देगाव येथील दशानन / रावणाचे अंकन केलेली वीरगळ
युद्धभूमीवर रणसंग्रामात ज्यांना वीरगती प्राप्त झाली ते वीर चंद्र-सूर्य असेपर्यंत आपल्या स्मरणात राहावे यासाठी कर्नाटकांतून आलेल्या ह्या शिल्पप्रकाराला वीरगळ संबोधले गेले. अनेक विस्मरणात गेलेले शूर आणि पराक्रमी योद्धे यांच्या स्मरणार्थ केलेलं हे एक स्मारक म्हणजे इतिहासाचे मूक साक्षिदार. महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या वीरगळ आढळतात, त्यांतील वीरगळींवर अंकण केलेल्या लढाया, सशस्त्र सैनिक, लढाईसाठी सज्ज असलेले घोडदळ किंवा पायदळ, सागरी युद्ध, गोधनाचे रक्षणकर्ते, हिंस्त्र प्राण्याशी लढतांना, शिकार करतानाचे शिल्पकारांनी केलेले हे सजीव सादरीकरण खूपच बोलकं आहे. आयताकृती (फक्त समोरील बाजूस अंकण केलेली) आणि स्तंभ वीरगळी (चारही बाजूंनी अंकण केलेली) असे वीरगळीचें मुख्य प्रकार पडतात. सर्वात खालच्या बाजूस वीर झोपलेला आणि ज्या कारणांमुळे वीरमरण आले त्या लढाईचे किंवा प्रसंगाचे चित्रण असते. त्याच्या वरच्या भागात वीर अप्सरांबरोबर किंवा स्वर्गरोहण चित्रण केलेले असते. शेवटच्या टप्प्यात वीर एकटा किंवा पत्नीसह शंकराच्या पिंडीची पूजा करताना म्हणजेच मोक्षप्राप्त...