नवसाला पावणारा उभादेव


       'येवा कोकण आपलाच आसा' असं दिलखुलास आमंत्रण देणारा सिंधुदुर्ग जिल्हा ! आपल्या मालवणी बोलीने आणि जेवणाने सर्वदूर प्रसिद्धी झाला. शिवरायांनी स्वतः बांधलेल्या मालवणजवळील सागरी किल्ल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वाचं स्थान आहे. नेहमीच्या पर्यटनस्थळांव्यतिरिक्त आवर्जून भेट द्याव्या, अशा अनेक निसर्गरम्य जागा जिल्ह्यात आहेत. तळकोकणातील मंदिरे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे देखणी आहेतच. तशीच गूढ आणि वेगळी वैशिष्ट्ये असलेली देवस्थानेदेखील जिल्ह्याच्या परिसरात प्रसिद्ध आहेत. असेच एक अनोखे देवस्थान आहे, 'श्री उभादेव'…
       गडनदी आणि जनवली नदीच्या काठावर वसलेल्या कणकवलीजवळ हे मंदिर आहे. कणकवलीहून कुडाळकडे जाणाऱ्या महामार्गावर एक किलोमीटर अंतरावर वागदे गावाच्या सीमेवर उभादेव हे जागृत देवस्थान वसलेले आहे. रस्त्यालगत असेलेल्या वाहनतळापाशी 'श्री उभादेव प्रसन्न' अशी कमान आपलं स्वागत करते. गड नदीच्या तीरावर गर्द झाडीमध्ये विसवलेल्या महाकाय वृक्षाच्या छायेत साधारणतः २५ फूट उंचीची एक शिळा उभादेव म्हणून पुजली जाते. नजीकच्या रत्नगिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यातून  भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. नवस पूर्ण झाल्यावर भाविकांनी केलेल्या इच्छेची प्रतिकात्मक वस्तू येथे बांधून ठेवली जाते. त्यामुळे झाडाला पाळणे, घर, लाकडी हाताचा किंवा पायाचा भाग, ट्रक, घंटा यांसारख्या वस्तू टांगलेल्या दिसतात. वागदे गावातील घाडीगांवकर हे येथील पुजारी असून त्यांच्या तोंडून गाऱ्हाणे घालून नवस फेडला जातो. काही भाविक हे नवसपूर्ती नंतर अन्नदान करतात तर काही कोंबडा किंवा बोकड देऊन नवस फेडतात.
         महामार्गापासून आत गेल्यावर लगेचच देवस्थानाचे दर्शन होते. प्रचंड उंच शिळा, त्याच्याभोवती बांधलेल्या अनेक वस्तू, झाडांची गर्द सावली आणि जवळच वाहणारी गड नदी ! सगळा परिसर अगदी शांत आणि मन प्रसन्न करणारा आहे. आदिम काळापासून पंचमहाभूतांना पूजण्याची प्रथा होती. निसर्गाच्या संहारक रुपापासून बचाव करण्यासाठी या शक्तींनाच देवतेचे रूप दिले गेले. विविध रुपात आपल्याला ही देवस्थाने आजही दिसतात. असाच हा 'उभादेव' !! कोकणात भटकंती करताना अशा आडवाटेवरच्या निसर्गरम्य जागा आवर्जून पहायला हव्यात. त्यामुळे कणकवलीजवळून मार्गस्थ होताना वाट वाकडी करून उभ्याउभ्या का होईना, उभादेवाचे दर्शन घ्यावे… 






टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे

अपरिचित गडकिल्ले - नवते किल्ला / गुढे गावचा किल्ला

नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ