गांधीटोपीच्या आकाराचा किल्ला - केंजळगड
पावसाळा सरून गेला की निसर्गात निरनिराळ्या रंगछटा बघायला मिळतात. हिरव्यागार गवताने अच्छादून गेलेल्या डोंगररांगा , त्यातूनच ओसंडून वाहणारे शुभ्र पाण्याचे ओहोळ , ढगांआडून चालणारा ऊन सावल्यांचा खेळ, धुक्यात गुडूप झालेली गिरीशिखरे, रंगीबेरंगी फुलांनी बहारलेली पठारे अश्या आल्हाददायक वातावरणात भटकंती करताना एक वेगळाच उत्साह अंगी असतो. पाचगणी, कास, रायरेश्वर या मावळातील पाठारांवर उमललेल्या सोनकी, तेरडा, कुर्डु, विंचवी अश्या रानफुलांचा आनंद घेण्यासाठी पर्यटन मोठ्या संख्येने गर्दी करतात. सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या महादेव डोंगररांगेत महाराष्ट्रातील सर्वात मोठं असलेल रायरेश्वर पठार आणि उत्तुंग असा केंजळगड किल्ला आहे. स्वराज्य स्थापनेची शपथ महाराजांनी रायरेश्वरावर शंभुमहादेवाच्या मंदिरामध्ये घेतली. राजा भोज च्या काळात बांधला गेलेला केळंजा उर्फ केंजळगड किल्ला, आदिलशाहीकडून १६७४ मध्ये शिवराज्याभिषेकाच्या एक महिना आधी मराठ्यांनी सुलतानढवा करून स्वराज्यात दाखल केला होता. केंजळगडच्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा उल्लेख बऱ्याच लेख आणि पुस्तकात वाचल्यामुळे त्याची ओढ जास्त लागली ...