कातळभिंती तैलबैल्याच्या !
सह्याद्री हा ज्वालामुखीचा उद्रेक. उन, वारा, पावसाने झीज होऊन अतिप्रचंड, अतिराकट, अतिदणकट, काळाकभिन्न अश्या वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाल्या. अतिप्रचंड शिखरे, उंचच उंच सरळ सुळके, भयाण घळी, दाट दाट झाडी, खोल खोल दऱ्या, भयंकर तुटलेले ताठ कडे, भयाण कपाऱ्या, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, आधारशून्य घसरडे उतार, लांबच लांब सोंडा, दुभेद्य चढाव आणि मृत्यूच्या जबड्यासारख्या गुहा. त्यापैकी एक रचना म्हणजे तैलबैल्याच्या प्रस्तर भिंती. समुद्रसपाटीपासून १०३० मी उंचीच्या तैलबैला उर्फ कावडीचा डोंगर उर्फ भैरवनाथाचा डोंगर त्याच्या सरळसोट कड्यामुळे अगदी खोपोली, नागोठणे, पाली, माणगाव या भागातूनही आपलं लक्ष वेधून घेतो. पुणे शहरापासून ९० किमी वर असलेल्या कोरबारसे मावळातील हा किल्ला. किल्ल्याचे ठिकाण, अवशेष आणि आकार पाहता याला टेहळणीची जागा किंवा संरक्षक वसाहत हेच नाव त्यास उत्तम. प्राचीन काळापासून घाटमाथ्यावरून कोकणात उतरणाऱ्या वाघजाई, चीवर दांड, साव घाट, बोरघाट, कुरवंड्या घाट, घोडजीनाची वाट/तिवईची वाट, भोरप्याची नाळ, नाणदांड घाट, डेऱ्या घाट यासारख्या वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी तैलबैला चा वापर केला गेला. यासो...