अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला


           आदिमानवापासून ते आधुनिक मानवापर्यंत सर्वांनीच सुरक्षिततेसाठी नैसर्गिक गुहा व पुढील काळात भिंती, तटबंदी इत्यादी बांधकामाचा वापर केलेला दिसतो. इ.स.पूर्व ३५०० ते ६०० दरम्यान ईजिप्शियन संस्कृतीच्या काळातील राजवाडे तटबंदी, बुरूज आणि भोवतीच्या खंदकांनी सुरक्षित केलेले होते. इ.स.पूर्व २००० - १७७६ दरम्यान म्हणजेच बाराव्या राजवंशाच्या वेळी “सेम्ना” हा किल्ला बांधण्यात आला. तीच परंपरा पुढे मध्ययुगीन कालखंडाच्या शेवटापर्यंत चालू राहिली. प्रत्येक राजवटीत भौगोलिक परिस्थितीनुसार गिरिदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट या प्रकारच्या गडकोटांची उभारणी केलेली दिसते. युद्धनीतीनुसार किल्ल्यामध्ये खंदक, बुरुज, दरवाजे, तटबंदी, माची, कोठारे आणि जलव्यवस्थापन यात विभिन्नता आढळते. प्राचीन काळापासूनच कोकणात व्यापाराला चालना मिळाली होती. त्यामुळेच शहरे आणि बंदरे उदयास आली. व्यापाऱ्यांच्या प्रवासासाठी आणि निवाऱ्यासाठी घाटमार्ग, लेण्या, बारव, टाक्या आणि किल्ल्यांची बांधणी केली गेली.

                    गुहागर तालुक्यातील अडूर, बोऱ्या, बुधल, पालशेत, वेलदूर, अंजनवेल ही  प्राचीन काळापासून महत्वाची बंदरे होती. ग्रीक खलाश्याने पहिल्या शतकात लिहलेल्या 'पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी' या ग्रंथात पालशेत उर्फ 'पालपट्टमयी' या बंदराचे उल्लेख सापडतात. इ.स. पूर्व दुसऱ्या शतकापासून ते सोळाव्या शतकापर्यंत हे बंदर अस्तित्वात होते. बंदराच्या सुरक्षेसाठी साधारणतः दोन किलोमीटर लांबीची आणि तीन मीटर उंचीची भिंत व अर्ध गोलाकार बुरुज नदीपात्रात होते. आजही पालशेत गावात बंदराचे काही अवशेष पाहायला मिळतात. अतिशय उंच जहाजे या बंदरात लागत असत. येथून तिसऱ्या शतकापर्यंत रोम व ग्रीस यांच्याशी व्यापार होत असे. त्यात धान्य, तीळ, साखर, तांदूळ, आले, कापड, खाद्यतेले याशिवाय विविध प्रकारची मद्ये, कापड, तांबे- पितळ, जस्ताची भांडी, सोन्या-चांदीची नाणी, शिंपल्यांचे दागिने, चांदीचे पेले, थाळ्या यांची आयात-निर्यात होत असे. या सर्व मालाची वाहतूक नदी, गाडीरस्ता आणि सह्याद्रीच्या घाटामार्गे दख्खनच्या पठारावर वसलेल्या  करहाटक (कऱ्हाड) या शहराकडे होत असे. याच व्यापारी मार्गावर माणिकगड, नवते दुर्ग आणि कासारदुर्ग या किल्ल्यांची उभारणी केली असावी.

                कोकणावर राज्य केलेल्या सर्वांनीच या बंदरातून होणाऱ्या व्यापाराला महत्त्व दिलेले दिसते. सहाव्या शतकात चालुक्यांच्या काळात, रोम साम्राज्याशी व्यापार कमी झाला, परंतु इराणशी वाढला. सातव्या शतकात राष्ट्रकूटांच्या वेळी अरेबियन लोकांचे संदर्भदेखील येतात. आठव्या शतकापासून पुढे चारशे वर्षे ही बंदरे शिलाहारांकडे होती. पंधराव्या शतकानंतर तुर्कांचं प्राबल्य होतं. नंतर आदिलशाही आणि पुढे मराठयांचा अंमल या बंदरावर राहिला. विजयनगर साम्राज्याच्या काळात कोकणातील पवार नावाच्या सरदाराने गुढे गावात नवते दुर्गाची बांधणी केली, असे उल्लेख श्री. दत्तो पोतदार यांच्या शके १८३५ (इ.स. १९१३) सालच्या 'अंजनवेलची वहिवाट' या अहवालात (भारत इतिहास संशोधक मंडळ) मिळतात. 






                     नवते किल्ल्यावर पोहचण्यासाठी आपल्याला चिपळूण - रामपूर - मिरवणे - गुढे असा ३० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. गुढे गावात रस्त्यालगतच एका गणपती मंदिराची स्थापना केलेली दिसते. गावापुढील चढावरून खाली उतरलो की वळणावर गाडी लावून नदीपात्रात उतरता येते. नदीपात्रात खंदकाचे अवशेष आणि पाणी टाके पाहता येते. याच खंदकात कधीकाळी पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधला होता. फुटलेल्या बंधाऱ्यावरून निदर्शनास येते. किल्ल्याच्या तीनही बाजूनी वाहणाऱ्या नदीचा वापर खंदकाच्या स्वरूपात केला आहे. खंदकाचा कातळ हा पंधरा ते वीस फूट तासून काढला आहे व उर्वरित भागांत दगड रचून तटबंदी केली आहे. गर्द झाडीमुळे काही भागातच तटबंदीचे अवशेष नजरेस पडतात. नदीपात्राच्या मागील बाजूस दोन बुरुजांमधून किल्ल्यावर जाणारी वाट आहे. दाट माजलेली कारवी आणि उंच झाडांच्या गर्दीतून किल्ल्यावर जाणे सुद्धा कठीण झाले आहे, फोटोग्राफी तर अवघडच. गडाच्या वरील बाजूस असलेल्या प्रवेशद्वाराशी एका तुटलेल्या मूर्तीचे अवशेष आहेत. येथून उतरण्यासाठी काही पायऱ्या आणि तटबंदी दिसते. एक टाके, दोन जोत्याचे अवशेष आणि काही भागांतील तटबंदी व्यतिरिक्त किल्ल्यावर काहीच अवशेष शिल्लक नाहीत.

                  गडाच्या उत्तरेकडील बाजूस असलेल्या सपाटीवर वामनेश्वर मंदिर, मारुती मंदिर आणि केदारनाथचे मंदिर आहे. वामनेश्वर मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग, गणेशाच्या दोन मूर्त्या आणि पार्वतीची मूर्ती असून समोरील बाजूस दोन दीपमाळा आहेत. मंदिराच्या प्रांगणात एक प्राचीन विष्णूमूर्ती, त्या शेजारीच एक सतीशिळा आणि भग्नावस्थेतील नंदी पाहता येतो. याखेरीज मंदिराच्या आसपास तुटलेल्या अवस्थेतील शिवलिंग आणि दोन बुजलेल्या विहिरी व एक हल्लीच खोदलेली विहीर नजरेस पडते.






                 रस्त्यालगत असलेल्या मारुती मंदिरात एक वीरमारुती, गणपती आणि शेषशायी विष्णुमूर्ती आहे. प्राचीन मूर्त्यांवर ऑइलपेंट चे विद्रुपीकरण दिसून येते. याच मंदिराशेजारी एक वीरगळ आहे. वीरगळीच्या तळाशी एका प्राण्याचे अंकण केले आहे. मारुती मंदिराच्या मागे हल्लीच गावकऱ्यांनी गावदेवीचे प्रशस्त मंदिर बांधलेले आहे. त्यात केदारनाथ, जाकमाता, भैरी, नवलाई आणि वरदानदेवी यांची हल्लीच स्थपणा केलेली दिसते. किल्ल्याजवळ असलेल्या ह्याच सपाटीवर पूर्वी वस्ती असावी. गुढे गावात मूळ स्थान असलेली ही गुढेकर मंडळी फार पूर्वीच मिरवणे आणि चिपळूण या गावात वास्तव्यास गेली. होळीतील पालखीचे मानकरी देखील आजही गुढेकरच आहेत. शिमग्यात पाच दिवस चालणाऱ्या उत्सवात गुढेकर आवर्जून उपस्थित असतात. इ.स. १५०२ (शके १७२४) दरम्यान विजापूरच्या मुस्तफाखान सरदाराने पवारांचा हा किल्ला उद्धवस्त करून दाभोळपर्यंतचा भाग आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर आलेल्या राजवटीने ह्या किल्ल्याकडे मात्र दुर्लक्ष केले असावे. गर्द झाडीत आणि इतिहासाच्या कागदोपत्रात हरवून गेलेला हा नवते किल्ला, आजही आपला इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्याची वाट बघतोय.








संदर्भ ग्रंथ :-

१) रत्नागिरी जिल्ह्याची दुर्गजिज्ञासा - सचिन विद्द्याधर जोशी ( बुकमार्क पब्लिकेशन )
२) साद सागराची - पराग पिंपळे ( बुकमार्क पब्लिकेशन )
३) सुंदर गावे कोकणची ( दिवाळी विशेषांक २०२२ ) - 'पालपट्टमयी अर्थात पालशेत' - विशाखा चितळे
४) दुर्ग भरारी. इन - सुरेश निंबाळकर 

टीप :- वरील नकाशा प्रमाणानुसार नाही, किल्ल्याच्या क्षेत्रफळाचा अंदाज यावा यासाठी केलेला आहे. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ