चार तालुक्यांना एकत्र जोडणारा - देवाचा डोंगर

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड,मंडणगड,दापोली आणि रायगड जिल्ह्यातील महाड या तालुक्यांच्या भौगोलिक सीमांचा केंद्रबिंदू असलेल्या देवाच्या डोंगरावरील टेपाडावर मल्लिकार्जुन/महादेवाचे मंदिर आहे. महाडहून तुळशी खिंडीमार्गे खेडकडे जाताना मंदिराचा कळस दुरूनच लक्ष वेधून घेतो. देवाचा डोंगर म्हणजे जणू एक पठारंच!! समुद्रसपाटीपासून याची उंची सुमारे पाचशे मीटर आहे. पठारावर खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक, मंडणगड-भोळावली, दापोली-जामगे आणि महाड तालुक्यातील ताम्हाणे (टेंबेवाडी) ही गावे आहेत. २०० हेक्टरवर पसरलेल्या या डोंगरावर चारही गावे मिळून एकूण १५० घरं आहेत व ती सर्व हाकेच्या अंतरावर आहेत. टेपाडावर असलेल्या मल्लिकार्जुन मंदिराचा हल्लीच जीर्णोद्धार केलेला दिसून येतो. थेट मंदिरापर्यंत गाडीरस्ता झालेला आहे. वीस ते पंचवीस पायर्‍या चढून आपला मंदिरात प्रवेश होतो.



मंदिराच्या प्रांगणात समोरील बाजूस शेंदूर लावलेला दगड व डाव्या बाजूस एक तुळशी वृंदावन नजरेस पडते. मंदिराच्या गाभाऱ्यात खोलगट भागांत शिवलिंग कोरलेलं आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला मंदिरात उसत्व साजरा केला जातो. त्या दिवशी मोठया संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. याच टेकडीवरून सभोवताली दिसणारं विहंगम दृश्य थक्क करणारं आहे. निरभ्र वातावरणात किल्ले रायगड, प्रचंडगड, राजगड, कावळ्यागड, मोहनगड, प्रतापगड, मधुमकरंदगड, मिठखडा, महिपतगड, सुमारगड, रसाळगड, चकदेव व मल्लिकार्जुन पर्वत, पालगड आणि मंडणगड पर्यंतचा नजारा दृष्टीक्षेपात येतो.
पठारावर पावसाचे प्रमाण देखील जास्त आहे  व वर्षभर थंड वातावरण असते. पठारावरील घरे जांभा किंवा बेसाल्ट दगडातील व तीव्र उताराच्या छपराची आहेत. शेतीत भात, नाचणी, वरी इत्यादी पिकं घेतली जातात. येथे धनगर समाजाची वस्ती असल्याने दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. एकूण मिळून दररोज ३००-३५० लिटर दूध पालगड गावात डेअरीमध्ये विक्रीसाठी नेले जाते. चारही तालुके मिळून तीन शिक्षकी आठवीपर्यंत शाळा या डोंगरावर आहे. पुढच्या शिक्षणासाठी मात्र विध्यार्थ्यांना पालगड किंवा लाटवण येथील हायस्कूल मध्ये जावे लागते. पावसाळ्यात देवाच्या डोंगरावरील वातावरण अतिशय निसर्गरम्य असते.  दापोली, खेड, पुणे आणि मुंबई येथून अनेक पर्यटक व भक्तजन दर्शनासाठी हजेरी लावतात. एकाच वेळी चार तालुक्यांची सफर करायची असेल तर महाड शहरापासून अवघ्या ३६ किलोमीटरवर असलेला देवाचा डोंगर, तिथला सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवण्यासाठी तुमची आतुरतेने वाट बघतोय.



देवाच्या डोंगरावर जाण्यासाठी गाडीरस्ता :-
(खेड - तुळशी बुद्रुक - देवाचा डोंगर - २८ किमी),
(दापोली - पिसई - पालगड/विसापूर - जामगे - देवाचा डोंगर - ३५ किमी), 
(मंडणगड - लाटवण - भोळावली - देवाचा डोंगर - २७ किमी),
(महाड - विन्हेरे - तुळशी बुद्रुक - देवाचा डोंगर - ३६ किमी).





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ