देगाव येथील दशानन / रावणाचे अंकन केलेली वीरगळ



             युद्धभूमीवर रणसंग्रामात ज्यांना वीरगती प्राप्त झाली ते वीर चंद्र-सूर्य असेपर्यंत आपल्या स्मरणात राहावे यासाठी कर्नाटकांतून आलेल्या ह्या शिल्पप्रकाराला वीरगळ संबोधले गेले. अनेक विस्मरणात गेलेले शूर आणि पराक्रमी योद्धे यांच्या स्मरणार्थ केलेलं हे एक स्मारक म्हणजे इतिहासाचे मूक साक्षिदार. महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या वीरगळ आढळतात, त्यांतील वीरगळींवर अंकण केलेल्या लढाया, सशस्त्र सैनिक, लढाईसाठी सज्ज असलेले घोडदळ किंवा  पायदळ, सागरी युद्ध, गोधनाचे रक्षणकर्ते, हिंस्त्र प्राण्याशी लढतांना, शिकार करतानाचे शिल्पकारांनी केलेले हे सजीव सादरीकरण खूपच बोलकं आहे. आयताकृती (फक्त समोरील बाजूस अंकण केलेली) आणि स्तंभ वीरगळी (चारही बाजूंनी अंकण केलेली) असे वीरगळीचें मुख्य प्रकार पडतात. सर्वात खालच्या बाजूस वीर झोपलेला आणि ज्या कारणांमुळे वीरमरण आले त्या लढाईचे किंवा प्रसंगाचे चित्रण असते. त्याच्या वरच्या भागात वीर अप्सरांबरोबर किंवा स्वर्गरोहण चित्रण केलेले असते. शेवटच्या टप्प्यात वीर एकटा किंवा पत्नीसह शंकराच्या पिंडीची पूजा करताना म्हणजेच मोक्षप्राप्ती झालेला दाखवलेला असतो. त्यावर कलश किंवा चंद्र सूर्य यांच्या सुद्धा प्रतिमा कोरलेल्या असतात. त्या वीरपुरुषाची पत्नी सती गेली असेल तर कोपऱ्यात दुमडलेल्या हाताचा भाग हा सतीशिळेवर कोरलेला असतो. 

              रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील देगाव या गावी अश्याच एका वेगळ्या स्वरूपाच्या युद्धाचे अंकण केलेली वीरगळ आहे. म्हसळा-माणगाव रस्त्यावर मोरबे / मोर्बे गावातून वाट वाकडी करून गाडीरस्त्याने ३ किलोमीटरचा प्रवास करत आपण देगाव या गावी पोहचतो. गावाच्या शेवटी असलेल्या शेतालगत शिवमंदिराच्या प्रांगणात आठ ते नऊ वीरगळी ठेवलेल्या आहेत. त्यातील एका वीरगळीवर दशानन म्हणजेच दहा डोके असलेला धनुर्धारी वीरपुरुष हा एका प्राण्यावर उभा राहून तिर मारताना दिसतो. कदाचित शिल्पकाराला हा वीर रावणासारखा शूर असावा असे दाखवायचे असावे. रावणाला दहा तोंडे होती त्यामुळे त्यास दशमुखी हे नाव पडले. दहा तोंडे याचा सांकेतिक अर्थ त्याला महानतेकडे घेऊन जातो. रावण अतिशय विद्वान पंडित होता, त्याला चार वेद आणि सहा उपनिषद यांचे सखोल व संपूर्ण ज्ञान होते. दहा पंडितांची विद्वत्ता एकट्या रावणामध्ये एकवटली असल्याने त्याला दहा तोंडाचा असे म्हंटले जाते. दहा तोंडची संकल्पना त्याच्या असुर असण्यावर लावली जाते. त्याच्या पांडित्याची जाण रामाला देखील होती. राम त्याला आदराने महाब्राह्मण संबोधित असे. म्हणूनच जेव्हा रावण मृत्युशय्येवर पडला, तेव्हा रामाने त्याला अभिवादन केले. कदाचित रावणाच्या ह्याच प्रकृतीचे अंकण ह्या वीराबद्दल शिल्पकाराने केले असावे. 






               चारही बाजूंनी चित्रण केलेल्या पाच वीरगळी आपल्याला आजही पाहता येतात. उभ्या ठेवलेल्या तिसऱ्या वीरगळीवर स्वर्गप्राप्तीच्या रकान्यात फणा काढलेल्या नागाची प्रतिमा कोरलेली आहे. स्वर्गरोहणात छत्रचामर प्राप्त झालेल्या ह्या वीरगळी दंडनायकाच्या असाव्यात. आजूबाजूला पुरातन शिवमंदिराचे अवशेष विखरून निपचित पडून राहिलेले दिसतात. त्यात कोरीव खांब, नक्षीदार छताचा भाग काही वीरगळ यांचा समावेश आहे. मंदिरात शिवलिंग असून काही जीर्ण झालेल्या मुर्त्या दिसून येतात. माणगाव - म्हसळा रस्त्याने प्रवास करताना आपल्यासारख्या इतिहासप्रेमी मंडळींनी वेळात वेळ काढून ही आगळी वेगळी वीरगळ पाहायलाच हवी. ह्या अवशेषांवरून इतिहासाचा उलघडा होईलच असे नाही पण काहीतरी नवीन पहिल्याच समाधान नक्कीच मिळेल. 




संदर्भ ग्रंथ :- 

१) इतिहासाचे मूक साक्षिदार 'वीरगळ आणि सतीशीळा' - श्री. अनिल किसन दुधाने - मराठीदेशा फाउंडेशन 

२) शिल्पसमृद्ध कोकण - प्र. के घाणेकर, आशुतोष बापट - स्नेहल प्रकाशन 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ