किल्ले कोंढवी
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटाजवळ छोटेखानी कोंढवी नावाचा अपरिचित गिरिदुर्ग आहे. पोलादपूर बस स्थानकापासून ११ किलोमीटरचा धामनदेवी - फणसकोंड फाटा - तळ्याची वाडी असा खाजगी वाहनाने अथवा बसने प्रवास करून आपण कोंढवी किल्ल्याजवळ पोहचतो. (उ. १७°५५' २०.७०" पू. ७३°२७' १०.७०" ) तळ्याच्या वाडीतून जाणारा गाडीरस्ता सुमारे १०० मीटर उंचीच्या गडमाथ्यावर घेऊन जातो. वाटेच्या मधल्या टप्यात गडाचे पहिले भैरव मंदिर आहे. मंदिर प्रशस्त असून येथे मुक्काम करता येतो. मंदिरात काही मूर्ती ठेवलेल्या आहेत, पण शिल्पकलेवरून या मूर्ती ६० ते ७० वार्षपूर्वीच्या असाव्यात असे वाटते. गडाच्या सुरवातीलाच उजव्या हाताला मंदिराचे अवशेष आणि चौथऱ्यावर रंगरंगोटी केलेल्या वीर मारुतीच्या दोन मुर्त्या नजरेस पडतात. मंदिराच्या मागील बाजूस गाळाने भरलेल्या विहिरीचे अवशेष आढळतात. मारुती मंदिरच्या समोर असलेल्या आठ ते नऊ पायऱ्या चढून आपला कोंढवी किल्ल्यात प्रवेश होतो. कधीकाळी येथे गडाचे मुख्य प्रवेशद्वार असावे. साधारणतः गडाचा परिसर गोलाकार आकारात पाच एकरमध्ये दक्षिणोत्तर पसरलेला आह...