चार तालुक्यांना एकत्र जोडणारा - देवाचा डोंगर
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड,मंडणगड,दापोली आणि रायगड जिल्ह्यातील महाड या तालुक्यांच्या भौगोलिक सीमांचा केंद्रबिंदू असलेल्या देवाच्या डोंगरावरील टेपाडावर मल्लिकार्जुन/महादेवाचे मंदिर आहे. महाडहून तुळशी खिंडीमार्गे खेडकडे जाताना मंदिराचा कळस दुरूनच लक्ष वेधून घेतो. देवाचा डोंगर म्हणजे जणू एक पठारंच!! समुद्रसपाटीपासून याची उंची सुमारे पाचशे मीटर आहे. पठारावर खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक, मंडणगड-भोळावली, दापोली-जामगे आणि महाड तालुक्यातील ताम्हाणे (टेंबेवाडी) ही गावे आहेत. २०० हेक्टरवर पसरलेल्या या डोंगरावर चारही गावे मिळून एकूण १५० घरं आहेत व ती सर्व हाकेच्या अंतरावर आहेत. टेपाडावर असलेल्या मल्लिकार्जुन मंदिराचा हल्लीच जीर्णोद्धार केलेला दिसून येतो. थेट मंदिरापर्यंत गाडीरस्ता झालेला आहे. वीस ते पंचवीस पायर्या चढून आपला मंदिरात प्रवेश होतो. मंदिराच्या प्रांगणात समोरील बाजूस शेंदूर लावलेला दगड व डाव्या बाजूस एक तुळशी वृंदावन नजरेस पडते. मंदिराच्या गाभाऱ्यात खोलगट भागांत शिवलिंग कोरलेलं आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला मंदिरात उसत्व साजरा केला जातो. त्या दिवशी मोठया संख्येने भाविक दर्शनासाठी येतात....