सातनाळ आणि मंडप धबधबा
नोव्हेंबर महिन्यातील दमछाक करायला लावणारं ऊन आणि त्यातच चालून आलेल्या दिवाळीच्या सुट्टीचं औचित्य साधून आमची उन्हातान्हात भटकणारी शरीर-मन सातनाळेतील मंडप धबधब्याखाली गारेगार करण्याची एक विराट योजना आखली."भटकंती घाटवाटांची" या डॉ. प्रीती पटेल यांच्या पुस्तकातील मंडप धबधबा आणि सातनाळ घाटवाटेचा लेख वाचल्यापासूनच मनात घर करून बसला होता. पण सतत कोसळणारा मुसळधार पाऊस, कोरोना आणि वाढलेलं लॉकडाऊन यांमुळे घराबाहेर पडणचं मुश्किल झालं होतं. वाढलेली कामे आणि कोरोना यांतून उसंत मिळताच, आम्ही महाडवरून उंबर्डी गावाच्या दिशेने रवाना झालो. दरवेळी प्रमाणे अलिबागचा वाघ म्हणजे आमचा भोप्या बऱ्याच दिवसांनी ट्रेकला जायचं म्हणून आमच्या आधीच माणगाव मध्ये दाखल झाला होता. महाड- माणगाव- निजामपूर- कडापे- जिते असा ५५ किलोमीटरचा प्रवास करून उंबर्डी गावात दाखल झालो. उंबर्डी नदीच्या तिरावर असलेलं हेमाडपंथी शिवमंदिर आणि त्यामागील मोसे खोऱ्यात दिमाखाने उभा असलेला कुर्डुगडाचा सुळका रस्त्यावरूनचं आमचं लक्ष वेधून घेत होता. फक्त दगड एकावर-एक रचून हे मंदिर उभारलं आहे. मंदिराच्या प्रांगणात बऱ्याच वीरगळ आणि सतीशिळा ...