निवळी गावातील बारव आणि कातळशिल्प
भारतात ब्रिटीश राजवट येऊन स्थिरावण्यापूर्वी शतकानुशतके आपल्या ज्ञानातून आणि परंपरेतून भारतीय समाज जलविज्ञानाचा वापर दैनंदिन गरजांसाठी करीत होते. त्याचा एक उत्तम नमुना म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी फाट्याजवळ रस्त्यालगतच जांभ्या कातळात खोदलेली ही बारव ! प्राचीन काळापासूनच सिंचन आणि पिण्यासाठी, पाण्याचा साठा वर्षभर रहावा यासाठी काटेकोर व्यवस्थापन धोरणांची अंमलबजावणी अशा विहिरींच्या माध्यमातून केलेली दिसते. जांभ्या खडकात खोलवर खोदलेल्या विहिरी भर उन्हाळ्यात सुद्धा थंड पाण्याचा आनंद देतात. साधारणतः ४० ते ५० पायऱ्यांची ही नंदा बारव (एकाच बाजूने विहिरीत उतरण्याचा मार्ग असलेली) प्रकारातील बारव आहे. कोकणात अशा प्रकारच्या विहिरींना घोडबाव सुद्धा म्हटले जाते. विहिरीच्या बाहेरील बाजूस दोन फूट लांब आणि दीड फूट रुंद दगडी भांडे पाहायला मिळते.
जयगड आणि रत्नागिरी यांसारख्या प्राचीन बंदरांमधून जाणाऱ्या मार्गावर वाटसरू आणि व्यापारी या दोन्हीसाठी ही विहीर म्हणजे एक वरदान असणार यात काही शंकाच नाही. पावसाळयात तुडुंब भरलेली निळ्याशार पाण्याची विहीर बघताच क्षणी मनाला भुरळ पाडते. निवळी फाट्यापासून ७५० मीटर अंतरावर असलेली विहीर आजूबाजूला नव्याने बांधलेल्या हॉटेल आणि रिसॉर्टमधूनही आपलं अस्तित्व टिकवून आहे.
विहिरीच्या समोरच रस्त्यापालिकडे एक १५ फूट × १५ फूट आकाराचे कातळचित्र / कातळशिल्प कोरलेले आहे. ह्याच ठिकाणामुळे सर्वप्रथम कातळचित्र ही गोष्ट लोकांसमोर आली. १९८० च्या दरम्यान नवीन रस्त्याचे काम चालू असताना कातळात खोदलेला चित्रांचा एक संच लोकांच्या नजरेस पडला. कोकणात सापडलेली ही कातळचित्रांची पहिली जागा. त्याचा बराचसा भाग हा आज रस्त्याखाली गाडला गेला आहे. उर्वरित भागांतील चित्रांमध्ये भौमितिक आकार, उभ्या-आडव्या रेघा आणि अनेक वक्राकार रेषा बघायला मिळतील. 'कोकणातील पर्यटन' या पुस्तकात प्र. के.घाणेकर यांनी निवळी गावातील कातळशिल्प या विषयावर प्रकाश टाकला. श्री.रवींद्र लाड यांचे 'कोकणातील कातळशिल्पे आणि सिंधू संस्कृती' आणि श्री. सतीश लळीत यांचे 'सिंधुदुर्गातील कातळशिल्पे' ही कातळशिल्पांवर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. उभ्या भिंतीवर कोरलेल्या चित्रांना Petroglyps म्हणतात. 'पेट्रा' म्हणजे दगड आणि 'ग्लिफिन' म्हणजे कोरीवकाम. आडव्या भिंतीवर / दगडावर कोरलेल्या आकृत्यांना किंवा चित्रांना geoglyps संबोधले गेले. ह्या चित्रांची काळनिश्चिती जरी झाली नसली तरी, ह्या आकृत्या कोणी व का कोरल्या असतील हे अजूनही एक गूढच आहे. जगात इतरत्र आढळणाऱ्या कातळचित्रांपेक्षा कोकणातील कातळचित्रे खूपच वेगळी आहेत. रत्नागिरीच्या निसर्गयात्री संस्थेने कोकणात एकूण ४० पेक्षा जास्त गावांतून १५०० पेक्षा जास्त चित्रे उजेडात आणली. युनेस्कोच्या यादीत कोकणातील कशेळी, रुंध्येतळी, देवाचे गोठणे, बारसू, देवी हसोळ, जांभरूण, कुडोपी, उक्षी आणि गोव्यातील पानसायमोल अश्या ९ ठिकाणची चित्रे समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे जगभरातल्या अभ्यासकांची पावलं नक्कीच इकडे वळतील. ह्या चित्रांच्या माध्यमातून व्यक्त होणारा मानव हा फारच कलात्मक आणि कल्पक बुद्धीचा असणार हे मात्र नक्की!!!
🙏🏼
उत्तर द्याहटवा😊
हटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏🏻😊
हटवाkeep writing, it's nice blog.
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻😊
हटवा