अलिबागच्या अथांग सागरावर नजर हेरून असलेला गिरिदुर्ग - सागरगड
पावसाळा सुरू होताच वेड लागतात ते निसर्गाच्या सानिध्यात मनमुराद भटकंती करण्याचे, पावसाच्या धारेत ओले चिंब होत गडकिल्यांवरील सोसाट्याचा वारा अंगी झेलण्याचे. ट्रेक करताना वाटेत लागणाऱ्या धबधब्यात आणि नदीतील डोहात मनसोक्त डुंबण्यासाठी अलिबाग जवळील सागरगड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मुंबई, पुणे किंवा रायगड यांसारख्या कोणत्याही ठिकाणांहून सागरगड आणि अलिबागचे समुद्रकिनारे यांचा वन-डे विकेंड डेस्टिनेशन म्हणून विचार करता येईल. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यातचं आम्ही सागरगड आणि कनकेश्वरचा प्लॅन बनवला. माझा अलिबाग मधील मित्र भोप्या (रोशन भोपी) आणि त्याचा भाऊ असे तिघेही भल्या पहाटेच त्याच्या बेलोशी गावातून सागरगडाकडे मार्गस्थ झालो. अलिबागजवळील धरमतर खाडी ते रेवदंडा खाडी पर्यंतच्या परिसरावर वचक ठेवण्यासाठी सागरगड किल्ल्याची उभारणी केली गेली. सागरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला असला तरी सागरापासून ८ किलोमीटर लांब आणि १८°४२' उ., ७३°२०' पू., ४१४ मीटर उंच असलेल्या डोंगरावर हा किल्ला वसलेला आहे. ● सागरगडाचा इतिहास :- १) सागरगड किल्ल्यावरील खांबटाके आणि भुयारे यांवरून याची पायाभर...