मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे
कोकणातील मंदिर म्हटलं की डोळ्यासमोर येतं छान कौलारू मंदिर...समोर दीपमाळ, तुळशी वृंदावन, आजूबाजूला झाडी…या वर्णनाला न्याय देणारं आणि सोबत एक अनोखं वैशिष्ट्य असलेलं प्राचीन मंदिर म्हणजे शिरंबे गावचं मल्लिकार्जुन मंदिर !!. रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे गावात 'एकमेव जलमंदिर' अशी ओळख असलेलं मल्लिकार्जुन देवस्थान आहे. निबिड अरण्यात विसावलेल्या शिरंबे गावात पोचण्यासाठी, मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे - वहाल - शिरंबे असा २० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. थोडी वाट वाकडी करून बुरुंबाड गावात हेमाडपंथी शैलीचे आमनायेश्वर मंदिर आहे, त्यालाही भेट देता येते. शिरंबे गावात शिरताच दुतर्फा कोकणातील टुमदार घरं आपलं स्वागत करतात. गाव पार करून गेलं की दाट झाडीतून मल्लिकार्जुन मंदिर डोकावताना दिसतं. मंदिराच्या प्रांगणातील दोन दीपमाळा आणि वृंदावन आपलं लक्ष वेधून घेतात. पाण्यातलं हे अनोखं मंदिर बघता क्षणी आपल्याला गारव्याची अनुभूती देतं. याच प्रांगणात वरदायिनी वरदान व चंडकाई देवीची मंदिरे आपण पाहू शकतो. इथे कलाकृतीचा नजारा दिसला नाही, तरी कोकणची लोककला आणि...