मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

      

कोकणातील मंदिर म्हटलं की डोळ्यासमोर येतं छान कौलारू मंदिर...समोर दीपमाळ, तुळशी वृंदावन, आजूबाजूला झाडी…या वर्णनाला न्याय देणारं आणि सोबत एक अनोखं वैशिष्ट्य असलेलं प्राचीन मंदिर म्हणजे शिरंबे गावचं मल्लिकार्जुन मंदिर !!. रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे गावात 'एकमेव जलमंदिर' अशी ओळख असलेलं मल्लिकार्जुन देवस्थान आहे. निबिड अरण्यात विसावलेल्या शिरंबे गावात पोचण्यासाठी, मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे - वहाल - शिरंबे असा २० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. थोडी वाट वाकडी करून बुरुंबाड गावात हेमाडपंथी शैलीचे आमनायेश्वर मंदिर आहे, त्यालाही भेट देता येते. 

शिरंबे गावात शिरताच दुतर्फा कोकणातील टुमदार घरं आपलं स्वागत करतात. गाव पार करून गेलं की दाट झाडीतून मल्लिकार्जुन मंदिर डोकावताना दिसतं. मंदिराच्या प्रांगणातील दोन दीपमाळा आणि वृंदावन आपलं लक्ष वेधून घेतात. पाण्यातलं हे अनोखं मंदिर बघता क्षणी आपल्याला गारव्याची अनुभूती देतं. याच प्रांगणात वरदायिनी वरदान व चंडकाई देवीची मंदिरे आपण पाहू शकतो. इथे कलाकृतीचा नजारा दिसला नाही, तरी कोकणची लोककला आणि स्थानिक संस्कृतीचे दर्शन मात्र नक्कीच घडते. मंदिराच्या जोते, भिंती यासाठी कोकणात प्रामुख्याने आढळणारा जांभा दगड उपयोगात आणला आहे. साग, असाणे यांसारख्या लाकडाचा वापर मंदिराचे खांब, दरवाजे, सभामंडप यांमध्ये केलेला दिसतो. 



चहुबाजूंनी असलेल्या पाण्याला झरा असून, तळे भरल्यावर उर्वरित पाणी शेजारी असलेल्या दोन कुंडांमध्ये जमा होते. ह्या दोन कुंडांतील पाण्याचा वापर गावकरी त्यांच्या गरजेनुसार करतात. तळ्यातील पाण्याची पातळी आणि गर्भगृहाची उंची एकच असल्याने शिवलिंग वर्षभर पाण्यात असते. मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक पूल बांधलेला आहे. हे कौलारू छप्पराचं बेटासम असलेले मल्लिकार्जुन मंदिर निसर्ग आणि मानवाच्या कलाकृतीचा उत्तम नमुनाच ठरावं!!

मंदिराच्या सभामंडपात नंदी असून त्यासमोर गणपती, मारुती आणि दत्त यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली दिसते. सभामंडप दगडी खांबावर उभे असून त्यावर चारपाखी मंगलोरी कौलांचा साज चढवला आहे. मंदिराचा जीर्णोद्धार १९७३ मध्ये केला आहे. तळ्यातील पाण्यात स्नान केल्याने आजारी व्यक्तीसुद्धा बरी होते, असा गावकऱ्यांचा समज आहे. त्यामुळे बरेच जण तळ्यातील पाण्यात मनसोक्त डुंबण्याचा आनंद लुटतात. या मंदिराबद्दल पूर्वापार सांगितलेली आख्यायिका अशी की एक शेतकरी नाचणीची मळणी करत होता, पण नाचणी संपतच नसल्याने हातातील मापटे दगडावर आपटून दगडाचे तीन तुकडे झाले. त्यातील एका तुकड्याची मल्लिकार्जुन मंदिरात स्थापना केली म्हणून यास नाचणदेव सुद्धा म्हणतात. 

कोकणातील पर्यटनाचा विचार करता, मंदिरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथील अनेक प्राचीन मंदिरांचे सौंदर्य पाहून डोळ्याचे पारणे फिटते. साधेपणातील सौंदर्य अनुभवायचे असेल, तर या मंदिरांना आवर्जून भेट द्यावी. कोकणातील पर्यटन नकाशावर अशी दुर्मिळ मंदिरे येणं आवश्यक आहे. कोकणचा विकास नक्कीच व्हायला हवा, पण त्याचबरोबर आपली संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांचं जतन होणंही तितकंच महत्वाचं आहे.



टिप्पण्या

  1. उत्तम आणि विस्तृत माहिती. 👍🏻

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ