कुंभळ माचीची नाळ आणि ठिबठीबा नळीचा बेत लवकरच आखण्याची इच्छा भवऱ्याने बोलून दाखवली. गावाच्या जवळ आमची पावलं पोहचेपर्यंत सूर्य मावळतीकडे झुकला होता. घामाच्या धारेने टपकणारी आमची स्वारी दादांच्या अंगणात येऊनच थांबली. दादांनी घर उघडून आणलेली पाण्याची कळशी आम्ही घटाघट खाली केली. आमची शरीर-मन थंड करण्याच्या नादात नोव्हेंबर हिट ने पुरती घामटून निघाली. आम्ही देऊ केलेले पैसे सुद्धा नाकारत मित्रत्वाची जाणीव ठेवून त्यांचा निरोप घेत आपापल्या घरचा रस्ता धरला. सह्याद्रीच्या अश्याच खेड्यापाड्यातील अनोळखी लोकांकडून होणाऱ्या मैत्रीच्या नात्याने आपल्या आयुष्यात देखील सात रंग भरून जातात हे निश्चित.
( १९ नोव्हेंबर २०२० )
सुंदर अनुभव होता...खूपच सुंदर 🚩🚩
उत्तर द्याहटवाधन्यवाद मित्रा 😍💕
हटवाAmazing! Very well written!
उत्तर द्याहटवाHey, I'm Aditi from Adhunik Adventures. We're a start up travel company. We're actually looking to form a group for our Valley Of Flowers Trek in Uttarakhand. It is one of the most beautiful treks during this time of the year when the valley is in full bloom.
Our packages start at just Rs 6,999! Let us know if you or anyone you know is interested.
Thanks for reading! Means a lot to us.
💕💕
हटवा