मनाला भुरळ पाडणारे महाड जवळील सुप्रसिद्ध धबधबे
कडाक्याच्या उन्हात तापलेला सह्याद्रीचा काळाकभिन्न कातळ जलधारांच्या वर्षावानंतर हिरव्याकंच शालीनं सजून आपले रौद्र रूप काही काळ दडवून ठेवतो. डोंगरकड्यांवरून एकसुरात कोसळणारे प्रपात, त्याच्याशी लगट करून दाटणारं दाट धुकं, भर्राट वाऱ्याचे झोत आणि नीरव शांततेनं, रानभूल न पडल्यासच नवल... निसर्गाचं हे सौंदर्य अनुभवणे म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभूती मिळाल्यासारखंच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला महाड तालुका नितांत सुंदर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. सावित्री, गांधारी आणि काळ नदीच्या तीरावर वसलेल्या महाड शहराला केवळ भूगोलंच नाही तर ऐतिहासिक वारसाही लाभला आहे. पावसाळ्यात रायगड किल्ल्या सोबतच आणखी काही ठिकाणे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहेत. ● नाणेमाची धबधबा :- महाड तालुक्यातील वाकी ( नाणेमाची ) गावातील आईचा बांध या नावाने नाणेमाची धबधबा ओळखला जातो. वेल्हे तालुक्यातील गुगुळशी गावातून आणि गाढवकडा / दुर्गाच्या कड्याशेजारून ह्या धबधब्याचे प्रपात स्वतःला ६०० मीटर उंचावरून झोकून देतात. ह्याच धबधब्याच्या कुंडाजवळ प्रसिध्द आई देवीचे देवस्थान आहे. हल्लीच हा धबधबा सोशल मीडियावर प्रस...