संरक्षक वसाहत - किल्ले सोनगड
मौर्य, सातवाहन काळापासून कोकणातील सिमुला (चौल), मंदगोर (मांदाड), पालेपट्पण (पालेमहाड), दालभ्यपुरी (दाभोळ) व घोडेगाव (गोरेगाव) ह्या व्यापारी बंदरातून मालाची वाहतूक इजिप्त, अरबस्तान, इराण, ग्रीसमधील बंदराशी होत असे. सावित्री आणि गांधारी नदीच्या तीरावर वसलेल्या महाड बंदराचा व्यापार गलबतातुन सावित्री नदीमार्गे अरबी समुद्राशी जोडला गेला होता. महाड आणि दासगाव ह्या बंदरांच्या सुरक्षिततेसाठी सावित्री नदीवर बाणकोट, मंडणगड, दौलतगड, सोनगड आणि महेंद्रगड ह्या किल्ल्यांची उभारणी केलेली आढळते. आजही महाड शहराच्या प्रवेशाजवळ, गांधारी आणि सावित्री नदीच्या संगमापाशी महाड बंदराचे व तटबंदीचे अवशेष दिसून येतात. महाडच्या उत्तर पश्चिम बाजूस असणाऱ्या डोंगररांगेवर ३०० मीटर उंचीचा सोनगड हा किल्ला आहे. सोनगडावरील खांब टाके पाहता गडाची उभारणी मध्ययुगीन काळात झाली असावी असा अंदाज बांधता येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये जावळीच्या खोऱ्यात उतरून चंद्रराव मोऱ्यांचा पराभव केल्यानंतर जावळीच्या खोऱ्यातील चंद्रगड, मंगळगड, मकरंदगड, सोनगड, चांभारगड आणि रायगड हे किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. रा...