गर्द हिरव्या वनात उठावलेला जांभ्या दगडाचा किल्ला - कमळगड
महाबळेश्वरच्या केट्स पॉइंट व पाचगणी परिसरातून दिसणारा वाई परगण्यातील कृष्णा आणि वाळकी नदीच्या मध्ये असलेल्या पठारावर उठावदार कातळकड्यांचा, समुद्रसपाटीपासून सुमारे १३५० मीटर उंचीचा कमळगड किल्ला ( उ. १७° ५८' २" , पू. ७३° ४४' ४१" ) आपलं नेहमीचं लक्ष वेधुन घेतो. हा किल्ला म्हणजे जणू गर्द हिरव्यादाट वनात फुललेलं लाल दगडाचं कमळचं! चहुबाजूंनी असलेल्या धारधार आणि सरळसोट कड्यांनी अभेद्य ठरणारा कमळगड उर्फ कमालगड. अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून लौकिक कमावलेले व दक्षिण काशी म्हणून विख्यात असलेले वाई हे गाव भौगोलिकदृष्ट्या सातारा जिल्ह्यात आहे. वाई मधील कमळगड, पांडवगड, वैराटगड, चंदन-वंदन या शिलाहारकालीन ( इ. स. ९०० ते १३०० ) गिरीदुर्गांची सैर करण्यासाठी मी आणि भोप्या ( रोशन भोपी ) ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी महाड वरून ९० किमी चा प्रवास करून वाई बस स्थानकाजवळ पोहचलो. समोरच असलेल्या हॉटेलमध्ये गरमागरम चहा नाष्टा करून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या वासोळे गावातील तुपेवाडी गाठली. रस्त्यालगतच लागणाऱ्या मेणवली घाट, नाना फडणवीस वाडा, धोम गावातील नृसिंह मंदिर या पर्यटन स्थळांना भेटी देत तुपेवडीच्या शेवटी असलेल्या कोंढाळकर आज्जींच्या घरासमोर गाडी पार्क केली.
दुपारचे बारा वाजले होते. सूर्य माथ्यावर आला असला तरी हवेत गारवा जाणवत होता. घराच्या आवारात आज्जी तीळ पाखडत बसल्या होत्या. अवकाळी पावसामुळे त्यांचा बराचसा तीळ गळून गेल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. आमच्या आजच्या ट्रेकची त्यांना कल्पना दिली व त्यांच्याकडून गडावर जाणाऱ्या वाटेची इत्यंभूत माहिती घेत त्यांनी दाखवलेल्या वाटेवर पाऊले टाकायला सुरू केली. तुपेवाडीच्या मागे दोन्ही डोंगराच्या मधोमध असलेल्या धारेवरून ही वाट वर जाते. डाव्या बाजूला नवरा नवरी डोंगर, उजव्या बाजूस कोळेश्वर पठार तर मागच्या बाजूस केंजळगड आणि रायरेश्वर पठार माथ्यावर पोहचेपर्यंत आपल्या दृष्टिक्षेपात राहतात. गोरक्षनाथ प्रतिष्ठानामार्फत वाटेवर जागोजागी मार्गदर्शक फलक (मार्किंग) लावलेले दिसून आले. तासाभरातच आम्ही अंगावर येणारी उभी चढाई करून कोळेश्वर पठारावर जाणाऱ्या वाटेजवळ पोहचलो. समोरची वाट बलकवडी-वहिगाव कडे खालच्या बाजूस जाते, उजवीकडील वाट माडगणीकडे/कोळेश्वर पठार, तर डावीकडील वाट कमळमाचीवर जाते. याच दिशेला दगड-धोंड्यानी रचलेल्या बांधाशेजारून वाट दहा मिनिटांतचं आपल्याला गोरक्षनाथ मंदिरापाशी पोहचवते. एका लोखंडी कमानीतून मंदिराच्या आवारात आपण प्रवेश करतो. मध्यवर्ती भागात असलेल्या औंदुंबराच्या झाडाखाली भग्न अवस्थेतील मुर्त्या पहावयास मिळतात. दोन छोटेखानी खोल्या, विटांच्या भिंती, त्यावर पत्राचं छप्पर आणि एक कळस अशी मंदिराची रचना. मंदिराला कुलूप असल्या कारणाने जास्त वेळ न दवडता माचीकडली वाट धरली. दाट जंगलातून जाणाऱ्या वाटेवर कचरा व्यवस्थापनावर जनजागृती करणारे फलक वाचत एका सपाटीवर आलो. येथून समोरील वाट थेट कमळमाचीवर जाते तर डावीकडील वाट पिण्याच्या पाण्याकडे ! गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने आम्ही पाण्याची वाट धरली. दहा मिनिटांतच आम्ही एका नैसर्गिक झऱ्यापाशी येऊन पोहचलो. कड्याच्या टोकावर समोरील बाजूस कोळेश्वर आणि रायरेश्वर पठाराची व्याती बघत झऱ्याचे गारेगार पाणी पीत एक क्षणभर विश्रांती घेतली. कमळमाचीवरील लोकं आणि वन्यजीव सुद्धा वर्षभर ह्याच पाण्यावर अवलंबून असतात. पाण्याच्या काही अंतरावरचं आम्हाला बिबट्याची विष्ठा निदर्शनास आली.
पाण्यापासून दहा मिनिटांतच आपण माचीवर पोहचतो. मध्यभागी एक प्रशस्त घर आहे. बाजूच्या शेतजमिनीत येथील लोक गव्हाची शेती करतात. घराची व्याप्ती बघता एखादं गाव राहू शकेल एवढी प्रशस्त जागा. तीन कुटुंब असलेल्या ह्या घराला लागूनच गुरांचा गोठा आहे. याच घरातील रहिवासी नारायण कचरे (९८३४९५४७४६) रोज १५ ते २० लिटर दुध वासोळे गावात विक्रीसाठी नेतात शिवाय येथे येणाऱ्या लोकांची जेवणाची सोय देखील करतात. पण त्याची कल्पना त्यांना आधीच द्यावी. घरच्या समोरून मळलेल्या वाटेने पंधरा मिनिटांतच गडाच्या तटबंदी जवळ पोहचलो. गडाचा पहिला दरवाजा याच भागांत असावा. या सपाटीवर कधीकाळी पहारेकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था असावी पण आज मात्र हा सर्व परिसर पडझड झालेल्या आणि दाट झाडीमध्ये लुप्त झालेला आहे. बालेकिल्ल्यावर जाणारी वाट कोसळली आहे. दोन दगडांमध्ये तयार झालेल्या खाचेवर पंधरा ते वीस पायऱ्यांची लोखंडी शिडी लावलेली आहे. या पायऱ्या चढल्यावर बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे जोते दिसतात. आणखी सात पायऱ्या चढून आपला बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. बालेकिल्ला म्हणजे दीड ते दोन हेक्टरमध्ये पसरलेलं एक पठारचं. चहुबाजूंनी धारधार ताशीव कडे त्यामुळे तुरळक ठिकाणीच तटबंदीचे अवशेष आढळतात. बालेकिल्ल्याच्या सुरवातीलाच एक लांबलचक विहीर जांभ्या दगडात कोरलेली दिसते. हा जांभा खडक पाचगणी- कोळेश्वर- महाबळेश्वर येथील पठारांवर तसेच कोयना नदीच्या दोन्ही तीरांवरील पठारांवर विस्तृत प्रमाणात दिसून येतो. जांभा खडकाखालील भाग लिथोमार्ज (चिकण माती) मातीयुक्त असतो. जेव्हा जाभ्यातील लोहाचे प्रमाण ४०% पेक्षा जास्त होते तेव्हा त्यास 'लोहयुक्त जांभा' असे म्हणतात व जर अल्युमिनियमचे प्रमाण ४०% पेक्षा जास्त झाल्यास 'अल्युमिनायुक्त जांभा' किंवा 'बॉक्साईट' म्हंटले जाते. किल्ल्यावरील या जांभ्यात खोदलेल्या सहा फूट रुंदीच्या व दीड ते दोन फूट कमी-अधिक उंचीच्या ५० पायऱ्या उतरून आपण विहिरीच्या तळाशी पोहचतो. यातील काही पायऱ्या कातळात कोरलेल्या तर काही बांधून काढलेल्या आहेत. खाली उतरण्यासाठी एक कायमस्वरूपी स्टील रोप फिक्स केलेला आहे. विहिरीच्या भिंतींना हात लावला असता लाल रंगाची माती (काव) आपल्या तळहातांना लागते. ह्यालाच गेरूची किंवा कावेची विहीर अशी सुद्धा ओळख आहे. विहिरीच्या तळाशी गारवा असल्याने तोंडातून निघणाऱ्या वाफेचे बाष्पीभवन होताना दिसत होते. विहिरीच्या छताला सूर्यप्रकाश आत येण्यासाठी तीन झरोके दिसून येतात. मुख्य विहिरीला लागूनच एक मातीने बुजलेली विहीर आहे. ह्या विहिरीच्या भिंतीत खडकात खोदलेले भव्य कोनाडे होते. यात कैदी ठेवत असत. त्यांच्यापुढे उपासमारीचे मरण किंवा विहिरीत उडी टाकून मरणे हे दोनच पर्याय उरत.
किल्ल्याच्या मध्यभागी एक २० फूट लांबी व ३० फूट रुंदीचे जोत्याचे अवशेष आहेत. त्यातील प्रत्येक जांभा दगड हा साधारणतः २×२ फुटांचा आहे. चौथऱ्याच्या मध्यभागी एक लोखंडी खांब झेंड्याकरिता रोवलेला आहे. जोत्याच्या समोरच कातळात पोस्ट होल्स व शिवलिंग कोरलेलं दिसतं. पूर्वेकडील बाजूस माची निमुळती होत गेलेली दिसते. त्यात काही ठिकाणी खडक बांधकामासाठी खणून काढलेला दिसतो. किल्ल्याच्या माथ्यावरून नैऋत्येस महाबळेश्वरचे पठार, वायव्येस कोळेश्वरचे पठार व मंगळगड, उत्तरेस रायरेश्वर पठार व केंजळगड, ईशान्येकडील बाजूस मांढरदेवीचा डोंगर व पांडवगड, आग्नेयेस पाचगणी पठार, वैराटगड व चंदन-वंदन पर्यंतचा सारा परिसर निरभ्र वातावरणात दृष्टिक्षेपात येतो. ट्रेक पूर्ण करण्यासाठी पाच ते सहा तासांचा कालावधी पुरेसा ठरतो. शिवाजी महाराजांनी सन १६७०-७१ मध्ये पांडवगड आणि एप्रिल १६७४ मधे केंजळगड घेतला त्याच दरम्यान या दोन किल्ल्याजवळील कमळगड हा सन १६७० ते १६७४ दरम्यान घेतला असावा. कमळगडी अंकुशी नावाची नाणी पाडली जात. सन १८०६ च्या दरम्यान ताई तेलीण यांच्या अधिपत्यात हा किल्ला होता. बहुदा याच काळात ही नाणी येथे पाडली जात असावीत. ही नाणी निश्चितच अंकुशी रुपयांप्रमाणे असावीत, असे मुद्राशास्त्रज्ञांचे मत आहे. परंतु अद्याप अशा प्रकारची नाणी इतरत्र सापडली नाहीत. पुढे एप्रिल १८१८ मधे मेजर थॅचर याने फारशी लढाई न करताच कमळगड ताब्यात घेतला. माथ्यावरून दिसणारे बलकवडी आणि धोम धरणाचं विहंगम दृश्य पाहताना, दाट झाडं आणि वेलींनी तयार झालेल्या मांडावाखालून जाणाऱ्या वाटा धुंडाळताना, निसर्गातील वैविध्यपूर्ण वृक्षवल्लींनी, दऱ्याखोऱ्यांनी आणि पशुपक्ष्यांनी नटलेल्या अश्या गडकोटांची वारी आत्मसुखाचा केंद्रबिंदू ठरते.
संदर्भ ग्रंथ :-
१) सातारा जिल्हा गॅझेटिअर
२) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे : प्रफुल्लता प्रकाशन
३) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
( ३० ऑक्टोबर २०२१ )
सुंदर अनुभव ❤️
उत्तर द्याहटवाधन्यवाद 💕✨
हटवा